उन्हाळा संपता संपता व मान्सून सुरू होताना 'सिद्धीविनायक' मोरिंगाच्या शेंगातील विकृती, कारणे, लक्षणे, दक्षता व उपाय

श्री. बाबुराव नानासाहेब कर्णे (वय ७४),
मु.पो. डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा.
मो. ९९६०९७०५३१



आम्ही सप्टेंबर २०१३ ला १।। एकर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला. जमीन मध्यम प्रतीची असल्याने लागवड ८' x ५' वर ठिबकवर आहे. या शेवग्याला पहिला बहार एप्रिल २०१४ मध्ये लागला. झाडाला शेंगा एवढ्या लागतात की, झाडापलिकडे माणूस उभा असला तरी दिसत नाही. शेवग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पहिल्या बहाराला फवारणी केली नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत २ महिने चांगल्या हिरव्यागार शेंगा मिळाल्या, मात्र पाऊस चालू झाल्यावर शेंगा पिचकणे, सडणे, पिवळसर कलर येणे असे प्रकार होऊ लागले. यासाठी क्लोरोपायरीफॉस, मोनोक्रोटोफॉस, नुवान फवारत असे. त्याने शेंगा पिचकणे, सडणे ४ - ५ दिवस थांबते. मात्र पुन्हा तोच प्रकार उद्भवतो. शिवाय किटकनाशकाचे जर प्रमाण १ लि. पाण्याला १ मिली पेक्षा जास्त झाले तर पानगळ होते. यावर सरांनी सांगितले, "शेवग्याची पाने ही अतिशय तलम, पातळ, पोपटी, नाजूक असल्याने पानगळ होते. जर वापरायचे झाले तर १ मिली प्रमाणेच वापरावे, अन्यथा विषारी किटकनाशक वापरू नये. सप्तामृताने पानगळ होत नाही." गेल्यावर्षी १० ते १२ टन माल विकला. सुरूवातील ६० रू. भावाने सातारा, पुणे मार्केटला विकला. पुढे भाव थोडा कमी होत शेवटी १५ रू. ने विकला. एप्रिल २०१४ ला चालू झालेल्या शेंगा ऑगस्ट २०१४ पर्यंत चालल्या. नंतर सडण्याचे प्रमाण ८०% वर गेल्यावर पुढे सप्टेंबर - ऑक्टोबरला छाटला. त्याला डिसेंबर - जानेवारीत फुल लागले नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये सरांना भेटण्यासाठी आलो होतो. मग सरांच्या मार्गदर्शनानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, क्रोपशाईनर प्रत्येकी ५ - ५ लि. घेवून गेलो. त्याच्या मार्च - एप्रिलमध्ये (२०१५) ३ फवारण्या घेतल्या. तर एप्रिल २०१५ ला शेंगा चालू झाल्या. पुढे शेंगांना कलर हिरवागार मिळण्यासाठी पुन्हा सप्तामृताच्या २ फवारण्या केल्या. त्यामुळे शेवटपर्यंत कलर हिरवा राहिला. या बहाराचा १२ ते १४ टन माल विकला. या वर्षी ३० रू. पासून ६० रू. दर मिळाला. सध्या पावसाळ्यात ६० रू. दर आहे. मात्र गेल्या २ वर्षातील पावसाळ्यातील, पादुर्भाव पुन्हा भेडसावू लागला आहे. यासाठी पिचकलेल्या, सडलेल्या, शेंगातून चिक बाहेर आलेल्या शेंगा सरांना दाखविण्यासाठी आज (२२ जून २०१५) घेवून आलो आहे.

शेंगाची पाहणी केल्यानंतर सरांनी सांगितले, सुरूवातीला सनकाडी ते तुरखाटी, दातवानाच्या कडू लिंबाच्या काडीसारख्या शेंगावर हा प्रादुर्भाव होतो. शेंगाचा गर हुरडयासारखा नाजूक व वाटाण्यासारखा गोड, मऊ असताना ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हा पावसाचा आघात झाला की, तेथे पांढरी बुरशी येते. तेथे शेंग पिचकते, चिर पडते, शेंगातील गराचा चीक बाहेर येतो. त्या गराला ओल्या भुईमूगाच्या शेंगेचा वास येतो. त्यावर अळी लागते. बुरशी, मावा, काळा करपा येतो. याचे प्रमाणे वाढले की, शेंगाचे पावसाळ्यात ९०% पर्यंत नुकसान होते. तेव्हा याच्या नियंत्रणासाठी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ७५० मिली + क्रॉपशाईनर ७५० मिली + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + राईपनर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + कॉपरऑक्झीक्लोराईड ५०० ग्रॅम + बावीस्टीन १५० ग्रॅम + १५० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करा. 'सिद्धीविनायक' शेवगा निर्यात करायचा झाला तर शेंगा तोडण्यापुर्वी १ महिना म्हणजे वाद्या लागण्यापासूनच अति कडक ऊन, अति पाऊस व थंडी असतानाच्या अवस्थेत क्रॉपशाईनरचे प्रमाण वाढवून कार्बनडेझिम आणि हार्मोनी व स्प्लेंडरचा वापर करून बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या पिकावरील विकृती आटोक्यात आणता येते का ? हे पडताळून पाहणे व त्याचे नमुने दाखवायला आणणे. अतिपाऊस , झिमझिम पाऊस, आभाळ आले किंवा वैशाख, भाद्रपदातील ऊन या अवस्थेत दक्षिणेकडील पाने, फुले घेऊन भेटावे. म्हणजे त्यावरील उपायाचा प्रयोग का, केव्हा व कसा करावा ? हे त्यावरील निरीक्षणे करून करता येईल.

