इसबगोल

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


इसबगोल (Plantago Ovata Forsk) हे प्लँटेजिनेसी (Plantaginaceae) फुलातील औषधी वनस्पतींच्या निर्यातीत महत्त्वपूर्ण असणारे गुजरात राज्यातील प्रमुख औषधी पीक आहे. या वनस्पतीचे उगमस्थान पर्शिया असून प्रसार पश्चिम आशियापर्यंत झाला आहे. इसबगोल पंजाब, सिंध, बलुचिस्थान, स्पेन व कॅनरी बेटांमध्ये निसर्गत: आढळतो. गेल्या काही वर्षात गुजरातबरोबर राजस्थान, हरियाणा, बिहार, पंजाब, दिल्ली व महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी हे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. इसबगोल फुलोऱ्यात व बी भरण्याच्या अवस्थेत असताना, ऑक्टोबर - डिसेंबर दरम्यान येणाऱ्या आकस्मित पावसास हे पीक बळी पडत असल्याने आपल्या राज्यात त्याचा अधिक प्रसार होऊ शकला नाही. आपल्या देशात ५०,००० हे. क्षेत्रावर लागवड केली जात असून इसबगोल निर्यातीत भारत अग्रेसर आहे. एकूण उत्पादनाच्या ८० - ९०% निर्यात होते. इसबगोल भूशी (कोंडा) व बियाण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून उत्पादन व व्यापार यामध्ये आपल्या देशाचे वर्चस्व आहे.

* वनस्पती परिचय : इसबगोल रब्बी हंगामातील पीक असून ३० - ४५ सें.मी. पर्यंत उंच वाढते. वनस्पतीस बुंधा नसून पाने ७.५ ते २० सें.मी. पर्यंत लांब तर १ सें.मी. रुंद असतात. पानांवर पांढरी केसांची लव असते. इसबगोल वनस्पतीस ५ ते १० कांद्या असून २० - २५ फुटवे येतात. प्रत्येक फुटव्याला गव्हासारखी परंतु लहान ओंबी येते. ओंब्यामध्ये पांढऱ्या रंगाचे घोड्याच्या कानासारखे परंतु तिळाएवढे लहान बी असते. इसबगोल बियांमध्ये साधारणत: ३०% भुशी (कोंडा) असतो. या भूशीस औषधी महत्त्व आहे.

* औषधी उपयोग : इसबगोल बियांची भुशी (कोंडा) औषधीदृष्ट्या उपयुक्त असून ती पाणी शोषण करून चवरहित लगदा तयार करते, त्यामुळे सौम्य रेचक म्हणून भुशी उपयोग ठरते. ही भुशी सवयीच्या बद्धकोष्ठतेमध्ये घरगुती औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इसबगोल भुशी अल्सर, आंतरसूज, अमांश, अतिसार, पदररोग, पित्त, संधिवात, मुळव्याध, धातुपुष्टता, रक्तस्त्राव ज्वर, प्रमेह, दाह इ. विकारांवर उपयुक्त आहे. इसबगोलमध्ये प्रथिने, म्युसिलेज, सेल्युलोज, स्टार्च व तेल हे घटक आहेत. तेलांमध्ये पामिटीक, स्टीअरीक, लिग्नोसेरिक ही आम्ले आढळतात.

* औषधे उत्पादने : सत इसबगोल, बोवलाइट इ.

* हवामान व जमीन : इसबगोल रबी हंगामातील पीक असल्याने या पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. बी भरण्याच्या काळात ढगाळ वातावरण अथवा हलका पाऊस झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होते. इसबगोल या पिकास हलक्या ते मध्यम वाळूमिश्रित / लाल मातीच्या जमिनी योग्य ठरतात. तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी.

* सुधारित जाती : गुजरात - १, गुजरात - २, जी. आय. - ४२, एच.एम.बी.एन. -२ (आनंद), टी.एस. १ - १०, इ.सी. १२४३४५, निहारिका (सिमॅप, लखनौ), हरियाणा इसबगोल - ५ व २ (हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार), जवाहर इसबगोल - ४, सिलेक्शन - १०, आर.आय. १२६, आर.आय. १२९, आर.आय. १३०, आर.आय. १४०, आर.आय. १४० - ३, एम.आय. १२१, एम.आय. १२२, एम.आय. १२३ (मंदसौर).

