उन्हाळी भुईमुगाची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



भारतात भुईमुगाचे क्षेत्राचे बाबतील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या खालोखाल महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो. आपल्या राज्यातील या पिकाखालील खरीप हंगामातील एकूण क्षेत्र ३.५३ लाख हेक्टर असून उत्पादन ४.१५ लाख टन आणि उत्पादकता ११७५ किलो / हेक्टर आहे. आपल्या राज्यातील भुईमूगाची सरासरी उत्पादकता अनेक वर्ष भारतातील उत्पादकतेपेक्षा बरीच कमी असल्यामुळे उत्पादकता वाढविण्यास बराच वाव आहे.

महराष्ट्रात उन्हाळी भुईमूगाखाली २.२५ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ३.७५ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उन्हाळी भुईमूगाची उत्पादकता ही १६५० ते १७०० किलो आहे.

भुईमूग हे द्विदल गटातील शेंगवर्गीय तेलबिया पीक आहे. वाढीच्या पद्धतीनुसार त्याचे उपट्या. निमपसऱ्या आणि पसऱ्या असे तीन प्रकार पडतात. तर वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या त्याचे स्पॅनिश, व्हेलेशिया आणि व्हर्जिनिया असे तीन वर्ग पडतात. स्पॅनिश व व्हेलेशिया हे दोन्ही उपट्या वर्गात मोडतात. तर व्हर्जिनियाचे निमपसऱ्या व पसऱ्या असे वाढीचे दोन वर्ग आहेत.

महाराष्ट्रातील भुईमूगाचे प्रचलित जातीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

१)   स्पॅनिश -   उपट्या   एस - बी -११  
२)   व्हेलेशिया -   उपट्या   कोपरगाव - ३
 
३)   व्हर्जिनिया-   निमपसऱ्या -   कोपरगाव - १
यु. एफ.७० -१०३
टी.एम.व्ही. -१०
४)   व्हर्जिनिया -   पसऱ्या   एम- १३  


भुईमुगाचा ए. के. १५९ हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी प्रसारित केला आहे. महाराष्ट्रा भुईमूग प्रामुख्याने खरीप हंगामात घेतला जात असला तर उन्हाळी हंगामात मिळणारा भरपूर सुर्यप्रकाश, पिकाच्या वाढीच्या काळात वेळच्या वेळी पाणी व किडीचे कमी प्रमाण यामुळे खरीप पिकापेक्षा उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन दीड ते दुप्पट येते.

जमीन :समपातळीतील मध्यम ते हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच वाळू, चूना व सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन भुईमूग पिकासाठी चांगली असते. मध्यम, भारी काळी, चांगली निचरा होणारी जमीन उन्हाळी भुईमूगासाठी योग्य असते. परंतु भुईमूगाच्या शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. तसेच अशा जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमीन भुसभुशीत होत असल्याने जमिनीत आऱ्या सहज जातात व शेंगाही चांगल्या पोसल्या जातात.

पूर्व मशागत : तूर, कापूस, ऊस आणि केळी या पिकानंतर भुईमूग घ्यावयाचा असल्यास जमिनीची चांगली मशागत होणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील बागायती क्षेत्रातून सर्वात जास्त नफा मिळविण्यासाठी कापूस पिकानंतर भुईमूग पीक घेतले जाते. खरीप पिकानंतर खोल नांगरट करावी. नांगरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रती एकरी १० -१२ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० किली देऊन फुळवाच्या २ - ३ पाळ्याने जमीन भुसभुशीत करावी.

सुधारित जाती :

१) एस. बी. - ११ : ही जात पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे. उपट्या प्रकारात मोडणारी ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते. एकरी शेंगाचे उत्पादन ८ ते १० क्विंटल मिळते.

२) टी. ए. जी. २४ : उपट्या प्रकारातील ही जात ११० ते ११५ दिवसात काढणीस येत असून एकरी ४० ते ४५ किलो बियाणे लागते. यामध्ये तेलाचे प्रमाण ४९ ते ५० % असून एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन मिळते. याच्या १०० दाण्यांचे वजन ३५ ते ४५ ग्रॅम भरते.

