रबी हंगामातील पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गहू, हरभरा, करडई, वाटणा, जवस व रबी ज्वारी ही रबी हंगामातील पिके आहेत. या पिकावर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. बदलत्या पीक परिस्थिती आणि हवामानामुळे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव पिकावर होत आहे. त्या अनुषंगाने रबी हंगामातील पिकावर येणाऱ्या किडींची योग्य माहिती करून त्यांचे व्यवस्थापन करावे.

गहू

१) खोडकिडा : या किडीचा पतंग तपकिरी किंवा गवती रंगाचा व अळी गुलाबी रंगाची असते. ती अंगाने मऊ असून डोळे काळे असतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडाचा वाढणारा मधला भाग सुकून जातो. अळी खोडात शिरून आतील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकून जातात व त्यांना ओंब्या येत नाहीत. पीक फुलोऱ्या त असताना जर प्रादुर्भाव झाला तर ओंब्यामध्ये दाणे भरत नाहीत व त्या पोचट व पांढऱ्या राहतात.

२) तुडतुडे : हे कीटक हिरवट राखाडी रंगाचे असून पाचरीच्या आकाराने असतात. तुडतुडे व त्याची पिल्ले पानातून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळू लागतात व पिकांची वाढ खुंटते.

३) मावा : गव्हावर दोन प्रकारचा मावा दिसून येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुसऱ्याचा रंग निळसर हिरवा असतो. या किडीची पिल्ले व प्रौढ पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषण करतात. तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोड व चिखट पदार्थ सोडतात. शरीरातून मधासारखा गोड व चिखट पदार्थ सोडतात. त्यामुळे काळी बुरशी वाढते व पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.

४) वाळवी किंवा उधई : या किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या अवस्थेत दिसून येतो. ही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खातात व त्यामुळे रोपे वाळतात व संपूर्ण झाड मरते .

५) उंदीर : शेतातील पिकांचे उंदीर आतोनात नुकसान करतात. ते गव्हाच्या ओंब्या फस्त करतात. तसेच बिळामध्ये नेवून ते साठवितात. तसेच शेतातील बांधावर, पाण्याच्या पाटात व इतर ठिकाणी शेतात उंदरांनी बिळे केल्यामुळे पिकांनी मिळणारे पाणी बिळात झिरपून अनाठायी खर्च होतो. बांधाची व पाटाची नेहमी दुरुस्ती करवी लागते.

एकात्मिक कीड व्यावस्थापन :

१) जमिनीची खोल नांगरट करुन दोन ते तीन कुळवणी करुन काडी कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.

२) जमिनीच्या उताराला आडव्या सरी/सारे पाडून पेरणीसाठी तयारी करावी.

३) वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणून काढावीत व त्यातील राणीचा नाश करावा. वारूळे नष्ट करून जमीन सपाट केल्यावर मध्यभागी सुमारे ३० सें.मी. खोलवर एक छिद्र करावे व त्यात क्लोरपायरिफॉस २० % प्रवाही १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून वारुळात ओतावे किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के दाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार जमिनीत टाकावे किंवा शेणखताबरोबर द्यावे.

४) खोडकिड्यामुळे प्रादुर्भावित झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.

५) खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्र किटकाची अंडी दीड लाख प्रति हेक्टर प्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यांनी सुरुवात करुन दर दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा सोडावीत.

रासायनिक व्यवस्थापन :

कीड   कीटकनाशक  साध्या पंपास
मात्रा १० लि. पाणी  
खोडकिडा   कार्बारील ५०% पा.मि.  ४० ग्रॅम  
मावा आणि   डायमेथोएट ३०% प्रवाही किंवा   १० मि.ली.  
तुडतुडे   मिथील डिमेटॉंन टक्के प्रवाही   ८ मि.ली. 


