बांबू लागवड

श्री. परशुराम ना. देवळी, (संशोधन विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर )
डॉ. ए. एम. गुरव (मार्गदशर्क डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स,कोल्हापूर)


बांबू : एक कल्पवृक्ष

गोषवारा : बांबू हे जलद गतीने वाढणारे काष्ट गवत आहे. ग्रामीण व शहरी लोकांचे जीवनमान उंचावण्याची फार मोठी क्षमता ह्या बांबूमध्ये आहे. सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०,००० कोटी रुपयाचा असून त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सन २०१५ पर्यंत हा व्यापार म्हणजे दुपटीने रुपये १,२०,००० कोटी इतका वाढेल असा अंदाज आहे. भारतात हा व्यापार ४,३०० कोटी रुपयाच्या धरात असल्याचा अंदाज असून सन २०१५ पर्यंत २७,००० कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच बांबूचे माणसाच्या सामाजिक व आर्थिक जीवनातील विविध उपयोग लक्षात घेत बांबू एक कल्पवृक्ष ही ओळख सार्थ वाटते.

प्रस्तावना : पृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून बांबूचे अस्तित्व आहे. बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, निचरा होणार्‍या जमिनीत तसेच कोरड्या हवामानातही बांबू वाढू शकतो. पाणथळ जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. वनातील इतर वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीमध्ये, ठराविक क्षेत्रात जास्तीत - जास्त जैवभार (BIOMASS) निर्माण करण्याची क्षमता बांबुमध्ये आहे. जगामध्ये बांबूच्या सुमारे ९० जाती आणि १५०० प्रजाती आहेत. बांबू प्रजातीला त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच फुलोरा येतो आणि त्यानंतर बांबू बेट मरते म्हणजेच ते वाळण्यास सुरवात होते.

कागद कारखाना,कुटीरउद्योग व हस्तशिल्प कामासाठी बांबूपासून कच्चा माल मिळतो. घरबांधणी, शेती अवजारे तसेच घरसजावटीच्या कित्येक वस्तुंसाठी बांबूचा उपयोग करण्यात येतो. एवढे काय तर बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून चांगली भाजी तसेच लोणचेही तयार करतात, बांबूची मुळे, रस खोडावर आढळणारी पांढरी भुकटी (वंशलोचन राख ) यांचा फार प्राचीन काळापासून छोट्या मोठ्या आजारात औषध म्हणून वापर केला जात आहे.

सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०,००० कोटी रुपयांचा असून त्यात चीनचा वाटा ५० टक्के आहे, सन २०१५ पर्यंत हा व्यापार १,२०,००० कोटी इतका वाढेल असा अंदाज आहे. भारतात हा व्यापार ४,५०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज असून सन २०१५ पर्यंत २७,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

ह्या सर्व बाबींचा विचार करता बांबू हे एक अत्यंत महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न देणारे पीक असून बांबूची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. वनशेतीला दिवसेंदिवस खूप महत्त्व प्राप्त होते आहे. त्यातच विविध उपयोग असणार्‍या व अल्प काळात उत्पन्न सुरू होणार्‍या बांबू लागवडीकडे लोक मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.

भारतात बांबूच्या १३० देशी - विदेशी प्रजाती आढळतात. समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. (अपवाद काश्मिर राज्य, तेथे नैसर्गिकरित्या आढळून येत नाही ) जगात चीनच्या खालोखाल भारतात बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण क्षेत्रातही आज बांबू लागवडीस फार मोठा बाब आहे.

बांबूचे विविध उपयोग :

बांबूचे जवळपास ५,००० उपयोग सांगितले जातात काही उपयोग खालीलप्रमाणे -

१) पारंपारिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.

२) शेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.

३) घरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ.

४) प्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.

५) घरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.

६) फर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.

७) हस्तकाल व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तु, विविध आभुषणे, फ्रेन्स इ.

८) व्यापार : चहाची खोकी, टोपल्याम आंबा पॅकींगसाठी पेट्या बनवण्यासाठी, पडदे, बासरी बनवणे, नॅपकिन्स, पॉलिहाऊस, कागद बनवणे, उदबत्ती इ.

९) आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.

१० औषधे : वंशलोशन, नारू रोगावर औषधांसाठी

११) मृदा संधारण : जमिनीची धूप थांबविणेसाठी, जमिनीचा कस वाढविणेसाठी.

बांबू लागवडीचे महत्त्व : बांबू शेती एक फायदेशीर लागवड आहे. खालील कारणांमुळे बांबू लागवडीपासून मोठा आर्थिक भाल होते,

१) बांबू पीक हे विविध प्रकारच्या जमिनीतील मातीत व वेगवेगळ्या वातावरणात येऊ शकते.

२) बांबूची छाटणी कापणी आपण बाजार मागणीप्रमाणे मागेपुढे कु शकतो किंवा नाशवंत नसल्याने बांबूची साठवणूक करू शकतो.

३) लागवड देखभाल करण्यासाठी कमीत कमी मजुरी व देखभाल खर्च कमी लागतो.

४) बांबूची बाजारात मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

५) शेतीच्या उत्पन्नात विशेष घट न येता बांधावर बांबूची लागवड केली जाऊ शकते.

