कर्नाटकात रेशीम किड्यांसाठी तुतीची लागवड

श्री. विद्याधर शामराव कुलकर्णी,
मु. पो. सिताळगेरा, ता. हुमणाबाद, जि. बिदर (कर्नाटक)
फोन नं. (०८४८३) २३६६९६५


पानांची / फांद्यांची तोडणी : प्रथम वर्षी चांगल्याप्रकारे तुतीची लागवड झाल्यास २.५ ते ४ महिन्यात झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. पाने रेशीम कीटकांना देण्यास पुरेशी होतात. पानांच्या एकरी उत्पादनावर रेशीम उद्योगातील अर्थशास्त्र अवलंबून आहे. १ किलो कोष निर्मितीसाठी २० किलो पाला लागतो. चीनमध्ये १६ किलो तुती पाल्यापासून १ किलो कोष तयार होतो. पहिल्यावर्षी १ एकर बागेत ३ - ४ हजार किलोपर्यंत पानांची निर्मिती होते, तर दुसऱ्या वर्षापासून वाणानुसार १२ ते २५ हजार किलोपर्यंत एकरी पानांचे उत्पादन होते. त्यानुसार सरासरी वर्षभरात ५ - ६ पिके सहज घेता येतात. १ एकर क्षेत्राची २ भागात विभागणी करून अर्ध्या - अर्ध्या भागावर स्वतंत्रपणे पिके घेत येतात. ज्यांच्याकडे कीटक संगोपन एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात घेण्याची सोय आहे, त्यांनी उपलब्ध पानांचा एकाच वेळी वापर करून संगोपन पूर्ण करावे. म्हणजे दुसऱ्या बॅचमध्ये अंतर राहते. त्याचा फायदा शेतीची इतर कामे, निर्जंतुकीकरण इत्यादींसाठी होतो व त्यामुळे उद्योग कीचकडीचा वाटता नाही. अलीकडे पानांच्या तोडणी ऐवजी पूर्णत: फांद्या तोडून कीटकांना खाऊ घातल्या जातात. त्यामुळे पाने तोडण्याच्या प्रमाणांमध्ये तसेच पानांचा पूर्ण वापर होत असल्याने एकरी मोठ्या प्रमाणात कीटक संगोपन करणे शक्य झाले आहे. पानांची, फांद्याची एकदा तोडणी / छाटणी झाल्यानंतर ४० - ५० दिवसात पुन्हा नवीन पीक घेता येते. पावसाळ्यात एकदा तळ छाटणी केली जाते व हे बेणे तुती लागवडीसाठी संचालनालय ७०० /- रुपये टनानुसार खरेदी करते.

कोषांचे उत्पादन : प्रथम वर्षाच्या एकरी तुती लागवडीपासून १५० - २०० कि. ग्रॅ. कोषाचे उत्पादन होते. दुसऱ्या वर्षापासून ४०० -५०० कि. ग्रॅ. कोष उत्पादन होऊ शकते. चीनसारख्या प्रगत राष्ट्रात एकरी १२०० किलोपर्यंत कोषांचे उत्पादन होते. आपल्या देशात आता व्ही - १ सारख्या तुतीचे व रेशीम कीटकांचे (सी.एस.आर.सारखे) सुधारित वाण उपलब्ध झाल्याने प्रति एकर कोषांचे वार्षिक उत्पादन १००० किलोपर्यंत वाढविणे सहज शक्य झाले आहे. महराष्ट्रात विशेषत: विदर्भातही ४० - ५० हजार रुपये एकरी उत्पन्न सहज निघू शकते. मराठवाडा व पश्चिम महराष्ट्रात एकरी रू. १ लाखापर्यंत उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी आहेत. याशिवाय आंतरपिके, तुती बेणे विक्रीपासून रू. ४,००० /- ते १०,००० /- जास्तीचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय तुतीचा राहिलेला पाला, विष्ठा इत्यादींचा गुरांसाठी चांगले खाद्य व सेंद्रिय खतासाठी वापर होऊ शकतो. 'रेशीम बरोबर दूध' अशी म्हण कर्नाटक राज्यात रूढ झालेली आहे. अशाप्रकारे तुती लागवड करून रेशीम कीटक संगोपनाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांना कापूस, मिरची व संत्र्याच्या तुलनेत हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

