अंजिराची आधुनिक लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


अंजीर या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण अरबस्थान हा देश आहे. अरबस्थानातून या फळझाडाचा प्रसार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात झाला.

अंजिराच्या फळातील भरपूर अन्मूल्ये व पोषणक्षमता यामुळे अंजिराचे फळ फार पूर्वीपासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. अंजिरामध्ये १० ते २८% साखर असून फळ चवीला थोडे आंबटगोड असते. अंजिराच्या फळातून चुना, लोह तसेच 'अ' आणि 'क' जीवनसत्ये भरपूर प्रमाणात असतात. अंजिराच्या फळात इतर फळांच्या तुलनेत भरपूर खनिजद्रव्ये असतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अंजिराचे फळ शक्तीवर्धक, सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे.

* अजीराच्या फळाच्या प्रत्येक १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील अन्नघटक असतात.

पाणी - ८०.८०%, साखर/कार्बोहायड्रेट्स -१७.१ ०%, प्रथिने/प्रोटिन्स -१.३०%, स्निग्धांश /फॅट्स -०.२०%, खनिजद्रव्ये - ०.६०%, लोह -१.२०%, स्फुरद - ०.०३६%, चुना - ०.०६% जीवनसत्त्व 'अ' - २७० इ.यु., जीवनसत्त्व 'ब' - ५०.० मिलीग्रॅम , जीवनसत्त्व 'क' - २.०० मिलीग्रॅम, निकोटिनिक आम्ल - ०.६० मिलीग्रॅम, उष्मांक - ७५ कॅलरी.

व्यापारी दृष्ट्या भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात अंजिराच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

अंजिराची लागवड इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, अल्जेरिय आणि तुर्कस्थान या देशांत फार मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये अंजिराची लागवड व्यापारी दृष्ट्या फक्त महाराष्ट्रातच केली जाते. दक्षिण भारतात पेनकोंडा, बंगलोर, श्रीरंगपट्टण आणि उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे अंजिराची लागवड तुरळक प्रमाणात केली जाते.

भारतात ५०० हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली जाते. यापैकी एकट्या महाराष्ट्रात ४०० हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या जिल्ह्यात ३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे. पुणे जिल्ह्यात निरा नदीच्या खोऱ्यातील पुरंदर -सासवड तालुक्याचा भाग अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील दौलताबाद जवळच्या भागात अंजिराची लागवड फार पूर्वी पासून केली जाते. पुणे जिल्ह्यातील सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी उत्पादन १० ते १२ टन इतके मिळते.

* हवामान : अजिराच्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. दमट हमन अंजिराच्या पिकला घातक आहे. तापमान कमी असल्यास अंजिराच्या पिकाचे नुकसान होत नाही. ज्या ठिकाणी सरासरी ६०० ते ६५० मिलीमीटर पाऊस पडतो आणि सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो थांबतो, अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रातील अंजिराच्या झाडांची ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये पानगळ होऊन झाड विश्रांती घेते व ऑक्टोबर महिन्यात झाडावर नवीन फुटीबरोबर फळे येतात. अंजिराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात तयार होतात. फळांच्या वाढीच्या काळात हवामान कोरडे असावे.

* जमीन : अंजिराच्या लागवडीसाठी तांबूस रंगाची आणि १ मीटरच्याखाली मुरुमाचा थर असलेली जमीन योग्य असते. आजुबाजूने डोंगर असणाऱ्या परिसरातील वातावरण या पिकाला मानवत असल्याने अशा ठिकाणच्या जमिनी अंजीर लागवडीसाठी निवडणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. अंजिराची मुळे साधरणपणे १ मीटर खोल जातात. म्हणून मध्यम खोलीची आणि उत्तम निचऱ्याची जमीन या पिकास मानवते.

*जाती : वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या अंजिरातील फुलांचे प्रकार व परागीभवन होण्याची क्रिया यावरून अंजिराचे प्रमख चार प्रकार पडतात. या प्रकारांत अंजिराच्या जगातील प्रमुख जाती येतात.

