मोसंबीची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लिंबूवर्गीय फळझाडातील मोसंबी हे एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात मोसंबी ची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून भारतामध्ये महारष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये मोसंबीची लागवड प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यात आढळते. कोकण विभाग वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जमीन व हवामान या पिकास अनुकूल आहे.

महत्त्व : १०० ग्रॅम मोसंबीमध्ये - ५० मायक्रोग्रॅम 'क' जीवनसत्त्व, ४० मिली ग्रॅम केल्शियम, ३० मिली ग्रॅम फॉस्फरस, ४० कि.ग्रॅ. कॅलरी असतात.

मोसंबी ही मधुर, शीत, ग्राहक, दीपक व पाचक असून पुष्टीकारक आहे. मोसंबी तृष्णानाशक स्फुर्तिदायक म्हणून प्रसिद्ध आहे. वाळलेल्या मोसंबीचा रस रक्त पित्तनाशक आहे.

हवामान : कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीच्या झाडांची वाढ चांगली होते. कोरड्या हवामानात मोसंबीच्या झाडांची वाढ चांगली होते. कोरड्या हवामानात फळांचा दर्जा चांगला मिळतो. १२ डी.से. ते ३५ डी. से. तापमानात झाडांची वाढ झपाट्याने होऊन फळे उत्तमप्रकारे पोसली जातात.

जमीन : मध्यम काळी, २ फुटापर्यंत खोल भुसभुशीत माती असलेली जमीन लागवडीसाठी निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण ०.१ टक्क्यापेक्षा जास्त आणि चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त नसावे. अशा उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करावी. भारी काळ्या तसेच पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करणे टाळावे.

जाती :

१) वॉशिग्टन नॅव्हेल : या जातीची फळे मोठी परंतु आकाराने एकसारखी नसतात. फळांना उग्र वास येत असल्यामुळे बाजारपेठेत मागणी कमी राहते.

२) जाफा : उत्तम प्रतीची जात परंतु उत्पादनक्षमता कमी आहे.

३) सातगुडी : फळे चमकदार पिवळी परंतु चवीला पांचट असतात.

४) माल्टा व कॅलेन्शीया : या जातीच्या फळांना आपल्या हवामानामध्ये रसाळपणा कमी असतो.

५) न्युसेलर : रोगमुक्त, दिर्धायु व अधिक उत्पादन देणारी जात असून इतर जातींपेक्षा दुप्पट उत्पादन मिळते. फळे आकाराने मोठी, रस जास्त असल्याने मागणी भरपूर असते. फळे २०० ते २२५ ग्रॅम वजनाची, फिक्कट पिवळी, पातळ सालीची, भरपूर गोड व रसाळ, गर घट्ट व पिवळसर असतो. फळांमध्ये ९ ते १२ बिया असून तोडणीनंतर जास्त दिवस टिकतात.

अभिवृद्धी : पन्हेरी (कलमे) निरोगी, शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली व्हायरस व बुरशीजन्य रोगास प्रतीकारक अशी निवडावीत. जंबेरी किंवा रंगपूर लाईम खुंटावर न्युसेलर जातीपासून केलेली कलमे निवडणे फायदेशीर ठरते. साधारण १ वर्षाच्या रसरशीत हिरव्या आणि भुरकट पांढऱ्या रेषा असणाऱ्या फांदीवरील डोळे घ्यावेत. अशा लाल गर्द हिरव्या व पांढऱ्या रेषा असणाऱ्या रोपांवर १५ ते २५ सेमी उंचीच्या काडीवर 'शिल्ड पद्धतीने' डोळे भरावेत. डोळे जुलै ते सप्टेंबर किंव जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात भरावेत. खुंट रोपे लावण्यापुर्वी जर्मिनेटरच्या द्रावणात (जर्मिनेटर २५ मिली + प्रोटेक्टंट १० ग्रॅम + १ लि. पाणी या प्रमाणात) बुडवून लावल्यास वाढ चांगली होईल व नंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या २ फवारण्या कराव्यात. म्हणजे २ आठवड्यात डोळा फुटू लागेल. डोळ्याच्या खालील भागावरील खुंट रोपावरील नवीन फुट काढून टाकावी.

