बारमाही उत्पादन देणारे फुलपीक :गेलार्डिया

डॉ.प्रज्ञा सुरेश गुडधे,
उद्यानविद्या विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला


गेलार्डिया फुलास 'गलांडा' या नावाने ओळखतात. या फुलझाडाची तीन - चार टप्प्यात लागवड केल्यास वर्षभर फुले मिळू शकतात. गेलार्डिया हे अत्यंत कणखर, भरपूर उत्पादन देणारे आणि बाजारात वर्षभर मागणी असणारे फुलपीक आहे. फुलातील भरपूर पाकळ्या फुलांचा आकर्षक आकार, रचना, रंग आणि टिकाऊपणा या गुणांमुळे गेलार्डियाच्या फुलांचा हार, गुच्छ तसेच लग्न समारंभात, विविध कार्यक्रमात सजावटीसाठी आणि सणासुदीला आरास कारणासाठी उपयोग केला जातो. फुलशेतीत वर्षभर उत्पादन व नियमित पैसा मिळवून देणारे हे चांगले फुलपीक आहे.

गेलार्डियाची लागवड महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, ठाणे, अकोला, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत गेलार्डियाची लागवड आढळून येते.

* हवामान आणि जमीन :

गेलार्डियाच्या पिकाला उष्ण व दमट हवामान चांगल्या प्रकारे मानवते. तसेच हे पीक काटक असल्यामुळे हवामानातील बदल सहन करून चांगल्याप्रकारे उत्पादन देऊ शकते. फायदेशीर उत्पादनाकरीता या पिकला मोकळी हवा, मध्यम तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या पिकाच्या वाढीसाठी २० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान उत्तम असते. सावलीतील जागा, अतिपर्जन्यवृष्टी कडक थंडी असलेल्या ठिकाणी या फुलझाडांची वाढ चांगली होत नाही. मात्र अवर्षण व उष्ण हवामान या सारख्या परिस्थितीवर हे पीक मात करू शकते.

या पिकासाठी हलकी ते मध्यम तसेच उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. साधारणपणे जमिनीचा सामू ५ ते ८ च्या दरम्यान असावा. माध्यम पोयट्याची जमिनी लागवडीसाठी योग्य असते. पण साचणारी क्षारयुक्त जमिन या पिकास मानवत नाही.

* पूर्वमशागत :

लागवडीपूर्वी जमीन उभी - आडव नांगरून हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून वखराच्या २ - ३ पाळ्या द्याव्यात आणि जमिनी भुसभुशीत करावी, जमिनीतील कडी कचरा, आधीच्या पिकाची धसकटे इत्यादी वेचून जमीन लागवडीसाठी तयार करावी. अशा प्रकारे जमीन तयार झाल्यावर सपाट वाफे किंवा सरी वाफे तयार करावेत.

* जाती : गेलार्डियामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

१) पिक्टा

२) लॉरेझियाना

१) पिक्टा : या प्रकारातील फुले मोठ्या आकाराची पण एकेरी पाकळ्यांची असतात. यामध्ये इंडियन चीफ रेड, डॅझलर, टेट्रा, फियस्टा, पिक्टा मिक्सड इत्यादी जातींचा समावेश होतो.

२) लॉरेंझियाना: या प्रकारातील फुले मोठी, दुहेरी पाकळ्याची आणि घट्ट असतात. या प्रकारात रॅगालीस, सरमुनी सनशाईन, गोरटी, डबल मिक्सड, डबल टेट्राफियस्टा इत्यादी जातींचा समावेश होतो. या शिवाय गेलार्डिया ग्रॅंडिलोरा या प्रकारातील जाती बहुवर्षायू असून त्यामध्ये सन गॉड, वरगंडी, रूबी, वारिअर इत्यादी जाती आहेत.

* अभिवृद्धी आणि लागवड :

गेलार्डियाची अभिवृद्धी बियांपासून करतात. त्यासाठी बियाणे गादीवाफ्यावर पेरून रोपे तयार करावी. गेलार्डियाची फुले वर्षभर मिळत रहावी म्हणून पुढे सांगितल्यानुसार लागवडी कराव्यात.