३ ) टी. जी. २६ : ही उपट्या प्रकारातील जात असून १०० ते ११० दिवसात शेंगा काढणीस येतात. टी.ए.जी. २४ प्रमाणेच एकरी ४० ते ४५ किलो बियाणे लागते. तेलाचे प्रमाण ४९ ते ५०% असून २० क्विंटल उत्पादन मिळते. १०० दाण्यांचे वजन ३५ ते ४५ ग्रॅम भरते. या दोन्ही जाती उन्हाळी हंगामासाठी संपूर्ण महारष्ट्रभर लागवडीस योग्य आहेत.

४) कोयना (बी - ९५ ) : निमपसऱ्या प्रकारातील ही जात पश्चिम महराष्ट्रात लागवडीस योग्य असून एकरी ४५ ते ५० किलो बियाणे लागते. १३५ ते १४० दिवसात काढणीस येत असून दाणे मोठे टपोरे असतात. १०० दाण्यांचे वजन ८० ते ९० ग्रॅम भरते. यामध्ये तेलाचे प्रमाण ९५% असून एकरी उत्पादन २२ ते २५ क्विंटल प्रति एकरी येते.

५) यु.एफ.७० - १०३ : ही जात निमपसरी असून पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे. १३५ ते १४० दिवसात काढणीस येते. १२ ते १५ क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते.

६ ) आय. सी. जी. एस. ११ : यू एफ ७० - १०३ प्रमाणे निमपसरी असून १२५ ते १३० दिवसात काढणीस तयार होते. १२ ते १८ क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते. पूर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे.

७ ) एम. - १३ : मराठवाडा, सोलापूर, नागपूर, पुणे भागात या जातीची लागवड करता येते. ही जात पसरी वाढणारी असून १३५ ते १४० दिवसात पेरणीपासून तयार होते. शेंगाचे एकरी उत्पादन ८ ते १० क्विंटल मिळते.

सोलापूर, नगर व मराठवाड्यातील पटाच्या पाण्याखालील क्षेत्रात भुईमूग मार्च - एप्रिल महिन्यात पेरून ऑगस्टमध्ये काढणी करतात व त्यांनतर रब्बी पीक घेतात. अशा भागात उन्हाळ्यात १२० -१२५ दिवसात तयार होणाऱ्या आय. सी. जी. एस. -११ वयू. एफ. ७० -१०३ या निमपसऱ्या व एम - १३ पसऱ्या जातीची लागवड करावी.

उन्हाळी हंगामामध्ये टपोऱ्या दाण्याच्या (एचपीएस) भुईमूगाच्या बी - ९५ (कोयना) आणि आय. सी. जी. व्ही. ८६५६४ (आय. सी. एस. - ४९) या जातींचा वापर करावा.

पेरणीची वेळ व अंतर :

उन्हाळी भुईमूगासाठी पेरणीची वेळ ही एक महत्त्वाची बाब आहे. पुढील खरीप हंगामाचा विचार करून जानेवारीचा तिसरा आठवडा ते फेब्रुवारीचा दुसरा आठवडा ही वेळ जास्त योग्य आहे. पेरणीचे वेळी किमान तापमान १८ डी. २० डी . सेंग्रे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. म्हणजे उगवण चांगली होते. पेरणी यंत्राने, पाभरीने किंवा टोकण पद्धतीने करावी. सारे पाडून जमीन ओलावून वाफश्यावर पेरणी करावी. उपट्या व निमपसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपातील अंतर १० ते १५ सेंमी राहील अशा तऱ्हेने पेरावे. त्यासाठी दर एकरी एस. बी. - ११ चे ४० किली बियाणे पेरणीसाठी वापरावे. एस. बी. - ११ व आय. सी. जी. एस. -११ एकरी झाडांची संख्या १.३३ लाख व एम- १३ झाडांची संख्या ८८ हजारपर्यंत ठेवावी.

उन्हाळा हंगामात कोयना (बी - ९५) या वाणाच्या अधिक उत्पादनासाठी रुंद (७५ ते १२० सेंमी) सरी - वरंब्यावर ३० सेंमी x १२ सेंमी टोकण पद्धतीने लागवड करावी.

सुधारित पेरणी पद्धत : जमिनीची १५ ते १८ इंच खोल नांगरट करावी. त्यानंतर जमिनीमध्ये प्रति हेक्टर दहा टन शेणखत अगर कंपोस्ट मिसळावे. पुन्हा १० ते १२ इंच खोल उभी - आडवी वखरणी करावी. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर एकसमान सपाट करावी. पाण्याचे व्यवस्थापन एकसमान राहण्यासाठी लहान आकाराचे वाफे किंवा गादी वाफे करताना माती परीक्षणाच्या शिफारशी प्रमाणे खताची मात्रा द्यावी. पेरणीसाठी स्पॅनिश उपटा प्रकाराचा वाण निवडावा.