लागवड : १८ x १८ फूट अंतरावर चौरस पद्धतीने २ x २ x २ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यांमध्ये शेणखत १ पोटी आणि कापतारू सेंद्रिय खत २५० ग्रॅम टाकावे. नंतर रोपांची लागवड करावी. रोप लावतेवेळी जर्मिनेटरची (जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाणी या द्रावणात रोपे बुडवून लावावीत) प्रक्रिया करावी. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकविला जातो . तसेच जमिनीत गांडुळांच्या संख्येत वाढ होते. रोपांचा जारवा फुटण्यास मदत होऊन रोपांची वाढ जोमदार होते.

खत : झाडांची वाढ होण्यासाठी लागवडीनंतर २ महिन्यांनी प्रत्येक रोपास २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत बांगडी पद्धतीने मातीत गाडून द्यावे. त्यानंतर वरील पद्धतीने आवश्यकतेनुसार झाडाची पुर्ण वाढ होण्यासाठी २ - ३ वेळा कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस द्यावा. खत हे वाफश्यावरच द्यावे आणि खत दिल्यानंतर पाणी द्यावे. म्हणजे खताची पूर्ण मात्रा झाडास उपलब्ध होते.

दुसऱ्या वर्षी जून महिन्यात २ घमेली शेणखत, २ किलो गांडूळखत व ५०० ते ७५० ग्रॅम कल्पतरू खत बांगडी पद्धतीने गाडून द्यावे. तिसऱ्या वर्षी जून महिन्यात ३ ते ४ घमेली पुर्ण कुजलेले शेणखत आणि ५०० ते ७५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत प्रयेक झाडास द्यावे. चौथ्या वर्षी फलधारणेस सुरुवात होते. तेव्हा शेणखत ४ - ५ घमेली, गांडूळ खत ५०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत १ किलो द्यावे. शेणखत व गांडूळ खताची कमतरता असल्यास पुन्हा १ महिन्याने ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खताची मात्रा द्यावी.

नंतर बहार धरतेवेळी ५०० ग्रॅम ते १ किलो व त्यानंतर २ महिन्यांनी ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडास द्यावे. त्याने मुळांभोवती गारवा निर्माण होऊन जारवा (पांढऱ्या मुळ्या) वाढतो. तसेच झाडांची फुट व वाढ चांगली होऊन पाने गर्द हिरवी राहतील. फळधारणेस आल्यानंतर खत व फवारणी व्यवस्थित योग्य वेळी न दिल्यास पाने पिवळी पडून पानांवर चट्टे दिसतात.

झाडांच्या जोमदार वाढीसाठी पहिले ३ - ४ वर्ष दरवर्षी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

१) पहिली फवारणी : (जून - जुलैमध्ये) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन १५० मिली + हार्मोनी २०० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (डिसेंबर - जानेवारीमध्ये) : थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + १५० लि.पाणी.

पाणी : मोसंबी पीक पाण्यास संवेदनशील असून उन्हाळ्यात ८ दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये १२ ते १५ दिवसांचे अंतराने पाणी द्यावे. वाढ पूर्ण होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे.

आंतरपिके : सुरूवातीच्या ४ ते ५ वर्षाच्या कालावधीत दोन ओळीमध्ये भुईमूग, गहू, कोबी, श्रावण घेवडा, गवार, पालेभाज्या इ. पिके घेता येतात.

आंतरमशागत : जमीन भुसभुशीत राहून हवा खेळती राहण्यासाठी तसेच तणमुक्त बाग ठेवण्यासाठी ५ - ६ वेळा खुरपणी करणे गरजेचे असते. जमिनीत वर दिल्याप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास रासायनिक खतांच्या वापरासारखी जमीन टवकी न धरता भुसभुशीत राहते. त्यामुळे खुरपणी लवकर उरकते. परिणामी त्याचा खर्चही कमी येतो.

