संत्रा लागवडीचे तंत्र

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


संत्रा हे सर्वांना आवडणारे असे फळ आहे. उन्हाळ्यामध्ये संत्रा साधारणपणे संक्रांतीनंतर वाढत जाणारा उन्हाळा सुरू झाला म्हणजे घामाच्या धारा अंगातून वाहू लागतात. पांढरे तलम वस्त्राचे प्रमाण वाढत जाते. घशाला कोरड पडत जाते आणि अशा वेळेस चालताना हातगाडीवर फळांच्या राशीमध्ये आकर्षक नारिंगी संत्री दिसल्यामुळे माणूस असेल त्या किंमतीला खरेदी करून पहिल्या दोन फोडी तोंडात टाकल्यावर तृष्णा क्षमल्याचे आणि चेहर्‍यावर हळूहळू तजेलदार छटा साकार होणारे दृश्य दिसू लागते. संत्र्यातून मिळणारा नैसर्गिक रस हा नारिंगी रंगाचा असून त्यामध्ये ग्लुकोज साखरेचे प्रमाण अधिक असते. तथापि, त्यामध्ये असणार्‍या आंबट - गोड विपुल चवीच्या व्हिटॅमिन 'सी' मुळे शरीरातील पेशींना प्ररणा व ताकद मिळते. या रसाच्या दर्जाची तुलना जगातल्या कुठल्याही टी. व्ही. वरील कृत्रिम पेयाच्या जाहिरात करणाऱ्या कंपनीच्या पेयापेक्षा किंबहुना कुठल्याही देशी विदेशी मद्यापेक्षा हजारो पटीने मानवाला त्याची सुप्त इच्छाशक्ती जागृत करून प्ररणा देणारी, आरोग्यास लाभदायक ठरेल असेच आहे.

जमीन व हवामान : कोणतेही फळपीक करावयाचे झाल्यास तांबूस जमीन ज्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त, चिकन मातीचे प्रमाण कमी, (कोणत्याही हवामानामध्ये) जेथे तापमाना साधारण ७० डी. ते १०० डी. फॅरनाइटच्या प्रमाणात असते व पाऊसमान साधारण ३० ते ४० इंचापर्यंत असते. अशा ठिकाणी हे पीक करता येते, कोकणामध्ये जमीन तांबूस (माती तांबूस) असली तरी कोकणात हे पीक न घेता रबर, काजू, कोकम, आंबा अशी फळझाडे करावीत. चोपण, खारवट व चिबड्या जमिनी संत्रा पिकास मानवत नाहीत. उत्कृष्ट निचरा होणारी हलकी, मुरमाड, मध्यम ते काळी करड्या रंगाची जमीन असावी. जमीन निचार्‍याही चांगली असण्याचे कारण बहर धरताना योग्य काळ पाण्याचा ताण बसणे जरूरीचे असते. तो ताण भारी जमिनीत न बसल्याने फलधारणा, फळांचे उत्पन्न व दर्जा यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जमिनीचा निचरा याकडे दुर्लक्ष व डोळे झाक करू नये.

लागवड : संत्र्याची लागवड ३३ ' x ३३' वर करतात. परंतु ते चुकीचे असून त्याची लागवड नेहमीप्रमाणे खड्डा करून १५' x १५' किंवा २०' x २०' वरती करावी. विकसीत तंत्रज्ञानामध्ये झाडाचा पसारा अधिक वाढू न देता, त्याचा बहर व्यवस्थित धरून फळे लवकर अधिक गोडीची मोठी व अधिक प्रमाणात पाहिजे तेव्हा मार्केटला आणता येतात, हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वैशिष्ट्ये आहे. फळे लवकर धरून दहा ते पंधरा वर्षे झाड जमिनीमध्ये ठेवून नंतर ते कापून त्याचा खोडवा घेणे शक्य असते. त्यामुळे झाड ३३' x ३३' वर लावून एकरी झाडाची संख्या कमी ठेवून अधिक उशीरा उत्पन्नाला सुरुवात होऊन वर्षाआड एकदा किंवा दोन वर्षाआड एकदा किंवा अनेक वर्षे फळ येत नाही. यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी फळ येईल. या आशेवर फळबाग सरपणाच्या लायकीच्या होऊन नुसत्या वाढत आहेत. कुठल्याही प्रकारची शास्त्रीय सखोल मीमांसा न करता वाढत आहेत. याकरिता वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय संस्था फंड देणाऱ्या संस्था, सरकारी बँका, देशातील बँका, भूविकास बँका, कोट्यावधी रुपयाची सबसिडी यावर ज्या प्रमाणात खर्च करते त्या प्रमाणात यश येत नाही. यासाठी सखोल संशोधन, वाचन, चिंतन, प्रयोगशीलता याची तातडीने गरज आहे. याची दखल न घेतल्यास हे पीक इतिहास जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उन्हाळ्यात कलमे अधिक मरण्याचे कारण :

सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीमध्ये रुंद व खोल खड्डे घेणे आवश्यक असते. ३' x ३' x ३' चे घ्यावेत, कारण मुळ्यांच जारवा खडकाळ किंवा हलक्या जमिनीत पसरणे अवघड असते. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडल्यास आणि खड्डा खोल नसेल तर आतील मुरूम तापून मुळाच्या जराव्यावर विपरीत परिमाण होतो, त्यामुळे उन्हाळ्यात कलमे मरतात. मध्यम काळ्या जमिनीमध्ये तीन फुट मातीचा थर असेल तर २' x २' x २' चा खड्डा चालू शकेल यापेक्षा कमी वापरू नये.

जंबोरी व कलमांची घ्यावयाची काळजी :

ईडलिंबू (जंबोरीचे) चांगले पेन्सिलच्या आकाराचे वाढलेल्या खुंटावर जातीवंत नागपूर संत्र्याचे डोळे एक फुटावर भरून साधारण कलम एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत उंचीचे असे वाफ्यात तयार करतात. जेव्हा लागवड करावयाची असते, त्यावेळेस वाफ्यातून खोदून काढतात. ही डोळा भरलेली कलमे वाफ्यात साधारण वर्षभर रहात असल्याने व अति दाटी होत असल्याने त्या कलामांचे शेंडे विशिष्ट प्रकारचे पिवळे पडतात. अशी कलमे पुढे लागवड केल्यास लवकर बाद होण्याची शक्यता असते. याकरिता संत्री, मोसंबीची नर्सरी करणाऱ्या लोकांनी जर्मिनेटर ४० मिली, थ्राईवर ५० -६० मिली, क्रॉंपशाईनर ६० -७० मिली, प्रिझम ३० - ४० मिली व प्रोटेक्टंट ३० ग्रॅम १० लिटर पाण्यामध्ये एकत्र मिश्रण करून ३ ते ४ वेळा एकदा डोळा भरण्याअगोदर व नंतर डोळा भरून फुटून आल्यानंतर तीन वेळा अशी फवारणी करावी म्हणजे वरील विकृती येत नाही. वाफ्यातून कलमे काढताना जारवा तुटण्याची शक्यता असते व जास्त उंच कलमास ( २।। ते ३ इंच ) दुखण्याची शक्यता असते. म्हणून १।। ते २ इंच उंचीच्या कलमाचा गठ्ठा बांधताना त्या कलमास जर्मिनेटर व प्रिझमच्या द्रावणात बुडवून जर्मिनेटर १०० मिली, प्रिझम ५० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + १० लिटर पाणी यामध्ये मुळापासून शेंड्यापर्यंत संपूर्ण किलातानात बुडवून काथ्याने बांधून लागवडीच्या ठिकाणी न्यावे. एका गावावरून (नर्सरी वरून ) दुसर्‍या गावी कलमे नेताना कलमांना इजा होते. ती होऊ नये म्हणून वरीलप्रमाण करावे व इतर शेतकरी बांधवांना सांगावे. लागवड करतान कलम जून ते सप्टेंबर पावसाळी हंगामात खड्ड्याच्या मध्यभागी कलमाच्या मुळ्या सरळ राहतील अशा पद्धतीने लागवड करावी. कलमांचा डोळा जमिनपासून ९' x १' वर राहील असे करावे. वरील द्रावण खोडावरून बुंध्याजवळ एक स्टिलचा ग्लास एवढे ओतावे म्हणजे कलमात नांग्या न पडता जोमाने वाढून जारवा जोर करतो.

