जायफळ यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जायफळ शास्त्रीय नाव - Myristaca fragrans आणि घराणे - Myristicaceae आहे.

जायफळाचे मुळस्थान इंडोनेशियातील मोलुक्कास बेटात आहे. या झाडापासून जायफळ व जायपत्री असे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात. असे जायफळ म्हणजे फळातील वाळलेली बी असते आणि जायपत्री फळाच्या साली भोवती गुंडाळलेला वाळलेला गर असतो. जायफळाची व जायपत्रीची ५० % परदेशी निर्यात इंडोनेशियातून होते. या निर्यातीत दुसरा क्रमांक ग्रेनाडाचा लागतो.

जायफळाचे झाड बहुवर्षायु असते. याची लागवड कोकणात समुद्रकिनारी गाळाच्या जमिनीत, बागेत छायेखाली चांगली होते. जायफळाचे झाड शोभिवंत असते. साल मऊ असते आणि आंतरसाल लाल असते. सदापर्णी झाडाची पाने लांबट भाल्यासारखी १० ते २० सें.मी. लांब व ४ ते ६ सें.मी. रुंद असतात. पाने वरून भुरकट व खालून करडी असतात. लहान नरफुले पुष्कळ असतात आणि मोठी मादीफुले बगलेत लोंबकळती असतात . फळे झाडावर फार दिवस टिकून राहतात. वाळलेल्या फालत ५ ते १५ % उडणारे तेल आणि २५ ते ४०% स्थित तेल असते. जायफळाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

हवामान व जमिन : वार्षिक पाऊसमन १५० सें.मी. पेक्षा अधिक असलेल्या उष्ण व दमत प्रदेशात जायफळाची झाडे चांगली वाढतात. ती समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीच्या जमिनीत वाढू शकतात. जायफळाच्या लागवडीसाठी चिकण पोयटा, वाळू पोयटा व जांभ्या खडकाची तांबडी जमिन योग्य असते.

जायफळाच्या झाडाला कोरडे हवामान व पाणथळ जमीन पोषक नसते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन योग्य असते.

जाती : भारतात जायफळाच्या वेगळ्या जाती नाहीत. या झाडत परस्पर - परागीकरण होत असल्याने बराच फरक आढळतो. हा फरक झाडाची वाढ, जाम, लैंगिकता, झाडाचा आकार आणि उत्पादन या बाबतीत दिसून येतो. एकाच झाडापासून जी फळे मिळतात त्यांच्या वजनात तफावत ( २ ते १५ ग्रॅम) आढळते. चांगल्या झाडापासून दरवर्षी सरासरी १००० फळे मिळतात. परंतु सर्वसाधारपणे एका झाडापासून काही शेकड्यापासून सुमारे १०,००० फळे मिळतात.

अभिवृद्धी : जायफळाची लागवड बियांपासून करतात. उगवण्यास काही आठवडे लागतात. जावामध्ये बियांपासून वाढलेल्या झाडात ४५% नर झाडे किंवा द्विलिंगी झाडे आढळतात.

निलगिरीच्या बर्लियर फळ संशोधन केंद्रात जायफळाच्या बियांपासून वाढविलेल्या रोपांवर जायफळाच्या मादी झाडाची भेट कलमे हंगामानुसार ४० ते ८०% यशस्वी झाल्याचे आढळले.

नर्सरी : बियांसाठी नैसर्गिकपणे भेगाळलेली जायफळाची निरोगी फळे निवडतात. ही फळे जून - जुलै महिन्यात गोळा करतात. फळाच्या सालीपासून बी वेगळे काढतात आणि त्यांची लागलीच नर्सरीत पेरणी करतात. पेरणीसाठी नदीतील वाळूचे गादी वाफे १५ सें.मी. उंच, एक ते दीड मीटर रुंद आणि आवश्यक तेवढ्या लांबीचे तयार करतात. बी २० ते २५ सें.मी. अंतरावर पेरावे. जमिनीत २.५ सें.मी. पेक्षा खोल बी पेरू नये.

बीजप्रक्रीया: जर्मिनेटर २५ मिली + प्रोटेक्टंट १५ ते २० ग्रॅम + १ लि. पाणी या द्रावणात २५० ते ५०० ग्रॅम बियाणे ४ -५ तास भिजवून सावलीत सुकवून लावावे.

