दर्जेदार उत्पादन दुधी भोपळ्याचे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


काकडीवर्गीय पिकात दुधीभोपळ्याची उपलब्धता जास्त असते. या फळाचा उपयोग भाजी, मिठाई आणि लोणचे तयार करण्यासाठी करतात. दुधीभोपळ्याची भाजी पचनास हलकी असते. दुधीभोपळ्याचे बरेच औषधे उपयोग आहेत.

वैशिष्ट्ये : वेलवर्गीय फळभाज्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून शरीराच्या वाढीस, पोषणास व आरोग्य रक्षणासाठी आवश्यक असलेली खनिजद्रव्ये, प्रोटिन्स, फॉस्फरस, कॅल्शिअम, अ, ब, क, इ. जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. या वेलवर्गीय फळभाज्यांचा उपयोग अनेक विकारांवर गुणकारी म्हणून केला जाऊ शकतो. उदा. कारली या वेलवर्गीय फळभाजीचा उपयोग मधुमेहाचा विकार असणाऱ्या व्यक्तींनी आहारामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह आटोक्यात येतो.

भोपळा तिखट व उष्ण असून संधिवात, दाताचे रोग, दातखिळी, धनुर्वायु यांचा नाश करतो. भोपळ्याचा वेल मधुर, शीतल, तर्पणकारक, गुरू, रूचि कर, पौष्टिक, धातुवर्धक बलप्रद, पित्तनाशक आहे.

दुधीभोपळ्याच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामधील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी ९६%, प्रोटीन्स ०.२%, तंतुमय पदार्थ ०.६%, कॅल्शिअम ०.०२%, लोह ०.००१%, उष्मांक (कॅलरी) १२%, कार्बोहायड्रेटस २.५%, फॅटस ०.१%, खनिजे ०.०५%, फॉस्फरस ०.०१%.

बडप्पण : अलीकडे मध्यवर्गीय ते उच्चभ्रू लोकांमध्ये ज्याचे साधारणपणे मासिक उत्पन्न २० हजार रू. किंवा त्याहून अधिक आहे. अशा कुटूंबातील मुलांना लहानपणापासूनच ओबेसीटी (लठ्ठपणा), मंद बुद्धी, धाप लागणे असे विकास जडतात. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पन्न अधिक असल्याने जास्त खर्च करणे आणि ताही आजाराला आमंत्रण देणाऱ्या वस्तु/ पदार्थांवर अंधप्रेमापोटी आई - वडील मुलांना फास्टफूड, प्रमाणापेक्षा अधिक बेकरीचे पदार्थ, गाई - म्हशीचे दूध, खवा, हलवा यासारखे अधिक प्रमाणात स्निग्धांश असणारे पदार्थ देत असतात. मुलांचा जास्तीत जास्त हट्ट पुरविताना त्यांचा समज होतो की, मुलांवर अधिक खर्च करणे हे श्रीमंतीचे लक्षण आहे.

मात्र त्याचे दुष्परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर घडत असतात. याकरीता लहानपणापासूनच फळे, पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या या आहारातून द्याव्यात. यामध्ये दुधी भोपळ्याचा रस किंवा मुगाची डाळ टाकून ती कुकरमध्ये न उकडता (जीवनसत्त्वाचं नाश होऊ नये म्हणून) वाफवून भाजी करावी व तिचा आहारामध्ये समावेश करावा. एरवी लहान मुले भोपळ्याची भाजी आवडत नाही म्हणून जेवण टाळतात. त्यावर त्यांची आई मोठ्या बढाईने सांगते की, "मी की नई मुलाला भोपळ्याचा हलवा करून दिला. " म्हणजे एकीकडे मुलाचा स्थुलपणा कमी करण्यासाठी स्निग्धपदार्थ खाणे टाळण्यास सांगितले जाते, परंतु भोपळ्याची भाजी मुलांनी खावी यासाठी दुधीचा हलवा करून दिला जातो, हि पद्धत चुकीची आहे. हे झाले लहान मुलांच्या बाबतीत.

