'सिद्धीविनायक' शेवग्यात कांदा, मिरची, दुधी व डांगर भोपळ्याचे आंतरपीक

श्री. अशिष दिगंबर गायकवाड,
मु.पो. जांबे (रसिकवाडी), ता. मुळशी , जि. पुणे.
मो. ९७६७२०२०४७



'सिद्धीविनायक' शेवग्याचे मार्च २०१४ मध्ये बी टोकून रोपे तयार केली. ती रोपे जुनमध्ये अर्ध्या एकरात ६' x ८' वर लावली. जमीन मध्यम, निचऱ्याची आहे. याला पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. हा शेवगा ६ महिन्यात (नोव्हेंबर २०१४ ला) चालू झाला. दररोज ५० - ६० किलो असे १।। महिना चालला. शेंगा दररोज पिंपरी मार्केटला घेऊन जात असे. तेथे ३० - ४० रू. ने विक्री होत असे. जानेवारीत माल संपल्यावर छाटणी केली. कल्पतरू खत देऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या. तो पुन्हा जून - जुलै २०१५ ला चालू झाला. सुरुवातीला ३० ते ४० रू. भाव मिळाला. नंतर तोच भाव जुलै मध्ये ६० ते ७० रू./किलो मिळाला. पुन्हा ऑगस्टमध्ये भाव कमी झाला. जुनमध्ये ६० - ७० किलो शेंगा ३- ४ थ्या दिवशी निघायच्या. या काळात पाऊस असल्याने फुलगळ होत होती. त्यामुळे माल कमी निघत असे. जुलै - ऑगस्ट मध्येही याचप्रमाणे माल मिळाला. आता पुन्हा छाटणी केली आहे.

मागच्या (पहिल्या) बहाराचे २० - २२ हजार रू. झाले होते. दुसऱ्या बहाराचे ३० -४० हजार रू. झाले आहेत. या शेवग्यात साधारण ७ ते ८ गुंठ्यात जुलै २०१४ मध्ये घरचेच कांदा बी जर्मिनेटरची प्रक्रिया करून फोकले आहे. तर उगवणही चांगली झाली. शेवग्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करत असताना खाली पडलेले तेवढेच औषध कांद्याला मिळत असे, वेगळी फवारणी घेतली नाही. तरी ६ पोती (६० किलोची) कांदा विकून व काही कांद्याच्या वेण्या बांधून (साधारण ५ पोती) घरी खाण्यासाठी साठवून ठेवला आहे. त्यातीलही ४० किलो कांदा मागच्या आठवड्यात (ऑगस्ट २०१५) कांद्याचे अचानक भाव वाढल्याने विकला. तर ५० रू. किलोने त्याचे २ हजार रू. झाले. असे कांद्याचे एकूण ६ - ७ क्विंटल उत्पादन मिळाले.

कांद्याबरोबर या शेवग्यात मिरचीचेही आंतरपीक घेतले होते. सितारा मिरचीची ३५० रोपे जून २०१४ ला लावली होती. मिरचीला सप्तामृत शेवग्याबरोबर फवारत असे, त्यामुळे बोटाएवढी मिरची झाडांना लागली होती. फुलेही भरपूर होती, ती ३ महिन्यात चालू झाली. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१४ मध्ये मिरची चालली. सुरुवातीला १० - १५ दिवस दररोज ५ - ६ किलो निघत होती, त्यानंतर दिवसाड १५ ते २० किलो निघू लागली. तेव्हा भाव तेजीचे होते. ५० ते ६० रू. किलो भाव मिळाला. कोकणे चौकात (रहाटणी) आमचा भाजी विक्रीया गाळा होता. त्यामुळे हात विक्रीतून या मिरचीचे चांगले १५ - १६ हजार रू. झाले. तसेच घरच्यासाठी पिकेलेल्या लाल मिरचीचा मसाला झाला.

आता (सप्टेंबर २०१५) शेवग्याची छाटणी करून त्यामध्ये दुधी भोपळा १० गुंठ्यात व डांगर भोपळा १० गुंठ्यात (आंतरपीक) लावला आहे. वेल २ - २।। फुट आहेत. त्यालाही वेळोवेळी सप्तामृत फवारण्या घेत आहे.

जून २०१५ ला सव्वा एकरात अजित बोलगार्ड कापूस लावला आहे. ३ फुटाच्या सरीला दोन्ही बाजूने तिरकस १।। - १।। फुटावर लागवड आहे. सध्या झाडे गुडघ्याच्यावर आहेत. झाडावर २५ - ३० फुलपात्या लागल्या आहेत. त्यासाठी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरणार आहे. २ वर्षापुर्वी कापूस १।। एकर लावला होता. तो अहमदनगर मार्केटला विकला, तेव्हा १५ क्विंटल मालाला ५ हजार रू. भाव मिळून ७५ हजार रू. झाले होते. या अनुभवातून यावर्षी कापूस लावला आहे.