सपाट वाफा : जमिनीचा उतार पाहून सर्वसाधारण १५ फूट लांब व दहा फूट रुंदीचे लहान वाफे करावेत. पुन्हा वाफ्यामध्ये जमीन एकसमान सपाट करावी. एक फूट अंतर असलेल्या दातेरी कोळप्याने दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात. ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंव सहा इंच अंतरावर दोन बियाणे टोकण करावे. एका ठिकाणी दोन बियांचे टोकण केल्याने झाडाची कमाल संख्या राहते व उत्पादनात वाढ होते. टोकण झाल्यानंतर सर्व बियाणे दक्षतापूर्वक झाकून घ्यावे. नंतर पाणी सिंचन महत्त्वाचे असून, वाफ्यातील सर्व जमिनीस पाणी पोचल्यानंतर दुसऱ्या वाफ्यात पाणी सिंचन करावे.

गादी वाफा : जमिनीच्या सपाटीकरणानंतर पूर्व - पश्चिम गादी वाफे तयार करावेत, गादी वाफ्याची तळाची रुंदी ३.५ फूट, टपाची रुंदी २.५ फूट व उंची ०.५ फूट ठेवावी. यामुळे दोन गादी वाफ्यांमध्ये एक फूट रुंदीची सरी तयार होते. पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व मशागत सरीतून करता येते. गादी वाफ्याच टप एकसमान सपाट करावा. टपावर १२ इंच अंतरावर दीड ते दोन इंच खोल ओळी आखाव्यात, ओळीमध्ये चार इंच अंतरावर एक बी किंवा सहा इंच अंतरावर दोन बियांचे टोकण करावे. टोकण झाल्यावर सर्व बियाणे मातीचे झाकून घ्यावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

प्लॅस्टिक अच्छादन तंत्र : ही सुधारित तंत्रज्ञान पद्धत आहे. या तंत्रज्ञानातील बारकावे लक्षात घेणे आवश्यक असते. प्लॅस्टिक आच्छादन मशागतीसाठी कुशल मजुरांची गरज असते. या पद्धतीमध्ये प्राथमिक खर्च व वेळ अधिक लागतो. प्लॅस्टिक आच्छादनाची मशागत योग्य व व्यवस्थित करणे महत्त्वाचे असते. या पद्धतीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे गादी वाफे तयार करावेत. तीन फूट रुंदी, सात मायक्रॉन जाडी व १.२५ इंच व्यासाचे ८ x ८ इंच अंतरावर छिद्रे असलेले प्लॅस्टिक उपलब्ध असते. प्लॅस्टिक अंथरण्यापूर्वी गादी वाफ्यावर माती परीक्षण शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी. दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिक अंथरण्याची प्रक्रिया सुरू करावी. प्लॅस्टिकच्या टोकाकडील कडा गादी वाफ्याच्या सुरवातीच्या कडावर अलगद खोचून मातीने बंद करावे. नंतर गाडी वाफ व प्लॅस्टिकच्या लांबीनुसार हळूहळू अलगद ताणून अंथरावे, प्लॅस्टिकच्या दोन्ही कडा गादी वाफ्याच्या काडावर अलगद खोचून बंद करावे. टोकण करण्यापूर्वी छिद्रातील माती भुसभुशीत करावी. छिद्रामध्ये दोन बियांचे टोक जमिनीकडे खाली दीड ते दोन इंच अलगद टोकण करावे. नंतर सरीमधील ओलसर मूठभर माती छिद्रावर लावून छिद्र संपूर्ण झाकले जाईल, याप्रमाणे बंद करावे. टोकण झाल्यावर तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करावे. राज्यातील जमिनीमध्ये उन्हाळी हंगामात जमिनीच्या सुपीकतेनुसार सपाट वाफा मशागत पद्धतीने प्रति हेक्टर ५० ते ६० क्विंटल व प्लॅस्टिक आच्छादन पद्धतीने ६५ ते ७५ क्विंटल उत्पादनक्षमता आहे.