६) उंदराचे व्यवस्थापन : उंदरासाठी विषारी अमिस तयार करताना १ भाग झिंक फॉस्फाईड आणि ४९ भाग कोणत्याही धान्याचा भरडा व त्यात मिश्रण करण्यास पुरेसे गोडेतेल टाकून त्याचे अमिष तयार करावे आणि एक चमचा आमिष कागदाच्या पुढीत टाकून ते बांबुच्या कामटीच्या सहाय्याने बिळात खोलवर टाकून बिळाचे तोंड गवताने व मातीने व्यवस्थित बंद करावे. १ किलो विषारी अमिष २०० जिवंत बिळात पुरेसे आहे. गरज पडल्यास विषारी अमिष १५ दिवसांनी परत वापरावे. विषारी अमिष वापरण्यापूर्वी विषरहित अमिष वापरणे आवश्यक आहे.

हरभरा

घाटेअळी : घाटेअळी ही बहुभक्षी कीड असून हरभऱ्याच्या कमी उत्पादनाचे मुख्य कारण होय. यांच्या लहान लहान अळ्या सुरूवातीस कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. हरभऱ्यास घाटे लागल्यास अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र करते व आत डोके खुपसून घाट्यातील दाणा फस्त करते. एक घाटे अळी ३० - ४० घाट्यांचे एकावेळी नुकसान करते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:

१) उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करुन जमिनीतील कोष नष्ट करावेत.

२) पिकांची पेरणी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कालावधीत करावी.

३) शिफारस केलेल्या वाणाची योग्य अंतरावर पेरणी करावी.

४) हरभरा पिकात आंतरपिक अथवा मिश्रपिक अथवा शेताच्या सभोवताली दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची लागवड करावी म्हणजे परभणी किटकांचे संवर्धन होण्यास मदत होईल. हरभरा पेरताना त्यासोबत १०० ग्रॅम प्रति हेक्टरी ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करावी. ज्यामुळे पशी आकर्षित होऊन घाटेअळीच्या अळ्या वेचून खातील.

५ ) ज्या ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव हमखास होतो अशाठिकाणी बाजरी, ज्वारी, मका अथवा भुईमूग या पिकांची फेरपालटीसाठी वापर करावा.

६) पीक एक महिन्याचे होण्यापूर्वी कोळपणी / निंदणी करून शेत तणविरहीत ठेवावे.

७ ) पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा १ ते १॥ फूट अधिक उंचीचे 'ढ ' आकाराचे ५० पक्षीथांबे प्रति हे. घाटेअळीसाठी लावावेत.

८ ) शेताच्या बांधावरील घाटेअळीची पर्याची खाद्यतणे उदा. कोळशी, रोनभंडी , पेटारी ही पर्यायी खातद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

९ ) घाटेअळीच्या सनियंत्रणासाठी / किड सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये ८ - १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास कामगंध सापळ्याची संख्या वाढविणे आवश्यक ठरते अशा वेळी घाटेअळीचे नियंत्रण करण्याकरिता प्रति हेक्टरी २० ते २५ कामगंध सापळे लावावेत.

१०) मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

११ ) पिकावरील मोठ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.

१२ ) पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ % निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

१३ ) घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. ५०० एल. ई. विषाणू (५०० मिली) ५०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ५०० मिली चिकट द्रव (स्टीकर) आणि राणीपाल (नीळ) २०० ग्रॅम टाकावा.

१४ ) सुप्तावस्थेतील किडींचा नाश करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी.

आर्थिक नुकसानीची पातळी : पिकात २ अळ्या प्रति मीटर ओळ किंवा ५% किडग्रस्त घाटे किंवा ८ -१० पतंग प्रति कामगंध सापळ्यात सतत २ ते ३ दिवस आढळल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी कारवी.

रासायनिक व्यवस्थापन :

कीड   कीटकनाशक   साध्या पंपास
मात्रा १० लि. पाणी  
घाटेअळी   क्लोरपारिफॉस २०% किंवा
क्विनालफॉस टक्के किंवा
फोझॅलोन ३५ टक्के  
४० ग्रॅम
२० मि.ली.
१५ मि.ली.  