पर्यावरण दृष्ट्या महत्त्व :

१) मुलाच्या विशिष्ट रचनेमुळे माती स्थिर करणे धूप थांबविणे नाधीच्या किनार्‍यांना संरक्षण पुरवणे आणि पुराव्हा धोका टाळणे या कामासाठी बांबू आदर्शवत आहे.

२) जमिनीवरील बांबूच्या वाढीमुळे कार्बंनग्रहण आणि जमिनीखालील बाढीमुळे मृदा पुनरुज्जीवन ही विशेष कार्य घडतात.

३) बांबू वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आणि निकस जमिनीतही वाढू शकतो तसेच कमी पावसाच्या प्रदेशापासून जास्त बाष्प असलेल्या ठिकाणीही वाढतो.

४) सांडपाण्याची स्वच्छता करण्यासाठी नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करण्यात येते.

५) एकदा बांबू लागवड केल्यावर जमिनीखाली रायझोमची आडवी वाढ होऊन दरवर्षी नवीन बांबू फुटतात आणि बांबू बेटामध्ये आपोआप वाढ होते व जास्त प्रमाणात बांबू मिळतात.

६) बांबू ही सर्वाधिक वेगवान वाढणारी वनस्पती असून त्यापासून सर्वाधिक जैवभाराचे उत्पादन मिळते.

रोजगार निर्माण करणारे पीक : बांबू रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने बांबूचे स्थान हे वरचे आहे. विविध अर्थिक क्षेत्रात बांबूचे मोठे कार्य आहे. घरबांधणी, पल्प (लगदा) कागद, कृत्रिम रेशीम, विविध वस्तु आदीच्या निर्मितीसाठी बांबू वापरला जातो. तसेच शेती, मासेमारी, रेशीम किड्यांची पैदास यासाठी बांबूचा उपयोग होतो.

१) प्रत्यक्ष कामाच्या निर्मिती बरोबरच बांबूची डोक्यावरून वाहतूक, बांबू शेतवनात गुरे चराई, बांबूच्या पणाची खाद्य म्हणून कापणी, शाकारणी, पहाड बांधणे इ. तसेच बांबूवर आधारीत कुटीर उद्योगातून रोजगार निर्माण होतो.

२) बांबूची निगा राखणे अगर तोडण्यासाठी मनुष्यबळ लागते.

३) कारखान्यामध्ये सुद्धा बांबूपासून वस्तुच्या उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग लागतो.

४) मुल्यवर्धित प्रक्रियांमुळे व्यापारात वाढ होऊन अप्रत्यक्षरित्या लोकांना रोख रक्कमेच्या स्वरूपात फायदा होतो.

५) बांबुवर प्रक्रिया करण्यासाठी तुलनेने कमी खर्च लागतो त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

वरील विवेचनावरून बांबूचे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक विधी उपयोग लक्षात घेता बांबू ही वनस्पती माणसाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाच्या अधिक अंगाना स्पर्श करणारी आहे, म्हणूनच एकविसाव्या शतकात बांबूची " Poor many timber to rich fancy " अशी ओळख तयार झाली आहे, त्यामुळेच बांबूला एक कल्पवृक्ष म्हटल्यास वावगे ठरू नये.

समारोप : बांबू हा कल्पवृक्ष आहे. कारण तो ग्रामीण डोंगर - दर्‍यात राहणार्‍या जनतेचा सर्वार्थाने आधार आहे. मानवी जीवनामध्ये सर्वत्र त्याचा उपयोग होतो. गरीबापासून श्रीमंतापर्यंत बांबूचा वापर केला जातो. महात्मा गांधीचे स्वप्न साकार करण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी, ग्रामीण जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्‍या अर्थाने उद्याचा समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी 'बांबू' लागवड -संवर्धन - संशोधन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिक भागामध्ये 'बांबू' या व्यवसायाचे "क्लस्टर " (समूह विकासाद्वारे ) होऊ घातलेला आहे. अभ्यासअंती संशोधकानी असे सिद्ध केले आहे की, बांबू हा लोखंडापेक्षाही कठीण व टिकाऊ होऊ शकतो. थोडक्यात बांबूमुळे निसर्गाचे संवर्धन आणि मानवी राहणीमानाचा विकास साधता येतो.

संदर्भसूची : १) बांबू हिरवं सोनं : राष्ट्रीय बांबू मिशन महाराष्ट्र २००८

२) बांबू वनशेती : श्रीकांत थत्ते

३) 'उसापेक्षा बांबू बरा" : अनिल अचवट

४) मानगा बांबू : सामाजिक वनीकरण संचालनालय महाराष्ट्र राज्य

५) प्राथमिक रिपोर्ट : चंदगड व आजरा तालुका कृषी विभाग व वनविभाग

६) भारतीय नियोजन आयोगाचा अहवाल : २००८

संकेतस्थळे :

www.inbar.int (Accessed on 28/02/2011)

http://kolhapur.nic.in (Accessed on 10/02/2011)

www.worldbamboo.net (Accessed on 12/01/2011)

www.bambootech.org (Accessed on 18/01/2011)