लिलीची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लिली हे एक महत्त्वाचे कंदवर्गीय फुलझाड आहे. हार, गुच्छ, तोरणे आणि मंडप सजावटीकरिता लिलीच्या फुलांना वर्षभर सतत मागणी असते. लिलीच्या विविध जाती आणि प्रकार असून त्यांचा उपयोग फुलांच्या वैशिष्ट्यानुसार हार, गुच्छ अथवा उद्यानाची शोभा वाढविण्याकरिता ताटवे लावून करतात. लिलीची फुले उत्तम प्रकारची कटफ्लॉवर्स म्हणून वापरली जातात. म्हणून च लिलीच्या लागवडीस भरपूर वाव असून पद्धतशीर लागवड केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळविता येते.

महत्त्व : लिली हे अत्यंत सुंदर आणि डौलदार फुलझाड असून या फुलझाडाची लागवड उद्यानातील ताटव्यांमध्ये, इमारतीसमोरील प्रांगणात आणि लहान मोठ्या कुंड्यात केली जाते. लिलीच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्याकरिता, हारतुरे तयार करण्यासाठी आणि तोरणे आणि मंडप सजावटीकरिता वर्षभर मागणी असते. विशेषत : सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत लिलीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. म्हणून शहराजवळच्या परिसरात लिलीची लागवड फायदेशीर ठरत आहे. चीनसारख्या देशात लिलीच्या काही प्रकारांचे कंद खाण्यासाठी वापरतात. लिलीच्या फुलांना मोठ्या शहरांतून असलेल्या मागणीचा विचार करता या फुलझाडाखालील क्षेत्र वाढविण्यास चांगलाच वाव आहे.

क्षेत्र आणि उत्पादन : भारतामध्ये निलगिरी पर्वताच्या परिसरात लिलीचे उगमस्थान आहे. भारतामध्ये लिलीची लागवड प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. बायबलमध्येही लिलीचा उल्लेख आढळतो. भारतामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश हिमाचल प्रदेश, पंजाब, काश्मिर, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत लिलीची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांत लिलीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.

हवामान आणि जमीन : लिलीचे असंख्य प्रकार असून काही प्रकार कमी सूर्यप्रकाशात चांगले येतात तर काही प्रकार उष्ण - दमट हवामानात चांगले येतात. सरासरी १५ ते ३५ डी. सें. तापमानात लिलीच्या पिकाची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळते. दिर्ध काळ अतिकडक थंडी या पिकाला अपायकारक ठरते.

लिलीच्या लागवडीसाठी सुपीक, काळी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७ इतका असावा. जमिनीत पाणी साचून राहत असल्यास कंदांची कूज होऊन पिकाचे नुकसान होते.

जाती : लिलीचे असंख्य प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. लिलीचे ३०० ते ४०० प्रकार असून त्यापैकी सुमारे १०० प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. लिलीचे अॅमरॅलिस (बेलाडोन लिली) आणि हिपॅस्ट्रम (ट्रंटेप लिली) हे दोन प्रकार खूपच प्रचलित आहेत. अमर लिली, स्पाईडर लिली, फायरबॉल लिली, क्रुपरँथम लिली, झिपरँथस लिली, डे लिली, फॉक्स टेल लिली, टायगर लिली, वॉटर लिली, प्लँटेन लिली हे प्रकार महाराष्ट्रात जास्त पसिद्ध आहेत.

लिलीमध्ये संकरित जातींचीही सतत भर पडत आहे. ऑरेलियन हायब्रीड, बेलिंगम हायब्रीड, फिस्टा हायब्रीड, गोल्डन चॅलेस हायब्रीड, गोल्डन हारवेस्ट हायब्रीड , ग्रीन माउंटन हायब्रीड , ऑलिंपीक हायब्रीड, पेटेड लेडी हायब्रीड, शेलरोझ हायब्रीड आणि टेंपल हायब्रीड हे प्रमुख संकरित वाण प्रसिद्ध आहेत. लिलीच्या काही प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंग खाली दिले आहेत.

