मधमाशा, शाश्वत शेती आणि वनसंवर्धन

डॉ. क. कृ. क्षीरसागर,
१२१४, शुक्रवार पेठ, ७वा रस्ता सुभाषनगर, पुणे - ४११००२.
मो. ९४२२०८०८६५


माणसाला मध आणि मधमाशा यांची ओळख फार प्राचीन काळापासून झाली. भारताभोवतालचं भूक्षेत्र आणि आफ्रिका हे मधमाशांचा उगमस्थान, आजच्या मधमाशांचं वंशशाश्त्र, शरीर रचना, सामुहिक जीवनप्रणाली आणि स्वभाव विशेष यांच्या शास्त्रीय अभ्यासावरून त्याचप्रमाणे पुरातत्त्वशाश्त्र प्राचीन वाड्मय यांच्या मदतीने मधमाशांच्या उत्क्रांतीचं आरेखन करता येतं. त्यांच्या या उत्क्रांतीचं निकटच नातं वनस्पतींच्या उत्क्रांतीशी जोडावं लागतं.

निम्न श्रेणीच्या अपुष्पीय वनस्पतींपासून सपुष्प वनस्पती जगात निर्माण झालं. काळाच्या त्या ओघात प्राणिजगतही अस्तित्वात आलं. प्राण्यांच्या विविध जातींची व प्रजातींची निर्मिती चढत्या श्रेणींने होत गेली. त्यातच कीटकवर्ग उदयाला आला आणि कीटकांमध्ये उत्क्रातींच्या अगदी वरच्या पायरीवर असणाऱ्या सामूहिक जीवन जगणाऱ्या मुंग्या, वाळवी, गांधीलमाशा आणि उत्युक्रांत मधमाशा निर्माण झाल्या.

गांधील माशांसारख्या पूर्वजांपासून विकसीत होत होत मधमाशांची निर्मिती झाली. मात्र त्यांना वनस्पतींच्या उत्क्रांतीक्रमाशी निगडीत राहावं लागलं. हा सर्व घटनाक्रम ५ ते ७ कोटी वर्षांचा आहे.

अनेक जातींच्या फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाशा त्यांच्या जीवनक्रमासाठी व अस्तित्वासाठी परस्परांवर अवलंबून असतात. कालौघात हे परस्पर अवलंबित्व अधिकाधिक दृढ होत गेलं. अशा वनस्पतींच्या फुलातून मधमाशांना त्यांचं एकमेव अन्न, म्हणजे पुष्परस (मकरंद) आणण परागकण मिळतात. त्या बदल्यात मधामाशंकरवी होणाऱ्या परागीभवनामुळे फुलांमध्ये बीज धारणा वा फलधारणा होते. हे खाद्य गोळा करण्यासाठी त्यांना मधमाशांच्या केसाळ शरीरावर अडकलेले पराग कण एका फुलातून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचविले जातात. अशा रितीने पर- पराग सिंचन होऊन बीज व फळधारणा होते. वनस्पतींचा वंश पुढे चालू राहतो. शिवाय त्यामध्ये गुणसंवर्धनही होतं, विविधता वाढते व ती टिकून राहतो. वनस्पतीजीवन समृद्ध होतं. वनस्पतींचा मधमाशांना फक्त खाद्यपुरवठ्यासाठीच उपयोग होतो असं नाही तर, त्यांच्या मोहोळांना सुरक्षित आसरा देण्यासाठीही होतो. मधमाशा आणि वनस्पतीचं हे सहजीवन लक्षावधी वर्षांपासून अस्तित्वात आलं आहे. आता ते अधिक समृद्ध करण्याची मध्यस्थाची भूमिका माणूस करू लागला आहे. ती संयमितपणे व नियोजितपणे वटवणं ही त्याची जबाबदारी आहे.

शेती, वने आणि मधमाशा : -

वनांचं, शेतीचं आणि मधमाशांचं अस्तित्व परस्परावलंबी आहे. ते शाश्व्त आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला मोठ्या नियोजनाची आवश्यकता आहे. त्यावरच आपलंही अस्तित्व अवलंबून आहे.

वनांचे प्रकार, भौगोलिक परिस्थती, हवामान, पर्जन्यवृष्टी, जमीन, डोंगरदऱ्या, सपाटी, समुद्राचं सान्निध्य या घटकनामुळे वौशिष्ट्यपूर्ण होतात. भारतात पश्चिम घाट, पूर्वघाट, विंध्यद्री, अरवली, सातपुडा, निलगिरी, पळणी डोंगररांगा आणि हिमालयीन पर्वतश्रेणी या भागात विविध प्रकारची जंगले, झाडझाडोरा आढळतो. समुद्र किनारपट्टीवरच्या दलदलीतही जंगलाचं अस्तित्व दिसतं. जंगला लगतचं शेतीचे पट्टे आढळतात. या भागात मधमाशांना अनुकूल अधिवास लाभतो. असे पट्टे भारताचं ५०% भौगोलिक क्षेत्र व्यापतात.

