रेशीम उद्योग : शेतीपुरक व्यवसाय

श्री. एस. टी. शिंदे व श्री. बी. व्ही. भेदे
कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी


जगात रेशीमास असलेली मागणी, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि रेशीम उद्योगास असलेले अनुकूल हवामान लक्षात घेता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या अर्थिक समृद्धीसाठी रेशीम उद्योग हाती घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांना केवळ शेतीच्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा वाढता प्रपंच चालविणे व चरितार्थ भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. रेशीम उद्योग हा एक अत्यंत महत्त्वाचा शेतीवर आधारित कुटीरोद्योग असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकेंद्रित स्वरूपात रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. किटकांपासून रेशीम मिळविण्याची कला माणसाला हजारो वर्षापासून अवगत आहे. रेशीम उद्योगाखाली मुख्यत: तुती, टसर, मुगा आणि एरंडी या चार प्रकारचे रेशीम उत्पादन होते. हे चार ही प्रकार आपल्या देशात तयार होतात.

रेशीम उद्योग हा पर्यावरणाचे प्रदूषण न करणारा असून या उद्यागातून निर्मिती केलेले कोष योग्य भावाने व हमी किंमतीत खरेदी करण्याची हमी खादी ग्रामोद्योग मंडळाने घेतल्यामुळे उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ पाहण्याची मुळीच गरज नाही. याशिवाय रेशीम किडींचे संगोपन करीत असताना यावर आधारित इतर दुय्यम परंतु काही अर्थाजन करून देणारे व्यवसाय करता येण्यासारखे आहेत. रेशीम किटकांची विष्ठा मासळ्यांसाठी व बागेसाठी चांगल्याप्रकारचे खत आहे.

रेशीम कोषापासून कोषाचे हार, फुले, भेटकार्ड व इतर शोभेच्या वस्तू स्त्रिया व मुलींना घरच्या घरीच बनवून त्यापासून पैसे मिळवता येतात. तुतीच्या झाडापासूनही फर्निचर, खेळाचे साहित्य बनविता येते. म्हणजेच रेशीम उद्योग करीत असताना आपण त्यावर आधारित इतरही उद्योग सहजासहजी सुरू करू शकतो व आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो. भारतामध्ये तुती रेशीम याचे सर्वात जास्त उत्पादन होते. तुती रेशीम उत्पादनाच्या व्यवसायाची दोन प्रमुख अंगे आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे तुतीची लागवड आणि दुसरे म्हणजे रेशीम कीटकांचे पालन.

रेशीम उद्योग करण्यासाठी तुतीची लागवड करणे गरजेचे आहे. तुती लागवडीसाठी हलक्या ते भारी प्रकारची जमीन चालते. मात्र डोंगर - उताराची, निचरा न होणाऱ्या जमिनीत तुतीची लागवड करू नये. तुती लागवडीअगोदर जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. जमिनीचा सामू ६.५ ते ७ पर्यंत असणे गरजेचे आहे.

तुतीची लागवड सतत १५ वर्षापर्यंत अखंडपणे उत्पादन देत असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ठिकाणी लागवड करावी. तुतीची लागवड रस्त्यालगतच्या शेतात करू नये. अशी लागवड केल्यास तुती पाल्यावर धूळ साचून पाल्याची प्रत कमी होते. कीटक संगोपनास ही पाने खाद्य म्हणून देणे अयोग्य आहे. तुती लागवड करायच्या शेताजवळ तंबाखु व मिरची ही पिके लावलेली नसावीत किंवा कमीत कमी तुती लागवडपासून १०० मीटर अंतरावर तंबाखू व मिरची पिके असतील याची दक्षता घ्यावी.

तुतीची लागवड करताना जमीन नांगराने ३० ते ३५ सें.मी. खोल नांगरट करावी. जमिनीची नांगरट उभी व आडवी दोन्ही बाजूंनी करावी. जेणेकरून जमिनीचा कठीणपणा जाऊन ती मोकळी व भुसभुशीत होईल. एप्रिल व मे महिन्यात नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील कीड मरते. नांगरणी झाल्यवर एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून वखरणी करून घ्यावी. तुती लागवड करताना ५ x २ x १ फूट अंतर मध्यम जमिनीसाठी व ६ x २ x १ फूट हे अंतर भारी जमिनीसाठी वापरावे.

