ज्येष्ठमध लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ज्येष्ठमध (Glycyrrhiza glabra Linn.) ही लेग्युमिनेशी (Leguminaceae) कुलातील चीन, पर्सिया, अफगाणिस्तान, उत्तर आफ्रिका, स्पेन, इटली, ग्रीस, सिरीया या भागात आढळणारी औषधी वनस्पती असून इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन व चीन येथे तिची लागवड केली जाते. आपल्या देशात वायव्य भागात ज्येष्ठमध नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी लागवडीचा हवा तेवढा प्रसार झाला नाही. गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश व महाराष्ट्रात या वनस्पतीची लागवड केली जाते. असे असूनसुद्धा आपल्या देशात दर वर्षी दहा हजार टन ज्येष्ठमधाची द्विपक्षीय कराराद्वारे इराण, इराक व अफगाणिस्तान या देशांकडून आयात केली जाते. अलीकडे या देशातील निर्यातक्षम मालाच्या तुटवड्यामुळे किंमतीत वाढ झाली असून आपल्या देशात मुळ्यांचा व त्यापासून बनविलेल्या उत्पादनांच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठमध लागवडीचे महत्त्व वाढत आहे.

* वनस्पती परिचय :

ज्येष्ठमध ही झुडुपवर्गीय वनस्पती असून १ ते १.४ मी. उंच वाढते. पाने संयुक्त असून ती सोनामुखी/उन्हाळीच्या पानांसारखी व गर्द हिरवी असतात. त्यामध्ये ४ - ७ पर्णिकांच्या जोड्या असतात. फुले मोठ्या दांड्यावर येत असून ती मंजरी कक्षास्थ व फिकट जांभळी असतात. शेंग चपटी व लांबीस ३ - ४ सें.मी. असते. शेंगांचा रंग फिकट तपकिरी असून त्यामध्ये २ ते ५ बिया असतात. ज्येष्ठमधाच्या १२ प्रजाती असून ग्लीसराइजा ग्लॅब्रा ही प्रजाती औषधी गुणधर्माची असल्याने लागवडीस उपयुक्त आहे. या प्रजातीमध्ये ३ वाण आहेत. टिपीका या वाणास स्पॅनिश ज्येष्ठमध म्हणतात व त्याची लागवड स्पेन, इटली इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व अमेरिकेत केली जाते. या जातीची मुळे लांब असून खोडाचे गड्डे लहान व लाल रंगाचे असतात. व्हीओलॅशिया ह्या वाणास पारशी/इराणी ज्येष्ठमध म्हणतात. या वाणाची लागवड इराण, इराक, सिरीया व अफगाणिस्तान या देशात आढळते. मुळे खूप जाड असतात. ग्लॅडूलीफेरा हा रशियन वाण रानटी असून मुळे मोठी, लांब, गुलाबी व चवीस गोड असतात.

* ओषधी उपयोग :

ज्येष्ठमध ही गोड मुळ्यांची वनस्पती सर्व औषधामध्ये महत्त्वपूर्ण असून तिचा उपयोग आयुर्वेदिक होमिओपॅथी औषधांमध्ये होतो. मुळे ही जमिनीतील खोड असून तीच औषधोपयोगी भाग आहे. दमा, अल्सर, पोटदुखी, वात, पित्त, मूत्ररोग, आवाजाची खरखर इ. विकारांवर ज्येष्ठमध उपयुक्त असून कडू औषधांना गोडी आणण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर करतात. तसेच मुळांमध्ये मूत्रलरोग तापनाशक व प्रतिजैवक - जीवाणू प्रतिकारक गुण आहेत. अन्नपदार्थ, तंबाखू, बिअर, दारू यांना गोडी व स्वाद आणण्यासाठी व टिकविण्यासाठी ज्येष्ठमधाचा उपयोग होतो. मुळांमध्ये ट्रायटर्पेनॉइड व फ्लेवोनाइड हे घटक असून त्याची गोडी ग्लायसिराइजीन या ट्रायटर्पेनॉइड गटातील संयुक्त पदार्थामुळे असते. त्याचे मुळांमधील प्रमाण २ - १४% इतके असते.

* औषधी उत्पादने :

यष्ट्यादिचूर्ण, यष्टीमध्वादि तैल, लवंगादिचूर्ण कर्पूरादिचूर्ण, यष्ट्यादिक्वाथ, यष्ट्यादिपाक.

* हवामान व जमीन :

ज्येष्ठमधाच्या लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान उपयुक्त ठरते. या पिकासाठी ५०० मि. मि. पर्यंत पाऊस पुरेसा होतो. परंतु त्याचे वाटप समप्रमाण व पिकाच्या वाढीच्या कालावधीत असावे.

या पिकासाठी मध्यम ते भारी अथवा पोयट्याची ओलावा धरून ठेवणारी १ मी. हून अधिक खोल जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.२ या दरम्यान असावा.

* सुधारित जाती :

हरयाना मूलहटी-१ (इ. सी. ११४३०३), (हरयाना कृषी विद्यापीठ, हिस्सार), मिश्री (केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था, लखनौ), इ.सी. १११२३६, इ.सी. १२४५८७, इ.सी.) २१९५० (हिस्सार).

* पूर्वमशागत : या पिकाची मुळे ०.५ ते १.० मी. खोलपर्यंत वाढत असल्याने जमिनीची खोल मशागत होणे गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून त्यामध्ये ८ - १० टन प्रति हेक्टरी शेणखत/कंपोस्ट खत टाकून २ - ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी.

