विदर्भात सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी

श्री. प्रकाश वसंतराव बोंबटकर,
मु.पो. गिताईनगर, गोपुरी, ता. वर्धा, जि. वर्धा- ४४२००१



गेली चाळीस वर्षे आम्ही दोघे भाऊ ऑटोमोबाईल (ट्रॅक्टर व कार पार्टस) व कृषी मशीनरी (स्प्रिंकलर, ड्रीप, पाईप्स, थ्रेशर, मोटर पंप इ.) च्या व्यवसायात आहे. घरी वडीलोपार्जीत २० एकर शेती वर्धा शहरापासून ५ कि.मी. अंतरावर रस्त्याकडेला आहे. वडील सर्वोदयचे (गांधी, विनोबा ह्यांचे विचार प्रचारचे, वय ९० वर्षे) काम करीत असताना शेत सुद्धा बघत असत. गेल्या आठ वर्षांपुर्वी वडीलांना पॅरॅलीसीसचा अॅटॅक आल्यापासून शेती पडीक होती.

शेती करण्याचा कुठलाही अनुभव नसतांना २०१४ - १५ मध्ये आम्ही भावांनी शेती करण्याचे ठरविले. सुरुवात कोठून करावी कळेना ? शेतात नुसते जंगल झाले होते. दोन्ही विहीरी खचल्या होत्या. मोटरपंप, पाईप सर्व शेती साहित्य चोरीला गेले होते. शेतात ठेवलेल्या रखवालदाराच्या मृत्युनंतर शेतात गेल्यावर आम्हाला अतिशय विदारक परिस्थिती दिसली.

खचून न जाता अतिशय चिकाटी, जिद्ध व मेहनतीद्वारे पुन्हा शेती पुर्वीसारखी उत्तम करण्याचे ठरविले. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये सर्व जंगल साफ केले. अनेक वर्षे शेती पडीक असल्यामुळे जंगल झाल्यामुळे आमच्या शेतात रानडुक्कर व रोही प्राण्यांच्या कळपाचे निवासस्थान झाले होते. शेत साफ केल्यावर सुद्धा शेतात रोही व रानडुक्करांचे कळप पळताना दिसायचे. शेतात जायची भिती वाटायची.

सर्व गोष्टींचे शांतपणे (पीक सोडून) बारकाईने नियोजन केले. सर्व शेती भोवती प्रथम सिमेंट पोलसह चेन लिंकचे कंपाऊंड केले. आतील रस्ते केले. २ बोरवेल २८० फुट प्रत्येकी केल्यात. जुन्या विहीरींना खरीप पिकापुरतेच पाणी पुरते असे वडील म्हणाले. दोन मोटारपंप (बोअर व १ सबमर्सीबल पंप) घेतलेत. पुर्ण शेताच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहचेल अशा रितीने व्हॉल्व्ह व पाईपलाईन टाकली. सर्व शेती नांगरून घेतली. रान रोटाव्हेटरने प्लेन केले. काडी कचरा साफ केला. १ बोअर फेल गेले. काय पेरावे, लावावे ह्याचा अभ्यास सुरू केला. पारंपरिक पीक न लावता व्यापारी तत्वावर शेती करण्याचे ठरविले. पुर्णपणे व्यापारी तत्वावर दुकानदारी व शेती ह्यातला फरक दोन महिन्यातच लक्षात आला, आतापर्यंत फक्त ऐकत होतो.

शेताचे नाव 'बोंबटकर, फार्म' ठेवले. पुर्ण कम्पाऊंड केले. दोन गेट लावले व काडी कुलूप लावले. बॅंक अकाऊंटं काढले, थोडे कर्ज पण घेतले. कामाचे तास सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवले. दुपारी अर्धातास जेवणाची सुट्टी, रविवारी सुट्टी. छोटे गेट सकाळी लेबर येतांना व संध्याकाळी ५ वाजता लेबर जाताना उघडते.

खुप साऱ्या शेतीनिष्ठ व उत्तम शेती करणाऱ्या मित्रांचे सल्ले घेत होतो. पण समाधान होत नव्हते. एका मित्राने अचानकच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कृषी विज्ञानाचे मागील चार अंक वाचायला दिले. झपाटून गेल्यासारखे चारही अंक वाचले. 'सिद्धीविनायक मोरिंगा म्हणजे कर्जमुक्ती, समृद्धी व आरोग्यवर्धक म्हणजे २१ व्या शतकातील आधुनिक कल्पवृक्षच.' 'सिद्धीविनायक मोरिंगा, जाण तू एक कल्पवृक्ष। ठेवशील आमच्या आरोग्यावर लक्ष।।' ह्या म्हणींनी आम्हाला भुरळच घातली. लोकांचे अनुभव ऐकून फार प्रभावीत झालो. फोन वरून त्या लोकांशी बोलणी केली. लोकांचे अतिशय उत्साहवर्धक अनुभव होते. डॉ. बावासक सरांना फोन लावला. त्यांनी शेवग्यावरील पुस्तकाचा अभ्यास करावयास सांगितले. पुस्तक तर आणले, पण कधी शेवगा लावू असे झाले.

वर्ध्याला लाख - लाख रु. उत्पन्न देणाऱ्या पिकांचे बरेच कॅम्पनींग पुर्वी झाले होते. उदा. सुबाभूळ, निलगिरी, बांबु, जट्रोफा इ. पण शेवटी सर्वांचे रिझल्ट निराशच. म्हणून यातून सुद्धा निराशाच पदरी पडेल असे वाटू लागले. म्हणून उंटावरून शेळी हाकण्याऐवजी प्रत्यक्षात शेवग्याचे प्लॉट बघण्याचे ठरले. पण दुर्दैवाने वर्धा परिसरात शेवगा बघायला मिळाला नाही. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर या एरियात बधितला. मात्र वर्ध्याचे तापमान ४७ डी. सें ते ४८ डी. सें. पर्यंत जाते. म्हणून तिकडच्या शेतकऱ्यांनी वर्ध्याला शेवगा होईल की नाही ह्याबाबत शंका व्यक्त केल्या.