करडई

* मावा : मावा आकाराने लहान असून रंगाने काळा व मृदू शरीराचा असतो. पंख असलेला व पंखहिन दोन्ही प्रकार दिसतात. सुरूवातीला माव्याचा प्रादुर्भाव काठावरील झाडावर आढळून येतो. पौढ तसेच बाल्यावस्थेतील मावा पिकाच्या कोवळ्या भागावर, पानावर, बोंडाच्या देठावर आढळतो. तो सोंडेवाटे रस शोषण केल्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. मावा शरीरावाटे चिकट पदार्थ सोडतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. चिकट स्त्राव फुलावर पडल्याने मधमाशामुळे होणाऱ्या परागीकरणाच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊन दाणे कमी भरतात.

* घाटे अळी : पीक लहान असताना अळ्या पाने व शेंडे खातात तर बोंड धारणा झाल्यावर अळी त्याला छिद्र पाडून आतील दाणे खाते. अळीचे डोके आत तर शरीराचा इतर भाग बाहेर दिसतो अळीचा प्रादुर्भाव पानावरील व कवच पाकळ्यावरील छिद्रे, अळीची विष्ठा, अर्धवट किंवा पूर्णपणे खाऊन टाकलेल्या कळ्या तसेच बोंडाला असलेल्या छिद्रावरूनही लक्षात येते.

* पाने खाणारी अळी : ही अळी हिरवट रंगाची असून अळ्या सुरुवातीला पिकाची पाने कुरतडून खातात. त्यामुळे पिक पानेविरहीत होते व पिकाचा जोम कमी होतो. ही कीड कोवळ्या बोंडाचे देखील नुकसान करते.

* उंट अळी : या किडीची अळी भुरकट किंवा राखाडी रंगाची असते. अळीच्या शरीरावर काळसर ठिपेक असतात. ही अळी चालताना पाठीचा भाग उंच करते म्हणून हिला उंट अळी म्हणतात. अळ्या सुरुवातीला पिकाची पाने खाऊन नुकसान करतात. पुढे ह्या कळ्या व बोंड कुरतडून नुकसान करतात.

* करडईवरील सोंडे:सोंडे लहान, करडे तपकिरी रंगाची असतात. ते दिवस ढेकळा खाली अथवा जमिनीतील भेगांमध्ये लपून बसतात आणि संध्याकाळी बाहेर येतात. याचे प्रौढ व अळ्या करडईची मुळे खातात. लहान रोपाचा जमिनीलगतचा भाग कातरतात. त्यामुळे झाडांची संख्या कमी होते. प्रौढ रोपांच्या पानावरही चरतात. याची मादी ओलसर जागी ढेकळाखाली किंवा भेगांमध्ये अंडी देते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

१) सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी लवकर करावी.

२) कोरडवाहू क्षेत्राकरिता माव्यासारख्या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करावी.

३)उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.

४ ) किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात.

५) ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

कीड   कीटकनाशक   साध्या पंपास
मात्रा १० लि. पाणी  
मावा   डायमिथोएट ३० % किंवा
अॅसीफेट ७५ % किंवा
 
१० मि.ली.
२० ग्रॅम
 
घाटेअळी,
उंटअळी,
पाने खाणारी अळी  
क्विनालफॉस २५ %   २० मि.ली.  


जवस

गादी माशी : ह्या किडीची मादी डासासारखी असून तिच रंग नारंगी असतो. ही मादी हिरव्या पाकळ्यांच्या खाली अंडी देते. अंड्यातून अळ्या निघाल्यानंतर फुलकळ्यातील पुंकेशर व स्त्रिकेशर खाऊन टाकतात. त्यामुळे फळधारणा होत नाही. किडग्रस्त कळ्या पोकळ होतात. त्यामुळे उत्पन्नात घट होते. ही कीड फक्त जवसावरच आढळते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

१) पीक काढणीनंतर खोल नांगरट करावी. म्हणजे किडींच्या अवस्था उघड्या पडून नष्ट होतील.

२) पिकांचे अवशेष / धसकटे गोळा करून नष्ट करावीत म्हणजे किडीच्या सुप्तावस्था इ. चा नायनाट होईल.

