प्रथमच गणेशपासून ६ लाख रू. उत्पन्न, १५ एकर भगव्याची नवीन लागवड

श्री. हनुमंत आनंद शिंदे,
मु. पो. काळज, ता. फलटण, जि. सातारा.
मो. ९९७०५१५४४५


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर १९९८ - ९९ साली गणेश डाळींबावर केला होता. त्यावेळेस चांगला रिझल्ट मिळाला होता. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाची औषधे मार्केटयार्ड पुणे येथील ऑफिसवरून घेत असे. माझ्याकडे त्यावेळी मध्यम मुरमाड जमिनीत ५०० गणेश डाळींबाची झाडे होती. झाडांना त्यावेळी सुरूवातीपासून दर आठवड्याला अशी ४ महिने सतत पंचामृत औषधांची फवारणी करत असे. त्याचबरोबर जर्मिनेटरचे दर महिन्याला ड्रेंचिंगही करत होतो. त्यामुळे फायदा असा झाला की, झाडांची वाढ चांगली होऊन झाडाचा विस्तार वाढला. पाने निरोगी, हिरवीगार, रुंद असायची. फांद्या व काडी जाड, सशक्त होत्या. काडीमध्ये अन्नसाठा भरपूर तयार झाला. त्यामुळे बहार धरताना बहार एकसारखा निघाला होता. फुलकळी ही भरपूर निघाली होती, सततच्या फवारणीमुळे अजिबात फुलगळ न होता फलधारणा होऊन झाडे पुर्णत : बहरून गेली होती. पुर्वी डाळींब या पिकावर मावा, तुडतुडे बुरशी, चिकट असे रोग व कीड येत असे. त्याला पंचामृत औषधांच्या फवारणीमुळे आळा बसत असे. गणेश डाळिंबाचे त्यावेळी विक्रमी व दर्जेदार उत्पादन मिळाले होते. प्रत्येक झाडांवरून ५० किलो माल मिळाला होता. या आधी मला कधीच एवढा माल मिळत नसे. एवढेच नव्हे तर मार्केटला इतरांच्या मालापेक्षा १० ते २० रू. डझनला ज्यादा भाव मिळत असे. मुंबई मार्केटला इतरांना ३० ते ४० रू. डझनला भाव असताना ५० ते ६० रू. डझन भाव त्याकाळी मला मिळत होता. म्हणजे दिडपटीहून अधिक भाव मालाचा दर्जा उत्तम असल्याने मिळत असे. पंचामृत फवारणीमुळे इतरांपेक्षा मालाची चकाकी, साईज, वजन व गोडी अधिक असल्याने हे साध्य होत असे. ५०० झाडांपासून जवळपास १२ ते १२।। टन उत्पादन मिळाले होते. खते, औषधे व मजुरीवर ५० ते ६० हजार रू. खर्च झाला होता. खर्च वजा जाता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मला प्रथमच त्यावर्षी ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.

या अनुभवावरून २००८ मध्ये लागवड केलेल्या भगवा डाळींबाला आता पुन्हा डॉ.बावसकर तंत्रज्ञाना चा वापर करत आहे. भगवा डाळींब १२ x १० फुटावर १५ एकर मुरमाड जमिनीत लावलेले आहे. सध्या झाडांची उंची ७ ते ८ फूट असून गेल्या महिन्यात ताण दिला आहे. त्यानंतर बागेची छाटणी करून शेणखत, निंबोळी पेंड, करंजी पेंड इ. खतांचा वापर केला आहे व आता मी हार्मोनी व प्रोटेक्टंट पावडर फवारणीसाठी घेऊन जात आहे. सध्या फुलकळी लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात आभाळ आल्यामुळे फुलगळ होऊ लागली. ती थांबण्यासाठी व फलधारणा होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट व हार्मोनीची फवारणी करणार आहे.