जंगलामध्ये आकाशाला भिडणाऱ्या वृक्षांपासून ते जमिनीलगतच्या खुरट्या वनस्पतीपर्यंत असंख्य प्रकार आढळतात. अगदी कच्छच्या वाळवंटाजवळच्या बाभुळ व तत्सम वनस्पतीवंरही फुलोरी जातीच्या छोट्या मधमाशा वसती करतात.

पर्जन्यवनांमध्ये वृक्षांच्या सहाय्याने वाढणाऱ्या वेलीचं जाळंही वैशिष्ट्यपूर्ण असते. या विविध वनस्पती मधमाशांना अन्न आणि निवारा पुरवतात. या बदल्यात मधमाशा या वनस्पतींचा वंश पुढे चालवण्यास मदत करतात. परागीकरणातून त्यांची बीजधारणा व फळधारणा वाढवतात. समृद्ध जंगलांच अस्तित्व हे मधमाशांमुळे टिकून राहातं, अधिक समृद्ध होतं. वनस्पतीचं जैववैविध्य वाढतं. मात्र माणसाने जंगलाच्या नैसर्गिक रचनेत ढवळाढवळ केली तर या दोन्ही घटकांच संतुलन बिघडतं आणि शेवटी मानव व अन्य जीवजगतावरच संकट कोसळतं. एकाच प्रकारच्या झाडांची लागवड स्वार्थासाठी अनियोजनपूर्वक जंगलतोड, शेतीसाठी जंगलच्या जागेचा अनिर्बंध वापर, पर्यटनासाठी जंगलांवर आक्रमण, कारखाने, खाणी यासाठी जंगलजमिनीचा अंदाधुंद वापर अशा अनेक कृत्यांमुळे वन - वनस्पती व मधमाशांच्या नैसर्गिक नात्याची साखळी तुटते. यावर उपाय म्हणजे नियोजनपूर्वक वनीकरण करणे हाच होय. त्यासाठी मधमाशांना उपयोगी वृक्ष असणाऱ्या अन्य वनस्पतींची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. या वनीकरणात कृषीवनीकरणाचाही समावेश होतो. त्यामुळे शेतीलाही फायदा होतो. शेतीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी वनशेती पूरक ठरते आणि अशी वनशेती करताना. लाकूड, फळे, फुले, वाऱ्याच्या माऱ्याला प्रतिबंध या बाजूंचा जसा विचार करावा त्याचप्रमाणे मधमाशांना उपयोगी पडतील अशा वृक्षजातींचाही विचार व्हावा. त्यामुळे मुख्य शेतीपीक वाढीसाठी मोठा हातभारही लागेल. शाश्वत शेतीतील हाही एक महत्त्वाचा घटक लक्षात घ्यायला हवा.

महाराष्ट्र शासनाने वनशेतीला प्रोत्साहन देणाऱ्या काही योजना पुरस्कृत केल्या आहेत. त्याचप्रमाणे वनमंत्र्यांनीही जुलै २०१६ पासून जलयुक्त शिवार या योजनेच्या धर्तीवर वनयुक्त शिवार योजनाही आखली आहे. लोकसहभागातून राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यातील वृक्ष निवड करताना मधमाशांना उपयुक्त जातींची निवड महत्त्वाची ठरेल. अशा निवडीत निरनिराळ्या ऋतूंमध्ये फुलोरा येणाऱ्या वनस्पतींच्या जातींनाही प्राधान्य दिले पाहिजे म्हणजे मधमाशांना वर्षभर खाद्यपुरवठा होईल. चीनने या दृष्टीने पुढील २५ वर्षांचा आराखडा तयार केला आहे. तो आपल्यालाही तयार करता येईल. त्या दृष्टीने मधमाशांना उपयुक्त वनस्पतींची एक यादी या लेखासोबत दिली आहे. ती मार्गदर्शक ठरेल. रस्त्याच्या कडेला वृक्षलागवडीसाठीही ती उपयुक्त ठरेल.

राष्ट्रीय कृषी आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील उपयुक्त वने आणि शेती पीके यांचा विस्तार लक्षात घेऊन आपल्याला किमान एक कोटी मोहोळे पाळता येतील. पिकांच्या परागीकरणासाठी किमान ७० लाख मोहोळांची गरज आहे. महाराष्ट्राला २ लाख मोहोळं पाहिजेत. देशात प्रत्येक्षामध्ये फक्त १२ लाख तर महाराष्ट्रात केवळ १२ हजार मोहोळे पाळली जातात. आपल्याला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करायला हवेत. मधमाशीला राष्ट्रीय कीटक हा दर्जा अधिकृतपणे देऊन तिचं संरक्षण व संवर्धन करायला पाहिजे. १९ ऑगस्ट २०१७ च्या जागतिक मधमाशा दिनाच्या दिवशी हा संकल्प करूया.