३) आजुबाजूच्या बांधावरील तणांचा नाश करावा म्हणजे मुख्य पीक नसताना किडीच्या अवस्था यांचे जीवनचक्र नष्ट होईल.

४) शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी म्हणजे आंतरमशागत तसेच किडीचे नियंत्रण करणे सोईचे होते.

५) किडीचा प्रादुर्भाव आढळ्यास डायमिथोएट ३० % प्रवाही १० मि.ली. १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वाटाणा

पाने पोखरणारी अळी : या किडीच्या अळ्या पानामध्ये शिरून नागमोडी वळणाची पोखरण करून पानाचा हिरवा भाग खावून टाकतात प्रौढ माशा पानातील रस शोषण करतात. मादी माशी अंडनलिकेद्वारे पानावर छिद्रे पाडून त्यामध्ये निघणारा रस शोषण करते. नरमाशी मात्र अशाप्रकारे रस शोषण करू शकत नाही. परंतु मादी माशीने केलेल्या छिद्रातून स्त्र वणारा रस मात्र नंतर माशी शोषण करते. परिणामत: फुले व शेंगाचे उत्पादन घटते. माशा फुलोऱ्यातील परागकणावर सुद्धा उपजिवीका करतात.

घाटे अळी : अळी कोवळी पाने, कळ्या, फुले कुरतडून खाते, शेंगामध्ये शिरून एका शेंगेतील एक दोन दाणे फस्त करते. कोषावस्थेत जाण्यापूर्वी एक अळी ६ - ८ शेंगा खाते. खूप प्रादुर्भाव झाल्यास शेंगाना अनेक छिद्रे आढळतात.

मावा : कोवळ्या पानातील व शेंड्यातील रस शोषण करतात. झाडे पिवळी पडतात व झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. पाने व शेंगाची वाढ होत नाही. दाणे आकराने लहान होतात.

रासायनिक व्यवस्थापन :

कीड   कीटकनाशक   साध्या पंपास
मात्रा १० लि. पाणी  
पाने पोखरणारी   डायमिथोएट ३०% किंवा
क्लोरपायरिफॉस २०% किंवा
 
१० मि.ली.
२० मि.ली.
 
अळी , मावा घाटेअळी   क्विनालफॉस २५ %
फोझॅलोन ३५ %  
२० मि.ली.
१५ मि.ली.  


रबी ज्वारी

खोडमाशी : या किडीची प्रौढ माशी घरातील माशीप्रमाणेच परंतु थोडी लहान असते. सुरुवातीला अळी पांढुरक्या रंगाची व नंतर पिवळसर असते तिला पाय नसतात.

किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस मध्यशिरेजवळ पांढरे, लांबट, असे एक एक अंडी टाकते. अंड्यातून निघालेली अळी खोडात शिरून आतील वाढणारा भाग खाते. त्यामुळे वाढणारा पोंगा मरतो. त्याला गाभेमर असे म्हणतात. असे पोंगे सहजपणे काढता येतात. पोंग्याचा खालील भाग सडून त्याचा घाण वास येतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुटवे येतात व त्यावरही या किडीचा प्रादुर्भाव होतो. पेरणी उशीरा केल्यास या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. अशा परिस्थितीत पिकाची फेरपेरणी करावी लागते.

खोडकिडा : या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून राखाडी किंवा गवती रंगाचा असतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या शरीरावर अनेक मळकट ठिपके असतात व अळीचे डोके तांबड्या रंगाचे असते. या किडीची मादी पानाच्या मागच्या बाजूस पुंजक्यात अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या प्रथम पानाचा पृष्ठभाग मुरतडतात व नंतर पोंग्यामधील सुरळीला छिद्रे पडून आत शिरतात. सुरळीतील पाने उमलल्यानंतर त्यावर एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे दिसतात. अळी खोडात शिरून आतील गाभा खाते. पीक लहान असताना प्रादुर्भाव झाल्यास पोंगे मरतात. यालाच गाभेमर असे देखील म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव करणे बाहेर पडल्यावर दाणे भरण्याच्या अवस्थेतसुद्धा आढळून येतो. अशा कणसाच्या देठावर छिद्रे दिसतात. कणीस सुकू लागते आणि काही वेळा देठ मोडतो.