१) सामान्य अंजीर (कॉमन अॅड्रिएटिक फिग) : या प्रकारात परपरागीभवनाची क्रिया न होताच फळे तयार होतात. सामान्य अंजिराच्या फुलांना लांब दांडे असतात, या प्रकारात कॅडोटा, ब्राऊन तुर्की, पूना अंजीर, दौलताबाद अंजीर या जातींचा समावेश होतो. पूना अंजिराची फळे पातळ सालीची, फिकट हिरव्या रंगाची, कडेला तांबूस धारा असलेली असतात. फळांचा गर गुलाबी असून फळे चवीला गोड असतात. पूना आणि दौलताबाद अंजीर या जातींमध्ये फारसा फरक नाही.

२) कॅप्री अंजीर (जंगली अंजीर) : या प्रकारातील झाडे नरफुलांची असतात. कॅप्री अंजिराची फळे खाण्यासाठी उपयोगी नसतात. आपल्याकडील उंबराची फळे कॅप्री अंजिराच्या प्रकारात मोडतात. कॅप्री अंजिराच्या फळात ब्लॅस्टोफॅगा या प्रकारचे फुलकिडे असतात.

३) स्मीरना अंजीर : या जातीच्या फळात फक्त मादीफुले असल्यामुळे फळांची वाढ ब्लॅस्टोफॅगा या फुलकिड्यांनी परपरागीभवन केल्याशिवाय होत नाही.

४) सॅनपॅड्रो अंजीर : हा प्रकार स्मीरना आणि या दोन्ही प्रकारांच्या मधला प्रकार आहे.

* जाती :

१) दिआना अंजीर : ह्या जातीची लागवड खास करून ज्युस निर्मितीसाठी केली जाते. या जातीच्या झाडांची उंची ६ ते ७ फूट असते. फळे लेमन पिवळसर रंगाची असून गर फिक्कट पिवळसर असतो. फळे चवीला अतिशय गोड असून स्वादयुक्त असतात. या फळांमध्ये विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण २१ ब्रीक्स असून ज्युस बनविण्यासाठी जास्त वापर केला जातो. फळांचे वजन इतर जातींच्या मानाने अघिक असून सरासरी ६० ते ६५ ग्रॅमची फळे असतात.

२) कोनाड्रिया अंजीर : ही जात मुळची अमेरिकेतील असून ती आयात केली जाते. भरपूर उत्पादनासाठी ही जात प्रचलित असून या जातीच्या झाडांची उंची इतर जातींच्या तुलनेने कमी आहे. फळे ४० ते ४५ ग्रॅम वजनाची असून फळाचा रंग हिरवा तर गर गुलाबी, गोड स्वादाचा असतो. या फळांतील विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण २०.५ ब्रीक्स असून हिची फळे लवकर सुकविता येतात. त्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी उत्तम प्रतीची असतात.

भारतातील अंजिराच्या सर्व जाती सामान्य अंजीर या प्रकारातच येतात. या जातींमध्ये परागीभवनाच्या क्रियेची गरज नसते.

१) पुणेरी अंजीर : ही जात पुरंदर तालुक्यात आणि दौलताबाद परिसरात लागवडीखाली आहे. या जातीस दिवे सासवड असेही म्हणतात. या जातीची फळे ३० - ५० ग्रॅम वजनाची असून गराचा रंग तांबूस असतो. साल पातळ असून गरात साखरेचे प्रमाण १४ - १५% इतके असते.

२) दिनकर : ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने दौलताबाद परिसरातून निवड करून वाढविली आहे. या जातीची फळे आणि गोडी, पुणे अंजिरापेक्षा सरस असल्यासे नमूद केले आहे.

* अभिवृद्धी : अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फाटे कलम किंवा गुटी कलम करून करतात. कलमे तयार करण्यासाठी चांगले उत्पादन देणाऱ्या अंजिराच्या झाडाची निवड करावी. फाटे कलमे तयार करण्यासाठी ८ ते १२ महिने वयाच्या फांद्या निवडाव्यात. या फांद्यांच्या शेंड्याकडचा भाग फाटे कलमे तयार करण्यासाठी वापरावा. फाटे कलम ३० ते ४० सेंमी लांब. १ ते १.२५ सेंमी जाडीचे असावे आणि त्यावर किमान ४ - ६ फुगीर डोळे असावेत. फाटे कलमे लावण्यापुर्वी त्यांवरील सर्व पाने काढून टाकावीत. फाटे कलमे गादीवाफ्यावर लावावीत. कलम करताना फाटे जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून कलम केल्यास मुळ्या लवकर फुटतात. त्यामुळे बहुतांशी कमले यशस्वी होतात.