कलमांची वाढ व दक्षता : कलमे एकदा लावून झाली म्हणजे महिनाभरात वरील जर्मिनेटरच्या चूळ भरण्याच्या (ड्रेंचिंग) प्रक्रियेमुळे कलमांना जारवा फुटून ती जोमाने वाढू लागतात. पहिल्यावर्षी कलमाची निगा काळजीपुर्वक घेणे आवश्यक असते. खते, औषधे फवारणी व पाणी या गोष्टी सांभाळल्या म्हणजे झाडाचे आयुष्यमान वाढून डायबॅक न होता ती जोमाने वाढू लागतात.

खते -भरखते :

सर्वसाधारण जून महिन्याच्यावेळी सेंद्रिययुक्त म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट खत एका कलमास साधारण १० किलो + १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत रिंग (आळे ) पद्धतीने द्यावे. पाण्याची उपलब्धता पाहून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा असे १५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत जानेवारीपर्यंत द्यावे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मिश्रखते देवू नयेत. आळ्यातील गवत हे न उपटता त्या गवताचा उन्हाळ्याच्या काळात अच्छादन (Mulching) म्हणून उपयोग होईल. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबेल व झाडांवर उन्हाच्या विपरीत परिणाम होणार नाही. दुसरा फायदा म्हणजे त्याचे सेंद्रिय खत तयार होईल. रासायनिक व भरखतामध्ये बचत होईल. हेच गवत जमिनीत मुळात असलेल्या गांडुळांसाठी खाद्य म्हणून उपयोगी पडेल असे दुहेरी फायदे होतील, मात्र गवत फुलावर येण्याअगोदर कापून त्याचा वापर वरीलप्रमाणे करावा, असे ३ वर्षापर्यंत करावे. म्हणजे झाडे साधारण ५' ते ६' उंचीची होतील, जमेल तेव्हा हिरवळीचे खत म्हणून ताग आळ्याभोवती मे महिन्यात फोकावा व १।। फुट झाल्यावर गाडून टाकावा. चोपण, चिभड्या, क्षारयुक्त जमिनीमध्ये चुकून लागवड केल्यास व हल्ली ४ वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त १० ते १५ वर्षाच्या देशभर ज्या ठिकाणी संत्रा बाग अस्तित्वात आहेत त्या न तोडता तेथे खताबरोबर अर्धा टन वाळलेली उसाची मळी (Press Mud Cake) टाकावी. याचा सामू (PH) साधारण ५ ते ६ च्या दरम्यान असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी सुधारण्यास मदत होते. दुसरा उपाय म्हणजे धैंचाचे हिरवळीचे खत मेथी सारखे सर्व बागेत दाट फोकावे व दोन महिन्याचे झाल्यानंतर ते जमिनीत गाडावे म्हणजे जमिनीतील क्षार कमी होऊन हिरवळीच्या खताचा या जमिनीत रामबाण उपाय होऊन जमिनीचा निचरा, पोकळी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अन्न द्रव्यांचा पुरवठा, मुळ्यांची वाढ व पर्यायाने कलमांनी वाढ व्यवस्थित होते.

