लागवड खरीपातील घेवड्याची

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


खरीपाटील घेवड्याला आपण श्रावण घेवडा, राजमा किंवा फ्रेंचबीन म्हणतो. हे एक शेंगवर्गीय कडधान्य पीक आहे. याच्या हिरव्या शेंगाचा पौष्टिक भाजीकरिता किंवा वाळलेल्या बियांचा कडधान्य म्हणून उपयोग होतो. उतर भारतात या पिकाच्या वाळलेल्या दाण्यापासून उसळीसारखी मसालेदार भाजी केली जाते. तिला 'राजमा' असे म्हटले जाते. उपहार गृहात या भाजीला विशेष मागणी असते. घेवड्याच्या प्रती १०० ग्रॅम पक्व दाण्यामध्ये ६९.९ टक्के कर्बोदके (पिष्टमय पदार्थ) २१.१ टक्के प्रथिने, १.७ टक्के मेद याशिवाय ३८१ मि. ग्रॅम कॅल्शियम, ४२५ मि. ग्रॅम फॉस्फरस, १२.४ मि. ग्रॅम लोह आणि 'अ' जीवनसत्त्व असते. हे पीक पक्व होईपर्यंत पूर्णपणे झडून गेल्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते आणि जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते. शिवाय वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्या देशास प्रथिनेयुक्त कडधान्य पिकाच्या उत्पादनाचा तुटवडा भासत आहे. कडधान्याची वाढती गरज लक्षात घेता घेवडा लागवडीस भरपूर वाव आहे.

* जमिनीची निवड व मशागत : घेवड्याचे पीक मध्यम ते भारी व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते. आम्लधर्मी किंवा चोपण जमिनीत हे पीक घेणे टाळावे. पिकाच्या लागवडीसाठी खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मध्यम खोल नांगराने नांगरट करून ढेकळे फुटल्यानंतर हेक्टरी २० - २५ बैलगाड्या शेणखत घालून वखराच्या आडव्या उभ्या दोन - तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

* हवामान व हंगाम : घेवडा पीक मुख्यत्वेकरून थंड हवामानाच्या प्रदेशात घेतले आहे. भारतातील जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात खरीप पीक म्हणून घेतले जाते. तसेच महारष्ट्रातील पुणे. सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या भागात हे पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

७० - ८० सें.मी पर्यंत पाऊसमान असलेल्या भागात हे पीक चांगले येते. पिकाच्या वाढीस १६ - २४ डी. सें. ग्रे. तापमान लागते. हे पीक धुके, जास्त पाऊस, जास्त काळ हवामानातील आर्द्रता यास संवेदनशील आहे.

मराठवाड्यात घेवडा हे पीक रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते. परंतु योग्य वाणाची निवड केल्यास खरीप हंगामातही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उत्पदान मिळू शकते.

* सुधारीत जातीची निवड : श्रावण घेवड्याच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत जातींची लागवड करावी.

१) कंटेडर: अमेरिकेत विकसित झालेली ही झुडुपवजा वाढणारी जात उत्पादनाला चांगली तसेच व्हायरस आणि भुरी रोगाला प्रतिकारक आहे. हिच्या शेंगा लांब, गोल आणि भरपूर गरयुक्त असतात. वाळलेले दाणे हे जाड, लांबट व बदामी रंगाचे असतात.

२) पुसा पार्वती : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथून प्रसारित झालेल्या या जातीच्या शेंगा आकर्षक हिरव्या रंगाच्या व गोलसर असून उत्पन्न भरपूर येते.

३) अर्का कोमल (आय. आय. एच. आर. - ६०) : भारतीय उद्यानविद्या संस्थान बेंगलोर येथून प्रसारीत करण्यात आलेल्या या जातीच्या शेंगा आकर्षक हिरव्या रंगाच्या, चपट्या व सरळ वाढणाऱ्या आणि वाहतुकीस उत्तम असतात. शिजवल्यानंतर स्वाद चांगला येतो. या जातीच्या आकर्षक बदामी रंगाच्या वाळलेल्या दाण्याचे उत्पादनही चांगले येते.

