कोरडवाहू शेतकऱ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची दिंडी !

श्री. हेमंत औदुंबर राऊत,
मु.पो. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर,
मोबा. ९९२३७६७८५८


५० वर्षापुर्वी सोलापूर जिल्ह्यातील घोटी व साडे ही १००% बागायती गावे. त्यावेळी द्राक्ष, डाळींब, केळी, लिंबू, पानाचे मळे ही पिके घेतली जात असे, मात्र १९७२ साली जो भयान दुष्काळ पडला त्याने जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खोल गेली. पुर्वी ज्या विहीरी १०० - १२५ फूट खोल होत्या त्यादेखील तुडुंब भरत असत. मात्र १९७२ च्या दुष्काळापासून पाऊसमानाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेले. त्यामुळे पाण्याच्या शोधात आम्ही आज मितीस विहीरी ७०० ते ८०० फुटापर्यंत खोल नेल्या आहेत. मात्र तरीही पुरेसे पाणी लागत नाही अशी परिस्थिती उद्भवल्याने शेती करणे अवघड झाले आहे.

गेल्यावर्षी अॅग्रोवन कृषी प्रदर्शन पाहत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'कृषी विज्ञान' मासिक मिळाले. ते तेथेच वाचून लगेच वर्षभरासाठी वार्षिक वर्गणी भरली. या मासिकांचा गेली ६ महिन्यांपासून अभ्यास करत आहे. त्यातील विविध पिकांच्या लागवडीचे लेख तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बदलत्या हवामानात, कमी पाण्यावर दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतल्याच्या मुलाखती वाचून प्रभावित होऊन याच तंत्रज्ञानाने आपण सध्याच्या परिस्थितीवर मात करून शेतीस पुन्हा उभारी देऊ शकू याची प्रेरणा मिळाली. यावरून चालू वर्षी खरीपातील कांदा, तूर, उडीद, मका या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचे ठरविले आहे. त्याकरिता प्रथम डॉ. बावसकर सरांचे आज (१८ जून २०१५) रोजी मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.

यावर प्रथम सरांनी सुचर्विले की, कांदा, तूर, उडीद, मूग, मका या पिकांवरील 'कृषी विज्ञान' मासिके ही पहाटे ३ ते ५ या वेळेत वाचा. त्यातून आपणास तंत्रज्ञान वापरण्याचे संबंधी संपुर्ण माहिती मिळेल आणि त्यातूनही आपणास काही शंका उरल्या तर आपण फोनवरून माहिती घ्या किंवा पुन्हा भेटा. येताना मातीपरिक्षण अहवाल आणा, म्हणजे त्यावरून अजून सविस्तर मार्गदर्शन करता येईल.

पुण्यात मॉडर्न कॉलेजमध्ये फस्ट ईअरपर्यंत शिक्षण घेतले. वडील शिक्षक होते. आजोबांपासून आलेली वडीलोपार्जित जमिनीवार वडिलांचा फार जीव होता. कारण आजोबांनी फार कष्टातून, हाल अपेष्ठा सोसून ही शेती वाढविली होती. शेतीत काम करण्यास माणसे मिळेनात. मात्र ज्या जगन्नायकाने ६०० कोटी जनतेची वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी पृथ्वीवरील शेतकऱ्यालाच नायक केले आणि ते कार्य करण्याचे भाग्य जर आपणास लाभत असेल तर त्याहून श्रेष्ठ ते कार्य कोणते ? या विचाराने शिक्षण अर्धवट सोडून शेतीकड वळालो. पुर्वीचे शिक्षण म्हणजे त्यावेळची मॅट्रिक आताच्या एम.ए.ला ऐकत नाही. सध्या माझे वय ५९ वर्ष असून ४० वर्ष शेती करत आहे. ३० वर्षापुर्वी डाळींब, द्राक्ष, लिंबू पुण्याला विक्रीस आणत होतो. आताची १९७० नंतरची जी पिढी झाली आहे ती शहराच्या वाटेवर लागली आहे. नव्हे ती तेथे स्थिरावली आहे. शहरी सुविधांमुळे सागरातील होडीसारखा त्या जिवननौकेचा ते आनंद घेत आहेत.