पाणी : नवीन लागवड केलेल्या बागेस जर्मिनेटर व प्रोटेक्टंट कुंच्याने लावावे. नंतर आले बांधून पाणी द्यावे. बाग जस - जसा मोठा होईल तस - तसा आळ्याचा आकार मोठा करणे गरजेचे असते. खोडाच्या बुंध्यास पाणी लागू नये म्हणून मातीची हुंडी लावावी व दर २ ते ३ महिन्याने म्हणजे वर्षातून ४ ते ५ वेळा जर्मिनेटर व प्रोटेक्टंची पेस्ट बुंध्यावर २ ते ३ फुट खोडास न चुकता लावावी. म्हणजे खोडाभोवती जाळी होणे, खोडाची साल जाणे इ. गोष्टींना आळा बसेल. हलक्या जमिनीमध्ये उन्हाळ्यात ५ व्या दिवशी पाणी द्यावे व भारी जमिनीस ७ व्या दिवशी पाणी द्यावे. हिवाळ्यामध्ये ३ ते ५ दिवस वाढवून म्हणजे १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाणी फक्त पहाटे द्यावे, तर हिवाळ्यात पाहटे किंवा रात्री न देता उन्हाचे वेळी पाणी द्यावे. म्हणजे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे होणारे कीड रोगाचे संभाव्य धोके टाळता येतील.

बहर धरणे : बहार धरण्यापुर्वी झाडांना चांगला विसावा मिळणे आवश्यक असते. संत्र्याच्या झाडाला मुख्यत्वे आंबे बहार (जानेवारी - फेब्रुवारी ) व मृग बहार (जून - जुलै ) असे दोन बहार घेता येतात. आंब्याला मोहोर येण्याच्या सुमारास फुल येते तो आंबेबहार व मृग नक्षत्राच्या सुमारास फुल येते तो मृगबहार. कोणताही बहार घ्यावयाचा असो, तो जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धता पाहून कोणता बहार घ्यावयाचा ते प्रथम निश्चित करून बागेचे पाणी तोडावे. जमीन हलकी असेल तर ३ ते ४ आठवडे व जमीन मध्यम भारी असेल तर ६ ते ८ आठवडे अगोदर पाणी देणे बंद करावे, यालाच 'बागेला ताण देणे' असे म्हणतात. दोन बहारपैकी कोणतातरी एक बहार घेणे. दोन्ही बहार धरल्यास झाडाचे आयुष्यमान कमी होऊन ते लवकर कमजोर होते. मृगबहार घेतल्यास त्याची फळे डिसेंबर महिन्यात युरोपियन लोकांच्या नाताळच्या सणात तयार होत असल्यामुळे भाव चांगला मिळतो. परंतु आंबेबहाराचे फुल फेब्रुवारी - मार्च महिन्यात येऊन फळ एप्रिल - मे मध्ये मोठे होऊ लागते, परंतु हे सर्व पाण्याची उपलब्धता पाहून करावे बहार कोणता आणि का धरावयाचा हे ठरवून त्याल खते भरून पाणी सोडताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन, हर्मोनीचा फवारा केल्यास संभाव्य गुंडीगळ हवामानाचा वाईट परिणाम किडी व रोग याला बर्‍यापैकी आळा बसतो.पहिले दोन बहाराला सर्वसाधारणपणे प्रत्येक झाडावर २०० फळे धरावीत. झाड ७ ते ८ वर्षानंतर मध्यम आकाराची २००० फळे प्रत्येक झाडावर धरता येतात.


सप्तामृत फवारणी :
पाणी सोडताना बहार धरण्याच्या वेळेस (मृग अथवा जानेवारी)
१) पहिली फवारणी : दोन ते चार वर्षाच्या बागेसाठी जर्मिनेटर ७५० मिली. ते १ लि.+ थ्राईवर १ ते १।। लि. + क्रॉंपशाईनर १ ते १।। लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम १ लि. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारले असता डिंक्या न होता बाग व्यवस्थित फुटतो

२) दुसरी फवारणी : (साधारण गुंडी ज्वारीच्या आकाराची असताना ) :थ्राईवर १ ते १।। लि.+ क्रॉंपशाईनर १ ते १।। लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम १ लि. + न्युट्राटोन १ लि. + मॅलॅथिऑन १०० मिली.+ हार्मोनी ४०० मिली. + २०० ते २५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारले असता गुंडीगळ होणार नाही

३) तिसरी फवारणी : (फळ बारीक सुपारी एवढे झाल्यानंतर ) : थ्राईवर २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + राईपनर १ ते १।। लि. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन १ ते १।। लि. + हार्मोनी ५०० मिली + २५० ते ३०० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.