गुटी कलमे तयार करण्यासाठी जून महिन्यात एक वर्ष वयाच्या फांदीवर साधारणपणे २.५ सेंमी रुंदीची गोलाकार साल काढावी. साल काढलेल्या भगवे गुटी कलमे ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंत तयार होतात.

* लागवड पद्धीत : अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून - जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते.

* लागवडीचे अंतर : अंजिराची लागवड जून - जुलै ते सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.

* वळण आणि छाटणी : छाटणीमुळे अंजिराच्या झाडाला व्यवस्थित आकार देता येतो. तसेच मशागतीची कामे सुलभतेने करता येतात आणि झाडावर रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होते.

अंजिराच्या झाडाच्या छाटणीचा मुख्य उद्देश झाडाला जास्तीत जास्त फुटवे आणणे हा असतो. अंजिराच्या झाडावर छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटीवर कलधारणा होते. म्हणून अंजिराच्या झाडाची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अंजिराची झाडे सुप्तावस्थेत असतात. सप्टेंबरनंतर तापमानात वाढ होते. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रीतीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटणी केल्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील डोळे फुटून नवीन फूट येते आणि नंतर नवीन फुटीवर फळे येतात. एका प्रयोगावरून असे दिसून आले आहे की, अंजिराच्या झाडाच्या प्रत्येक फांदीचा शेंड्याकडील ५ ते ६ सेंमी लांबीचा भाग छाटून टाकल्यास अथवा झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर २ ते ३ डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणीनंतर अंजिराच्या झाडावर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात.

* फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) : अंजिरामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी छाटणीप्रमाणेच फांद्यावर खाचा पाडणे ही एक महत्त्वाची आणि उपयुक्त पद्धत आहे.

अंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी लांब आणि १ सेंमी रुंद तिरकस काप घेऊन खाचा पडतात. फांदीवर खाच पडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे ८ - ९ महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात, त्यामुळे फांदीवर सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील ३ - ४ डोळे सोडून खाचा पाडाव्यात.

*खत : अंजिराच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी सुरुवातीला नियमित खते द्यावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला १० किलो शेणखत, २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत, १०० ग्रॅम निंबोळी पेंड, १०० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि ५० ग्रॅम पालाश द्यावे. दरवर्षी या पटीत हे प्रमाण वाढवावे. पूर्ण वाढलेल्या ५ ते ६ वर्षांच्या झाडाला ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, २५० ग्रॅम निंबोळी पेंड, ५०० ग्रॅम ते १ किलो गांडूळ खत, ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश द्यावे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खते वेगवेगळी द्यावीत (एकत्र मिसळून देऊ नयेत). शेणखताच्या बरोबरच हिरवळीच्या खताचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.

बहार धरणे : अंजिराच्या झाडाला वर्षा तून दोन वेळा बहार येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला 'खट्टा' बहार आणि अन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला 'मीठा' बहार असे म्हणतात. खट्टा बहाराची फळे जुलै - ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असल्यामुळे प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हकली मशागत करून पाणी न देता झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.

* पाणी व्यवस्थापन : अंजिराच्या झाडांना ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये ८ ते १० दिवसांनी, डिसेंबर ते फेब्रुवारीच्या काळात १२ ते १५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिंबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अंजिरासाठी सोईची आणि पाण्याचा मोजका वापर करून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे असे जरी म्हटले असले तरी अनुभवांती असे आढळले आहे की, उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून झाडांना 'वाफे पद्धत' पाणी देण्यासाठी योग्य ठरत आहे. मात्र यासाठी पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे असावी लागते.

* आंतरपिके : लागवडीनंतरच्या सुरूवातीच्या २ ते ३ वर्षात अंजिराच्या झाडाचा पसारा कमी असल्यामुळे बागेत मोकळी जागा भरपूर असते. या मोकळ्या जागेत भाजीपाल्याची तसेच ताग, चवळी यासारखी हिरवळीची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. त्यामुळे बागेची चांगली मशागत होऊन जमिनीची सुपीकता वाढते व आंतरपिकापासूनही काही प्रमाणात उत्पादन मिळते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाणीपुरवठा लक्षात घेऊन अंजिराच्या बागेत एक किंवा अधिक हंगामात आंतरपिके घ्यावीत.

* कीड :

१) तुडतुडे : ही कीड अंजिराच्या झाडाची पाने, कोवळ्या फांद्या आणि फळातील रस शोषून घेते. यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच फळाची वाढ न होता फळे गळतात.

उपाय : ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात झाडांवर स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे २ - ३ वेळा फवारण्या केल्यास या किडीचे नियंत्रण होते.

२) खवले कीड : ही कीड झाडाच्या फांद्यांवर कोवळ्या फुटीवर, नवीन फुटणाऱ्या डोळ्यांवर तसेच पाने व फळांवरही प्रामुख्याने दिसून येते. खवलेकीड झाडाच्या फांद्यांतील व फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकतात व वाळतात. खवलेकिडीच्या प्रादुर्भावामुळे फळांच्या आकारावर व चवीवर विपरीत परिणाम होतो.

उपाय : खवलेकिडीचे नियंत्रण करण्यासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

३) कोळी (माईटस) : कोळी ही कीड झाडाची पाने व फळांतून रस शोषून घेते. त्यामुळे फळांची पूर्ण वाढ न होता फळे गळून पडतात.

उपाय : कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारावे.

४) पिठ्या ढेकूण कीड : ही कीड कोवळ्या फांद्या, फांद्यावरील डोळे, पाने आणि फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकतात आणि फळे गळून पडतात.

उपाय : पिठ्या ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी खवले किडीप्रमाणेच उपाय करावेत.

५) साल व बुंधा पोखरणारी अळी : अंजिरावरील इतर किडींच्या तुलनेत ही कीड अंजिराच्या झाडाचे अधिक नुकसान करते. अंजिराच्या दुर्लक्षित झाडावर तसेच ज्या झाडाची वाढ झुडपासारखी आहे, अशा झाडावर या किडीचा उपद्रव जास्त असतो. ही अळी झाडाचा बुंधा आणि फांद्या आतून पोखरते. झाडाची साल खाते.

उपया : साल किंवा बुंधा पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव कमी करण्यासाठी अंजिराची झाडे झुडपासारखी न वाढू देता झाडांना योग्य वळण द्यावे. झाडांची वेळोवेळी पाहणी करावी. झाडाच्या सालीचा भुसा आणि किडीची विष्ठा असलेल्या ठिकाणी छिद्र शोधून आतील अळीला तारेच्या सहाय्याने बाहेर काढावे किंवा अशा प्रत्येक छिद्रात पेट्रोल अथवा इडीसीटी मिश्रण यांचा बोळा घालावा आणि छिद्र ओल्या मातीने बंद करावीत. यामुळे अळी छिद्राच्या आतमध्ये गुदमरून नष्ट होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोरचूद, चुना, गेरू आणि प्रोटेक्टंट पावडर प्रत्येकी ५०० ग्रॅम १० लि. पाण्यात कालवून झाडाच्या खोडावर कुंच्याने ३ ते ४ फुट खोडास पेस्ट लावावी.

इतर किडी : वर उल्लेखिलेल्या मुख्य किडींव्यतिरीक्त पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव काही प्रमाणात होतो. मुख्य किडींच्या नियंत्रणासाठी योजण्यात आलेल्या उपायांमुळे अशा इतर किडींचाही बंदोबस्त होतो.