बीजप्रक्रिया : पेरणीकरिता चांगले, टपोरे दाणे निवडावेत. बारीक, सुरकुतलेले व फुटलेले दाणे वेचून बाजूला काढावेत. ४० किलो बियाण्यासाठी ५०० मिली जर्मिनेटर + १ लिटर पाणी एकत्र करोन बियाण्यावर शिंपडावे. हे करताना दाण्यांवरील आवरण निघणार नाही याची दक्षता घ्यावी. जर्मिनेटरच्या बीजप्रक्रियेमुळे उगवण लवकर एकसारखी आणि चांगली होते. तसेच मर, मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी किंवा प्रादुर्भाव झाला असल्यास पाण्यातून एकरी १ लि. जर्मिनेटर ५०० ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईदसह सोडावे.

खते : भुईमुगासाठी रासायनिक खते देणे शक्यतो टाळावे. त्यासाठी शेणखत, गांडूळखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत एकरी ५० किलोची १ ते १।। बॅग लागवडीपुर्वी देऊन नंतर पहिली खुरपणी झाल्यावर आवश्यकतेनुसार पुन्हा २५ ते ५० किलो कल्पतरू खत द्यावे. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जातो. तसेच झाडाच्या वाढीबरोबर शेंगा पोसण्यासही मदत होते. त्यामुळे शेंगा भरपूर लागून दाणे एकसारखे भरतात. परिणामी उत्पादनात निश्चितच वाढ होते.

आंतरशागत : पेरणीनंतर पीक १५ दिवसाचे झाल्यावर पहिली कोळवणी करून लागलीच खुरपणी करावी.१ महिन्याच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी पेरणीनंतर ४५ दिवसांनी खोल करावी, म्हणजे पिकास मातीची भर दिली जाते. जमीन भुसभुशीत होते व त्यामुळे आऱ्या सहज जमिनीत शिरतात.

पाणी : पेरणीनंतर ३ - ४ दिवसांनी हलकेसे आंबवणीचे पाणी द्यावे. म्हणजे उगवण चांगली होईल. संपूर्ण उगवण झाल्यावर १५ -२० दिवसापर्यंत ओलिताचा ताण दिल्यास कायीक वाढ कमी होऊन अधिक फुलोरा येतो. पुढे मार्चमध्ये १० -१२, एप्रिलमध्ये ८ ते १० व मे मध्ये ६ ते ८ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी शेतात जास्त काळ साठवू नये. त्यामुळे पिक पिवळे पडते. त्याचप्रमाणे पाणी अपुरे पडले किंवा योग्य वेळी पाणी दिले नाही तर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी वेळापत्रकापेक्षा जर्मिनेटर ३० मिली, थ्राईवर ४० मिली, क्रॉंपशाईनर ५० मिली, राईपनर ३० मिली, प्रोटेक्टंट ३० ग्रॅम, प्रिझम ३० मिली, न्युट्राटोन ३० मिलीची प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी. क्रॉंपशाईनरचे प्रमाण ५० मिली / १० लि. पाणी घेतल्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते आणि जर्मिनेटर, थ्राईवर, राईपनर, प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी ३० मिलीच्या वापराने झाडांनी वाढ होऊन शेंगा चांगल्या पोसतात.

शेंगा पक्व होण्याच्या वेळी पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे थोडे वाढवावे म्हणजे जास्त ओलाव्यामुळे शेंगा कुजणार नाहीत.

पीक संरक्षण : उन्हाळी भुईमूगामध्ये खरीपापेक्षा रोग व कीड कमी येत असल्याने तुलनात्मकदृष्ट्या उत्पादनात कमी घट येते. किडीमुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट येते. उन्हाळी भुईमूगाला शेंडेमर, पाने गुंडाळणारा अळी व तुडतुडे, फुलकिडे यामुळे प्रादुर्भाव होतो.

शेंडेमर : जेथे झाडांची एकरी संख्या कमी आहे, तेथे शेंडेमर हा रोग जास्त दिसून येतो. शेंडेमर (बड नेक्रॉसीस) हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार फुलकिड्यांमुळे होतो. म्हणून फुलकिड्यांने नियंत्रण करणे आवश्यक ठरते.

सुक्ष्म द्रव्यांचा पुरवठा

उन्हाळी भुईमूगाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आवश्यकतेनुसार करावा.

१) जस्त (झींक) : जर जमिनीत जस्तानी कमतरता असेल तर झाडांची पाने लहान राहतात. पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो व नंतर पाने वाळल्यासारखी दिसतात. जमिनीत जस्त कमी असल्यास ४ किग्रॅ. प्रति एकरी झींक सल्फेट पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळावे किंवा उभ्या पिकात कमतरता आढळल्यास १ किलोग्रॅम झींक सल्फेट २०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.

