अवकाळी पाऊस व तुफान गारपीट - एक राष्ट्रीय समस्या व उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या ७ - ८ वर्षापासून शेतकऱ्यांच्या नशिबी संकटाची एकापाठोपाठ एक मालिकाच जणू नियतीने लावली आहे. कधी सतत दुष्काळ तर कधी लागोपाठ झाडी (पाऊस) तर कधी चक्री वादळाचा तडाखा आणि गारपीट यामध्ये विशेषेकरून द्राक्ष, डाळींब, केळी, रब्बी व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

२०१३ - २०१४ यावर्षात गेल्या १ - १।। महिन्यापासून अवकाळी पाऊस व गारांचा भडीमार प्रचंड प्रमाणात झाल्याने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, ऊस या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे ज्वारीच्या उभ्या पिकातील कणसांना कोंब फुटले. तर गारांनी उसाची पाने फाटली. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. हवामानातील बदलांमुळे कमी दाबाचे पट्टे तयार होऊन उत्तरे कडील बर्फ प्रचंड प्रमाणात वितळून त्याचे बाष्पाचे गारांच्या पावसात रूपांतर झाले आणि त्यामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे अपरिमित नुकसान झाले. शेतकरी गेल्या २ वर्षात दुष्काळाने होरपळला आणि २०१३ च्या खरीपात निसर्गाने साथ दिल्याने खरीप पिकाचे समाधानकारक उत्पादन मिळाले. मात्र त्यातही विदर्भात खरीपात ज्यादा पावसाने सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ आता राज्यात २७ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट याने हाता - तोंडाशी आलेली रब्बी पिके व द्राक्ष, केळी, डाळींब बागाचे प्रचंड नुकसान झाले. कोठेतरी शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसत होता तो संकटाच्या गर्तेत अंधारात लोटला गेला. त्यामुळे शेती कशी करावी हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी पाहणीत प्रथमदर्शी एकंदरीत १५ -१७ लाख हेक्टर पिकांची नुकसान होऊन १० हजार कोटींचे नुकसान वर्तविले गेले असले तरीही प्रत्येक्षात १५ ते २० हजार कोटीपर्यत हे नुकसान असू शकते.

एवढे मोठे नुकसान झालेले असल्याने प्रथमदर्शी शेतकऱ्यांना ही राष्ट्रीय आपत्ती समजून ताबडतोब सरकारने एकरकमी रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करणे गरजेचे आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रू. आठमाही बागायती शेतकऱ्यांना एकरी ७ -१० हजार रू. आणि द्राक्ष व डाळींब या बागा कर्ज काढून उभारलेल्या शेतकऱ्यांना एकरी २० ते २५ हजार रू. अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावे. थकलेले विज बिलांचे हप्ते व ब्रँकांचे कर्ज माफ करावे किंवा पुढील ५ - १० वर्षात ०% व्याजदराने फक्त मुद्दल परत घेण्याची केंद्र सरकारने राज्यसरकारला सूचना करावी.

राज्य सरकारी कर्मचारी व सेवाभावी संस्थांनी एक दिवसाचा पगार देण्याचे मान्य केले आहे. एक आठवण लक्षात आली ज्याप्रमाणे बांगलादेशातील दुष्काळ पडला होता तेव्हा प्रत्येक नागरीकाने ४ - ५ वर्षे आपल्यापरिने निधी जमा करून सरकार कडे पाठविला नव्हे सरकारनेच तो बांगलादेश निधी म्हणून जमवून त्या देशात पाठविला होता तसा ह्या बेछुट गारपिटीतून शेतकऱ्याला सावरण्या साठी देशभरातील नोकरदार, व्यापारी संस्था, खाजगी संस्था देशभरातील नोकरदार, व्यापारी संस्था, खाजगी संस्था यांचेकडून फंड जमा करून तो शेतकऱ्यांना वेळोवेळी पोहच करावा. त्यामुळे सरकारी तिजोरीवर याचा बोजा पडणार नाही व नेहमीच्या विकास कामावर परिणाम होणार नाही. तेव्हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बाऊ न करता वरील सुचविलेल्या बाबींचा अवलंब ताबडतोब करावा. ही सुचना करावीशी वाटते.

ज्या बागांचे गारपीटीने नुकसान झाले त्या दुरुस्त करण्यासाठीचे उपाय

केळीच्या बागांची गारपिटीने पाने फाटून केळीचे घड, फग्यावर गारपिटीने डाग पडून प्रचंड नुकसान झाले त्या बागा दुरुस्त होणार नाहीत, तेव्हा त्याचे मुख्य खोड कापून त्याच्या येणाऱ्या फुटव्यातील एक जोमदार फुटवा राखून त्याला १ किलो कल्पतरू देवून जर्मिनेट १ लि. + प्रिझम १ लि. ची १०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करावे. हे खोड एक फूट उंचीचे झाल्यावर माहितीपत्रकाप्रमाणे फवारण्या कराव्यात. ४ महिन्यापर्यंत कल्पतरू व जमीन हलकी असल्यास रासायनिक खते व विद्राव्य खतांची मात्रा द्यावी. म्हणजे या खोडव्याचे उत्पन्न ११ महिन्यात पुढील वर्षी घेता येईल.

डाळींबाच्या ज्या बागांना हस्त व आंबे बहाराची फळे धरली, तेथे बागांचे अतोनात नुकसान झाले. तेथे फळे तडकली, अस्ताव्यस्त फाटली, चिरडली गेली, फांद्या मोडल्या, पाने झडली अशा बागांची प्रथम फळे तोडून ज्या फांद्या तुटलेल्या आहेत किंवा आघात झाला आहे. त्या कट करून त्याला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपरऑक्झीक्लोराईड १ किलोचे १०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करावे म्हणजे पांढरी मुळी चालू राहील. नंतर वयोमानानुसार कल्पतरू १ ते २ किलो कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देवून वेळापत्रकाप्रमाणे सप्तामृताच्या ३ ते ४ फवारण्या करून प्रथम बागा निरोगी करून सशक्त करणे गरजेचे आहे. यामध्ये थ्राईवर, क्रॉपशाईनरचे प्रमाण वाढवून घेणे, कारण जेव्हा हवामानात बदल होतो. तेव्हा त्याचा पिकावर होणाऱ्या दुष्परिणामावर क्रॉपशाईनर मात करते. नंतर पुढे २०१४ च्या मृग बहार किंवा आंबे बहाराची तयारी करता येईल.

द्राक्ष बागाचे हाता - तोंडाशी आलेले पीक संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. त्याकरिता एप्रिल छाटणीची तयारी करून आपल्या भागातील द्राक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. म्हणजे ऑक्टोबरची काडी चांगली तयार होईल. ह्याच प्रमाणे नवीन बागेचीदेखील तयारी करणे म्हणजे पानांची कॅनॉपी, वेलीची वाढ करून पुढील वर्षी माल धरता येईल.

कापसाचे बाबतीत खरीपात समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बीमध्ये ज्यांनी फरदड घेतली होती त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा अशा अवस्थेत नवीन जो कापूस लागवड होईल तेथे कापसात 'सिद्धीविनायक' शेवाग्याचे मिश्रपीक घेणे फायदेशीर ठरत आहे. याच्या मुलाखती याच अंकात अन्यत्र दिल्या आहेत. या पीक पद्धतीत कापसाचे उत्पादन मिळून शेवग्याचे बोनस पीक मिळते. त्याचा प्रयोग करावा.

निसर्गापुढे मानव हतबल होतो. परंतु अशा परिस्थितीत देखील शेतकऱ्यांनी आपले मनोबल ढळू न देता येणाऱ्या परिस्थितीला तोंड देवून मात कशी करता येईल. याचा शेतकऱ्यांची विचार करावा. सर्व प्रकारच्या यंत्रणांनी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून मार्गदर्शन व सहाय्य करावे. तसेच सरकारने आपत्कालीन परिस्थती प्रतिबंधात्मक मॉडेल मार्गदर्शनासाठी विकसीत करावे.