२६ 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ३५ हजार

श्री. महादेव कडाजी बिराजदार,
मु. पो. औंढा, ता. निलंगा, जि. लातूर.
मोबा. ९९७५६६७७८५



४ वर्षापुर्वी कवठा (जि. उस्मानाबाद) कृषी प्रदर्शनामधून 'सिद्धीविनायक' शेवग्याचे २ पाकिटे बी घेतले होते. त्याची प्लेस्टिक पिशवीत रोपे तयार केली तर लागवडीयोग्य १५० रोपे मिळाली. या रोपांची १०' x १०' अंतरावर लागवड केली. रोपांची वाढ चांगली झाली होती. मात्र प्लॉट फुलकळी अवस्थेत असताना पाणी कमी पडू लागल्याने बोअर घेण्याचे ठरविले. बोअरची जागा या शेवग्याच्या प्लॉटमध्ये २ - ३ ठिकाणी दाखविली गेली. तेथे बोअर घेताना बोअर मशीन चालकाने रानातून आडवे - तिडवे मशीन फिरविल्याने बरीच झाडे मोडली. त्यातील फक्त २६ झाडे राहिली. या झाडांना ७ महिन्यात शेंगा चालू झाल्या. २ - ३ दिवसाला शेंगा तोडत होतो, तर ४० - ५० किलो शेंगा निघत असे. या 'सिद्धीविनायक' शेवग्याची शेंग खायला चविष्ट १ नंबर होती. शेंग दिसायलादेखील हिरवीगार, टवटवीत होती. आमच्या येथून बसवकल्याण मार्केट जवळ असल्याने तेथे आम्ही सर्व तरकारी विक्रीसाठी जातो. शेवगादेखील तेथेच विक्रीस नेत होतो. ३५ - ३६ रू./ किलो ठोक भाव मिळत होता. तर २ महिने सतत उत्पादन मिळून २६ झाडांपासून ३५ हजार रू. झाले होते.

बसवकल्याणवरून व्यापारी हैद्राबादमध्ये माल विक्रीस नेतात. आमच्याकडे एकूण ६० एकर जमीन असून २ बोअर व १ विहीर आहे. पाणी बऱ्यापैकी आहे. गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन ह्या पिकांवारोबरच बागायती मिरची (बिजोशितल - ३७८), वांगी महिको - ११ नंबरची लावतो. ऊस ३ - ४ एकर असतो. घरचेच गुऱ्हाळ आहे. कारखान्याला ऊस देत नाही. आज घरचा गूळ २५० ढेप (१० किलोची) पुणे मार्केटला विक्रीला आणली होती. तर २९४०,२९५० रू./क्विंटल भावाने गेली. भाव २५०० पासून ३२०० रू./क्विंटल पर्यंत आहे. तेव्हा वरील शेवग्याच्या अनुभवावरून १ एकर शेवगा लावायचा आहे. रान शेवग्याला योग्य मध्यम हलक्या प्रतिचे आहे. त्याकरिता आज (७ एप्रिल २०१४) 'सिद्धीविनायक' शेवग्याची ४ पाकिटे बी आणि जर्मिनेटर घेऊन जात आहे. टिश्यूकल्चर केळीदेखील १ एकर लागवड प्रथमच करणार आहे.