आता मोठ्या माणसांच्या बाबतीत साधारणपणे वय वर्षे १८ ते ३० या वयोगटातील आय टी कंपनीमध्ये रात्रंदिवस कॉम्युटरवर काम करणाऱ्या स्त्री - पुरूषांना सात्विक भोजन करायला वेळच नसतो. तेव्हा ते वेळी अवेळी हॉटेलमध्ये फास्टफूट खाऊन भूक भागवितात त्यांना जेवणाला व विश्रांतीसाठी ही वेळ नसतो. अशा व्यक्तींना वेगवेगळे आजार जडतात. यामध्ये डोळे जळजळ करणे, डोळे दुखणे, चक्कर येणे, शरीर जड होणे, भूक मंदावणे ओबेसीटीचा विकार जडणे हे आजार वाढू लागतात.

तेव्हा अशा व्यक्तींनी दररोज सकाळी व्यायाम केल्यानंतर दुधी भोपळ्याचा रस एक ग्यासभर घ्यावा, तसेच अधुनमधून आहारामध्ये इतर पालेभाज्याबरोबरच दुधी भोपळ्याचा समावेश करावा.

दुधीचा उपयोग सर्व थरांतील निरनिराळ्या हॉटेल्समध्ये भाजीसाठी व सांबरमध्ये केला जातो. अशा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या व मागणी बऱ्यापैकी व मोठ्या प्रमाणात उत्पादन असणाऱ्या दुधी भोपळ्याची व्यापारी तत्त्वावर लागवड करणे फायदेशीर ठरते.

हवामान आणि जमीन : दुधीभोपळ्यासाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. या पिकाच्या लागवडीसाठी हलकी जमीन निवडल्यास अशा जमिनीत भरपूर खते घालावीत. या पिकला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.

लागवडीचा हंगाम : भोपळ्याला उन्हाळ्यामध्ये व जून, जुलैस चांगला भाव असतो. मुख्यत : जानेवारीमध्ये चांगल्याप्रकारे मागणी असते. ज्या शेतकऱ्यांकडे शेतमजुरांची कमतरता आहे व देखभाल करण्यासारखी परिस्थिती नाही, अशा शेतकऱ्यांनी दुधी भोपळ्याची लागवड जरूर करावी. १ ते २ फूट लांबीचे भोपळे एक्सपोर्ट होतात. दुधीभोपळा हे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते म्हणून याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते. खरीप हंगामात मे - जून महिनामध्ये आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये लागवड करतात.

जाती :

१) पुसा समर प्रॉलिफिक लाँग: दुधीघोपाल्याची ही एक भरपूर उत्पन्न देणारी सुधारित जात आहे. ह्या जातीची फळे फिकट हिरव्या रंगाची असून त्यांची लांबी ६० - ७५ सेंमी इतकी असते व घेर २० -२५ सेंमी इतका असतो. एका वेलीला १० ते १५ फळे येतात. ही खरीप व उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी उपयुक्त जात आहे. सरासरी हेक्टरी उत्पन्न ४५ टन मिळते.

२) पुसा समर प्रॉलिफिक राउंड : दुधीभोपळ्याच्या ह्या जातीची फळे आकाराने गोल असतात. फळाचा घेर १५ ते २० सेंमी असून रंग हिरवा असतो. ही एक अधिक उत्पन्न देणारी जात आहे. खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य. सरासरी हेक्टरी उत्पन्न ५० टन मिळते.

३) सम्राट : दुधीभोपळ्याची ही जात खरीप आणि उन्हाळी हंगामाकरिता अधिक फायदेशीर आहे. ही जात मांडवावर, ताटीवर अथवा जमिनीवर घेण्यास उपयुक्त आहे. जमिनीवरील लागवडीतही फळांचा आकार गोल राहतो. फळे एक ते दीड फूट लांब आणि दंडगोल आकाराची असतात. सम्राट या जातीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन २५ टन मिळते.

४) अर्का बहार : या वाणाची फळे लांब, सरळ असून फळाचे सरासरी वजन १ किलो राहते. फळे चमकदार हिरव्या रंगाची असतात. सरासरी हेक्टरी उत्पन्न ४० - ४५ टन मिळते.

५) पुसा नवीन : खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामात घेण्यास योग्य वाण. फळे सरळ, मुलायम, हिरव्या रंगाची, २० -२५ सेंमी लांब, सरासरी वजन ८५० ग्रॅम, सरासरी हेक्टरी उत्पन्न ४० -५० टन मिळते.