* पूर्वमशागत :खरीप हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर नांगरणी करून १ - २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. एकरी ८ ते १० गाड्या शेणखत आणी १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत जमिनीत मिसळून शेत तयार झाल्यावर उतारास आडवे वाफे करावेत.

* लागवड : पिकाची पेरणी १५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत करतात. १ एकर लागवडीसाठी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते. १ किलो बियास जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावे. म्हणजे बियांची उगवण नेहमीपेक्षा लवकर व अधिक प्रमाणात होते. पेरणी सपाट वाफ्यांमध्ये बी फोकून करावी. बिया लहान असल्याने सर्वत्र सारख्या पडतील व खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यासाठी ते रेतीत मिसळून पेरावे. बी पेरून झाल्यावर ते हलक्या हाताने/झाडूने झाकावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. उगवण ८ - १० दिवसात सुरू होते. ती कमी आढळल्यास त्वरित दुसरे पाणी द्यावे. * खत व पाणी व्यवस्थापन : या पिकास रासायनिक खतांचा वापर टाळावा. त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे एकरी ८ ते १० गाड्या (४ - ५ टन) शेणखत आणि कल्पतरू १०० ते १५० किलो देऊन लागवड करावी. लागवडीनंतर १ महिन्यांनी पुन्हा कल्पतरू ५० ते १०० किलो/एकरी द्यावे. म्हणजे या पिकाची खताची गरज पूर्ण होऊन उत्पादन वाढ होते. तसेच आयुर्वेदीक गुणधर्म व दर्जात हमखास वाढ होते. जमिनीच्या प्रकार व हंगामानुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने ७ ते ८ पाण्याच्या पाळ्या या पिकास पुरेशा होतात.

* रोग व कीड : १) डॅम्पिंग ऑफ : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. रोपांचे कोंब जमिनीवर येण्याआधी मरतात. रोपांची उगवण झल्यानंतर त्यावर गडद व ओलसर ठिपके दिसतात. ठिपक्यांची वाढ होऊन रोप मरते. पेरणीच्या वेळी जास्त तापमान व आर्द्रता असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो. याच्या प्रतिबंधासाठी वर सुचविल्याप्रमाणे जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात १ किलो बी ५ - ६ तास भिजवून सावलीत सुकवून बियाणास पारायुक्त बुरशीनाशक चोळावे.

२) मर : या बुरशीजन्य रोगामुळे पानांचा रंग हिरवट चंदेरी होऊन पाने सुकतात. त्यामुळे रोपे मरतात. रोगग्रस्त रोपांच्या आंतरपेशीमध्ये बुरशीचे धागे वाढलेले दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांची फेरपालट करावी व बियाणास जर्मिनेटरची वरिलप्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर बाविस्टीन/बेनलेट हे बुरशीनाशक प्रति किलोस ५ ग्रॅम प्रमाणे चोळावे.

३) केवडा : (डाऊनी मिल्ड्यू) : या बुरशीजन्य रोगामध्ये पानांवर रंगहीन पिवळसर ठिपके दिसतात व खालील बाजुस राखाडी धुक्यासारखी बुरशीची वाढ दिसून येते. अशी रोगग्रस्त पाने तांबडी होऊन मुरडतात व संपूर्ण रोप वाळते. सदर रोगाचा प्रादुर्भाव तापमान २० सें. व आर्दता ८९% असताना अधिक प्रमाणात आढळतो. रोगाची लागण टाळण्यासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. पेरणीसाठी कमी (२ किलो/एकरी) बियाणे वापरावे व लागवड नोव्हेंबरच्या शेवटी/ डिसेंबरच्या सुरुवातीस करावी. पेरणीपूर्वी बियाणे रात्रभर जर्मिनेटरच्या द्रावणात भिजवून पेरावे. रोगाची लक्षणे जाणवताच थाईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लिटर + हार्मोनी ४०० - ५०० मिली/२०० लि. पाणी यांच्या दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

४) भुरी : हा बुरशीजन्य रोग पीक फुलोऱ्यात असताना मोठ्या प्रमाणावर आढळतो. पानांवर पांढरे - हिरवट ठिपके दिसून येतात व पावडरप्रमाणे बुरशीची वाढ दिसते. रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची (०.२५%) किंवा हार्मोनी २५० मिली/१०० लि. पाणी यांच्या १० दिवसाच्या अंतराने २ - ३ फवारण्या द्याव्यात.