* लागवड : लागवडीसाठी जमिनीखालील खोडांचा बियाणे म्हणून वापर केला जातो. साधारणतः १० ते २० सें.मी. लांब व ३ - ४ डोळे असणारी भूमिगत खोडे (मुळ्या) मातीत ६ ते ८ सें.मी. खोल लावून लागवड करतात. लागवड जुलै-ऑगस्ट किंवा फेब्रु-मार्च महिन्यात अगोदर तयार केलेल्या सरी वरंब्यात/सपाट वाफ्यात करतात. दोन ओळीत ६० सें.मी. तर रोपांत ३० - ४५ सें.मी. अंतर ठेवावे. एक हेक्टर लागवडीसाठी ३०० किलोपर्यंत बेणे पुरेसे होते. याशिवाय प्लॅस्टीक पिशवीत खोडांची लागवड जाणाऱ्या मुळांना जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे भिजवण्याची प्रक्रिया केल्यास फूट तर जलद होतेच शिवाय बेणे चांगले उगवून उशीरा फुटणाऱ्या मुळांची वाढ जलद होते. अशी रोपे नांगी भरण्यासाठीदेखील वापरली जातात.

* खते: लागवडीच्या वेळेस १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि ७ किलो नत्र, १० किलो स्फुरद व १० किलो पालाश प्रति एकरी या खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर १० किलो नत्र सहा महिन्याच्या अंतराने अर्धा - अर्धा द्यावा.

* पाणीव्यवस्थापन :

मुळांची चांगली उगवण होण्यासाठी लावणीनंतर लगेच पाण्याची पहिली पाळी द्यावी. १५ - २० दिवसात मुळांना नवी फुट येते. ज्या भागात हिवाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते, अशा ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात जास्त प्रमाणात पानगळ होते म्हणून पिकास गरजेनुरूप १० - १५ दिवसाच्या अंतराने एकूण ८ - १० पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

* आंतरपिके :

ज्येष्ठमध उत्पादनास २ - ३ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंतरपीक म्हणून मुळा, गाजर, कोबी, बटाटा इ. पिके लागवडीस वाव आहे. आंतरपिकामुळे तणांचे नियंत्रण करणे वेळोवेळी शक्य होते.

* पीकसंरक्षण :

१) पानांवरील ठिपके (सर्कोस्पोरा) : या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर काळे ठिपके पडतात व रोगग्रस्त पाने वाळून मोठ्या प्रमाणात पानगळ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २५ मिली/१० लि. पाणी किंवा डायथेन एम - ४५ किंवा डायथेन झेड-७८ (०.२%) किंवा बाविस्टीन (०.१%) या औषधांची फवारणी करावी.

२) मूळ कूज व मर रोग : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव लागवडीपासून दिसून येतो. या रोगांमध्ये मुळे कुजून रोपे मरतात. बुरशीची वाढ खोड व फांद्यांवर होऊन तांबड्या ठिपक्यांचे रूपांतर काळ्या ठिपक्यांत होते. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी झाडांचा जमिनीवरील १० सें.मी. भाग कापावा. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून मातीत लागवडीपूर्वी बाविस्टीन /बेनलेट मिसळावे. रोग नियंत्रणासाठी ०.०५% कार्बेडेन्झीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

३) पानांवरील ठिपके (अल्टरनेरिया) : या बुरशीजन्य रोगामुळे पान व खोडांवर फिकट तांबूस काळ्या रंगाचे ठिपके पडून पानगळ होते. रोगाची लक्षणे दिसताच सहा दिवसांच्या अंतराने ३- ४ वेळा ब्लायटॉक्स (०.०२%) या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

४) वाळवी: या किडीचा प्रादुर्भाव पाण्याची कमतरता असणाऱ्या जमिनीत अधिक प्रमाणात दिसून येतो. या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रानबांधणीच्या वेळी २५ किलो/हे. याप्रमाणे कार्बारील पावडर जमिनीत मिसळावी किंवा ०.५ मि.ली. क्लोरपायरीफॉस प्रति लिटर पाण्यात टाकून मातीत मिसळावे.

वरील कीडरोगांना प्रतिबंधक म्हणून तसेच पिकाच्या चांगल्या व दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर २० - २५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० - ५० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर २।। ते ३ महिन्यांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० ते ४०० मिली + २०० लि.पाणी.

यापुढील फवारण्या पीक परिस्थतीनुसार आमच्या कृषीविज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्लानुसार कराव्यात.

* काढणी व उत्पादन :

ज्येष्ठमध काढणी दीड ते तीन वर्षानंतर केली जाते. नोव्हेंबर महिन्यात काढणी करताना जमीन एक मीटरपर्यंत खोदून सर्व मुळ्या ओढून काढाव्या. हिवाळ्यात काढणी करण्याचा मुख्य फायदा म्हणजे या कालावधीत मुळातील ग्लीसीराइझीनचे प्रमाण अधिक असते. काढणीनंतर मुळ्या स्वच्छ धुवून ६ - १० सें.मी. लांबीचे तुकडे करून १० ते १२ दिवस सावलीत वाळवाव्या. मुळांची प्रतवारी करताना चांगल्या प्रतीच्या मुळ्यांमध्ये ३% हून अधिक कचरा नसावा. सुकलेल्या मुळ्यांमध्ये १०% पेक्षा अधिक ओलावा असू नये. अन्यथा प्रत खराब होण्याची शक्यता असते. उच्च प्रतीच्या मुळांमध्ये ग्लायसीराइझीनचे प्रमाणे ६ - १०% असते. सदर मुळ्यांची लांबी व जाडीनुसार प्रतवारी करावी. पिकाच्या कालावधीनुसार हेक्टरी ३० ते ५० क्विंटल मुळ्यांचे उत्पादन मिळते. सुकवणी यंत्रात ३० - ४० डी.से. तापमानास मुळ्यांनी सुकवणी केली जाऊ शकते.