संकरित जाती :

१) संकरित दुधी वरद : हा महिको कं. चा वाण असून फळ फिक्कट हिरव्या रंगाचे, सरळ लांबट आकाराचे चमकदार, नाजूक व मऊ गराचे असते. फळाचे सरासरी वजन ६०० ते ७०० ग्रॅम असून दूर अंतरावरील बाजारपेठेत पाठविण्यासाठी योग्य वाण. ६० ते ६५ दिवसात फळ तोडणीस येते.

२) कावेरी एक - १ : ही नामधारी कं. ची लवकर येणारी, जोमदार वाढ असणारी, भरपूर उत्पादनक्षम जात आहे. या जातीची फळे मान नसलेली, हिरवी असतात. प्रत्येक फळाचे सरासरी वजन ३०० ते ४०० ग्रॅम असते. याची चव व दर्जा उत्कृष्ट प्रतिचा आहे. आतील गार भरगच्च, मांसल, पांढरा, हळू पक्व होणाऱ्या कमी बियायुक्त जात आहे.

दुधीभोपळ्याच्या वरील जातीशिवाय केबीजी १३, पंजाब लाँग, पंजाब राउंड, पंजाब कोमल ह्या सुधारित जातींची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते.

दुधी भोपळ्याचे पुसा मेघदूत आणि पुसा मंजिरी हे संकरित वान आहेत, तसेच काही खाजगी कंपन्यांनी विकसित केलेलेही काही संकरित वाण उपलब्ध आहेत.

बियाण्याचे प्रमाण : दुधीभोपळा दर हेक्टरी संकरित जातीचे १ किलो तर सुधारीत जातीचे दीड किलो बियाणे लागते. बियाण्याची लागवड करण्यापूर्वी बियाणे २४ तास जर्मिनेटर २५ मिली + १ लि. पाणी या द्रावणात भिजवून ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे. म्हणजे बियाण्याची उगवण चांगली होते.

लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धती :

दुधीभोपळा या पिकाची लागवड रुंद सारी - वरंबा पद्धतीने केली जाते. दुधीभोपळा या पिकाची लागवड ओळीत २ ते २.५ मीटर अंतर व दोन वेलीत १ते १.५ मीटर अंतर ठेवून १ ते २ बिया टोकून करतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन : भोपळ्यास शक्यतो रासायनिक खतांचा वापर करू नये. बी लागवडीच्या जागी चांगले कुजलेले शेणखत एक घमेले आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ग्रॅम देवून लागवड करावी. लागवडीनंतर दीड महिन्यांनी कल्पतरू सेंद्रिय खत वेलाच्या खोडाभोवती गोलाकार प्रत्येकी ५० ग्रॅम द्यावे.

दुधीभोपळ्याची लागवड केल्यानंतर उगवण होईपर्यंत दोन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळयामध्ये ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. वेलींना फुले आल्यापासून ते फळधारणा होताना नियमित पाणी द्यावे. फळे पोसण्यासाठी भरपूर पाणी लागते.

भोपळ्यास थंडीमध्ये सकाळी १० ते दुपारी २ ह्या वेळेस पाणी द्यावे. तसेच उन्हाळ्यामध्ये सकाळी ९ ते १० च्या आत पाणी द्यावे. (विदर्भ, मराठवाडा, खानदेश ह्या भागामध्ये सकाळी ९ च्या आत पाणी द्यावे.) थंडीमध्ये आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देताना 'भीज पाणी' (संपूर्ण पाणी देणे) न देता 'टेक पाणी' (हलके पाणी देणे) द्यावे. म्हणजेच वेलीच्या खोडास पाणी लागणार नाही, याची काळजी घ्यावी.

वळण, आधार देणे आणि आंतरमशागत : शेत तणविरहित ठेवावे. त्यासाठी गरजेनुसार दोन ते तीन खुरपण्या कराव्यात. या पिकाच्या वेलींना वळण देणे आवश्यक असते. वेलीवर लागलेली फुले आणि फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. दुधीभोपळा ह्या पिकास उन्हाळ्यात मांडवाची आवश्यकता असतेच असे नाही, मात्र दुधीभोपळा या पिकास पावसाळी हंगामात मांडव आवश्यक असतो. यामुळे उत्पादन जास्त येऊन फळाची प्रत चांगली राहते. मांडव करणे शक्य नसल्यास या पिकाच्या वेली तुराट्या, काट्या अथवा इतर फांद्यांवर चढवाव्यात.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : दुधीभोपळा पिकावर प्रामुख्याने लाल भुंगे, मावा आणि फळमाशीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो.