तुती लागवडीसाठी व्ही - १, एम - ५ व एस - ३६ अशा सुधारित जातीचे बेणे वापरावे. बेणे तयार करताना ६ ते ८ महिने वयाच्या तुतीच्या झाडांची १० ते १२ मि. मी. जाडीच्या फांद्या निवडाव्यात. बेण्याची लांबी ६ ते ८ इंच असावी. त्यावर किमान ३ ते ४ डोळे असावेत. तुकडे धारदार कोयत्याने करावेत. कोवळ्या फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरू नयेत. लागवडीअगोदर थायमेट १ टक्का द्रावणात हे बेणे बुडवून ठेवावे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात लागवड पूर्ण करावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे. रासायनिक खतांची मात्रा ३००:८०:८० कि. नत्र, स्फुरद व पालाश/हे./वर्ष द्यावी. नत्राची मात्रा ५ वेळा विभागून द्यावी आणि स्फुरद व पालाशची मात्रा २ वेळा विभागून द्यावी. रेशीम उत्पादन व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कीटकांच्या जातीपैकी तुतीवरील रेशीम कीटक ही एक जात आहे. या अळ्यांचे संगोपन तुतीच्या पानांचे उत्पादन आणि वाढ यांच्याशी निगडित असते. हवामानानुसार वर्षातून एकदा, दोनदा किंवा अनेकदा अळ्यांचे संगोपन केले जाते. रेशीम अळ्यांची वाढ त्यांना खाऊ घातलेल्या पानांच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. पाने रसरशीत आणि गर्द हिरव्या रंगाची असायला हवीत यासाठी बागेची काळजी घ्यायला पाहिजे.

किटकांच्या संगोपनासाठी साधनसामग्री : ज्या घरामध्ये आवश्यक ते तापमान (२४ ते २८ अंश सेल्सिअस) आणि आर्द्रता (७० ते ९०%) राखता येईल, असे घर संगोपनासाठी आदर्श असते. वायुजीवन होऊन हवा खेळती राहील असे घर असावे. आवश्यक त्या वेळी निर्जंतुकीकरण करता येईल अशी रचना असावी. घराचे छत साधारणपणे ३ मीटर उंच असावे.

मंच पद्धतीने कमी जागेत अधिक फायदेशीररित्या संगोपन करणे शक्य होते. लाकडापासून किंवा बांबूपासून बनविलेल्या संगोपन मंचामध्ये गाळ्यांमध्ये सोईस्कर आकाराचे ट्रे ठेवले जातात. हाताळण्यास सुलभ अशा हलक्या लाकडापासून ट्रे केले जातात व त्यामध्ये अळ्यांचे संगोपन केले जाते. अळ्यांची वाढ तुतीच्या पानांवर होते. सुमारे ३ - ४ आठवड्यांत पूर्ण वाढलेली अळी ७ ते ८ सें. मी. लांब असते. या काळात ३ - ४ वेळा कात टाकते. कात टाकण्यापूर्वी प्रत्येक वेळेस अळी पाने खाणे थांबविते. अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती कोषावस्थेत जाण्यासाठी तयारी करते. अशा वेळी ती खाणे थांबविते. तिचा रंग बदलून ती किंचित आकुंचन पावते. डोक्याकडचा भाग उंचावून ती या बाजूकडून त्या बाजूकडे सावकाशपणे हलविते. या अवस्थेमध्ये अळी कोष करण्यासाठी तयार झाली असे समजावे. अशा अळ्यांना नीट कोष तयार करता यावेत म्हणून प्लास्टिकच्या नेत्रिकेवर सोडण्यात येते. अळी त्या ठिकाणी स्वत:च्या शरीराभोवती रेशमाचे आवरण तयार करते व या आवरणामध्ये कोष तयार करते. कोषावरणासाठी वापरला जाणारा रेशमी धागा अखंड असून त्याची लांबी ८०० ते १२०० मीटर असते. कोषावस्था १० ते १२ दिवस टिकते. कोषामधून पतंग बाहेर पडण्यापूर्वीच वाफेच्या सहाय्याने किंवा इतर तंत्राचा अवलंब करून आतील पतंग मारण्यात येतो. संगोपनगृह आणि उपकरणांचे वरचेवर निर्जंतुकीकरण करावे. मेलेल्या अळ्या त्वरित जाळाव्यात. संगोपनाचे काम संपल्यानंतर संगोपनगृहे स्वच्छ धुवून कोरडी करावीत आणि २ ते ४ टक्के फॉरमॅलिनचा फवारा द्यावा. जंतुनाशक फवारणीनंतर सुमारे १५ ते २० तास संगोपनगृह बंद ठेवावे. त्यानंतर २४ तास उघडे ठेवावे.

