खरीप पिकांचे नियोजन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पिकला थोडा फटका बसला. विहीर, नद्या, नाल्यांचे पाणी कमी झाल्याने उन्हाळी पिकाखालील क्षेत्र घटेल. फळबागा (द्राक्ष, डाळींब) यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी दयनीय झाली. टँकरचीही सोय जेथे होऊ शकली नाही. तेथील लोकांनी बाग तोडल्या. काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसू नये म्हणून ज्याप्रमाणे लहान मुलांना ऊन लागू नये म्हणून पांघरून घातले जाते. त्याप्रमाणे झाडांना वाया गेलेला कपडा, साडी, धोतर याने झाकले.

गेल्यावर्षी खरीपाचा पाऊसही दिड महिना उशीरा झाल्याने खरीपातील पिकांचे उत्पादनात घट आली. जानेवारी - फेब्रुवारी २०१२ पासून तर उन्हाच्या झळा वाढल्या, त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या. एका व्यत्त्कीस एका दिवसभरात हंडाभर पाणी मिळणेही मुश्किल झाले आणि ग्रामीण जनता पाण्यामुळे वेठीस धरली गेली. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले. अशारितीने निसर्गाने सारे कोष्टकच कोलमडले.

२०१२ चा खरीप आता डोकावू लागला आहे. दोन दिवसांनी आता रोहिणी सुरू होईल. ७ जून ला मृग चालू होईल. कृषी व हवामान खात्याने चालू वर्षीचा अंदाज वर्तविला आहे की, मान्सूनचा पाऊस जूनमध्ये वेळेवर सुरू होईल. जुलैमध्ये कमी पडेल. ऑगस्टमध्ये चांगला पडेल आणि सप्टेंबरमध्ये कमी होईल. अशा एकूण मोसमात पाऊस ४० त ४५ दिवस पिकांना मिळेल. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करावे.

२०१० च्या खरीपात सुद्धा कापसाखालील व्यापारी पीक वाढल्याने आणि गेल्यावर्षी कापसास ७ हजार रुपयाचा भाव मिळाल्याने कापसाखालील क्षेत्र वाढले. मात्र निसर्गाने साथ न दिल्याने कापसाचे उत्पादन घटले आणि सरकारचे निर्यातीचे धोरण गेले १५ दिवस धरसोड वृत्तीचे राहिल्याने कापसाचे भाव घसरले. सुदैवाने निर्यात बंदी उठविल्याने ४७०० ते ५२०० रुपये इतके दर झाल्याने शेतकऱ्यांनी थोडा कापूस बाहेर काढला. तरीही निम्म्याहून अधिक कापूस बाजारभाव वाढीच्या आशेपोटी शेतकऱ्यांनी राखून ठेवला आहे आणि निर्यातबंदी आता कापसाची उठविल्याने कापसाचे दर वाढण्याच्या पोटी २० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीची भर पडेल आणि नवीन कापूस ऑक्टोबर - नोव्हेंबरला उपलब्ध होईल, त्यावेळी जुन्या कापसाचे भाव पडतील. ते एवढे पडतील की, चालू भावापेक्षाही कमी असतील. जुन्या कापसाचे भाव पडल्याने नवीन कापसाचे दरही कमीच राहतील आणि अशा रितीने कापूस शेतकऱ्यांची कोंडीच होईल. त्यामुळे राहिलेला कापूस विक्री करण्याचे नियोजन मृगाच्या अगोदर विचारपुर्वक करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे.

व्यापारी पिकांखालील क्षेत्र एका बाजूला वाढत असताना ज्वारी, उडीद, मूग, चवळी या पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे. या धान्य - कडधान्याचा गरजेपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने याचे दर वाढत आहेत आणि आम आदमीची ज्वारीची भाकरी ही एक 'श्रीमंती ' लक्षण झाले आहे. तेव्हा राज्याची आणि देशाची गरज भागावी म्हणून त्या त्या भागातील शेतीचे नियोजन धान्य पिकाखाली निदान आपल्या राज्यापुरती गरज भागविण्याच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. म्हणजे अन्नधान्याच्या किंमती ह्या सर्व सामन्यांच्या आवाक्यात राहतील. त्याच्या तुटवड्याने जे दुर्गम भागात कुपोषण होते ते कमी होईल. डाळीखालील क्षेत्र हे झपाट्याने घसरते आहे. याचे कारण म्हणजे खरीप पावसाचा काळ कमी झाल्याने कडधान्य (डाळवर्गीय) पिकाखालील क्षेत्र घटत आहे. तर याची भरपाई ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे, तेथे उन्हाळ्यात तुरीचा खोडवा, उन्हाळी मूग यांचे नियोजन करावे. यासाठी केंद्रसरकारचे प्रोत्साहन आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तद्वतच खरीप भुईमूगाचे क्षेत्र कमी झालेले आहे. त्याचे क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले आहे, मात्र सोयाबीनवरील अळीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे देखील उत्पादन कमालीचे घटले आहे. शेंगदाण्याचे उत्पादन घटल्याने शेंगदाणा तेलाचे भाव १०० रुपयेहून अधिक झाले असल्याने आम आदमीच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. तेव्हा उन्हाळी भुईमूगाचे नियोजन करावे. खरीप भुइमुगाच्या उत्पादनापेक्षा उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन हे अधिकच येते तसेच इक्रीसेट पद्धतीने भुईमूग घेतला तर उत्पादन व दर्जा सुधारतो असे लक्षात आले. या कारणास्तव यवतमाळसारख्या जिल्ह्यात उन्हाळी भुईमूगाखालील क्षेत्र बऱ्यापैकी वाढले आहे.

शेतकऱ्यांची कापूस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. बियाणे भरपूर उपलब्ध असताना देखील शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यात अडचणी येत आहेत. पाऊसकाळ बऱ्यापैकी असल्याने आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिबकचे नियोजन केल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीचे नियोजन करावे. उताराच्या जमिनीत उतारास आडवे कडधान्य पिकाची लागवड करावी, म्हणजे जमिनीची धूप होणार नाही. तसेच पुढील उन्हाळ्यात जनावरांना चारा मिळण्यासाठी या कडधान्यापासून चुणी व भूस उपलब्ध होईल, तो दुधाच्या व मशागतीच्या जनावरांना उपयोगी पडेल. ज्या ठिकाणी पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे तेथे चारा पिकाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शक्यतो स्वावलंबी बनावे. कोणावर अवलंबून राहू नये. निसर्गावर मात करण्याचे देशभर तंत्रज्ञ प्रयोग करीत आहेत. त्या भागातील बारमाही पाणलोटाचे पिकाखालील क्षत्रे वाढले आहे. याचे उत्तम उदाहरण २००४ साली जो दुष्काळी तालुका शिरपूर (महारष्ट्र) होता तो सुरेश खानापूरकर या निवृत्त भूजल वैज्ञानिकाच्या प्रयासाने/ प्रयोगाने ४ वर्षात म्हणजे २००८ पासून या तालुक्यातील दुष्काळ पुर्ण हटला असून बारमाही क्षेत्र वाढले आहे. नांदेड जिल्ह्यातील खेडेगावातील ४५ स्त्रियांनी ४ महिने स्वश्रमाने तेथील पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे व तेथे उन्हाळी बागायतीही आहे. तसे अनेक राज्यातही प्रात्यक्षिक मॉडेल केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बारमाही ओलीत क्षेत्र वाढून जनावरांचा चार - पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. अशा पथदर्शक प्रकल्पाचे अनुकरण देशभर होणे गरजेचे आहे. याचे नियोजन मान्सूनपासून करावे. म्हणजे ऐनवेळी फजिती होणार नाही. बाजरीखालील क्षेत्रही घटत आहे. पावसाचा अंदाज बधून बाजरी पेरली तर ७५ दिवसात बाजरीचे उत्पादन चांगले येते.

कराळे (खुरासणी) हे कोकणपट्टी - रायगढ, ठाणे या भागातील पीक आहे. तसेच खरीप तीळ हे कमी दिवसात, कमी पाण्यावर येणारे एक गळीत पीक आहे. तर आपआपल्या भागातील सुधारित वाणांचा वापर करून पेरणी केल्यास शेतकऱ्यांना सहाय्यभुत होईल.

दर्जा, उत्पन्न व लवकर क्षत्रे मोकळे होण्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वेळापत्रकाप्रमाणे तसेच आपल्या भागातील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेवून वापर करावा. म्हणजे प्रतिकुल परिस्थितीवरही मात करता येईल.