लिलीच्या प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंग

अ.क्र.   जात   फुलांचे रंग  
१)   ब्लंक ड्रॅगान   फुले तुतारीच्या आकाराची, मध्यावर सोनेरी तर पाकळ्या आतील बाजूस सफेद आणि बाहेरील बाजूस गडद लालसर.  
२)   अॅप्रीकॉटग्लो   नारिंगी रंगाची फुले  
३)   ब्रँडीवाईन   पिवळसर नारिंगी रंगाची फुले  
४)   ब्रोकेड   फिक्कट पिवळ्या रंगाची फुले  
५)   डेस्टिनी   लिंबासारख्या पिवळ्या रंगाची फुले 
६)   हेलन कॅरॉल   पिवळ्या रंगाची फुले  
७)   लाईमलाईट   तुतारीच्या आकाराची पिवळी फुले 
८)   सनसेट ग्लो   गुलाबी आणि मध्यभागी पिवळ्या रंगाची फुले  
९)   रॉयल गोल्ड   पिवळ्या धमक रंगाची व मध्यावर लालसर रंगाची फुले  


लिलीच्या अनेक जाती प्रचलित असल्या तरी महाराष्ट्रात खालील प्रकार जास्त प्रचलित आहेत.

१) अमर लिली : या प्रकाराला बेलाडोना लिली असेही नाव आहे. या प्रकारातील जाती उन्हामध्ये किंवा विरळ सावलीत वाढणाऱ्या आणि बहुवर्षायु आहेत. या प्रकारातील जाती रोग आणि किडींना जास्त प्रतिकारक आहेत. या प्रकारातील काही जाती कुंडीत लावण्यासाठी तर काही जाती जमिनीत लावण्यास योग्य आहेत. या प्रकारातील जातींना लांब दांड्यावर भोंग्याच्या आकाराची फुले येतात. अशी फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. फुले लाल, पिवळी, सफेद अशा विविध रंगांची असतात. स्नोव्हाईट लियो, ज्युपिटर, स्टार ऑफ इंडिया, ब्लॅक प्रिन्स आणि पिंक इंदोरा या प्रकारच्या जाती अमर लिली या प्रकारात येतात.

२) स्पाईडर लिली : लिलीच्या या प्रकारातील जाती अत्यंत कणखर आहेत. या प्रकारातील लिली बांधावर लावल्या तरी चांगली फुले येतात आणि कंद पुढील पावसळ्यापर्यंत जमिनीत तग धरून राहू शकतात. पांढऱ्या रंगाची फुले कळीच्या अवस्थेत तोडून हारासाठी आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

३) टायगरी लिली : या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पिवळसर लालसर रंगाची फुले येतात. पाकळ्यांवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य असतात.

४) डे लिली : या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगांची फुले येतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य आहेत.

५) झिपरँथस लिली : या प्रकारातील जाती बुटक्या असून जमिनीलागत वाढतात. या प्रकारातील दलदलीच्या जागी तग धरून राहतात. या प्रकारातील जाती इमारतीच्या सभोवती सुशोभनासाठी लावण्याकरिता योग्य आहेत. या प्रकारातील लिलीला पिवळ्या आणि फिकट गुलाबी रंगाची फुले येतात.

६) फायरबॉल लिली : नावाप्रमाणे लालभडक रंगाचा फुलांचा गोलाकार गेंद हिरव्या पानांवर अत्यंत आकर्षक दिसतो. कुंडीत अथवा जमिनीत लावून परिसर सुशोभनासाठी हा प्रकार उत्तम आहे.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : लिलीची अभिवृद्धी बियांपासून, पानाच्या बेचक्या तील कंद (बल्बिल) आणि जमिनीत वाढणाऱ्या लहानमोठ्या कंदांपासून करता येते. जमिनीतील मोठ्या कंदाभोवती लहान कंद (स्केल) वाढतात. या लहान कंदापासूनही लिलीची लागवड करता येते.

लिलीच्या लागवडीसाठी कंद निवडताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात :

१) कंद मोठ्या आकाराचे असावेत.

२) कंद निरोगी असावेत.

३) कंदाचा उभा व्यास ७.५ सेंटिमीटर तर आडवा ६ ते ९ सेंटिमीटर असावा. कंदाचा आकार जाती प्रमाणे निरनिराळा असू शकतो.

४) कंदाचे वजन ४० ते ५० ग्रॅम असावे.

5) कंद लागवडीपूर्वी किमान महिनाभर तरी सुकविलेले निवडावेत.

६) हेक्टरी ४० ते ५० हजार कंद किंवा २ ते २.५ हजार किलो बेणे वापरावे.