बहार धरणे : बहार धरण्याअगोदर झाडाची वाढ जोमदार व पूर्ण झालेली असावी. साधारणपणे ४ थ्या वर्षापासून बहार धरण्यास सुरुवात करावी. तेव्हा मृग, हस्त किंवा अंबिया बहार घेता होतो. मात्र हस्त बहार धरण्याच्या वेळी पाऊस जर जास्त असेल तर पाण्याचा ताण देता येत नाही. त्यासाठी मृग किंवा अंबिया बहार धरावा.

मोसंबीमध्ये मृग बहर (मृगाच्या वेळेस मोहोर), हस्त बहर (हस्ताच्या वेळेस मोहोर), आंबिया बहर (आंबा मोहोराच्या वेळेस मोहोर) असे निसर्गत : जरी तीन वेळेस मोसंबीस मोहोर येत असला. तर त्यापैकी एकच मोहोर घेणे बागेच्या आरोग्याच्या तसेच मशागत व उत्पादनाच्या बाबतीत जास्त फायद्याचे ठरते. त्यापैकी मराठवाड्यातील शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी आंबिया बहरच घेणे मोठ्या प्रमाणात पसंत करतात.

मोसंबीच्या आंबिया बहराचे व्यवस्थापन : मोसंबी हे सदाहरित असल्याने त्यास पाण्याच्या योग्य ताण दिल्यास त्यावर हव्या त्या बहरात भरपूर फुले येतात. झाडास मोहोर पेण्यासाठी फळकाड्यांत कर्ब : नत्राचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. कर्ब म्हणजे पिष्टमय पदार्थ, त्यात नत्राच्या तुलनेत पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्तच असल्यास मोहोर चांगला येतो. ताण दिल्यामुळे झाडावरील फळकाड्यांमध्ये पिष्टमय पदार्थाचा संचय नत्राच्या मानाने जास्त होतो. अशा फळकाड्या हमखास फुले देतात. जर पिष्टमय पदार्थपेक्षा नत्राचे प्रमाण जास्त असेल, तर त्यामधून फुलाऐवजी नवती बाहेर पडते. आशा प्रकारे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण वाढविण्यासाठी झाडास पाण्याचा १॥ ते २ महिन्यांचा ताण देतात. जेणेकरून झाडांची पाने सुकून पिवळी पडून गळू लागतात. अशा प्रकारे २५ -३० टक्के पानगळ झाली म्हणजे ताण व्यवस्थित झाला असे समजून बागेस पाणी देऊन ताण तोडतात.

आंबिया बहरात काही प्रमाणत झाडास थंडीच्या ताणाचासुद्धा फायदा होतो. आंबिया बहराचा ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हकल्या जमिनीत १॥ महिने, तर भारी जमिनीत २ महिने असतो. अशाप्रकारे ताण पूर्ण होऊन पाणी देण्याची वेळ डिसेंबरमध्ये येते. त्यातही बहुतेक शेतकरी ताण तोडण्यासाठी डिसेंबरच्या अखेरीची वेळ निवडतात, मात्र अशाप्रकारे उशिरा ताण तोडल्यास फळधारणा उशिरा होऊन लहान फळे मार्चच्या उन्हात सापडून मोठ्या प्रमाणात फळगळ होते. त्यासाठी ताण ५ ते १० डिसेंबरच्या दरम्यान तोडणे फायद्याचे असते. यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, बहुतेक ठिकाणी बागांच्या जमिनी कडक झालेल्या आहेत. अशा परीस्थितीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ ऑक्टोबरनंतर बाग ताणावर सोडाव्यात. ताण काळात बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे.

ताण काळातील व्यवस्थापन

१) बाग स्वच्छ करावी.

२) झाडावरील वाळलेल्या काड्या, रोगट फांद्या काढून टाकाव्यात

३) खोडावर डिंग आलेला असेल तर तो खरडून टाकावा.

४ ) खोडास बोर्डो मलम (पेस्ट) लावावे.