४) चौथी फवारणी : साधारण फळ लिंबाएवढे झाल्यानंतर थ्राईवर २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + राईपनर १ ते १।। लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ ते १।। लि. + हार्मोनी ५०० मिली. + २५० ते ३०० लि. पाणी एकत्र मिसळून फवारावे.

वरील फवारणीचे फायदे : यामुळे फळांचा आकार सारख्या प्रमाणात (पृथ्वीच्या आकाराचा ) नारिंगी रंगाचा तयार होऊन मालाची फुगवण चांगली होऊन भरपूर गोडी मिळेल. मालाला शाईनिंग राहून गर्द पिवळा धमक असा फळास रंग येईल व फळबाग लावताना जमिनीच्या निवडीतील झालेली चूक, फळबागतील कमी अंतर असणे, बहार दरवर्षी न येणे, आलेला बहार कमी येणे, आलेला बहार प्रचंड येउन आभाळामुळे आणि अन्य जैविक क्रियेमुळे झाडाखाली फळांची अतोनात प्रचंड फळगळ (गुंडीगळ होणे) फळांना गोडी न राहणे, फळात कापसासारखा निस्तेज फोफासा रसविरहित फळांची वाढ होणे. फळांच्या सालीवर चट्टे पडणे, डिंक्या, शेंडेमर, डायबॅक होणे, यावर प्रतिबंध होऊन उत्पन्नात भर पडून फळांचा आकार व गोडी वाढून, शाईनिंग येऊन माल ट्रान्सपोर्टमध्ये खराब न होता बाजारभाव अधिक मिळतो.

बाजारभाव : संत्र्याच्या बाजारभावामध्ये १ रुपये अथवा २ रुपये डझन संत्री झाली, असे कधी पहावयास मिळत नाही. याचे कारण आहारात संत्र्याला वरच्या दर्जाचे स्थान आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये मार्केटला ऐन आंब्याच्या, द्राक्षाच्या सिझनमध्ये सुद्धा संत्रा मार्केटला आला तरी भाव गडगडत नाही. किंबहुना भाव रुपये ८० ते १२० ला ३ ते ४ डझन फळांच्या पाटीचा कायम टिकून असतो.

संत्रा पिकाच्या भेडसावणार्‍या समस्या : जसे पंजाब म्हटले की गहू, बंगाल म्हटले की भात, हिमाचल प्रदेश म्हटले की सफरचंद, उत्तर प्रदेश म्हटले की गहू, सरसू , केरळ म्हटले की रबर, कोको, कॉफी, आसाम म्हटले की चहा, तव्दतच विदर्भ म्हटले की संत्र्याचे आगर असे समीकरण झाले आहे. विदर्भातील काळ्या सुपीक जमिनीमुळे फळवाढीच्या काळात अधिक कमाल तापमान मिळत असल्याकारणाने ही हवामानाची अवस्था फळांचा नारिंगी रंग गडद होण्यास व आतील शर्करानिर्मिती व फळातील शर्करेसाठी अधिक गोडीस पोषक ठरत असल्याकारणाने साधारण पाच पिढ्या हे पीक विदर्भात तग धरून आहे आणि याचा प्रसार महाराष्ट्रातील तत्सम हवामान असलेल्या ठिकाणी हळूहळू पसरत चाललेला आहे. तथापि या फळपिकाच्या समस्या खालीलप्रमाणे आहेत.

विदर्भातील जमीन पॉण्डमोरीलो नाईट १:२ लॅटिस लेअरच्य भर काळ्या, सुपीक चिकन मातीच्या मुक्त चुन्याचे प्रमाण ( CaCo3) ७% अधिक असल्याकारणाने बाल्यावस्थेमध्ये संत्र्याच्या नवीन कलमांची वाढ हळूहळू होते. ही वाढ होत असताना अधिक चुनखडी असलेल्या जमिनीमधील कोवळ्या शेंड्याकडील पानांवर पिवळेपणा (लोहाची कमतरता) काही पानांवर चेकच्या शर्टवर असलेल्या डिझाईनवजा जाळी म्हणजे शिरा गर्द राहून भोवतालचा पानावरील पिवळेपणा, पानांमधील अनियमित पेशींची मर करड्या रंगापासून तपकिरी रंगापर्यंत (जस्ताची कमतरता) अशा विविध पोषणाच्या समस्या या पिकाशी निगडीत आहे. या व्यतिरिक्त काही कमी अधिक लक्षणे खालीलप्रमाणे.

