२।। एकर शेवगा डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने १ वर्षात २।। लाख

श्री. सुरेश बाळासाहेब शेलार,
मु.पो. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ८६९८९०९७७९


१ जून २०१४ ला ५' x ५' वर ओडीसा जातीचा शेवगा २।। एकरमध्ये लावला आहे. जमीन मध्यम प्रतीची आहे. पाणी नेटाफिम ठिबकने देतो. शेवगा लावतेवेळी आंतरपीक ऑरेंज झेंडू दोन्ही झाडांच्यामध्ये १ - १ रोप याप्रमाणे लावला. झेंडू ६० ते ६५ दिवसात चालू झाला. गणपती, नवरात्रात मार्केटला आल्याने ३० रू. पासून ८० रू. पर्यंत भाव मिळाला. हा झेंडू २- २।। महिने चालला त्यापासून १ लाख रू. उत्पन्न मिळाले.

शेवगा लागवडीनंतर १५ दिवसात ३ ते ४ इंचाचा असताना जर्मिनेटर एकरी १ लि. ठिबकमधून सोडले. फुटव्यासाठी प्रिझम व जर्मिनेटर फवारले. परत हिरव्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यावर नुवान फवारले. त्याने आळी आटोक्यात आली. शेवग्याचा २।। - ३ फुटावर पहिल्यांदा शेंडा खुडला. नंतर फुटवा वाढला. परत फांद्यांचा २ फुटावरून शेंडा खुडला. ५ - ५।। महिन्यात ज्वारीच्या आकाराची फुले दिसू लागली. त्यानंतर प्रत्येक १५ दिवसाला पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी व अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी याप्रमाणे सप्तामृत फवारत होतो. तसेच प्रत्येक महिन्याला जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करत होतो. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊन माल पोसू लागला.

पिकाला फुटवा वाढीच्या आवश्यकतेनुसार १३:४०:१३ आणि ०:५२:३४ ठिबकमधून देत होतो. शेवगा ७ व्या महिन्यात चालू झाला. त्यावेळी झेंडू काढला होता. झेंडू उपटून तसाच शेवग्याच्या खोडाजवळ टाकून कुजवला त्याचे चांगले खत झाले.

डिसेंबरमध्ये शेंगा चालू झाल्यावर अर्धा - अर्धा प्लॉट दिवसाड तोडत होतो. १०० किलो दिवसाड शेंग निघत होती. विक्री सुरुवातीला वडगाव, मांडवगण, काष्टी, न्हावरा असा आठवडे बाजार केला. हातविक्री करणाऱ्यांना १५ - १५, २०- २० किलो शेंगा देत असे. त्यावेळी ३० - ४० रू. भाव मिळत होता. जानेवारीत ५०रू./किलो मिळाला.

माल जसा वाढला तसा ह्या आठवडे बाजाराबरोबरच पुणे मार्केटला माल पाठवू लागलो. पुणे मार्केटला १०० किलो माल आणला तर २ गाळ्यावर ५० - ५० किलो असे विभागून माल टाकत. त्यामुळे दर चांगला मिळत होता. एखाद्या व्यापाऱ्याने भाव कमी दिला की त्याला त्याच दिवसाचा दुसऱ्या गाळ्यावरील पट्टीवरचा भाव दाखवत. त्यामुळे भाव चांगले मिळत. दत्तात्रय तुळशीराम भुजबळ गाळा नं. २३२ आणि लक्ष्मीशंकर यांचे गाळ्यावर शेवगा पाठवितो. डिसेंबर ते मे (१५ मे २०१५) अखेर शेंगा चालू होत्या. १५ मे ला अर्धा प्लॉट छाटला व अर्ध्या प्लॉटला आज १ जॊओन २०१५ शेंगा असल्याने त्या संपल्यावर साधारण १५ जूननंतर छाटणार आहे.

2।। एकरातील या शेवग्यापासून २।। लाख रू. उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. याला खर्च ६० हजाराच्या जवळपास आला आहे.

५ किलो व २ किलोचे शेंगाचे नायलॉन दोरीने बंडल बांधून पाठवित आसे. २ माणसे दुपारी २ - ३ नंतर १०० - १५० किलो माल तोडतात. संध्याकाळी पोत्यात पॅकिंग करून ७ वा. तरकारी गाडी भरून रात्री २ वाजता पुणे मार्केटला माल येतो. शेवग्याचे पीक वाटते तेवढे सोपे नाही. आमच्या गावातील ४ - ५ जणांचे प्लॉट योग्य व्यवस्थापना अभावी उत्पादन कमी आल्याने काढून टाकले. आम्ही मात्र दररोज शेतात जाऊन पीक पाहणी करून गरजेनुसार लागलीच फवारण्या घेतो. त्यामुळे हे खात्रीशीर उत्पादन मिळत आहे. फुल लागण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम फवारतो. शेंगा पोसण्यासाठी राईपनर व न्युट्राटोन फवारतो. फळधारणा होण्यासाठी थाईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट फवारतो. त्यामुळे हे सर्व साध्य होत आहे.