१९७२ च्या दुष्काळानंतर पाण्याची पातळी खाली गेली आहे असे सरांना सांगितल्यानंतर सरांनी यावेळी एक दृष्टांत सांगितला, "राजस्थानमध्ये ७५० फूट खोल बोअर घेतले. तेथे एवढे पाणी लागले की, त्यावर ५ एकर डाळींब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून यशस्वी केले.

असेच वायूसेनेतून निवृत्त झालेले विश्वजीत आकरे यांनी विदर्भातील पारंपारिक शेतीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या माध्यमातून छेद देवून २१ एकर डाळींब यशस्वी केले.

(यांची मुलाखत याच अंकात दिली आहे) असे हजारो प्रयोग आम्ही यशस्वी केले. त्या सर्व मुलाखती जगाला मार्गदर्शक ठरत आहेत."

मका करताना आम्ही नत्र, स्फुरद, पालाश अशी रासायनिक खते देतो. तेव्हा सरांनी सांगितले, मका हे खादाड पीक आहे. त्यामुळे याला १५:१५:१५, १९:१९:१९. १०:२६:२६, १८:४६:०० अशी रासायनिक खते दिली जातात. अशा खतांनी जमिनी नापिक व निसुर होतात. तेव्हा मका टोकाल्यानंतर पाभरीने वरंब्यावर कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २ बॅगा मोघडले आणि ते २।। इंच खोल गेले तर त्यामुळे मुळांची वाढ व जारवा चांगला राहील. या कल्पतरू खतामुळे हवेतील बाष्प शोषले जाते. त्यामुळे मुळांजवळ गारवा निर्माण होतो. गारवा निर्माण झाल्याने जारवा वाढतो. त्यामुळे कमी पाण्याच्या भागास ते वरदान ठरते. या खतामुळे हवा, पाणी आणि अन्न याचा एकत्रित लाभ प्रतिकूल परिस्थितीत मिळून ते तृणधान्य, कडधान्य, शेंगवर्गीय पिकांच्या उत्पादनासाठी उपकारक ठरते. रासायनिक खते तसेच झिंकसारखी खते जमिनीतून घालू नयेत. त्याऐवजी सप्तामृताच्या २ - ३ फवारण्या केल्या असता आणि २ - ३ संरक्षित पाणी देता आली तर पिके पाण्याचा ताण सहन करतात. जर्मिनेटरची प्रक्रिया करून मुळांवर नत्राच्या गाठी वाढून पिकाची नत्राची गरज भागविली जाते. सप्तामृत फवारण्यांमुळे इतर लागणाऱ्या गोष्टी जमिनीतून न देता थेट पानांवाटे दिल्याने त्या लवकर, सुलभ, वेळेवर, प्रमाणात त्या - त्या अवस्थेत मिळाल्याने उत्पादनात पारंपारिकतेपेक्षा अधिक दर्जेदार, अधिक भाव देणारे व शेतकऱ्यांला कमी काळात समाधानकारक नफा मिळवून देणारे हे तंत्रज्ञान आहे.

मका किंवा कडधान्य, भाजीपाला पिके यासाठी पारंपारिक किटकनाशके न वापरता प्रोटेक्टंट हे जैविक किटकनाशक वापरावे. याचा हजारो शेतकऱ्यांनी अनुभव घेतला आहे. तेव्हा आपत्तीची जी भिती आहे की, रासायनिक खते, किडनाशके व बुरशीनाशके वापरली की, पिकांवरील किड किंवा रोग तर जात नाहीतच, परंतु विषारी रासायनिक अंश राहिल्याने ती उत्पादने मानवाच्या आरोग्यास घातक ठरतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यास आधारभूत किंमत ना व्यापारी देत, ना घेणाऱ्या ग्राहकाची क्रयशक्ती कमी असल्याने तो देत. कोणीही कितीही नगारा वाजवला तरी या घोष वाक्याचा शिमग्याला लहान मुले डफली वाजवून तुटल्यावर जसा डफलीचा आवाज होतो तशी शेतकऱ्यांची आजची अवस्था झाली आहे. तेव्हा या सर्व संकटांवर मात करून वरील सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी हे तंत्रज्ञाना वरदान आहे. असे देशभरातील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. ते आपणही अनुभवावे व या दिंडीत आपला सहभाग नोंदवावा.