२) लोह : जमिनीत लोहाची कमतरता आढळल्यास भुईमूगाची वाढ खुंटते, पाने पिवळी व त्यानंतर पांढरी पडतात. त्यासाठी एकरी १ किलोग्रॅम फेरस सल्फेट, ४०० ग्रॅम चुना आणि १ किलोग्रॅम युरिया २०० लिटर पाण्यात विरघळून पिकावर फवारणी करावी.

३) बोरॉन : हलक्या व मध्यम जमिनीत भुईमूगाच्या पिकासाठी बोरॉन या सूक्षम द्रव्याचा वापर केल्यास उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी पिक असताना १०० ग्रॅम बोरीक आम्ल २०० लिटर पाण्यात विरघळून फवारले असता उत्पादनात वाढ होते. एकरी २ किलोग्रॅम बोरॅक्स पेरणीपूर्वी जमिनीत मिसळल्यास बोरॉन ची कमतरता राहत नाही.

४) कॅल्शियम व गंधक : ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण ४० ग्रॅम/१०० ग्रॅम पेक्षा कमी आहे. अशा जमिनीत भुईमूगासाठी प्रती एकरी २०० किलोग्रॅम जिप्सम पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी २ हप्त्यांत झाडालगत ५ सें. मी. अंतरावर आऱ्यांची वाढ होते त्या भागात जमिनीत पेरून दिल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भुईमूगाच्या इक्रीसॅट पद्धतीच्या लागवडीत जिप्सम हे खत देण्याची शिफारस आहे. जिप्सममधून कॅल्शियम २४% आणि गंधक १८.६ % उपलब्ध होते असल्याने भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्यास, जसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या केल्यास वरील अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघून रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि उत्पादन व दर्जात हमखास वाढ होते.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी :(उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३५० ते ४०० मिली. + २५० लि.पाणी.

काढणी : भुईमूगाची काढणी योग्य वेळेस करणे फार महत्त्वाचे आहे. कारण लवकर काढणी केल्यास अपक्व शेंगाचे प्रमाण जास्त असते. काढणी उशिरा केल्यास पीक मोसमी पावसात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेंगाना कोंब फुटून नुकसान होते. यासाठी भुईमूगाचे पीक काढणीस योग्य आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता ठिकठिकाणी झाडे उपटून शेंगा तयार झाल्या किंवा नाहीत ते पहावे. तयार झालेल्या शेंगाचे टरफल आतील बाजूने काळसर दिसते व त्यातील शिरा स्पष्ट दिसू लागतात. तसेच शेंगदाण्यांना मुळचा रंग प्राप्त झालेला दिसू लागतो.

पीक तयार झाले म्हणजे झाडे हाताने उपटून शेंगा तोडून त्या उन्हात वाळवाव्यात. शेंगा बियाण्यासाठी वापरावयाच्या असल्यास शेंगा उन्हात न वाळविता सावलीत चांगल्या वाळवून ठेवाव्यात.

उत्पादन : उन्हाळी हंगामात रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने व पाणी व्यवस्थापन केल्याने उन्हाळी भुईमूगाचे सर्व साधारण एकरी ८ ते १० क्विंटल वाळलेल्या शेंगाचे उत्पादन येते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वेळापत्रकाप्रमाणे वापर केल्यास उत्पादनात यापेक्षाही वाढ होते. उन्हाळी भुईमूगाचे क्षेत्र खरीप भुईमूगापेक्षा कमी असल्याने उन्हाळी हंगामातील शेंगास जास्त भाव मिळतो. उन्हाळी भुईमूगाचे उत्पादनही खरीप हंगामातील भुईमूगापेक्षा सुमारे दीड ते दुप्पटीने जास्त येते. कारण रोग किडींचा प्रादुर्भाव कमी व पाणी साचून मर ही कमी असते. उन्हाळ्यातील शेंगा वाळविण्यासाठी भरपूर वाव असतो व त्याचे लगेच तेलसुद्धा काढता येते.

अशाप्रकारे शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रांचा अवलंब केल्यास उन्हाळी भुईमूगाच्या क्षेत्रात वाढ करून उत्पादनातही निश्चित वाढ करता येईल आणि खाद्यतेलाच्या आयातीवर होणारा खर्च कमी करता येईल व परकीय चलन वाचेल.