करवंद लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


करवंदाचे मूळ स्थान भारत असून भारतामध्ये सर्वत्र याची झाडे आढळून येतात. करवंदाचा उपयोग कुंपण म्हणून केला जातो. करवंदाची ताजी फळे खाण्याकरिता वापरली जातात. करवंदामध्ये 'क' जीवनसत्व असते.

करवंदाच्या फळापासून जेली, चटणी, मुरंबा तसेच वेगवेगळ्या प्रकारची लोणची तयार केली जातात. करवंद हे सदाफुलीच्या कुळातील झुडूपवर्गीय झाड आहे. हे झाड वेलीप्रमाणे पसरते. त्यामुळे करवंदाच्या जाळ्या डोंगरघळीत व जंगलात नेहमी आढळतात. ३ ते ४ मीटर उंचीचे हिरवेगार दिसणारे हे झाड फार काटक असून निसर्गाच्या भरवशावर वाढते.

करवंदाची फुले छोटी, पांढरी, सुंगधी असतात. फाद्यांना काटे असतात. म्हणून या झाडांचा उपयोग कुंपणाकरिता चांगला होऊ शकतो. शिवाय कमी कष्टात फळांचे उत्पन्न बऱ्यापैकी मिळते.

जमिन: करवंदाचे झाड काटक असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. डोंगर कपारीच्या अत्यंत हलक्या मुरमाड जमिनीत करवंदे चांगली वाढतात.

हवामान : कोरड्या हवामानापासून उष्ण व दमट हवामानात सुद्धा करवंदे चांगली येतात. जास्त थंड प्रदेशात ह्या झाडाची वाढ होत नाही म्हणून महाराष्ट्रातील डोंगर उतारावर करवंदाची लागवड सहज करता येते.

जाती : करवंदाच्या जाती फळांच्या रंगावरून आणि आतील गरावरून ठरविल्या जातात. उदा. हिरवे, गुलाबी पांढरे, काळे व तपकिरी करवंदे असे म्हटले (ओळखले) जाते.

१) हिरवी करवंदे : लांबट गोल असून त्यावर तपकिरी छटा असते. फळ आंबट, बी टणक व गर रसदार असून ही जात मुरंब्यास चांगली असते.

२) गुलाबी जात : छोटी ते मध्यम आकाराची, फळावर फिक्कट ते गडद गुलाबी रंग, कमी आंबट व जास्त टणक बियांची असते.

३) काळी जात : हिरव्या रंगाची असून, त्यावर गडद काळी तपकिरी छटा असते. ही जात जंगल प्रदेशात डोंगरावर येते.

लागवड : करवंदाची लागवड मुखत्वेकरून कायमच्या ठिकाणी बिया लावून किंवा रोपे तयार करून करतात. करवंदास लागवडीनंतर तिसऱ्या - चौथ्या वर्षी फळे मिळू लागतात. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात निरोगी व पिकलेली फळे तोडून त्यातील बी काढून - जर्मिनेटर ५० मिली + १ लि. पाणी या द्रावणात बीजप्रक्रिया करून ताबडतोब गादीवाफ्यावर पेरावे. साधारणत : ३ ते ४ आठवड्यांत बी उगवते. अशी रोपे फेब्रुवारीच्या सुरुवातीस लागवडीस येतात. त्यानंतर सोयीनुसार अशी रोपे कायम जागी लावावीत. पावसाळ्यात लागवड करणे अधिक चांगले ठरते.

रोपांची लागवड १० x ६ फुटावर किंवा ८ x ८ फुटावर करावी. कुंपणासाठी लागवड करावयाची असल्यास ३ ते ५ फुट अंतरावर करवंदाची रोपे लागावीत. हे झाड फार हळू वाढणारे आहे. फेब्रुवारीत लागवड केलेली रोपे जून - जुलैचा पाऊस होईपर्यंत फार सांभाळावी लागतात. व्यापारी दृष्ट्या उत्पादनासाठी करवंदाची दरवर्षी छाटणी करावी. रोपांभोवती पाला पाचोळ्याचे अच्छादन केल्यास रोपांची वाढ चांगली होते. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत झाडांना नियमित गरजेपुरते पाणी द्यावे. पुर्ण वाद झाल्यावर झाडांना पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच इतर मशागतीचीही गरज भासत नाही. तसे हे झाड काटक असल्याने नैसर्गिक परिस्थतीवरही येते मात्र उत्पादन वाढीसाठी झाडाच्या पोषणासाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा २५० ते ५०० ग्रॅम याप्रमाणे पावसाळ्यात जुलै - ऑगस्टमध्ये वापर करावा.

काढणी : कवरंदाला साधारण फेब्रुवारी महिन्यात फुले येऊन एप्रिल ते जूनमध्ये फळे काढण्यास येतात. कधी कधी फेब्रुवारी नंतर आलेल्या फुलांपासून पावसाळ्यात देखील फळे मिळतात. छाटणी केली नसल्यास कुंपणाकरिता लावलेल्या झाडांनासुद्धा भरपूर फळे येतात. करवंदाची कच्ची फळे मी महिन्यानंतर मिळू लागतात. एप्रिल - मे महिन्यात उष्णतेमुळे फळांची वाढ होत नाही.

उत्पादन : प्रत्येक झाडापासून १० किलोपर्यंत उत्पादन मिळते. लागवडीच्या अंतरानुसार ६०० ते ७०० झाडे/एकरी बसतात. सरासरी २० ते २५ क्विंटल. माल एकरी मिळतो.

कच्च्या फळांना मागणी असते. पिकल्यावर फळातून चीक गळतो. त्यामुळे अशी फळे पुसून फळे विक्रीस पाठवावीत. गुलाबी करवंदांना जास्त मागणी असते.

उत्पन्नाशिवाय डोंगर - उतारावर लावलेली झाडे जमिनीची धूप थांबविण्यासाठी मदत होते.

रोग : या पिकावर आर्द्र व दमट हवामानात करपा रोग पडतो. ह्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी बुरशीनाशका (हार्मोनी) ची व सप्तामृताची फवारणी झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तसेच फळांच्या उत्पादन व दर्जासाठी फायदेशीर ठरेल.