५) संपूर्ण झाडावर, तसेच खोडावर ३ मि.लि. क्लोरपायरिफॉस + २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार १ ते २ फवारण्या कराव्यात. अशा प्रकारे काळजी घेतल्यास बाग सर्वसाधारणत: डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ताणावर येईल. ताणावर येण्याची लक्षणे म्हणजे झाडांची पाने पिवळी पडून २५ ते ३० टक्के पानगळ होईल, मात्र जर मध्येच पाऊस आला किंवा काही कारणाने ताण आला नाही. तर पुढीलप्रमाणे उपाय योजना करावी.

६ ) क्लोरमेक्वाट क्लोराईड या वाढ नियंत्रकाची १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. गरज पडल्यास आठ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

७ ) बागेची हलकी मशागत करावी.

८ ) बागेत ०-५२:३४ ची किंवा प्रिझमची फवारणी करावी.

९ ) ताणाचा अंदाज घेऊन शेवटी बागेत दीड ते दोन मि.लि. प्रति लिटर इथेफॉनची फवारणी करावी. अशाप्रकारे बाग ताणावर आल्यानंतर बागेस शिफारशीप्रमाणे खते देऊन बागेस प्रथम हलके. नंतर ४ ते ५ दिवसांनी थोडे जास्त, तर १० ते १२ दिवसांनी परत जास्त पाणी देऊन ताण तोडावा. अशाप्रकारे ताण तोडल्यास बागेत चांगली फुले येऊन आपोआपच चांगली फळधारणा होईल आणि नंतर लगेच फळगळ कमी होण्याच्या दृष्टीने उपाय योजना करावी, जेणेकरून बागेतून चांगले उत्पादन येऊन आर्थिक लाभ होऊ शकेल.

कीड व रोग :

१) पाने खाणारी अळी : पूर्ण वाढलेली अळी गर्द हिरवी असते. या अळीचा एप्रिल, जून, नोव्हेंबरमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून ही अळी कोवळी पाने खाऊन टाकते. पादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण झाड पानाविरहित दिसते.

२) पाने पोखरणारी अळी : पानांच्या आतील हिरवा भाग खाते. पानावर पारदर्शक, नागमोडी पोखरलेले पांढरे चट्टे दिसतात. अळी आत असल्यामुळे दिसत नाही. पाने आकाराने लहान व चुरगळ लेली राहतात. पाने आखडून सुकतात व गळून पडतात. झाडांची वाढ खुंटते, फुल व फळधारणेवर परिणाम होतो. लहान झाडांवर किंवा मोठ्या झाडांवर पालवी फुटताना मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.

३) सायला : कोवळे शेंडे, पाने, देठ व कळ्यातील रस शोषून घेत असल्याने शेंडे सुकतात व कळ्या गळून पडतात.

४) माशी : पांढरी माशी व काळी माशी- ह्या माशा पानातील रस शोषतात. त्यांच्या शरीरातून चिकट द्रव स्त्रावतो. त्यावर काळी बुरशी वाढते व त्यामुळे पाने, फांद्या व फळांच्या वरचा पृष्ठभाग काळा पडतो. यालाच शेतकरी 'कोळसा पडला' असे म्हणतात.

५) फळातील रस शोषणारे पतंग : पतंग रात्रीचे वेळी फळांतील रस शोषून घेत असल्यामुळे फळे सडतात व गळून पडतात.

६ ) मावा : शेंडा व कोवळ्या पानातील रस शोषून घेत असल्यामुळे पाने गुंडाळली जातात व नंतर सुकतात. वाढीवर व फलधारणेवर परिणाम होतो.

झाडाची साल खाणारी अळी : दिवसा फांद्याच्या बेचक्यात छिद्र पाडून लपून बसते व रात्रीच्या वेळी बाहेर पडून खोडाची, फांद्याची साल खाते. अशी जागा जाळीने झाकलेली दिसते. परिणामी कोवळ्या फांद्या वाळतात व झाडांची वाढ खुंटते. उत्पन्न व दर्जा यावर परिणाम होतो.

रोग -

१) डायबॅक : झाड शेंड्यापासून खाली वाळत जाते. लहान फांद्या सुकतात. पाने पिवळी पडून गळतात. काही वेळा खूपच फुलोरा येतो व प्रमाणापेक्षा जास्त फळे लागतात. मात्र फळे आकराने लहान राहतात व नंतर पिवळी पडून गळतात. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची सर्व पाने गळून फक्त फांद्या शिल्लक राहतात व झाड मरते.

