कृषी विज्ञान व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी शाश्वत!

श्री. सिद्राय विठ्ठल बिरादार,
मु. शिरगुर इनार, पो. पडनुर, ता. इंडी, जि. विजापूर.
मो. ०९९००८०३३९५


माझे किराणा दुकान आहे. गेली १० वर्षे मी 'कृषी विज्ञान' मासिक सकाळ - संध्याकाळ वाचतो. दुकानात गिऱ्हाईक नसले कि लगेच पुस्तक हातात घेतो. एकवेळ जेवण विसरतो, मात्र वाचन विसरत नाही. मी कृषी विज्ञानमधून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी बद्दल एवढे वाचले आहे की, ह्या टेक्नॉलॉजीएवढे शाश्वत काहीच नाही असे माझे ठाम मत आहे. कृषी विज्ञानचे एवढे वाचन झाले आहे की झोपेतही मी सांगू शकतो कोणत्या पानावर काय माहिती आहे.

हे तंत्रज्ञान वापरण्याची माझी १० वर्षापासून इच्छा आहे, मात्र घरातील आई, वडील, भाऊ, पत्नी हे वापरून देत नाही. ते म्हणतात, आपली पारंपारिक शेतीच बरी. शेवटी आज भांडण काढून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. मी घरच्यांना सांगितले, की तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करा, मला फक्त २ एकर शेती माझ्या पद्धतीने करू द्या. याला घरचे कोणीच तयार होत नव्हते. तरी मी त्यांचे न ऐकता पुण्याला आलो आहे. हे तंत्रज्ञान एवढे प्रभावी आहे की १० वर्षापुर्वीच वापरणे चालू केले असते तर आता मी चार चाकी गाडीतून फिरलो असतो. मागे मी सरांचा सिद्धिविनायक शेवगा लावायचा म्हटले तर त्यालाही घरच्यांचा विरोधच. आमच्या भागात अंधश्रद्धा फार आहे. ते म्हणतात शेवग्याचे झाड दारात किंवा शेतात असले तर दारिद्र्य येते. त्यामुळे शेवगा लागवडीस फार विरोध झाला. तरीही मी त्याकडे लक्ष न देता, त्यांचे न ऐकता शेवग्याचे तुमच्याकडून बी नेऊन ५००० रोपे तयार केली, मात्र रोपे तयार झाली तरी विरोध कायमच होता. त्यामुळे मी गावी गेलो असताना ती ५००० रोपे घरच्यांनी गावातील लोकांना फुकट वाटली. आज ते लोक त्याच शेवग्याच्या १० रु. ला ३ शेंगा विकतात. आमच्या घरातीलही लोक कधीकधी त्यांच्याकडून विकत घेतात, अशी परिस्थिती आहे.

आता २ एकरमध्ये कलिंगड लावणार आहे. त्याला पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे. आज (१५ फेब्रुवारी २०१७) सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. तेव्हा 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून कलिंगडाचे मासिक घेतले आहे. वेळोवेळी फोनवर पुणे ऑफिसच्या संपर्कात राहून सरांनी सुचविल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा अचुक वापर करणार आहे. आणि विक्रमी उत्पादन घेणार आहे.