लागवडीसाठी मोठे कंद निवडल्यास त्यांना लवकर आणि मोठ्या आकाराची फुले येतात. सारख्या आकाराचे कंद लावल्यास जास्तीत - जास्त फुले थोड्या कालावधीत फुलतात. बियांपासून लिलीची अभिवृद्धी करण्यास जास्त वेळ लागतो, मात्र ही पद्धत सोपी आहे. हिवाळ्यात पॉलिथीन गृहात कुंडीत रोपे तयार करतात. उन्हाळ्यात उघड्या शेतात लिलीची बियांपासून रोपे तयार करता येतात. यासाठी गाडीवाफ्यावर बिया पेरून त्यावर चाळलेल्या कंपोस्ट खताचा थर द्यावा. वाफ्यांना नियमित पाणी द्यावे आणि कंपोस्ट खताचा थर वाळणार नाही याची काळजी घ्यावी.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : लिलीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे मे - जून, ऑक्टोबर - नोव्हेंबर आणि फेब्रुवारी - मार्च महिन्यांत करता येते.

लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात ५० मिली जर्मिनेटर आणि ३० ग्रॅम प्रोटेक्टंट टाकून तयार केलेल्या द्रावणात कंद अर्धा तास भिजवून घ्यावेत.

कुंडीमध्ये लिलीची लागवड करायची असल्यास पोयटा माती आणि शेणखत समप्रमाणात मिसळून कुंडीत भरावे आणि कंदाच्या आकारानुसार प्रत्येक कुंडीत १ ते २ कंद लावावेत.

शेतात लागवड करताना जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात आणि सरीच्या बगलेत ३० ते ५० सेंटिमीटर अंतरावर कंद लावावेत.

खते आणि पाणी व्यवस्थापन : लागवडीपुर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. नंतर दीड ते दोन महिन्यांनी ५० ते ७५ किलो कल्पतरू खत जमिनीच्या प्रकारानुसार खुरपणीनंतर द्यावे.

पिकाला जरुरीपुरते परंतु नियमितपणे ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास जमिनीतील कंद सडतात. म्हणून पिकाला पाणी देताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.

महत्त्वाच्या किडी : लिलीच्या पिकाला मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या अळ्या, खोड पोखरणाऱ्या अळ्या इत्यादी किडींपासून उपद्रव होतो.

१) मावा : ही कीड पाने, कोवळे शेंडे, फुलांचे देठ यावर राहून रस शोषून घेते. त्यामुळे पाने सुकतात, फुलांची प्रत खराब होते.

२) फुलकिडे : हे किडे लिलीच्या कंदातील रस शोषून घेतात, त्यामुळे कंदाच्या बाहेरील पाकळ्यांवर तांबूस रंगाचे खोलगट डाग पडतात. नंतर या बाहेरील पाकळ्या मऊ पडतात आणि गळून पडतात. अशा कीडग्रस्त कंदांची लागवड केल्यास झाडे खुरटी राहतात.

३) पाने खाणाऱ्या अळ्या : या अळ्या लिलीच्या झाडाची पाने कुरतडून खातात आणि पिकाचे नुकसान करतात.

४) खोड पोखारणारी अळी : या अळ्या लिलीच्या झाडाचे खोड पोखरून आत प्रवेश करतात आणि आतील भागावर उपजीविका करतात. झाडाचे खोड पोखरल्यामुळे पानांची वाढ होते नाही. फुले अतिशय कमी प्रमाणत येतात.

रोग :

१ ) करडी भुरी (ग्रे मोल्ड) : या रोगाची लागण झाल्यास झाडांच्या पानांवर गोलाकार अथवा अंडाकृती पिवळ्या अथवा लालसर रंगाचे ठिपके दिसू लागतात आणि पाने सुकून वाळून जातात. उष्ण आणि ढगाळ हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

२) कंदकूज : या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळेकंदावरील पाकळ्यांचा खालचा भाग कुजतो व पाकळ्या गळतात. झाडाची खालची पाने पिवळी पडू लागतात. नंतर सुकून वाळतात.

३) मऊ कंदकूज (सॉफ्ट बल्ब रॉट) : हा रोग रायझोपस स्टोलोनिफर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी कंदावर झालेल्या जखमांमधून आत शिरते. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कंद लिबलिबीत होतात आणि सडतात कंदावर बुरशीची वाढ झालेली दिसून येते.