२) डिंक्या : हा रोग फायटोप्थोरा या जमिनीतील बुरशीमुळे होतो. खोडातून डिंकासारखा स्त्राव वाहतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडाची पाने मलूल, निस्तेज, पिवळसर होतात.

३) ग्रिनिंग : हा रोग सिट्रस सायला या किडीमुळे होतो. झाडाची पाने पिवळी व पानांवर लहान, गोलाकार, हिरवे ठिपके दिसतात.

४) शेंडेमर : नवीन व पक्व फांद्या वरून खाली वाळण्यास सुरुवात होते. वाळलेल्या फांद्या पांढऱ्या पडून त्यावार काळसर बुरशीचे ठिपके आढळतात. कधीकधी संपूर्ण झाड वाळते.

५)फुलगळ, फळगळ (गुंडीगळ ) : बहार धरल्यानंतर खते दिल्यानंतर पाणी सोडले म्हणजे मोसंबीच्या, संत्र्याच्या झाडाची फूट होऊन फुलाफळांचा बहार येतो. तथापि अपुऱ्या व योग्य प्रकारच्या पोषणाअभावी फुलगळ व गुंडीगळ ही समस्या फार प्रकर्षाने जगभर भेडसावीत आहे. यासाठी सर्व पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन, हर्मोनीचा वापर शिस्तबद्ध व प्रमाणशीर केला असता त्यावर मात करता येते. असे अनेक शेतकर्‍यांनी व बागायतदारांनी कळविले आहे. एवढेच नव्हे तर डायबॅक सुद्धा कमी झाला आहे. ज्या बागायतदारांनी लिंगू, संत्री, मोसंबी (लिंबूवर्गीय फळे) लावली असता त्यांची लागवड नवी असो, पाच अथवा पंधरा वर्षाची असो, त्या फळबागमध्ये ज्या विविध समस्या असतील त्यावर मत करण्यासाठी आपण संपर्क साधावा. निराश होऊन फळबागा तोडू नये. हाताचे उत्पन्न घालवू नये.

मोसंबीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे :

१) लोहाची कमतरता - लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, मात्र शिरा हिरव्या राहतात हे प्रमुख लक्षण आहे. लोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिराव रंग येत नाही. पाने खोलगट होतात. कमतरता तीव्र असल्यास संपूर्ण शिरादेखील पिवळ्या पडतात. पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही. फळांचा आकार लहान राहतो. नवीन फांद्या वेड्या - वाकड्या येतात.

२) जस्ताची कमतरता - जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान राहून अरुंद व निमुळती होतात. शेंड्यांची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छात रूपांतर होते. पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसतो. जुन्या पानांचा शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानांच्या पृष्ठभागावर साखर साचते. पाने ठिकठिकाणी जळतात व भरपूर प्रमाणात पानगळ होते. झाडाला फुलोरा कमी प्रमाणत येतो. फळांचा आकर लहान राहून फळे अपरिपक्व राहतात. जस्ताची कमतरता तीव्र असल्यास झाडांची वाढच थांबले. मोसंबी पीक फुलावर येण्यास व फळे पक्व होण्यास उशीर होतो.

३) मँगेनिजची कमतरता - मँगेनिजच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरा हिरव्या राहून शिरांमधील भाग पिवळा पडतो व पान जाळीदार दिसते. पानांवर ठिकठिकाणी काळसर व तेलकट डाग दिसतात. कमतरता तीव्र असल्यास पानांवर करपल्याचे डाग दिसतात. फळांच्या रसामध्ये 'क' जीवनसत्त्व कमी प्रमाणात तयार होते.