मावा : मावा ही कीड पीक वाढीच्या अवस्थेत असतात दिसून येते. ही कीड ज्वारीच्या पानावर व पोंग्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्नरस शोषण करतात तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

मिजमाशी : या किडीचा प्रादुर्भाव पी फुलोऱ्यावर असताना आढळून येतो. उशिरा पेरलेल्या ज्वारीवर या किडीचा प्रादुर्भाव सातत्याने जाणवतो. मिजमाशी दिसायला डासासारखी असून पंख पारदर्शक असून पोट नारंगी रंगाचे असते. अळी सूक्ष्म व पांढऱ्या रंगाची असते. माशा माशा सकाळचे वेळी कणसाभोवती घोंगावताना दिसतात, मादी माशी फुलोऱ्यात अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी बिजांडकोषावर उपजीविका करते. त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत. परिणामी उत्पादनात घट येते.

कणसावरील ढेकणे व अळ्या :

ज्वारीच्या कणसातील ढेकणे कणसातील दाण्यातून रस शोषण करतात. त्यामुळे दाणे सुकतात. कणसातील घाटेअळी कणसातील दाणे खाऊन नुकसान करतात तसेच झाडाची कोवळी पानेसुद्धा खातात. तसेच कणसात जाळी करणाऱ्या अळ्या कणसातील दाने खाऊन नुकसान करतात तसेच कणसात जाळी करून राहतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

१) जमिनीची खोल नांगरट व फूळवणी करून काडी, कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.

२) ज्वारीची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून व त्यातील धसकटे गोळा नष्ट करावीत म्हणजे त्यामधील सुप्तावस्थेतील अळ्यांच नाश होईल.

३) रबी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी. काही करणाने पेरणी लांबली तर ५ ग्रॅम इमिडाक्लोप्रीड ७० टक्के या किटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी किंवा २०० ग्रॅम कार्बोसल्फान (२०० एस.टी.) एक किलो बियाण्यामध्ये चांगले मिसळून पेरणीसाठी वापरावे.

४) मिजमाशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मिजमाशी उपद्रव ग्रस्त शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी शकयतो एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची निवड करून साधारणपणे एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी साधल्यास मिजमाशीपासून संरक्षण होत. तसेच प्रादुर्भावग्रस्त शेतातील मळणी झाल्यावर खळ्याभोवती अथवा मळणी यंत्राभोवतील पडलेले कणसाचे अवशेष गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी म्हणजे त्यातील सुप्तावस्थेतील अळ्यांचा व कोषांचा नाश होईल शिवाय साठवून ठेवलेले कुटार १५ मे पूर्वी जनावरांना खाऊ घालून संपवावे.

५) खोडमाशीमुळे जर १० टक्के गाभेमर उगवणीनंतर ७ दिवसांनी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० टक्के २० मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १० दिवसांनी दुसरी फवारणी करवी.

६) खोडकिडीमुळे १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास किंवा उगवणीनंतर ३० दिवसांनी कार्बारिल ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ४० ग्रॅम किंवा क्लोरपायरिफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. फवारणी पोंग्यात जाईल याची दक्षता घ्यावी.

७) मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉंन २५ टक्के प्रवाही ८ मिली अथवा मानोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ६ मिली अथवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १२ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

८) १ ते २ मिजमाशी प्रति कणसावर आढळून येताच मॅलाथिऑन ५० टक्के प्रवाही २० मिली किंवा कार्बारिल ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९) कणसातील सर्व प्रकारच्या अळ्या तसेच ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी कार्बारिल ५० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी ४० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही २५ मिली प्रवाही २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे/

अशा प्रकारे रबी हंगामातील पिकावरील किडींचे व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल यात शंका नाही.