४) वाघ्या : ही पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेली जात असून वाणाचा रंग फिकट गुलाबी व त्यावर लाल रेषा असतात. ही जात व्हायरस रोगास बळी पडते. वाळलेल्या दाण्याचे हेक्टरी उत्पदान १२ - १५ क्विंटल मिळते.

५) फुले सुरेखा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण अधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेंगाचा रंग फिकट हिरवा असून त्या सरळ आणि चपट्या आहेत. व्हायरस, मर, करपा, व पाने चुरमुरने या रोगास प्रतिकारक आहे.

याशिवाय व्ही. एल. बोनी - १, जंपा, एच. पी. आर - ३५, एच. पी. आर. - ६७ आणि वरुण इ. जाती प्रसिद्ध आहेत.

* पेरणी : जर्मिनेटर २५ मिली + प्रोटेक्टंट १० ग्रॅम प्रति लि. पाण्यात घेऊन बियाणी ५ ते १० मिनिटे भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणी करावी. म्हणजे बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टळून उगवण लवकर व अधिक प्रमाणात होईल.

खरीप हंगामात जूनच्या पहिल्या पावसानंतर घेवड्याची पेरणी करावी. ३० सें. मी. x १५ सें. मी. अथवा ४५ सें. मी. x ९० सें. मी. (२.२२ लाख झाडे प्रति हे.) अंतरावर पेरणी केल्यास हेक्टरी ७५ - ९० किलो बियाणे पुरेसे आहे. घेवड्याचे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून उपलब्ध करून घेता येते. सरळ सपाट वाफ्यात पेरणी केल्यास रुजणाऱ्या बियांतून निघणाऱ्या कोवळ्या अंकुरावर मातीचा कडक थर/पापुद्रा बसण्याची शक्यता असते. म्हणून पाण्याचा ताण पडल्यास ४ - ५ दिवसांनी जमिनीस हलके पाणी देवून भिजवावे. जेणेकरून ही अडचण दूर होईल व उगवण चांगल्या प्रकारे होईल.

* खत व्यवस्थापन : हे पीक कडधान्य असले तरी इतर कडधान्यासारखे हवेतील नत्र स्थिरीकरण करू शकत नाही. कारण याच्या मुळावर गाठी तयार होत नाहीत.

घेवडा पीक खताच्या जादा मात्रेला चांगला प्रतिसाद देते. त्यासाठी पेरणीपुर्वी शेणखत हेक्टरी १० ते १२ टन आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ते ३०० किलो द्यावे. या पिकास दर हेक्टरी १०० - १२० कि. नत्र, ५० - ६० कि. स्फुरद आणि ५० - ६० कि. पालाश देणे फायद्याचे ठरते.

* पाणी व्यवस्थापन : बी उगवल्यानंतर खरीप हंगामात घेवडा पिकास पावसाचा ताण पडल्यास आवश्यकतेनुसार पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळते. शिवाय जास्त पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा न झाल्यास पाणी साचून पीक खराब होणार नाही. याचीही दक्षता घेणे गरजेजे आहे.

* तण व्यवस्थापन : तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरणीनंतर सुरूवातीचे ३० - ३५ दिवस महत्त्वाचे आहेत. यासाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी आणि ३० दिवसांनी एक कोळपणी पुरेशी ठरते.

* रोग व कीड नियंत्रण : घेवडा या पिकावर फारशा रोग आणि किडी पडत नाहीत. तरीसुद्धा पिकावर येणाऱ्या प्रमुख रोग व किडींचा वेळीच बंदोबस्त केल्यास अधिक उत्पादन मिळते.