५) करपा : या बुरशीजन्य रोगामुळे पानांचा अग्रभाग हिरवट - पिवळ होतो. पक्व पानांचा ५०% भाग सडतो. रोगाचा प्रादुर्भाव उष्ण व आर्द्र हवामानात दिसून येतो व तो अधिक झाल्यास बी काळपट सुरकुतलेले दिसते. रोगनियंत्रणासाठी कार्बेन्डेझीम (५० डब्ल्यू. पी.) २५० ग्रॅम. किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू. पी.) ५०० ग्रॅम किंवा थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ५०० मिली २०० लि. पाण्यातून फवारावे.

६) हुमणी : हुमणीचा प्रादुर्भाव मुळावर दिसून येतो व मुळांवरील साल कुरतडल्याने वनस्पतींची वाढ खुंटते व पाने पिवळी पडून वाळतात. सदर कीडनियंत्रणाऐवजी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चात्यांचा नांगराने नांगरल्याने किडीच्या नांगरणीवेळी अल्ड्रीन (५%) किंवा लिंडेन ही किडनाशके १० किलो/एकरी याप्रमाणे जमिनीत मिसळावे. जैविक उपाय म्हणून कृषी मार्गदर्शिकेत पान नं. १३ ते १४ वरील सुचविलेला उपाय करावा.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी इसबगोलच्या रोगमुक्त अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली. + थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (पीक ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (पीक ५० ते ६० दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (पीक ७० ते ७५ दिवसांचे असताना) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली. + २५० लि.पाणी.

* काढणी व उत्पादन : पेरणीनंतर ५० - ६० दिवसांनी पीक फुलोऱ्यात येते. प्रत्येक झाडामधून १० ते २५ फुटवे येतात व ओंबी निघायला सुरुवात होते. साधारणपणे ११० ते १३० दिवसांनी (मार्च - एप्रिल) पीक काढणीस तयार होते. यावेळी पिकाचा रंग पिवळसर होऊन ओंब्या तपकिरी दिसतात. ओंब्या दाबल्यास त्यातून बी बाहेर पडते. ओंब्यामधील बी गळून पडण्याचे टाळण्यासाठी दव पडून गेल्यानंतर सकाळी काढणी करावी. कापणी जमिनीलगत पिकाच्या बुंध्यात करावी. लगेच पीक गोळा करून गंजी मारून कापलेले पीक उन्हात वाळवून घ्यावे. त्यानंतर मळणी करून उफणीने भुश्यापासून बी अलग करावे. साधारणत: एकरी ४ ते ५ क्विंटल बियांचे उत्पादन मिळते. बियाणांपासून भुशी कोढण्यासाठी खास गिरण्यांमध्ये कप्प्यांची (शेलर) रचना केलेली असते. भरडण्याचा दाब फक्त भुशी काढण्याच्या उद्देशाने गिरणीमध्ये रचना केलेली असते. भुशी प्रत्येक कप्प्यांमधून पंखे व चाळणी यांच्या मदतीने बाजूला केली जाते. न भरडलेले बियाणे पुढील कप्प्यात ढकलले जाते. भुशी व बियाणे यांचे गुणोत्तर प्रमाण वजनानुसार २५:७५ असे असते. चांगल्या दर्जाची भुशी पांढरी असून त्यात तांबड्या बियांचे कण नसतात. गिरणीमध्ये दळलेल्या बियांची चाळून प्रतवारी करण्यात येते. ७० मेश (जाळी) तून चाळलेली भुशी निर्यातीसाठी वापरली जाते.