तुतीची नर्सरी तयार करणे : तुतीची लागवड पावसाळ्यात केली जाते. अनिश्चित स्वरूपात पडणारा पाऊस व पावसाच्या लहरीपणामुळे वेळेत पाण्याची सोय न झाल्यास तुती बागेत तुटाळी / गॅप्स पडतात. बागेत जिवंत झाडांची संख्या पुरेशी असल्याशिवाय पानांचे अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. तेव्हा लागवडीनंतर २ ते २.५ महिन्यात नर्सरी रोपाद्वारे तुटाळी /गॅप्स भरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी १ गुंठे क्षेत्रात जमिनीची चांगली मशागत करून २.५ ते ३ बैलगाड्या चांगले मुरलेले शेणखत टाकावे व त्याच्यामध्ये ३ किलो थायमेट पावडर टाकावी. ६ x ४ फूट आकाराचे गादीवाफे तयार करून ६ x ४ इंचावर तुती बेणे जर्मिनेटरची प्रक्रिया करून लावावे. लागवडीनंतर वेळोवेळी ५ - ६ दिवसांनी पाणी द्यावे. १५ ते २१ दिवसात बेणे फुटलेले दिसेल. २ महिन्यानंतर युरिया खताची मात्रा देऊन चांगली वाढ झालेली झाडे तुती बागेत तुटाळी ठिकाणी लावून तुती बागेतील झाडांची संख्या भरून काढता येते. रोपांची लागवड करताना विशेष काळजी घ्यावी व मुळांपासून १ फुटाचा भाग ठेवून शेंड्याचा वरील भाग तोडून रोपांची लागवड करावी.

रेशीम उद्योगासाठी शासनामार्फत सोयी सवलती

१) एक एकर क्षेत्रासाठी रू.१२०० /- ते १५०० / - किंमतीचे बेणे फक्त रू. २०० /- मध्ये उपलब्ध करून दिले जाते.

२) तुतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीपासून कीटक संगोपनापर्यंत पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण काळात रू. ३००/- विद्यावेतन दिले जाते.

३) रू. ३००/- किमतीचे रेशीम अंडीपूंज रू. १५०/- मध्ये सवलतीच्या दरात पुरविली जातात.

४) शेतकऱ्यांनी तयार केलेले कोष वाजवी दराने खरेदी करण्यात येतात किंवा इतर बाजारपेठेत उदा. हैद्राबाद, बेंगलोर, रामनगरम येथे जास्तीचा भाव मिळावा म्हणून विक्रीसाठी प्रोत्साहित केले जाते.

५) विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी केले जाते.

६ ) रोजगार हमी योजने अंतर्गत रू. १२०६३/ - प्रती एकरला १०० टक्के अनुदान दिले जाते. (साहित्य आणि रोख स्वरूपात) ३ वर्षे रेशीम उद्योग चांगल्या प्रकारे केला जाईल या अटीवर ते दिले जाते.

७) नाबार्ड पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना बँकेकडून प्रति एकर रू.५५ हजार पर्यंतच्या कर्जासाठी बँकेला शिफारस करण्यात येते.

८ ) ठिबक सिंचन संच शेतकऱ्यांना ५० टक्के सबसिडीवर दिला जातो.

९ ) कीटक संगोपनगृह बांधणीसाठी १०,०००/- ते ५०,०००/- रुपये अनुदान दिले जाते.

अधिक माहितीसाठी रेशीम विभागाच्या नजीकच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.