मी सरांना विचारले, "जुलै - ऑगस्टमध्ये शेवग्याची जर छाटणी केली. तर २- ३ महिन्यात शेंगा लागतील का ?" यावर सरांनी सांगितले, "ऑगस्ट महिन्यात तापमान कमी १२ ते २५ डी. सेल्सिअस असते. पावसाचे प्रमाण कमी अधिक झाले तरी पाऊस असतो आणि छाटणीसाठी योग्य काळ सप्टेंबर व अर्धा ऑक्टोबर (भाद्रपदातील ऊन) जो मूग काढणीचा काळ असतो. या काळात तापमान २८ पासून ३६ डी.से. असते. आणि नवरात्राची पहिली माळ सुरू असताना पाऊस किंवा दव पडते त्यावेळी छाटणी करू नये. कारण याकाळात फूट निघण्याकरिता वातावरण अनुकूल नसते.

सप्टेंबरची गोडी (कमी) छाटणी असते. छाटणी डोळ्याच्यावर क्रॉस अर्धा ते पाव सेमी (०. २५ मिमी) करावी. म्हणजे नोव्हेंबरमध्ये फूल लागून वाध्या ह्या फुले ओवायच्या मोठ्या सुईसारख्या लागतील. सुतळी व दाभणाच्या आकाराच्या शेंगा लागतील. खत, पाणी आणि फवारणीचे व्यवस्थापन केले व शारिरीक चयअपचय, विकृती आटोक्यात आली तर डिसेंबरमध्ये शेंगा मार्केटमध्ये येऊन २५ रू. पासून १०० रू. किलो दराने थंडीत शेंगा विकल्या जातात. कारण थंडीत शेंगा कमी लागतात.

परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थंडीतदेखील भरपूर, वजनदार, हिरव्यागार पाचूसारख्या, चमकदार, मटणासारख्या चवदार, चिकनसारख्या लवचिक व पॉपलेट पेक्षा स्वादिष्ट मिळतात. म्हणून महागडे नॉनव्हेज खाणारी मुले खाण्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची भाजी खाणे पसंत करतात. म्हणजे काल 'योगा' आंतरराष्ट्रीय महोत्सव साजरा झाला व् त्याच्या जोडीला बाबूराव कर्णेनी समस्या सांगितली त्याला उत्तर म्हणून जे सरांनी सांगितले. हे आरोग्यवर्धक शेवग्याचे उपयोग हे मावन जातीला किती उपयुक्त आहे. हा एक योगायोग असून दुग्धशर्करा योग आहे. म्हणजे भारताने जो योगाचा संदेश विश्वाला दिला तितकेच महत्त्व शेवग्याला आहे म्हणून त्याचा आहार व आरोग्यात समाविष्ट करणे म्हणजे आखूड शिंगी, कमी खाणारी, पाचक दूध देणारी आरोग्यवर्धक असा 'सिद्धीविनायक' मोरिंगा आहे असे बाबुरावांना सरांनी सांगितले.

सरांनी शेवटी जाताजाता सांगितले, उत्पन्न जरी चांगले असले तरी आपणास मिळणारे उत्पन्न हे दर्जेदार शाश्वत आसवे. मार्केटमध्ये मागणी असणारे म्हणजे बर्गर, पिझ्झा, पास्ता यासारखे आरोग्यास हानीकारक नसावे. ते मानव जातीचे आरोग्यास उपकारक असावे. ते मानवी जिवनाच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहे.

वरील प्रयोग केल्यानंतर दक्षिणेकडील फांदी फुले, पानांचे, तसेच दोरा, सुई, सुतळी, सन काडी करंगळी या अवस्थेतील शेंगांचे नमुने आणि मातीचे पृथ:करणही घेऊन यावे. म्हणजे सविस्तर विवेचन करून सप्टेंबरच्या छाटणीचे विवेचन करता येईल.