बी चांगले उगवण्याकरिता वाफ्यांना नियमितपणे पाणी देण्याची गरज असते. पेरणी केल्यापासून सुमारे ३० दिवसांनी उगवणीला सुरुवात होते आणि ९० दिवसांपर्यंत उगवण पुर्ण होते. सुमारे २० दिवसांचे मोड आलेले बी पॉलिथिनच्या पिशव्यात पेरतात. ह्या पिशव्या आधीच सुपीक माती, वाळू व चांगले कुजलेले शेणखत यांच्या ३:३:१ मिश्रणाने भरलेल्या असतात. शेतात वाफ्यात वाढणार्‍या रोपावर मंडप घालून सावली करावी. रोपांना सकाळी व संध्याकाळी झारीने पाणी द्यावे. एका वर्षाची १५ ते २० सें.मी. उंचीची रोपे बागेत लावण्याकरिता योग्य असतात.

लागवड : बागेत जायफळाची लागवड करण्याकरिता जमीन उन्हाळ्यात तयार करतात आणि पावसाळ्याचे सुरुवातीला रोपांची लावणी करतात. शेतकरी झाडातील अंतर वेगवेगळे ठेवतात. त्यांनी ठेवलेले झाडातील ६ -७ मीटर अंतर अपुरे पडते. परंतु जायफळाच्या झासात ९ मीटर x ९ मीटर अंतर योग्य ठरले आहे. लागवडीसाठी या अंतरावर ०.७५ मीटर x ०.७५ मीटर x ०.७५ मीटर आकाराचे खड्डे खणतात. रोप लावणीच्या १५ दिवस आधी हे खड्डे माती व सेंद्रिय खताच्या मिश्रणाने भारतात. प्रती हेक्टरी १२० झाडे बसतात.

सुरुवातीच्या काळात लहान झाडांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे लागते. डोंगराच्या उतरणीवर जायफळाची लागवड करण्यापूर्वी सावलीसाठी अगोदर मोठ्या झाडांची लागवड करावी लागते. केरळात जायफळाची रोपे नारळाच्या बागेत लावतात. तेव्हा रोपांना सावली मिळते. नदीच्या पात्राशेजारच्या नारळाच्या बागेत जायफळाची झाडे चांगली वाढतात. जायफळाच्या झाडांना उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते. म्हणून उन्हाळ्यात पाण्याची सोय असलेल्या बागेत जायफळाची लागवड करावी. नारळ व सुपारीच्या झादासोबत जायफळाच्या झाडांनाही पाणी द्यावे.

खते : सध्या शेतकरी जायफळाच्या झाडाला सेंद्रिय खतेच घालतात. त्यात हाडांचा चुरा अधिक लोकप्रिय आहे. सुरुवातीचे ३ वर्षे अनुक्रमे ५०० ग्रॅम, १ किलो आणि दीड किलो कल्पतरू सेंद्रिय खत याप्रमाणात जून - जुलै आणि सप्टेंबर - ऑक्टोबर या काळात दोन वेळा अर्धे -अर्धे याप्रमाणे द्यावे. ३ वर्षानंतर दरवर्षी २ किलो कल्पतरू सेंद्रिय खत वरीलप्रमाणे द्यावे. झाडाभोवती उथळ चर खोदून त्यामध्ये हे खत द्यावे. केरळच्या कृषी विभागाने जायफळाच्या झाडाकरिता पुढील खते देण्याची शिफारस केली आहे. प्रत्येक झाडाला सुरुवातीला ३० ग्रॅम नत्र, १८ ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. त्यानंतर खताची मात्रा वाढवावी . पूर्ण वाढलेल्या १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला प्रति वर्षी १०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व १००० ग्रॅम पालाश ही खते द्यावीत.

कोकण कृषी विद्यापीठाची खतांची शिफारस पुढीलप्रमाणे आहे. रोपांना पहिल्या वर्षी १ घमेले शेणखत ५० ग्रॅम नत्र, २५ ग्रॅम स्फुरद व २५ ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. झाडांचे वय जसजसे वाढत जाईल तसे प्रत्येक वर्षी खतांची मात्रा वाढवावी. दहा वर्षापासून पुढे प्रत्येक झाडाला प्रति वर्षी १० घमेली शेणखत ही खते द्यावीत. ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश ही खते द्यावीत.

संपूर्ण शेणखत व स्फुरद आणि नत्र व पालाशची अर्धी मात्रा ऑगस्ट महिन्यात द्यावी. नत्र व पालाशची उरलेली अर्धी मात्रा फेब्रुवारी महियात द्यावी. याच काळात बहार धरेपर्यंत झाडांना फांद्या फुटून झाडांची वाढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या पहिले ५ -६ वर्षे पावसाळयामध्ये १ महिन्याच्या अंतराने ३ -४ वेळा दरवर्षी (सप्तामृत १ लि. आणि हार्मोनी ५०० मिली + २५० लि. पाणी याप्रमाणे ) कराव्यात. म्हणजे रोग - किडींचा प्रादुभार्व टाळून झाडाची जोमदार वाढ जरून घेता येईल.

लागवडीच्या समस्या :जायफळाच्या लागवडीतील महत्त्वाची समस्या म्हणजे बागेत लावलेल्या रोगापासून सुमारे ५०% नर झाडे होतात. नर झाडापासून फळांचे उत्पादन मिळत नाही महणून ती काढून टाकावी लागतात. नर व मादी रोपे वेगळी ओळखण्याच्या काही खुणा आहेत. उदा. पानांचा आकार व पानावरील शिरा, अंकुराचा रंग, रोप वाढण्याचा जोम आणि पानातील कॅल्शियम ऑक्सलेटच्या स्फटिकांचा आकार, परंतु यापैकी कोणतेही चिन्ह विश्वासार्थ नाही म्हणून या समस्येवर एकच पर्याय आहे तो म्हणजे कलमापासून लागवड करण्याचा. डोळे बांधून किंवा दाब पद्धतीने कलमे तयार करता येतात. नर झाडांचा शेंडा छाटून त्या खुंटावर कलम बांधता येते.

बीजकलमाची पद्धत :

'मसाल्याकरिता राष्ट्रीय संशोधन केंद्रा' ने बीजकलमाची (एपीकॉटिल ग्राफ्टिंग ) यशस्वी पद्धत शोधून काढली आहे. ज्या रोपावर कलम बांधायचे त्या रोपाला (रूट - स्टॉंक) पहिले पान आले असावे आणि खोडाचा व्यास ०.४ सें.मी. किंवा त्यापेक्षा अधिक असावा खोडावर ३ सें.मी. लांबीचा काप देण्यासाठी खोडाची लांबी पुरेशी असावी. भरपूर फळे देणाऱ्या निरोगी झाडाची काडी (Scion) कलम बांधण्यासाठी वापरावी. काडीला २- ३ पाने असावीत. खुंट व काडीचा व्यास समान असावा. काड्या २० मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी याद्रवान्नात १० ते १५ मिनीटे बुडवून घ्याव्यात. रोपाचे खोडावर 'व्ही' (V) आकाराचा काप देतात आणि त्यामध्ये पाचरीच्या आकाराची काडी काळजीपूर्वक बसवावी. हा जोड ३०० गेजच्या पॉलीथिनच्या पट्टीने बांधून काढतात. काडी सुकू नये महणून पिशवी बांधून टाकतात. हे कलम सावतील ठेवावे. प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात ठेवू नये. एक महिन्यानंतर पिशवी उघडावी. काडीवरील डोळे फुटलेली कलमे पॉलिथीनच्या पिशव्यात लावावीत. या पिशवीत माती, वाळू व कुजलेले शेणखत यांचे १:१:१ प्रमाणतील मिश्रण भरलेले असावे. ही पिशवी सावलीत ठेवावी. या प्रमाणे कलमाचे स्थलांतर पिशवीत केल्यानंतर तीन महिन्यांनी कलमाच्या जोडावरील पॉलिथीनची पट्टी सोडून टाकावी. कलम करताना काही न सुकण्याची काळजी घ्यावी. झाडावरून काढलेली काडी लागलीच कलमासाठी वापरावी. रोपावर काप दिल्यानंतर त्या ठिकाणी रस पाझरतो. त्यामुळे जोड चांगला जमत नाही. म्हणून काडी तयार करण्याचे आधी कलम बांधण्यासाठी रोप तयार करावे. त्यामुळे काडी तयार होईपर्यंत रोपातील रस पाझरण्याचे बंद होते. कलम बांधण्याची काडी सरळ वाढलेली असावी. म्हणजे सामान्य आकाराचे झाड वाढते. आडव्या फांद्याची काडी वापरल्यास झुडुपाप्रमाणे पसरणारे झाड तयार होते. झुडुपाप्रमाणे वाढणार्‍या झाडाचे रूपांतर उंच वाढणार्‍या झाडत करावे लागते, पण त्यात नेहमीच यश मिळत नाही.

रोग - कीड

१) फांद्या सुकणे : काही बागातील जायफळाच्या झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली सुकत जातात. बुरशीमुळे या रोगाची बाधा होते.

उपाय : रोगाने सुकलेल्या फांद्या छाटून टाकाव्या आणि कापलेल्या जागेवर बोर्डो पेस्ट लावावी.

२) करपा : जायफळाचे झाडावर दोन प्रकारचा करपा रोग आढळतो. पहिल्या प्रकारात बुरशीचे पांढरे धागे खोडावर वाढतात आणि पानाच्या खालच्या बाजूवर पंख्याप्रमाणे वाढलेले दिसतात. त्यामुळे बाधा झालेला भाग सुकतो. बुरशीमुळे गळालेल्या पानातून या रोगाचा प्रसार होतो.

दुसऱ्या प्रकारात खोड व पानावर बुरशीच्या काळ्या बारीक धाग्यांची जाळी तयार झालेली दिसते. या रोगामुळे झाडाचे फारसे नुकसान होत नाही.

३) फळे सडणे : केरळातील बहुतेक बागांमध्ये जायफळाची कच्ची फळे भेगाळतात, सडतात आणि झाडाखाली गळतात. रोगाची लक्षणे न दिसताच काही झाडांची अपक्क भोगळतात व गळतात. रोगाची बाधा देठावर गडद रंगाचे पुरळ उठून सुरू होते. हे पुरळ फळावर पसरतात. फळाची साल तपकिरी होते आणि सडते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जायपत्रीदेखील सडते आणि त्याचा घाणेरडा वास येतो. बुरशीमुळे हा रोग होतो.

उपाय : फळे अर्ध - पक्क असताना झाडावर ०.१% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

४) पाने सडणे : पाने सडण्याची सुरुवात पानाच्या शेंड्याकडून होते आणि खालच्या भागावर पसरते. पानाच्या किनारीचा रंग बदलतो आणि हा बदल तेथून आत पसरतो. क्वचित पानावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. ह्या ठिपक्यांची जागा ठिसूळ असल्याने तेथिल पानाचा भाग गळून पडतो. आणि पानावर भोके पडलेली दिसतात. बुरशीमुळे हा रोग होतो.

५) खवले कीटक : बहुधा नर्सरीतील रोपांच्या कोवळ्या शेंड्यावर व नवीन पालवीवर खवले कीटक आढळतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी ०.०५% मोनोक्रोटोफॉसची फवारणी करावी.

१) खवले कीटकांच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा २० मिली. मॅलाथिऑंन मिसळून त्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी.

२) पावसाला सुरू होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या फांद्या दरवर्षी छाटाव्यात.

३) रोपवाटिकेतील रोपांचे आणि शेतातील झाडांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड मिसळून त्या द्रावणाची किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

निगा :

पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी बागेत चर खणावेत. जायफळामध्ये पपई व कोकमप्रमाणे नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. बागेमध्ये सुमारे ५०% मादी, ४५% नर आबू ५% द्विलिंगी झाडे निघतात. दर १० ते १२ मादी झाडांना परागीकरणासाठी एक नर झाड पुरते. बाकी अनावश्यक नर झाडे काढून तेथे मादी झाडांची कलमे लावावीत. नारळाच्या बागेत चार झाडांच्या मध्यभागी आणि सुपारीच्या बागेत एकाआड एक चौकोनाच्या मध्यभागी जायफळाची झाडे लावावीत .

जायफळाच्या मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फलधारणेस सुरुवात होते. परंतु कमाल उत्पादन झाडे २० वर्षे वयाची झाल्यानंतर मिळते. मोहोर धरल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी काढणीस तयार होतात. मोहोर व फलधारणा वर्षभर होत असते. परंतु जून ते ऑगस्ट या कालावधीत अधिक फळे मिळतात.

जायफळ पक्क झाल्यानंतर देठाच्या विरुद्ध दिशेने तडकते आणि झाडावरून गळून पडते. अशा रितीने गळून पडलेली फळे दररोज गोळा करावीत.

फवारणी : फळांचा बहार धरल्यानंतर १ ते १।। महिन्याच्या अंतराने सप्तामृत प्रत्येकी ३००, ४००, ५०० ६००, मिली याप्रमाणे अनुक्रमे ४ फवारण्या कराव्यात. म्हणजे फळांचे उत्पादन वाढून रोग - किडींवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच फळांचा दर्जा चांगला मिळाल्याने मालास भाव जादा मिळेल. अधिक माहितीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

काढणी : फळे पक्क होऊन काढणीस तयार झाली की, त्यांची साल भेगाळते. आकडीच्या झोर्‍याने झाडावरील पक्क झालेली फळे काढावीत. गोळा केलेल्या फळांची जाड साल काढून टाकावी. जायफळावरील जायपत्री हाताने वेगळी करावी. त्यानंतर जायफळ व जायपत्री अंगणार पसरून उन्हात वाळवावी. चांगली वाळलेली जायपत्री पिवळस तपकिरी रंगाची दिसते आणि ती ठिसूळ असते. ताज्या फळांच्या सालीचा उपयोग लोणची, जॅम व जेली बनविण्यासाठी होतो.

बियांच्या रोपापासून तयार झालेल्या झाडांना सातव्या आठव्या वर्षी फळधारणेस सुरुवात होते. दरवर्षी उत्पादनात वाढ होते आणि पंधराव्या वर्षापासून अधिक उत्पादन मिळते. अशा पूर्ण वाढलेल्या मादी झाडापासून दर वर्षी सुमारे २०० ते ५०० फळे मिळतात. बाराही महिने फळे मिळतात.