रेशीम पतंगाचे रोगमुक्त अंडीपुंज रेशीम पैदास केंद्रामधून मिळतात. अंडी उबविण्याची क्रिया प्रामुख्याने सकाळी सुरू होते. अळ्या बाहेर यायला सुरुवात झाल्यावर अंडीपुंज असलेल्या कागदावर तुतीचा कोवळा पाला पसरावा. अळ्या आपोआप पाल्यावर येतील. त्यानंतर हा पाला संगोपनगृहामध्ये घ्यावा. बऱ्याचशा अळ्या सकाळी ८ वाजेपर्यंत बाहेर पडतात.

रेशीम अळ्यांची भरवणी : अळ्यांच्या योग्य वाढीसाठी त्यांना वेळच्या वेळी भरपूर आहार देणे आवश्यक आहे. साधारणपणे ५० अंडीपुंज्यातून (२५,००० अंडी) बाहेर पडलेल्या दुबार जातींच्या अळ्यांन पहिल्या अवस्थेच्या कालावधीत १०० अंडीपुजाच्या अळ्यांना साधारणपणे ३ किलो तुतीचा पाला लागतो. दुसऱ्या अवस्थेच्या कालावधीत ११ -१२ किलो, तिसऱ्या अवस्थेत ६४ किलो, चौथ्या अवस्थेत १६५ किलो तर शेवटच्या पाचव्या अवस्थेत १३०० किलो खाऊ घालावा लागतो. शेवटच्या अवस्थेत म्हणजेच पाचव्या अवस्थेत सर्वात जास्त खाद्य लागते. एकूण खाद्याच्या ८०% खाद्य या अवस्थेमध्ये लागते. साधारणपणे दिवसातून दोन वेळा भरवाणी करावी. परंतु पाचव्या अवस्थेसाठी दिवसातून ३ वेळा भरणी करावी. लहान अळ्यांसाठी नाजूक, मुलायम, लुसलुशीत आणि तंतुहीन पाने निवडावीत. मोठ्या अळ्यांसाठी रसरशीत परंतु जुना पाला वापरणे चांगले.सुरुवातीला पाल्याचे लहान तुकडे करावेत, प्रौढ अळ्यांसाठी संपूर्ण फांदी वापरावीत. अळ्या जसजशा वाढत जातात, तसतशी त्यांना जास्त जास्त जागेची आवश्यकता असते. साधारण प्रत्येक पुढच्या अवस्थेला पाठीमागच्या अवस्थेच्या दुप्पट किंवा तिप्पट जागा द्यावी. कात टाकतेवेळी अळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. या काळात ट्रेमध्ये आर्द्रता कमी असावी. कात टाकण्यासाठी सुमारे १५ ते ३० तास लागतात. सर्व अळ्या कात टाकून बाहेर आल्यानंतरच भरवणी करावी. कोषावस्थेत जाण्यासाठी तयार झालेल्या अळ्या अचलून नेत्रिकेवर ठेवाव्यात. कोष तयार करण्यासाठी अळीला सुमारे ७५ तास लागतात. साधारणपणे पाचव्या दिवशी सर्व कोष नेत्रिकेवरून काढवेत. असे कोष विक्रीसाठी तयार असतात.

रेशीम उद्योगाच्या यशस्वी उत्पन्नाच्या ३८.२ % बाग सकस तुती पानांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. रेशीम उद्योगासाठी शासनामार्फत सवलतीत तुती बेणे उपलब्ध करून दिले जाते. तुतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीपासून कीटकसंगोपनापर्यंत अल्प दरात पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. रेशीम अंडीपुंज सवलतीच्या दरात पुरविले जातात.

शेतकऱ्यांनी तयार केलेले कोष वाजबी दराने खरेदी करण्यात येतात. रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति एकरला अनुदान दिले जाते (साहित्य आणि रोख स्वरूपात) कीटकसंगोपनगृह बांधणीसाठी १०,००० ते ५०,००० रुपये अनुदान दिले जाते.

यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. या उद्योगात रोजगारांची प्रचंड क्षमता आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटक संगोपन धागानिर्मितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो.