कृषी शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्थरावर अत्यावश्यक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतीय शेती ही पारंपारिक पद्धतीने हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. ज्यावेळेस १९ व्या शतकात लोकसंख्या ही नगण्य होती तेव्हा माणसांच्या मुलभूत गरजा (अन्न, कपडा, निवारा) ह्या आटोक्यात होत्या. स्वातंत्र्यापूर्व काळामध्ये देशामध्ये शिक्षण संस्था कमी होत्या. आजच्या १ % देखील शिक्षणाची सुविधा १०० वर्षापुर्वी नव्हती. २० व्या शतकाच्या तोंडी देशातील लोकसंख्या वाढू लागली आणि ८० च्या दशकात ती अब्जावर जावून पोहचली. ५० च्या दशकात पावसाने आपले कालचक्र व्यवस्थित चालू ठेवले. नेमाने येणे, प्रमाणात आवश्यक पडणे, त्यामुळे खरीपाच्या पेरण्य वेळेवर होत. नद्या, नाले व्यवस्थित भरत. त्यावर रब्बी पिके व दुसोट्याची पिके घेतली जात. शेती ही पारंपारिक असल्याने बारमाही फळपिके आणि व्यापारी पिकांची गरज त्यावेळी भासाली नाही. परंतु जसा लोकसंख्येचा डोंब उसळू लागला, शहरीकरण वाढू लागले तसा अन्नधान्याचा साठा अपुरा पडू लागला. निसर्ग काही ठिकाणी अनावृष्टी तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ लागली. तेव्हा पारंपारिक अन्नधान्य, कडधन्या, तेलबिया यांची गरज ज्यादा भासू लागली. त्यामुळे १९४० ते १९६० च्या दरम्यान त्यांची परदेशातून आयात करावी लागली. परंतु ही आयात देशाला परवडणारी नव्हती. लोकसंख्या अब्जाच्या दिशेने दौडत असताना देशाची भूक लक्षात घेऊन अन्नधान्याचा दर्जा (Quality) पेक्षा देशाची भुक भागविण्यासाठी उत्पादनाला (Yield - Quantity) प्राधान्य द्यावे लागले. यासाठी परदेशातील संकरित वाणांचा आधार घ्यावा लागला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाताचा आय. आर - ८ आणि गव्हाची सोनोरा - ६५ या वाणांचा वापर सुरू झाला. संकरित वाणांच्या विकासामध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचा सिहांचा वाटा होता. केवळ त्यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. डॉं. नॉंर्मन बोरलॉग यांचा सिंहाचा वाटा होता. केवळ त्यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नांमुळे ए शक्य झाले डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टीमुळे या संकरित वाणांचा प्रसार देशामध्ये शक्य झाला आणि एरवी देशातील ३० ते ५०% होणारी उपासमार थांबली. हा फायदा जरी देशाला झाला तरी अधिक उत्पादन देणारे वाण हे मादी वर्गातील व परदेशातील असल्याने त्यांच्यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव पारंपारिक वाणांपेक्षा अधिक होऊ लागला. तेव्हा स्थानिक वाण हे अधिक रोग व कीड प्रतिबंधक शक्ती (Emmunity) असलेले असल्याने त्यांच्यातील नर वाण आणि परदेशातील अधिक उत्पादन देणारे मादी वाण यांचा संकर करून अधिक उत्पादनक्षम नवीन वाण निर्माण केले गेले.

राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधनामध्ये यांचा अभ्यास, चिंतन आणि संशोधन वाढले. अनेक नवीन विषयांचा जन्म झाला. रासायनिक खते, विषारी किटकनाशकके व बुरशीनाशके यांचे प्रकार व प्रमाणामध्ये सढळ हाताने वापर वाढले. कॅन्सर, हृदयविकार यासारख्या अनेक असाध्य रोगांचे रुग्ण वाढले, आरोग्य संशोधनाला ते एक आव्हानच ठरले. त्यामुळे २१ व्या शतकाच्या सुरुवातीस अनेक सरकारी व खाजगी शेतकी कॉलेजेस उभारली गेली. फळबागांचे नियोजन वाढले, उत्पन्नाचे श्रोत वाढले, नोकर्‍या उदीम वाढले, संपर्काची माध्यमे वाढली, दळण - वळण वाढले, त्यामुळे माणसाची क्रयशक्ती वाढली. त्यामुळे एरवी आजार्‍याचा आधार असणारा फलाहार हा सर्वसामान्यांच्या चौरस आहारामध्ये सहजपणे प्रवेश करून गेला. फळबागांमध्ये १०० हून अधिक वाणांचे प्रकार रूढ झाले. काही आयात झाले त्यांचे विविध वाण आले. त्यांच्या वाढीच्या, जोपासनेच्या, संवर्धनाच्या व देखभालीच्या क्रिया आणि पिक करण्याच्या पद्धती (Package of Practice) यामध्ये अनेक बदल झाले आणि अशा रीतीने काळाच्या ओघामध्ये नवीन - नवीन विषय जन्माला आले. रासायनिक खतांच्या, किटक व बुरशीनाशकांच्या भस्मासुरामुळे सेंद्रिय शेतीचा पुनर्जन्म झाला आणि सेंद्रिय शेतीला परत सुगीचे दिवस आले. म्हणजे ज्याप्रमाणे कपड्याची फॅशन रिपीट होते, त्याप्रमाणे जीवन पद्धतीतील वाटचाल व क्रांती ही फॅशन न राहता अत्यावश्यक बाब म्हणून परत आली.

हे सर्व विषय हाताळण्याकरिता कृषी संशोधन, कृषी शिक्षण, कृषी शिक्षणाचा विकास (Agril Extn.) या ३ अंगांची देशाला गरज निर्माण झाली आणि राधाकृष्णन समितीच्या निर्णयाप्रमाणे देशात स्वतंत्र कृषी विद्यापीठे स्थापन व्हावी ही कल्पना ६० च्या दशकात जन्माला आली आणि अमेरिकेतील लँड ग्रँड कॉलेजेसच्या धर्तीवर शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे वारे वाहू लागले. ही शिक्षण व्यवस्था नवीन पद्धतीची असल्याने तिला भारतीय संस्कृतीत पचायला व बाळसे धरायला वेळ लागला. पारंपारिक पद्धतीचे शिक्षणामध्ये परिक्षा ही वर्षाच्या शेवटी असल्यामुळे समग्र अभ्यासाची सवय भारतीय विद्यार्थ्यांना लागली. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता व स्मरणशक्ती ही प्रखर आणि वाखाणण्यासाठी जगभर श्रेष्ठ ठरली. अमेरिकन शिक्षण पद्धतीमध्ये दर ३ महिन्यांनी विषय बदलायचे, ३ महिन्यात विषयाचे सत्र बदलायचे आणि या ३ महिन्यात ४ ते ५ परीक्षा द्याव्या लागत असत. तेव्हा शिक्षणापेक्षा परिक्षांचे सत्र ज्यादा होऊ लागल्याने शिक्षण हे ६ महिन्याचे केले गेले. याला 'सेमीस्टर' म्हटले जावू लागले. परीक्षेच्या घोडदौडीमागे न घावता विषयाचे ज्ञान, आकलन, चिंतन आणि त्याच शिक्षणाचा वापर व्यवहारात होऊ लागल्याने ते उपयुक्त होऊ लागल्याने पारंपारिक विद्यापीठांनी सेमीस्टर हीच पद्धत अवलंबली.

सुरूवातीला देशामध्ये ७० ते ८० च्या काळात ३० कृषी विद्यापीठ निर्माण केली गेल आणि आता ६० हून अधिक कार्यरत आहेत. देशातील मुलांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून फलोद्यान विद्यापीठे निर्माण करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवरची वस्तू (Commdity) विविध फळे, फलोद्यान संस्था जसे कांदा, लसूण, भुईमूग, केळी, द्राक्ष, बटाटा, ऊस अशा अनेक पिकांच्या राष्ट्रीय संशोधन संस्था संचालये निर्माण करण्यात आली. त्यामुळे १९६० च्या नंतर या देशात आचार्य (Ph.D.) या पदवीचे शिक्षण सुलभ झाले.