पुन्हा भ्रमंती सुरू झाली. विदर्भात, यवतमाळला आम्हाला तीन प्लॉट बघायला मिळाले. शेतकरी फार खुष होते, त्यावरून एप्रिल २०१५ मध्ये 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावण्याचा निर्णय पक्का झाला. शेतामध्ये ६' x १०' अंतरावर लागवडीसाठी शेवगा बियाची पाकिटे स्थानिक डीलर 'फोरसाईट अॅग्रो कन्सलटंट' वर्धा यांच्याकडून घेतली. तापमान ४४ - ४५ डी.से. होते. म्हणून ७५% चे शेडनेट २०' x ५०' केले. तापमान मेंटेन करण्यासाठी नेटाफीम कंपनीचे फॉगर लावले व नर्सरीतील तापमान ३५ डी.से. पर्यंत आणले. ४" x ६" च्या बॅगेत १ भाग नदी पात्रातील बारीक रेतीयुक्त माती आणि १ भाग गांडुळखत व ५ ग्रॅम कल्पतरू खत प्रत्येक बॅगेत भरले. १५ मे २०१५ ला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे श्री. अंकुश वऱ्हाडे ह्यांचे मार्गदर्शनाखाली बी लावणे सुरू केले. बियांना ३५० मिली जर्मिनेटर, १५० ग्रॅम प्रोटेक्टंट ७ लिटर पाण्यात मिसळून आदल्या दिवशी भिजवले. दुसऱ्या दिवशी बियाणे सुकल्यावर पिशव्यांमध्ये लावले. झारीने पाणी दिले. फॉगर सुरू होतेच. १ महिन्यात रोपांची उंची १।। फूट झाली. २१ जून २०१५ पर्यंत पाऊस न पडल्यामुळे नर्सरीतच रोपे होती. २१ नंतर शेतात ट्रान्‍सफर केले. २५ जून नंतर पाऊस थांबला. गडव्याने पाणी दिले व रोपे जगवली. पुर्ण शेताला ड्रीप केले, पण लाईन १५ ऑगस्टला मिळाली. तोपर्यंत बऱ्याचशा झाडांची पाने गळून गेली होती. फक्त काड्या राहिल्या होत्या. नंतर श्री. वऱ्हाडे साहेबांच्या सल्ल्यानुसार सप्तामृत व कल्पतरूचे डोसेस दिले. आमची बाग सुधारली, फुलली. दर महिन्याला सप्तामृताचे फवारे वेळापत्रकाप्रमाणे करतोय. कल्परू खत जुलै २०१५ मध्ये ५० ग्रॅम, सप्टेंबरमध्ये १०० ग्रॅम, नोव्हेंबरमध्ये २५० ग्रॅम प्रती झाड दिले.

शेवग्यात आंतरपीक तुरीचे व आंतरआंतरपीक (शेवग्याच्या ओळीत) चवळी शेंगांचे

शेवग्याच्या (१० फुटाच्या) २ ओळीमध्ये ५ फुटावर तुरीची एक ओळी आणि २ झाडांच्या ६ फुटामध्ये चवळीचे आंतरआंतर पीक घेतले होते. यालाही सप्तामृत २ - ३ वेळा शेवग्याबरोबर फवारले. तर चवळीच्या ओल्या शेंगा १५० रु./१० किलो भावाने विकून एकरी ५ हजार रु. झाले, तर तूर एकरी १.५ ते २ क्विंटल. मिळून ती ७३५० रु./क्विंटल भावाने विकली.

शेवग्याच्या झाडांना ५ व्या महिन्यात भरपूर फुले व शेंगा लागण्यास सुरुवात झाली. १।। ते २ फुट लांबीच्या भरघोस शेंगा लागल्यात. आज मितीला (१३ मार्च २०१६) शेंगांचे तोडे सुरू होऊन १।। महिना झाला आहे. ३ - ४ थ्या दिवशी २५ - ३० किलो शेंगा मिळत आहेत. वर्धा मार्केटला १५ ते २० रु. भाव मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक झाडास २५० ग्रॅम कल्पतरू खत देऊन १५ - १५ दिवसाला सप्तामृत फवारणी घेत आहे. त्यामुळे फुले, बारीक शेंगा भरपूर लागल्या आहेत. सध्या तापमान ४०.५ डी.से. असून पाणी सकाळी १ तास (४ लि.) आणि संध्याकाळी १ तास (४ लि. ) ठिबकने देत आहे. झाडे पूर्ण बहारात आहेत.

डॉ. बावसकर सरांचे चरणस्पर्श आमच्या शेताला (१ डिसेंबर २०१५ ला) लागलेत, आम्ही धन्य झालोत. ईश्वर कृपेने व डॉ. बावसकर सरांच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या अपेक्षापेक्षा जास्त भरघोस पिक, शेंगा मिळत आहेत. शेंगासुद्धा दर्जेदार हिरव्यागार, गरयुक्त , चवदार आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे श्री.अंकुश वऱ्हाडे, श्री. गजानन भगत व डीलर श्री. बाष्टेवार साहेब ह्यांचे मला नियमित मार्गदर्शन मिळते. दर महिन्याला हे लोक बोंबटकर फार्मला भेट देतात व आम्हाला मार्गदर्शन करतात.