बी पेरणीचा काळ   रोपेलावण्याचा काळ   फुले तोडणीचा काळ  
सप्टेंबर   ऑक्टोबर   जानेवारी ते जून  
मार्च   एप्रिल   जून ते ऑक्टोबर  
जुलै   ऑगसत   ऑक्टोबर ते फेब्रुवारी  


गेलार्डियाचे बी फारच हलके असते. एक ग्रॅम वजनात साधारणत: ७०० ते ७५० बिया असतात. एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी ४०,००० रोपे लागतात त्याकरिता ५०० ते ७५० ग्रॅम बियाणे पेरेसे होते. रोप तयार करण्यासाठी १ मीटर रूंद, १५ सें.मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. याप्रमाणे २० गादीवाफे पेरले तर एक हेक्टरसाठी पुरेशी रोपे तयार होतात. एका वाफ्यावर ५ ते ६ ग्रॅम बी, १.२५ सें.मी. खोलीवर ओळीत पेरावे. दोन ओळीत १० सें.मी. अंतर ठेवावे. बी पेरणी अगोदर गादी वाफ्यावर प्रति चौरस मीटर क्षेत्रात १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे.

* बीज प्रक्रिया : १ लि. पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर मिसळून त्या द्रावणात गेलार्डियाचे ५०० ग्रॅम बी ३ - ४ तास भिजवून अर्धातास सावलीत सुकवून नंतर गादीवाफ्यावर टाकावे. जर्मिनेटरच्या पर्क्रियेमुळे बियाची लवकर व जास्तीत जास्त उगवत होऊन रोपांची मर होत नाही तसेच वाढ जोमाने होते. थंडीमध्ये बीजप्रक्रियेस कोमट पाणी वापरावे. थंडीमध्ये बियाणे उगवण साधारणत: ७ ते ८ दिवसात होते. त्यानंतर ३ ते ४ आठवड्यात रोपाला ६ - ८ पाने येतात आणि रोप लागवडीस तयार होते. जमीन तसेच हंगामानुसार रोपांची लागवड ६० x ४५ सेमी अंतरावर करावी. रोप लावताना जर्मिनेटर १०० मिली १० लि. घेऊन रोपांची मुळे त्या द्रावणात बुडवून लागवड करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून रोपांची जोमाने वाढ होते. त्यामुळे लागवड यशस्वी होते.

* खात व पाणी व्यवस्थापन :

लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत आणि २५० ते ३०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत जमिनीत मिसळावे. गेलार्डियाच्या पिकाला हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश ही खते द्यावीत. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्यानी द्यावे. लागवडीनंतर पाण्याच्या दोन पाळ्या लवकर - लवकर द्याव्यात. पावसाळ्यात पाऊस नसताना पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. हिवाळी हंगामात १० ते १२ आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. म्हणजे झाडांची वाढ एकसारखी होत राहील. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. सुरुवातीला गेलार्डियाची वाढ पसरट असते, मात्र पुढे - पुढे त्याची वाढ ही उभट होते.

* कीड, रोग व्यवस्थापन :

गेलार्डियाच्या पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात आढळतो. परंतु काही वेळा मावा, फुलकिडे आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा उपद्रव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा स्प्लेंडर हे सेंद्रिय किटकनाशक २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळ्यात मुळकूज तसेच मर रोग आढळून आल्यास जर्मिनेटर १ लि + कॉपर ऑक्झिक्लोराईड ५०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त झाडाच्या बुडाशी हे द्रावण (ड्रेंचिंग/आळवणी करणे) सोडावे.

* डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या पिकाच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी तसेच फुलांचा दर्जा व उत्पादनात खात्रीशीर वाढ होण्यासाठी पुढीलप्रमाणे कराव्यात.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० ते १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली. + २५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० ते ५०० मिली. + २५० लि. पाणी.

तोडे चालू झाल्यानंतर फवारणी क्र. ४ प्रमाणे दर १५ दिवसाला फवारणी घेणे. म्हणजे रोगराई आटोक्यात राहून फुलाचा दर्जा नेहमी उत्तम मिळतो, तसेच फुलांचे तोडे वाढल्याने उत्पादनात हमखास वाढ होते.

* फुलांची काढणी आणि उत्पादन :

रोपांच्या लागवडीपासून साधारणत : ५० ते ६० दिवसात गेलार्डियाला फुले येण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर १५ ते २५ दिवसात फुले तोडणीला येतात. पुढे जवळ जवळ १० ते १२ आठवडे तोडणीचा हंगाम चालू राहतो. फुलांची तोडणी करताना १० ते १५ सें.मी. लांबीच्या दांड्यासह फुले झाडावरून छाटून घ्यावीत. अशा प्रकारे तोडणी केलेल्या फुलांची प्रतवारी करून चांगली सुटी फुले किंवा १० ते १२ फुलांची एक जुडी या प्रमाणात ३०० ते ४०० जुड्या एका करंडीत भरून नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवाव्यात. साधारणपणे गेलार्डियाच्या एका झाडापासून २५ ते ३० फुले मिळतात. एक हेक्टर क्षेत्रामधून ५ ते ७ टन फुलांचे उत्पादन मिळू शकते.