झाडे तीन ते चार वर्षाची झाली म्हणजे पानाच्या खालील बाजूस गोलाकार फुगलेला फोड मध्ये दबलेला असून या मऊ फोडास दाबल्यानंतर एक विशिष्टप्रकारचे चिकट द्रव्य त्यातून येते. हे लक्षण म्हणजे मॉलिब्डेनमची कमतरता. वाढत्या झाडांच्या कोवळ्या व जून फांद्या यांतील पानांवर अधिक पांढरट फिकट प्रकारची लक्षणे तसेच फळांचा आकार नारिंगीसारखा न राहत एका बाजूस झुकलेला हे पाहण्यासाठी आपण अंगठा व मधले बोट यांमध्ये फळ धरून फिरवले असता आपल्याला ताबडतोब लक्षात येते की, फळ एका बाजूस झुकलेले आहे. तसेच फळांच्या वरच्या वा खालच्या कोपर्‍यात विशिष्ट प्रकारचे चट्टे खालील रंगापेक्षा थोड्या प्रमाणात वेगळ्या प्रकारचे व त्यामुळे फळातील पेशी ह्या कापसासारख्या लुसलुशीत वेगळ्या चवीच्या रसहीन तयार होणे, तसेच संत्र्याच्या फळझाडाचे वय पाच वर्षावरील झाले असता झाडाच्या खोडाच्या सालीमधून डिंक बाहेर येणे व नंतर डायबॅक सुरू होऊन झाडे झपाट्याने मरणे या एक ना अनेक समस्या या ताम्र, बोरॉन, जस्त, मॅग्नेशियम याच्या कमतरतेमुळेच होतात का ? यावर जगभर अविरत संशोधन चालू आहे. कॅलिफॉर्निया जगाच्या नकाशावर आज मनाचे स्थान मिळवून आपण आपल्या प्रदेशास ती उपाधी लावण्याचे धाडस 'कोकणचा कॅलिफॉर्निया' जे संबोधित आहोत, त्याच्या यशाचे फळ हे होमर डी चॅपमन या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या शास्त्रज्ञाच्या साठ वर्षाच्या प्रदिर्ध संशोधनात आहे आणि एवढे संशोधन करूनही त्यांनी "मला पाठविलेली साडेतीनशे संशोधनपर जगभरची तांत्रिक पुस्तके, मासिकामधून प्रसिद्ध होऊन सुद्धा निसर्गाचे रहस्य मला अद्याप उलघडले नाही " , से त्यांचे भाष्य ! म्हणजे या शास्त्रज्ञाच्या मनाचा खरोखरच फार मोठेपणा आहे. तथापि निसर्ग हा निसर्गच आहे. तो मानव निर्मिती नाही, म्हणून संशोधकांना शोध लावताना समस्या अडचणीवर उपाय शोधताना जमीन, पाणी, वातावरण, संत्र्यांचे फळझाड, जनावरांस व मानवास शोधलेल्या तंत्रज्ञानाचा काहीही अपाय होणार नाही , याची दक्षता घेऊन विकसित करावे लागेल.

आज अशाच तंत्रज्ञानाची जगभर मागणी असून सर्व युरोपियन पाश्चिमात्या जपानसारखी प्रगतशील राष्ट्रे पाच ते ध पट प्रचलित भावापेक्षा अधिक मोलाने फळे व शेती उत्पादनाची मागणी करीत असून येत्या शे -दोनशे वर्षात बदल होण्याची शक्यता नाही. कुत्रिमदृष्ट्या हवा, तापमान पाणी (आर्द्रता) याचे नियोजन करून कृत्रिमरित्या जगभर मानव पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊसमध्ये निसर्ग निर्माण करून लाखो रुपये खर्च करून निसर्गाची कॉपी (नक्कल ) करून येणारे उत्पादन जगाच्या व्यापारात मूळ धरू पहात असले तरी भारतासारख्या महाकाय विकसनशील देशामध्ये व जगातील पाच ध राष्ट्रे सोडून अडीचशेहून अधिक देशामध्ये हे तंत्र कदापिही पर्यावरणाचा समतोल बिघडून रुजू शकणार नाही.