१) लाल भुंगे : लाल भुंगे पीक लहान असताना पाने कुरतडून खातात, म्हणून बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते.

या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० मिलीलिटर मॅलेथिऑन या प्रमाणात मिसळून फवारावे. याशिवाय कार्बारिल किंवा रोगोर या किटकनाशकाची फवारणी करून किडीचे नियंत्रण करता येते. ह्या किडीची सूर्य उगवण्यापूर्वी हालचाल कमी असते. अशा वेळी कीड वेचून मारावी.

२) फळमाशी : फळमाशी ही एक महत्तवाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते, या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० मिलीलिटर मॅलेथिऑन मिसळून फवारणी करावी. पीक ३० ते ४० दिवसांचे झाल्यानंतर फुले येण्यापूर्वी १ - २ फवारण्या केल्या तर या किडीचे नियंत्रण होते. शेतातील किडकी फळे नष्ट करावीत. फळमाशांच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचाही उपयोग करता येतो. या सापळ्यात मिथाईल युजेनोल (फेरामोन) वापरले जाते.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : या पिकावर भुरी, करपा, केवडा हे बुरशीजन्य रोग आणि मोझॉंईक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

१) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, फळे वाढत नाहीत. उत्पादन घटते. भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी होर्मोनी १५० मिली १०० लि. पाण्यातून फवारावे. काकडीवर्गीय फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगाच्या नियत्रणासाठी गंधकाची धुरळणी करू नये.

२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोड रोगाला बळी पडतात.

केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात १५० मिली हरोमोनी मिसळून फवारणी करावी.

३) करपा : करपा रोगामुळे पानांवर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास हा रोग बळावतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन या बुरशीनाशकाची बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव फारच मोठ्या प्रमाणात झाला असल्यास अशा जमिनीत पुढील तीन वर्ष काकडी वर्गातील पीक घेऊ नये.

भोपळ्यावरील किडी व रोग टाळण्यासाठी सप्तामृत औषधे (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम व न्युट्राटोन ), हार्मोनी सुरूवातीपासून पुढीलप्रमाणे वापरल्यास पीक निरोगी राहून फळे भरपूर व दर्जेदार प्रतिची तयार होतात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २२५ ते २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

३)चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ३०० ते ४०० मिली. + २०० ते २५० लि.पाणी.

वरील फवारणी (क्रं. ४) माल चालू असेपर्यंत दर १५ ते २० दिवसांनी घ्यावी.

काढणी आणि उत्पादन : २ महिन्यांनी भोपळे काढणीस येतात. आठवड्यातून किंवा दोनदा काढणी करावी. दुधीभोपळा या पिकाची कोवळी फळे जून होण्यापूर्वी तोडावीत. कोवळ्या फळांना बाजारात अधिक किंमत मिळते. काढणीस तयार झालेल्या फळांचे देठ धारदार चाकूने कापावेत. खराब, वेडीवाकडी आणि रोगट फळे वेलीवरून काढून फेकून द्यावीत. कोणत्याही परिस्थितीत वेलीवर रोगट आणि किडकी फळे वाढू देऊ नयेत. अशाप्रकारे सर्व तर्‍हेची काळजी घेऊन आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व सर्वसामान्यांना परवडणार्‍या व सर्व थरांतील लोकांमध्ये चांगली मागणी असणार्‍या दुधी भोपळ्याची मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करून व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास उत्पादन अधिक तर मिळतेच, तसेच भावही चांगला मिळून पीक फायदेशीर ठरते. ह्या पिकापासून हेक्टरी १२ ते १५ टन उत्पादन मिळते. दुधीभोपळ्याच्या वेली मांडवावर वाढविल्यास हेक्टरी दुप्पट म्हणजेच २५ टन उत्पादन मिळू शकते.