१० गुंठे झेंडूपासून ३ महिन्यात २२ ते २८ हजार नफा

श्री. समीर राजाराम झांजुर्णे (बी. ए. इकॉनॉमिक्स ). मु.पो. तडवळे, ता. कोरेगाव, जि. सातारा.
मो. ९९२२९१०३२६


मी गेली आठ वर्षापासून सेंद्रिय शेती करीत आहे. यामध्ये गेल्या ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत आहे. एकूण ३ एकर भारी काळी जमीन आहे. पाणी विहीरीचे आहे. यामध्ये झेंडू, कांदा, टोमॅटो, ऊस ही पिके घेतो.

झेंडू दरवर्षी जुलैमध्ये १० गुंठे लावतो. इंका ऑरेंजची ४' x ३' वर लागवड असते. रोपे विकत घेतो. लागवडीनंतर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. नंतर पुन्हा १५ दिवसांनी दुसऱ्यांदा ड्रेंचिंग करतो. त्याने मुळ्या भरपूर फुटतात. खोड जाड होते. वाढ झपाट्याने होते. लागवडीनंतर १ महिन्यानंतर पहिली भांगलणी (खुरपणी) झाल्यावर कल्पतरू खत १ चमचा एका झाडास मातीत झाकून देतो. पावसाळ्यात पाणी देत नाही. इतरवेळी देतो.

त्यानंतर १ महिन्यानी वरीलप्रमाणेच १ डोस देतो. असे १० गुंठ्याला दोन्ही वेळचे मिळून ५० किलो कल्पतरू खत वापरतो.

शेणखत पुर्वमशागतीच्या वेळी १० गुंठ्याला ३ बैलगाड्या देतो. या व्यतिरीक्त कोणतीही खते वापरीत नाही.

तसेच वेळापत्रकाप्रमाणे ४ सप्तामृताच्या फवारण्या करतो. यामुळे दरवर्षी आम्हाला शेवटपर्यंत उत्तम दर्जाची फुले मिळतात. इतरांच्या प्लॉटमध्ये दसऱ्याची फुले तोडल्यानंतर झाडांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन फुलांवर डाग पडतात. त्यामुळे दर्जा ढासळल्याने भाव दुय्यम मिळतो. तसे गेल्या ३ वर्षापासून आपल्या प्लॉटमध्ये कधीही घडत नाही. आपली फुले दसऱ्याला तोडल्यानंतर दिवाळीतही त्याच क्वालिटीची फुले मिळतात. या दोन्ही सणांच्या वेळीच फक्त तोडणी करतो. १० गुंठ्यात ७५ ते ८० थैल्या (१३ ते १५ किलोच्या) एका वेळी निघतात. अशा दोन्ही सणाला मिळून १५० थैल्या सहज मिळतात. म्हणजे साधारण १९०० ते २००० किलो माल निघतो. मालाचा इतरांपेक्षा त्याच व्हरायटीत देखील कलर उठावदार असतो. फुले घट्ट वजनदार मिळतात. फुलांवर कुठलाही रोग (डाग) नसल्याने इतरांपेक्षा भाव जादा मिळतो. २० ते ४० पासून ५२ रू. किलोपर्यंत भाव मिळतो. सर्वसाधारण ३० - ३५ हाजार रू. चे उत्पन्न या झेंडूपासून मिळते. रोपे, मजुरी, सप्तामृत फवारणी, कल्पतरू खत याचा सर्व मिळून ७ - ८ हजार रू. खर्च येतो. १० गुंठ्यात ३ महिन्याच्या काळात खर्च वजा जाता २२ ते २८ हजार रू. नफा मिळतो.

५ गुंठे टोमॅटो खर्च ७ हजार, उत्पादन ३२ हजार

दरवर्षी विजेता ५ गुंठे आणि US १०३६ या जातीच्या टोमॅटोची ५ गुंठे असे १० गुंठ्यात गुढीपाडव्याला लागवड करतो. याची रोपे स्वत:तयार करतो. जर्मिनेटर + प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिया करून गादी वाफ्यावर रोपे तयार करतो आणि रोपांना एक फवारणी प्रोटेक्टंट २५ ग्रॅम आणी गोमुत्र ५०० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी करतो. एवढ्यावर ३ आठवड्यात रोपे लागवडी योग्य तयार होतात.

जर्मिनेटरच्या द्रावणात रोपांच्या मुळ्या बुडवून ४' x ३' वर लागवड करतो. लागवडीनंतर ३ ऱ्या दिवशी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करतो. यामुळे उन्हाळा असतानाही झाडामध्ये वेगळात सशक्तपणा येतो. त्यामुळे प्लॉट जोमदार निरोगी राहतो.

याला शेणखत ३ पोती आणि कल्पतरू १ पोते एकत्र मिसळून लागवडीनंतर १५ दिवसांनी देतो आणि फळे लागल्यावर याचप्रमाणे दुसरा डोस खोडाजवळ मातीआड करून देतो. झेंडू, टोमॅटोला ड्रीपने पाणी देतो. सप्तामृताच्या वेळापत्रकाप्रमाणे १५ दिवसाला नियमित फवारण्या घेत असतो, त्यामुळे प्लॉट सुरूवातीपासून निरोगी राहतो. तोडा जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतो. दर २ दिवसाला तोडतो. गेल्यावर्षी जुलै अखेरपर्यंत माल चालू होता.

गेल्यावर्षी ७ हजार रू. एकूण खर्च झाला होता. उत्पादन ३२ हजार रू. मिळाले होते. व्यापारी गावातून स्वत: मालाची प्रतवारी करून माल नेतात. क्रेट ३०० ते ६०० रू. ला जाते.

आज विविध पिकांबद्दल सरांचा सल्ला घेण्यासाठी आलो असता सरांनी कृषी विज्ञान मासिक आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पपई, केळी, डाळींब पुस्तके दिली, (संदर्भ - कव्हरवरील फोटो)