४) विषाणुजन्य रोग : मोझॅईक विषाणूची लागण झाल्यास लिलीचा झाडे खुरटी राहतात, झाडाची पाने वेडीवाकडी येतात. पानांचा रंग फिकट पिवळा अथवा फिकट हिरवा होतो. पाने गुंडाळली जातात. पाने अतिशय आखूड देठावर गुच्छासारखी येतात. अशा रोगट झाडांचे कंद चपटे आणि लहान राहतात. कंदांना भेगा पडतात.

महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण :

१) पाने करपणे : या विकृतीचे लिलीच्या पानांची टोके जळतात. नत्राची कमतरता आणि मँगनीज व अॅल्युमिनियम या अन्नद्रव्यांचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनीता ही विकृती आढळून येते.

उपाय : जमिनीत चुन्याचा (लाईम) पुरवठा केल्यास या विकृतीचे प्रमाण कमी होते.

२) कळी फुटणे : प्रामुख्याने पॉलिथीन - गृहात लागवड केलेल्या पिकामध्ये लिलीच्या कळ्या फुटून सुकतात. कळीभोवतीच्या वातावरणात अतिशय कमी आर्द्रता, पाण्याची कमतरता, अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे ही विकृती निर्माण होते.

उपाय : पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. पाण्याचा ताण पडू देऊ नये.

वरील किडी, रोगांचे तसेच विकृतीचे प्रतिबंधक व प्रभावी नियंत्रणासाठी तसेच जोमदार वाढ व दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर २० ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ९० ते १२० दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

वरील चौथ्या फवारणीप्रमाणे फुलांचे तोडे चालू झाल्यानंतर दर १५ ते २० दिवसांनी फवारणी करावी.

तणांचे नियंत्रण : हरळी अथवा लव्हाळा यासारख्या बहुवर्षायु तणांच्या बंदोबस्तासाठी सुरूवातीलाच खोल नांगरट करून आणि तणांच्या काश्या अथवा गाठी वेचून जाळून टाकाव्यात. जमीन चांगली तापू द्यावी. पांढरी फुली, एकदांडी यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करावी.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री : लिलीची लागवड केल्यानंतर लागवडीसाठी निवडलेली जात, कंदांचा आकार आणि लागवडीचा हंगाम यानुसार ३.५ ते ४ महिन्यांनी लिलीची फुले उमलू लागतात. लिलीच्या काही प्रकारांत वर्षातील काही कालावधीतच फुले येतात. उदा. फायरबॉल लिलीची फुले मार्च ते मे या काळातच फुलतात. लिलीच्या फुलांची काढणी प्रमुख्याने हार आणि सजावटीसाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी फुलांची कळी लांबट होऊन उमलण्याच्या अवस्थेत असताना फुले पूर्ण उमलण्यापूर्वी फुलांचे दांडे कापून फुलांची काढणी करतात. काही वेळा फुलातील परागकण फुलांवर पसरून फुलांचे सौंदर्य बिघडते. म्हणून फुलांचे परागकोश फुटण्यापूर्वीच ते काढून टाकले जातात. हारासाठी फुले काढली जातात तेव्हा हंगामामध्ये सर्वसाधारणपणे हेक्टरी ४.५ ते ५ लाख फुले मिळतात. तर फुलदाणीत ठेवण्याकरिता फुलांचे दांडे काढले जातात तेव्हा हेक्टरी एक लाख ते सव्वा लाख फुलांचे दांडे मिळतात.

फुलांच्या कळ्या काढल्यानंतर बांबूच्या करंड्यांत सभोवती पाने अथवा गवत लावून मध्यभागी काळ्या ठेवतात. फुलांचे दांडे वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून कागदी कार्डबोर्डा च्या खोक्यात भरून दूरच्या बाजारपेठेत पाठवितात.

कंदांची काढणी आणि साठवण : लिलीच्या फुलांची काढणी केल्यानंतर काही दिवसांनी झाडाची पाने पूर्णपणे सुकतात. या वेळी जमिनीतील कंद काढून घ्यावेत. कंदांची प्रतवारी करावी. नंतर कंदांना प्रोटेक्टंट पावडर किंवा बुरशीनाशक चोळावे आणि कंद हवेशीर जागेत थंड ठिकाणी ठेवावेत. शीतगृहात कंद २ ते ३ महिने साठवून ठेवता येतात.