* कीड नियंत्रण :

१) मावा : ही कीड पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पिकाच्या पानामधून व खोडामधून रस शोषण करते. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट १५ मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुन्हा प्रादुर्भाव दिसल्यास १२ - १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

२) पाने खाणारी अळी : ही अळी कोवळ्या पिकाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे उत्पादनात घट येते. या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस २० मि. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) खोडमाशी : मादी माशी पानावर अंडी घालते. अंड्यातून अळ्या बाहेर पडून खोडात प्रवेश करतात आणि खोडाचा गाभा खातात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागात अळी राहते. त्यामुळे खोडाचा खालचा भाग तांबूस होतो. खोडाची साल तडकते व झाडे वाळतात.

या किडीच्या बंदोबस्तासाठी उगवण झाल्यानंतर ५ - ६ दिवसांनी डायमेथीएट ३० टक्के आंतरप्रवाही कीडनाशक २० ते २५ मि. ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.

रोग नियंत्रण :

१) मर : या बुरशीनाशक रोगामुळे जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो. रोपे पिवळी पडतात आणि कोमेजून सुकून वाळून जातात. यासाठी पेरणीपूर्वी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. शिवाय मर रोग होऊ नये म्हणून त्याच जमिनीत हे पिक घेऊ नये.

२) करपा : ह्या बुरशीजन्य रोगामुळे काळ्या तपकिरी रंगाचे खोलगट ठिपके आढळून येतात. रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण पानावर होऊन पाने कलांतराने वाळून जातात. याच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणि हार्मोनी दीड ते दोन मिली प्रति लि. पाणी याप्रमाणात फवारणी करावी.

३) तांबेरा : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या दोन्ही बाजूस गडद तपकिरी रंगाचे ठिपके येतात. ठिपक्याभोवती पिवळसर रंगाचे वलय दिसून येते. रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब किंवा झायनेब या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्वादार १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.

४) मोझॅक : या विषाणुजन्य रोगाची लागण झाल्यास पिकाची वाढ खुंटते, रोगग्रस्त पाने जमिनीकडे वाळलेली दिसतात. मावा, पांढरी माशी या किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो. याच्या नियंत्रणासाठी रोगमुक्त व रोग प्रतिकारक बियाणे पेरणीसाठी वापरावे. मावा किडीचे वर उल्लेख केल्याप्रमाणे नियंत्रणा करावे.

वरील किडी व रोगांना प्रतिबंधक म्हणून तसेच झाडांच्या जोमदार वाढीसाठी आणि अधिक फळधारण होऊन उत्पादन व दर्जा वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढील प्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (२५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ३०० ते ४०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० ते २५० लि.पाणी.

* तोडे चालू झाल्यानतंर दर १० ते १५ दिवसांनी (उत्पादन व दर्जावाढीसाठी २ ते ३ वेळा ): थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १ लि . + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर १५० मिली. + २५० लि. पाणी. याप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

* पिकाची काढणी व उत्पादन : हिरव्या शेंगाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास शेंगा कोवळ्या असताना म्हणजेच पीक ४५ - ६० दिवसांचे दरम्यान असताना ५ - ६ दिवसाच्या अंतराने दोन ते तीन तोडण्या कराव्यात. यापासून हिरव्या शेंगाचे सरासरी ५० - ६० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

वाळलेल्या दाण्यासाठी पीक वाणानुसार सर्वसाधारणपणे ७५ ते ९० दिवसांत काढणीस तयार होते. पीक काढणीला आल्यावर पाने पिवळी होऊन गळतात. वाळलेल्या शेंगा हलवल्यास दाण्याचा खडखड असा आवाज येतो. असे असल्यास लगेच झाडे उपटून उन्हात वाळवून काठीने बदडावे व जमा केलेले बी वाळवून पोत्यात/कोठीत भरून ठेवावे. घेवडा पिकाच्या बियास भुंगा या साठवणीतील किडीपासून धोका संभवतो. त्यासाठी काढणीनंतर बियाणे उन्हात चांगले वाळवावे. या पद्धती ने लागवड केल्यास घेवड्याचे जातीपरत्वे १२ - १८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.