फुलगळ फळ (गुंडी ) गळ : बहार धरल्यानंतर खते दिल्यानंतर पाणी सोडले म्हणजे संत्र्याच्या झाडाची फूट होऊन फुला - फळांचा बहार येतो. तथापि अपुर्‍या व योग्य प्रकारच्या पोषणाअभावी फुलगळ व गुंडीगळ ही समस्या फार प्रकर्षाने जगभर भेडसावीत आहे, यासाठी पंचामृत प्रिझम, न्युट्राटोन, हर्मोनीचा वापर शिस्तबद्ध व प्रमाणशीर केला असता त्यावर मात करता येते. असे अनेक शेतकर्‍यांनी व बागायतदारांनी कळविले आहे. ज्या बागायतदारांनी लिंबू, संत्री, मोसंबी (लिंबूवर्गीय citus family crops) लावली असता त्यांची लागवड नवीन असो, पाच अथवा पंधरा वर्षाची असो, त्या फळबागामध्ये ज्या विविध समस्या असतील त्यावर मात करण्यासाठी आपण संपर्क साधावा. निराश होऊन फळबागा तोडू नये. हातचे उत्पन्न घालवू नये.

संत्र्यावरील कोळशी रोग : कोळशी रोग फळमाशीच्या प्रदुर्भावातून निर्माण झालेली ही एक समस्या आहे. फळमाशी दोन प्रकारची असते. एक काळी व दुसरी पांढरी. पांढरी माशी सुक्ष्म आकाराची असून पंख पांढूरके असतात व काळ्या माशीची पिल्ले व माश्या पानातील रस शोषतात. त्यामुळे झाड निस्तेज होते तसेच रस शोषण करत असताना त्यांच्या शरीरातून चिकट गोड पदार्थ स्त्रवतो. त्यावर काळी बुरशी वाढते. त्याचा विपरीत परिणाम पाने, फांद्या व फळांचा वरचा पृष्ठभाग काळा होण्यामध्ये दिसतो. या काळ्या बुरशीच्या प्रदुर्भावास 'कोळशी पडणे ' अथवा 'कोळशी रोग ' असे म्हणतात. म्हणजेच कोळशी रोग होऊ नये म्हणून फळमाशींचे नियंत्रण करणे अथवा प्रतिबंधात्मक इलाज करणे युद्ध पातळीवर गरजेचे आहे. हे प्रत्येक संत्रा, मोसंबी, बागायतदारांनी कटाक्षाने पाळले पाहिजे अगोदरपासून सप्तामृताबरोबर क्विनॉलफॉस हे विषारी किटकनाशक जर प्रमाणत वापरले तर फळमाशी व कोळशी रोगावर बर्‍यापैकी नियंत्रण ठेवता येते. मात्र यासाठी योग्य प्रमाण, वेळ व औषध फवारणीची पद्धत हे सल्ल्यानुसार काटेकोरपणे पाळले पाहिजे. तसेच पाने खाणारी अळी, पाने पोखरणारी अळी , सायला, फळातील रस शोषण करणारे पतंग, मावा, साल खाणारी अळी इत्यादी किडी कमी अधिक प्रमाणत पिकाचे नुकसान करतात.

