'सिद्धीविनायक' शेवग्यातील आंतरपीक हळद, आंतर - आंतरपीक कारले दोन्हीही पिके यशस्वी

श्री. दत्त हरीकिशन कांबळे,
मु. पो. चिंचोली माळी, ता. केज, जि. बीड,
मोबा. ९६६५६७५१४६आम्ही १ ॥ एकरमध्ये ८ x ८ फुटावर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड जून २०१२ मध्ये केली आहे. जमीन काळी आहे. पाणी ठिबकने देतो. आम्हाला पाणी भरपूर आहे.

शेवग्याला दर महिन्याला याप्रमाणे सप्तामृताच्या ५ फवारण्या केल्या आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या ४ बॅगा दिल्या आहेत. मधे २ - ३ वेळा शेंडा छाटणी केली. एवढ्यावर फेब्रुवारी २०१३ ला शेंगाचे तोडे चालू झाले. सध्या १०० - १५० किलो शेंगा निघत आहेत. झाडांवर लहान शेंगा व फुलकळी चालूच आहे. हा शेवगा लातूर मार्केटला विकत आहे. सध्या २० रू./ किलो भाव मिळत आहे. लातूर मार्केटमध्ये मागील आठवड्यात आम्हाला असा अनुभव आला की, आम्ही सोमवारी आमच्या शेंगा घेऊन मार्केटला गेलो होतो. तेथे ३ दिवस अगोदर शनिवारी आलेल्या ओडीस शेवग्याच्या शेंगा लाल व काळसर असल्यामुळे त्यातील बराचसा माल ३ दिवस झाले तरी शिल्लक होता. आमचा मात्र हिरवा व ताजा माल असल्याने १ तासात संपूर्ण शेवग्याच्या शेंगा २२ रू. किलोने विकल्या गेल्या. बाजारातील शेवग्याला त्यावेळी १७ रू./ किलो भाव चालू होता. साधारणपणे आमच्याकडे १ हजार झाडे आहेत. सरासरी कमीत - कमी ७ किलो जरी शेंगा मिळाल्या, तरी एका झाडापासून किमान १५० रू. प्रमाणे १॥ लाख रू. या १॥ एकर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्यापासून सहज होतील.

'सिद्धीविनायक' शेवग्यात हळदीचे आंतरपीक

या शेवग्यामध्ये ८ फुटाचे अंतर असल्याने २ झाडामध्ये ४ x ४ फुटाचे एक बेड करून शेवगा लागवडीच्यावेळीच त्या बेडवर सेलम हळदीची लागवड केली. हळददेखील चांगली आली. सध्या पाला पुर्ण बसला (वाळला) आहे व शेवग्याला शेंगा भरपूर लागल्या आहेत. (संदर्भ - कव्हरवरील फोटो) सध्या शेवगा शेंगा चालू असल्याने हळद काढता ये नाही. तेव्हा शेंगा अजून २ महिने चालतील. त्यानंतर हळद काढणार आहे. तरी साधारणपणे २ लाख रुपयाची हळद सहज होईल.

नाविन्यपुर्ण आंतर -आंतरपीक कारले

हळदीचा पाला काढल्यामुळे त्या बेडवर कारल्याची लागवड (२ शेवग्याच्या झाडामध्ये) केली आहे. २ शेवग्यांना आडवी ३ ते ४ फूट उंचीवर दोरी बांधली आहे. आता ते वेल त्या दोरीवर सोडणार आहे. अशा पद्धतीने कारल्याला वेगळा मांडव न करता कारल्याचे कमी खर्चात उत्पादन घेणार आहे. सध्या कारल्याला फुलकळी लागण्यास सुरुवात झाली आहे.