४) तांब्याची कमतरता - तांबे या अन्नद्रव्याची कमतरता नवीन पानांत आढळते. प्रथम कोवळी पाने गडद हिरवी पडतात व नंतर फिकट पिवळी होऊन गळून पडतात. पानांच्या टोकाकडून शिरांमधील भाग पिवळा होऊन तो पानांच्या देठांकडे सरकत जातो. पाने देठाजवळ वाकतात. कमतरता तीव्र झाल्यास पाने पिवळी होऊन दुमडतात व वाटुळी होतात. फुले न उमलताच फुलगळ होते. खोडांच्या सालीपासून डिंक बाहेर येतो. शेंद्याची पाने गळतात आणि शेंड्याकडील भाग वळतो. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. मोसंबी पिकात पिथीयम, फायटोप्थेरा या बुरशीमुळे होणाऱ्या मूळकूज व पायकूज या रोगामुळे झाडांचा ऱ्हास होतो. या बुरशींना प्रतिबंध करण्यासाठी झाडाला तांबे या अन्न्द्रव्याचा पुरवठा अतिशय महत्त्वाचा आहे.

५) बोरॉनची कमतरता - बोरॉनच्या कमतरतेमुळे कोवळी मुळे व शेंडे सडतात. नवीन पालवी वाळून मुख्य शेंडा मरतो. त्यामुळे बगल डोळे फुटतात व आखूड कांड्याच्या फांद्या फुटतात. पाने पिवळी होऊन जाड, रखरखीत व कडक होतात. पानांचा आकार बेढब होतो. खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते. खोडाचा गाभा लाल होऊन खोड तडकते. परागीभवन व फलक यामध्ये अडचणी येऊन कच्ची फळे गळून पडतात. फळांची पक्वता

होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणत गळ होते. फळांना भेगा पडतात . फळांचा आकार लहान राहतो. फळांवर व फळात काळा डाग पडतो. तसेच फळाच्या रासामधील साखरेचे प्रमाण (गोडी) देखील कमी होते.

६ ) मॉलिब्डेनमची कमतरता : मॉलिब्डेनम कमतरतेचि लक्षणे सर्वसाधारणपणे तळाकडील जुन्या व त्यांच्याशी लगतच्या वरील पानांवर आढळते. याच्या कमरतेला (यलो स्पॉट) पिवळे ठिबके रोग असे देखील म्हणतात. याची कमतरता आम्लयुक्त जमिनीत जास्त प्रमाणत आढळते. मोसंबी पिकाची पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात व पाने रंगबिरंगी होतात. तीव्र कमतरता असल्यास पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात. पानांच्या खालील बाजूस गोलाकार फुगलेला फोड दाबल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा दव बाहेर येतो. झाडाला फुलोरा अतिशय कमी प्रमाणात येतो. मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे नत्राची देखील कमतरता पिकांमध्ये दिसून येते.

वरील किडी व रोगांपासून मोसंबी पिकाचे संरक्षण, उपाय तसेच अधिक बहार लागून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सप्तामृताची फवारणी करावी.
१) पहिली फवारणी : ( बहार घेताना, पाणी देते वेळेस ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + राईपनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (६० ते ७५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० ते १ लि. + न्युट्राटोन ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (९० ते १०५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + हार्मोनी ३०० ते ३५० मिली + २०० लि.पाणी.

५) पाचवी फवारणी : (१३५ ते १५० दिवसांनी) : थ्राईवर १।। लि. + क्रॉंपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि.+ प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ५०० मिली + ३०० लि.पाणी.

काढणी व उत्पादन : फळधारणेपासून ७ ते ८ महिन्यांनी फळे संपूर्ण पक्व होतात. आंबे बहाराची फळे ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये तर मृग बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये चालू होतात. फळांचा गर्द हिराव रंग जाऊन फिक्कट हिरवा, फिक्कट पिवळा रंग येतो. सालीवर चकाकी येते. फळांचा कडकपणा कमी होऊन फळ दाबले जाऊ शकते. काढणीच्या वेळी फळे जर ओढून काढली तर सालीचा काही भाग खरचटून साल खराब होण्याचा संभव असतो. त्यासाठी व्यवस्थित देठासह फळे काढावीत.

४ - ५ व्या वर्षापासून ४०० ते ६०० फळे तर १० वर्षापुढील प्रत्येक झाडापासून १००० फळे मिळतात व ४० ते ४५ वर्षापर्यंत किफायतशीर उत्पादन मिळू शकते.