कापरी (तुळजापुरी) ची लागवड

श्री. संतोष बबन बुदगुडे,
मु.पो. मरकळ, ता. खेड, जि.पुणे.
मोबा. ९६०४८६३९१२


कापरीच्या झाडाची पाने झेंडूपेक्षा लहान करवतीच्या आकाराची गर्द हिरवी काळीभोर असतात. याला अतिशय आकर्षक, मध्यम लहान आकाराची, गडद मखमली, केशरी रंगाची फुले लागतात. गपणती, लग्न सराई, सणासुदीत अॅस्टर, झेंडू महाग होतो. म्हणजे एरवी जो अॅस्टरच्या फुलांचा भाव ४ ते ६ रू. असतो तो या २० फुलांच्या चार गड्ड्यांचा १६ रू. होतो. त्यावेळेस कापरी (तुळजापुरी) या फुलांना मागणी वाढते. तेव्हा तुळजापुरीचाही ३० ते ४० रू. पासून १०० रू. किलोपर्यंत दर वाढतो. याचे फुल लहान, दिसण्यास आकर्षक असल्याने हारामध्ये अधूनमधून लावल्यास हार आकर्षक होत असल्याने अशा फुलांना हारामध्ये मोठी मागणी असते. म्हणून ही फुले देणाऱ्याला व घेणाऱ्यालाही परवडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना या फुलास ४० ते ६० रू. किलो भाव मिळतो.

* जमीन : कापरी हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. हलकी ते मध्यम तांबट स्वरूपाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन कापरी या पिकासाठी उत्तम ठरते. खारट, चोपण तसेच चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत कापरी लागवड टाळावी. डोंगर उताराच्या, घाट - माथ्यावरील सपाट जमिनी या पिकास उत्तम प्रतिसाद देतात.

* हवामान : उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. जास्त पावसच्या भागात लागवड फारशी यशस्वी होत नाही. सर्वसाधारणपणे झेंडूचे पीक ज्या भागात चांगले येते तेथील हवामान या पिकास मानवते.

* बियाणे : एकरी ४०० ते ५०० ग्रॅम बी पुरेसे होते. याच्या प्रचलीत जाती बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी त्यांच्याकडील प्लॉटमधील चांगल्या दर्जेदार फुलांपासून बी धरून ते लागवडीसाठी वापरतात.

* लागवडीचा हंगाम : कोणत्याही हंगामात कापरीची लागवड करता येते. विशेषत: कमी पावसाच्या भागामध्ये पावसाळ्याच्या सुरूवातीस जून - जुलै महिन्यात लागवड केली जाते. ही फुले ४५ - ५५ दिवसात तोडणीस येतात. गणपतीत या फुलांना भाव अधिक असतात. उन्हाळ्यात पाण्याची सोय असणाऱ्या भागात जानेवारी - फेब्रुवारीतील लागवडीची फुले मार्च - एप्रिलमध्ये ऐन उन्हाळ्यात लग्न सराईत आल्याने या ३ महिन्यात चांगले पैसे होतात.

* रोप तयार करणे : झेंडूप्रमाणेच कापरीचे बियास जर्मिनेटर २५ मिली + १ लि. पाणी या द्रावणात ५०० ग्रॅम बी ३ -४ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून गादीवाफ्यावर खुरप्याने २ - ३ इंच अंतरावर रेषा पाडून त्यामध्ये दीड ते २ सेमी अंतरावर बी सोडून मातीने झाकावे. तत्पुर्वी गादी वाफे तयार करताना वाफ्यावर शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा.

बी टाकल्यानंतर हळूवारपणे द्यावे. रोपे १ महिन्यात लागवडीयोग्य तयार होतात. या काळात सप्तामृत प्रत्येकी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे उगवणीनंतर ८ - ८ दिवसाला दोन फवारण्या घेतल्या असता रोपांची मर न होता वाढ जोमाने होऊन रोपे नेहमीपेक्षा आठवडाभर लवकर लागवडीस तयार होतात.

* लागवडीच्या पद्धती : या पिकाची लागवड सरी वरंब्यावर बागायती क्षेत्रात ३ x १।। किंवा ३ x २ फूट अंतरावर तर मध्यम पाण्याच्या उपलब्धतेवर मध्यम ते हलक्या जमिनीत २ x १।। किंवा २।। x १।। फूट या अंतरावर लागवड केली जाते.

* खते : या पिकाला रासायनिक खते शक्यतो देऊ नये. या पिकाला चांगले कुजलेले शेणखत ८ ते १० टन (१५ ते २० बैलगाडी) आणि ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत लागवडीच्या वेळी द्यावे. लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यावर पुन्हा २५ ते ३० किलो कल्पतरू सेंद्रिय खत रोपाजवळ गाडून द्यावे.

* पाणी: याला पावसाळ्यात गरजेनुसार तर थंडीत ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसाच्या. अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. फुलांचे तोडे चालू झाल्यावर पाणी वेळेवर दिल्यास फुलांचा टवटवीतपणा, कलर वाढून वजन चांगले मिळते.

* रोग कीड : या पिकाला रोग किडीचा प्रादुर्भाव फारसा जाणवत नाही. तरी काही प्रमाणात मावा, केसाळ अळी आणि पानांवरील ठिपके यांचा प्रादुर्भाव जाणवतो.

* केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) : ही अळी झाडाचे पाने कुरतडून खाते. त्यामुळे प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

'* पानांवरील ठिपके : या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे गोलसर ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पानांवर काळसर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे डाग दिसतात. काही वेळा पानांच्या देठावर आणि फांद्यावरही बुरशीची लागण दिसून येते.

रोग, किडींवर प्रतिबंधक उपाय म्हणून आणि कापरीचे अधिक दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली.+ १५० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ २५० लि. पाणी.

* काढणी : लागवडीनंतर ४० - ४५ दिवसात फुलकळी लागून ५५ ते ६० दिवसात तोडे चालू होतात. फुले झेंडूपेक्षा लहान आकाराची केशरी रंगाची, आकर्षक मिळतात. तोडा साधारणपणे सुरूवातीस ३ - ४ थ्या दिवशी केला जातो. ४ - ५ तोडे झाल्यानंतर फुलांचे प्रमाण वाढून तोडे २ - ३ दिवसाड करावे लागतात. फुले तोडे चालू झल्यानंतर २ ते २।। महिने चालतात.

* उत्पन्न : एकरी सर्वसाधारण २ ते २।। टन उत्पादन मिळते. सरसरी बाजारभाव ३० - ४० रू. किलोचा जरी मिळाला तरी एकरी ६० - ७० हजार रू. सहज उत्पन्न मिळते. याला उत्पादन खर्च झेंडूच्या तुलनेत कमी येतो. त्यामुळे या फुलापासून आर्थिकदृष्ट्या परवडते.