देशाची ७० ते ९०% अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. परंतु प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये याचा समावेश अन्वयानेही नाही, ही सर्व समावेशक शिक्षण शास्त्रामधील मोठी घोडचूक आहे. विविध विषयांचे आकलन व्हावे व त्यांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुले शाळेत जाण्याअगोदर बालवाडीपासून त्यांना पर्यावरण, माती, हवा, पाणी, बी, रोपांची लागवड, पेरणी, रोपांचे संवर्धन पिकांचे कीड व रोग निवारण पोषण जोपासना पहिल्या ५ ते ७ वर्षामध्ये शिकवावे. नंतर ७ वर्षानंतर ११ वर्षापर्यंत कृषी क्षेत्रातील विविध विषय अत्यावश्यक करावेत, म्हणजे समाजामध्ये कृषी क्षेत्र व शिक्षणामध्ये गोडी निर्माण होईल. कृषी क्षेत्रामधील संशोधन व विकास यामध्ये शास्त्रज्ञ व विकास अधिकारी, प्रसारक निर्माण होतील. त्याची भारतालाच नव्हे तर सर्व विकसनशिल व विकसीत राष्ट्रांना गरज आहे. या शिक्षणाचा उपयोग व्यवहारामध्ये झाल्याने शेती सुधारित पद्धतीने केल्याने त्याचे उत्पादन वाढेल. ती आतबट्ट्याची न होता समृद्ध होईल. शेतकर्‍यांच्या विषयाबद्दल जनतेला ध्रुणा वाटणार नाही. कारण येथून पुढे शेती व्यवसायाशिवाय देशाला पर्याय नाही. म्हणजे शेती क्षेत्राला चांगले दिवस येतील. एरवी नियोजन न करता अभ्यास, प्रयोग न करता शेती केल्याने शेती परवडत नाही असे होते.

शेती शिक्षण हा एक प्रतिष्ठा आणि मानवतेचा विषय ठरेल. म्हणून कृषी विषयाचे ज्ञान आणि शिक्षण हे फक्त कृषी महाविद्यालये व कृषी विद्यापीठामध्ये मर्यादित न ठेवता वयाच्या ३ र्‍या वर्षापासून ते माध्यमिक, उच्च माध्यमिक व पारंपारिक शिक्षणामध्ये अत्यावश्यक म्हणून पारंपारिक विषयामध्ये समावेश करावा. ज्या पारंपारिक विषयाचा व्यवहारी जिवनात वापर कमी होतो, त्याऐवजी शेती विषय चालू केल्याने अर्थव्यवस्था बळकट होईल. तेव्हा देशातील विद्यापीठ अनुदान मंडळ, भारत सरकारचे मनुष्यबळ खाते , कृषी शिक्षण, संशोधन व कृषी विकास (ICAR , IARI)तसेच देशाचे आरोग्य खाते, जैव तंत्रज्ञान क्षेत्र आणि नॅनो टेक्नॉंलॉजी व तत्सम येऊ घातलेले नवीन विषय यांची सांगड घालून शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये सोप्या विषयापासून ते कठीण विषयापर्यंत क्रमाक्रमाने अभ्यासक्रमामध्ये (Curricula) समाविष्ट करणे म्हणजे शिक्षण पुस्तकी न राहता ते खर्‍या अर्थाने व्हावाहारी होईल.

सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरण, संतुलित आरोग्य, आधुनिक उपयुक्त उच्च कृषी तंत्रज्ञान, जैवशास्त्र, नॅनो टेक्नॉंलॉजी, बायो टेक्नॉंलॉजी, बायोमास, व्हर्मीकल्चर, टिश्यूकल्चर हे विषय व शिक्षण काळाच्या ओघात परवलीचे झाले व त्याची उपयुक्तता, गरज व प्रसार करणे गरजेचे झाले.

कृषी प्रक्रिया व कृषी मुल्य संवर्धन उद्योजक प्रेरणा, उद्योजकता व उद्योजकता विकसन या संस्था मोठ्या प्रमाणात देशामध्ये कार्यरत होणे गरजेचे आहे. म्हणजे वाढत्या लोकसंख्येमध्ये सुशिक्षित, अर्धशिक्षीत बेरोजगार व नैपुण्य अर्धनैपुण असणार्‍या व्यक्ती व मदतनीस अशा विविध टप्प्यावर उद्योजक आणि नोकरीचे विविध पर्याय समृद्धीने खुले होतील. त्यामुळे नोकऱ्या व उद्योजकता यांचा मोठा कॅन्व्हॉस निर्माण होईल. तेव्हा अनावश्यक, अनुत्पादित गोष्टीकडे तरूण पिढीची उर्जा व शक्ती वाया न घालविता या विद्यायक कामासाठी वापरावी म्हणजे देशाची वाट समृद्धीकडे चढत्या कमानीकडे राहील.