डच गुलाबाचे २० फुलांच्या गड्डीला ७० रू. भाव २२ गुंठ्यातून रोज १२० गड्ड्या

श्री. संतोष बबन बुदगुडे,
मु.पो. मरकळ, ता. खेड, जि.पुणे.
मोबा. ९६०४८६३९१२


आमचे २२ गुंठे पॉलीहाऊस आहे. त्यामधील १२ गुंठ्यामध्ये टॉंप सिक्रेट आणि १० गुंठ्यात बोर्डो या दोन्ही वाणांच्या डच प्रकारातील गुलाबाची लागवड २८ जानेवारी २०१४ रोजी केली आहे. बेड लाल माती, सेंद्रिय खते, रासायनिक खते, भाताचे तूस मिक्स करून तयार केले. बेडची रुंदी ९० सेमी असून एका बेडवर २ ओळी बसविल्या आहेत. लागवडीतील अंतर ४५ x १७ सेमी आहे. दोन बेडमध्ये ४५ सेमी अंतर आहे. पाणी व विद्राव्य खते ड्रिपवाटे देतो. २२ गुंठ्यामध्ये एकूण १८,५०० झाडे बसली आहेत. या बागेला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेट, थ्राईवर, क्रोपशाईनर, प्रिझम, हार्मोनी या औषधांच्या दोन फवारण्या केल्या आहेत. सध्या झाडांची उंची १।। फूट आहे. फुटवे भरपूर आहेत. क्रॉपशाईनरने पानांना व फुलांना शायनिंग येते. फुलांचे तोडे चालू आहेत. दोन्ही वाणांच्या १२०० + १२०० कळ्या (दोन्ही मिळून १२० गड्ड्या) निघतात. सध्या ६० - ७० रू. भाव २० फुलांच्या गड्डीला मिळत आहे. २ बाया व २ गडी असे ४ लेबर आहेत. सिकेटरने फुलांची दांडीसह काढणी करून रबरी दातेरी मशीनने काटे (६ इंचापर्यंतचे) काढून टाकतो. ५ ते १० फुले एकावेळी मशीनमध्ये धरतो. मशीनला १।। एच.पी.ची मोटर आहे. १२ वाजेपर्यंत तोडणी करून ३ वाजेपर्यंत पॅकिंग करतो. फवारणीसाठी क्रोंप्रेसर/एच. टी.पी. आहे. त्यामुळे २२ गुंठ्यातील फवारणी अर्ध्या तासात पुर्ण होते.

सध्या (७ ऑगस्ट २०१४ ) फुलांची बड साईज (उंची) व स्टेमलेंथ (काडीची लांबी) कमी मिळत आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज आलो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे थ्राईवर ७५० मिली, क्रॉपशाईनर १ लि. राईपनर ६०० मिली, न्युट्राटोन ७०० मिली, हार्मोनी ६०० मिली, प्रोटेक्टंट १ किलो व स्ट्रेप्टोसायक्लीन ६ ग्रॅम २०० लि. पाण्यातून फवारणार आहे. तसेच जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून ड्रीपवाटे सोडणार आहे.

हार्मोनीच्या फवारणीमुळे भुरी रोग आटोक्यात येतो. हे आम्ही अगोदरच्या २ फवारण्यात अनुभवले आहे. मात्र सध्या फवारणीस उशीर झाल्यामुळे भुरीचा थोडा प्रादुर्भाव जाणवत आहे. तोही वरील फवारणीने आटोक्यात येईल.

आमच्या गावातील जमीन भारी काळी असून बारमाही बागायती आहे. पॉलीहाऊस शिवाय ६ - ७ एकर ऊस असतो. त्याचे एकरी ७० ते ७५ टन उत्पादन मिळते. आता ऊस १५ - २० कांड्यावर आहे. तो तुटल्यानंतर खोडव्याला सरांचे तंत्रज्ञान वापरणार आहे.