* अंजिरावरील तांबेरा रोग : हा बुरशीजन्य रोग मुख्यत: अंजिराच्या झाडाच्या पानांवर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात हवेतील दमटपणा कायम राहिल्यास तांबेरा रोग झाडाच्या पानांवर झपाट्याने पसरतो. त्यामुळे झाडाची पाने गळतात. तांबेरा रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये अंजिराच्या झाडाच्या पानांवर तांबूस रंगाचे लहान लहान ठिपके दिसतात. पानाच्या खालच्या बाजूस शिरांच्या बारीक जाळीत गर्द तपकिरी रंगाच्या पावडरीचे ठिपके दिसतात. झाडाची पाने गळून पडल्यामुळे झाडे कमजोर होतात आणि फळेही पक्व न होता गळतात.

उपाय :अंजिराच्या झाडाची गळून पडलेली सर्व पाने गोळा करून जाळून टाकावीत. ऑक्टोबर महिन्यात नवीन फुटलेल्या फांद्यावरील पानांवर वरच्या व खालच्या बाजूंनी ३:३:५० तीव्रतेचे बोर्डो मिश्रण किंवा थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर ५०० मिली, हार्मोनी २५० मिली, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०%) १०० ग्रॅम आणि ५०% कार्बारिल यांची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने २ - ३ वेळा १०० लि. पाण्यातून करावी. १० लि.पाण्यात २० ग्रॅम बाविस्टीन किंवा ४० ग्रॅम डायथेन - एम - ४५ ही बरशीनाशके मिसळून २ - ३ वेळा फवारणी केल्यास तांबेरा रोगाचा बंदोबस्त होतो.

वरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच जादा बहार लागून फळांचे अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करावी.

* फवारणी :

१) पहिली फवारणी : (बहार धरतेवेळेस, पहिले पाणी सोडल्यानंतर ४ -५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (१५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी ३०० ते ३५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (४० ते ५० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० ते १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + १५० ते २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (६० ते ७५ दिवसांनी) : थ्राईवर १.५ ते २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + राईपनर १.५ लि. + न्युट्राटोन १.५ लि.+ प्रोटेक्टंट १.५ किलो + हार्मोनी ६०० ते ७५० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + ३०० लि.पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर दर १५ ते २० दिवसांनी फवारणी क्र. ४ चे प्रमाण घेऊन औषधांची फवारणी घेणे. म्हणजे किड - रोगाचा प्रादुर्भाव न होता मालाचा दर्जा शेवटपर्यंत टिकविता येतो.

काढणी : अंजिराची फळे सर्वसाधारणपणे १२० ते १४० दिवसांच्या कालावधीत तयार होतात. फळांना फिकट हिरवा विटकरी - लालसर जांभळा रंग आल्यावर फळे पक्व झाली असे समजावे. अंजिराच्या फळांचा हंगामा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. पक्व झालेली फळे चाकूने देठाजवळ कापून अथवा खुडून काढावीत.

उत्पादन : लागवडीच्या सुरूवातीच्या चार वर्षात अंजिराच्या झाडाची योग्य वाढ होऊ द्यावी. अंजिराच्या झाडाला दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येतात. ही फळे काढून टाकावीत व पहिली दोन वर्षे उत्पादन घेऊ नये. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांपासून अंजिराच्या झाडाचे उत्पादन वाढत जाऊन झाडे ३० ते ३५ वर्षापर्यंत भरपूर उत्पादन देतात. अंजिराच्या बागेची योग्य रितीने मशागत केल्यास अनिराच्या एका झाडापासून सरसरी २० ते ३० किलो फळे मिळू शकतात. पुणे - सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी १० ते १२ हजार किलोपर्यंत उत्पादन मिळते.

अंजिराची पूर्ण पिकलेली फळे लवकर खराब होतात. म्हणून विक्रीसाठी अंजिराची फळे बाहेरवागी पाठविताना फळे थोडी अपक्व असतानाच काढून पाठवितात. अंजिराची फळे बांबूच्या मजबूत टोपलीत अंजिराच्या पानांचा थर, फळांचा थर असे एकावर एक थर देऊन अथवा अंजिराच्या पानांचे खालून वरून आच्छादन करून ३ - ३ फळांचे ४ कप्प्यात १२ फळे छोट्या बॉक्समध्ये भरतात.