वरील प्रकारची लक्षणे असलेले बुरशी कोळशी रोग म्हणजे 'संत्र्याचा कॅन्सर' होय. यामुळे विदर्भातील हजारो एकर बागांचे नुकसान होऊन अनेक प्रकारची कृत्रिम विषारी औषधे वापरूनही ही समस्या अद्याप न मिटल्याने हजारो एकर बाग उद्धवस्त होऊन तोडल्या जात आहेत. म्हणजे या फळबागा पिकामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाचा गुंतविलेल्या लाखो रुपयांचा भांडवली खर्च कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न मिळता न परवडणारा भयानक व खेदजनक आहे. या समस्येला तांत्रिक नैसर्गिकदृष्ट्या कायम स्वरूपाची उपाय योजना होणे गरजेचे आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने या समस्यांवर काही प्रमाणात यश मिळू लागले आहे. त्यामुळे नविन लागवडीच्या बाग व दहा वर्षाच्या आतील बागांना वर उल्लेखीलेल्या समस्या यावर हमखास आशेचा एक नवीन किरण दिसू लागला आहे.

प्रक्रिया उद्योग :

नैसर्गिकरित्या रसाच्या बाटल्या भरणे. कृत्रिम रसपेय घेण्यापेक्षा हे कधीही सोयीचे आहे. गावोगावी या कारखान्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या क्षेत्रामध्ये शिरकाव करू देऊ नये. कारण या कंपन्या जादा भांडवल गुंतवून शेतकर्‍यांच्या मालाला जादा बाजारभाव देतील याची खात्री नाही. त्या उलट गावोगावी या प्रकारच्या सहकारी संस्था अथवा कुटीरउद्योग स्थापन करून ज्या तत्वावर दूध संकलन करून गुजरातमधील आनंद पॅटर्न धर्तीवर देशभरातील शहरांमध्ये ते पोहचविले जाते, त्या पद्धतीने जर हा प्रक्रिया उद्योग यशस्वी झाला तर या रसाला जगभर मागणी चांगली राहील. संत्र्याच्या सालीमध्ये विविध प्रकारचे (Essential Oils Organic Compounds) असतात, याचा औषधी उपयोग तसेच नैसर्गिकरित्या सौंदर्य प्रसाधने निर्मिती करणे याला फार मोठा जगभर वाव आहे. लहानपणी विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येकाने संत्री खाल्यानंतर मित्रांच्या होळ्यामध्ये सालीताला रस उडवून नैसर्गिकरित्या अश्रू आढळून डोळे स्वच्छ झाल्याचे अनुभवले आहे. संत्र्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे कातडीचे रोग बरे करण्याची ताकद आहे. शिकेकाईबरोबर वाळलेल्या संत्र्याच्या सालीचा वापर केल्यामुळे डोक्यातील कोंडा कमी होऊन, शांपूमुळे झटपट खराब होणारे केस (पांढरे, विरळ ) निस्तेज व कमी केस असताना सुद्धा पिंजारल्यामुळे अधिक असण्याचा आभास ढळून केसांना नैसर्गिक रोगमुक्त सौंदर्य प्राप्त करून देण्याची किमया संत्रीच्या सालीमध्ये आहे, हे विसरून चालणार नाही. टी. व्ही. वरील भुरळ पडणार्‍या जाहिरातींचा सूज्ञ जगावर परिणाम होणार नाही. नैसर्गिक संत्र्याच्या रसाच्या सेवनाने बिअरची आठवण येणार नाही किंवा व्हिटॅमिन 'सी' युक्त सेलिन या गोळ्यांची कृत्रिम गरज भासणार नाही. त्यामुळे यास सरकार, पतसंस्था यांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे.

या तंत्राचा राजगुरुनगर, जि. पुणे येथे सरकारी फलोद्यान रोपवाटिकेवर वरिष्ठ कृषी अधिकार्‍याने अनुभव चांगला आल्यावर स्वत:च्या अकोला (विदर्भातील ) संत्र्याच्या बागेवर याचा वापर केल्यावर तेथेही त्यांना त्याचा बराच फायदा झाल्याचे कळविले. विदर्भातील अनेक कृषी पदवीधरांनी स्वत:च्या संत्रा, पपई तसेच भाजीपाला, फुल बागांवर या विज्ञानाचा वापर करून प्रतिकुल परिस्थितीत अधिक दर्जेदार उत्पादन मिळविल्याचे कळविले आहे.