ऑईलपाम उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

ऑईलपान हे तेलाचे उत्पन्न देणारे एक प्रमुख लागवड पीक आहे. ऑईलपामचे उगमस्थान पश्चिम आफ्रिकेचा किनारा असून या पिकाची लागवड दक्षिण, पूर्व आशिया, दक्षिण व मध्य अमेरिकेत आढळते. भारतात जवळजवळ ८ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड आढळते. भारतातील खाद्यतेलाची गरज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ऑईलपामपासून मोठ्या प्रमाणात तेलाची गरज भागू शकते. एक हेक्टर क्षेत्रापासून जवळजवळ ३ - ४ मेट्रिक टन तेल मिळते. खाद्यतेलाबरोबर या तेलाचा उपयोग साबण, मेणबत्त्या बेकरी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात करता येतो. तसेच या फळांच्या लगद्याचा उपयोग जनावरांचे खाद्य म्हणून करता येतो. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गोवा, तामिळनाडू, या राज्यांत ऑईलपामची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

ऑईलपामचे उगमस्थान पश्चिम आफ्रिका आहे. तसेच आफ्रिका, दक्षिण - पूर्व आशिया आणि अमेरिकेत ऑईलपामची लागवड जंगली स्वरूपात आढळते. १४ व्या शतकात ऑईलपामची लागवड पश्चिम आफ्रिकेत करण्यात आलेली आढळते आणि १९ व्या शतकाअखेर ऑईलपामची लागवड फक्त याच प्रदेशात झालेली आढळते. भारतात १९०८ मध्ये प्रथमच बंगलोरच्या लालबागेमध्ये एक ऑईलपामचे झाड ब्रिटीशांनी लावले. त्यानंतर १९६१ नंतर भारतात केरळ राज्यात व्यापारी दृष्टीने ऑईलपामची लागवड प्रथम करण्यात आली. त्यासाठी ४,००० ऑईलपामच्या रोपांची नायजेरियातून आयात करण्यात आली.

ऑईलपाम हे एक प्रमुख खाद्यतेल देणारे लागवड पीक असून या पिकापासून हेक्टरी ३ - ४ टन तेल मिळते. सध्या आपल्या देशाला खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे तेलाची गरज भागविण्यासाठी ऑईलपामच्या लागवडीस मोठा वाव आहे.

खाद्यतेलाबरोबर ऑईलपामचा वापर साबण, मेणबत्ती आणि बेकरी उद्योगामध्ये तसेच पेंडीचा उपयोग जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो.

क्षेत्र आणि उत्पादन : जगात ऑईलपामचे एकूण उत्पादन जवळजवळ ८०० - १००० लाख. टन असून त्यापैकी निम्मे उत्पादन हे दक्षिण - पूर्व आशियातून मिळते. भारतात पामतेलाकडे शेंगदाणा तेलाला पर्याय म्हणून बघितले जाते. दर वर्षी जवळजवळ ८ - १० लाख टन पाम ऑईल आपला देश आयात करतो. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, गोवा, तामिळनाडू या राज्यांत आणि अंदमान - निकोबारमध्ये ऑईलपामची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असून यापुढे या राज्यांमध्ये ऑईलपामच्या लागवडीला मोठा वाव आहे.

ऑईलपाम लागवड करणारी राज्य व क्षेत्र

राज्य   क्षेत्र (लाख हे.)  
आंध्रप्रदेश   ४.००  
आसाम   ०.१०  
गुजरात   ०.६१  
गोवा   ०.१०  
कर्नाटक   २.५०  
केरळ   ०.०५  
महाराष्ट्र   ०.१०  
ओरिसा   ०.१०  
तामिळनाडू   ०.२५  
त्रिपूरा   ०.०५  
पश्चिम बंगाल   ०.१०  
एकूण   ७.९६  


हवामान आणि जमीन : ऑईलपामच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी जमिनीची निवड महत्त्वाची आहे. पामच्या लागवडीसाठी अधिक खोलीची, पाण्याचा योग्य निचरा होणारी व अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ एवढा असावा.

ऑईलपामच्या योग्य वाढीसाठी उष्ण - दमट हवामान मानवते. तपमाना २० डी. - २७ डी.से. खाली गेल्यास ऑईलपामाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो. ३३ डी.सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढल्यास झाडाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होतो. तसेच फळांचे घड गळून पडतात. ऑईलपामच्या योग्य वाढीसाठी पर्जन्यमान २,००० -३,००० मिमी असावे.

जाती : ऑईलपामच्या विशिष्ट अशा जाती नसून फळांच्या रचनेवरून व बियांच्या कवचाच्या जाडीनुसार वेगवेगळे तीन वर्ग करण्यात आले आहेत.

१) ड्यूरा : बियांचे कवच जाड असून गर कमी ते मध्यम असतो.

२) टेनेरा : बियांचे कवच मध्यम जाड असून गर मध्यम ते जास्त असते.

३) पिसिफेरा (कवच नसते) : नवीन जातीची निर्मिती करताना पातळ कवचाच्या टेनेरा ऑईलपामचा ड्यूरा आणि पिसिफेरा या दोन जातींशी संकर केला जातो

नवीन जाती ह्या बुटक्या, तेलाचे प्रमाण व दर्जा उत्कृष्ट असलेल्या, रोग व किडींना प्रतिकारक असाव्यात. ऊति - संवर्धनाने ऑईलपामची अभिवृद्धी करता येते. या पद्धतीने तयार झालेल्या जातीच्या एका झाडापासून प्रतिवर्षी सुमारे २५० किलो वजनाचा घड मिळतो.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : ऑईलपामची अभिवृद्धी संकरित टेनेरा बियांपासून करतात. यासाठी योग्य ऑईलपामच्या झाडाची निवड करून त्यावर निवडलेल्या नरांचे पुंकेसर आणून परागीभवन केले जाते. अशा झाडापासून साधारणत : ६ - ९ महिन्यांत फळे तयार होतात. पूर्णपणे परिपक्व झालेल्या फळांची बियांसाठी काढणी करावी. बियांवरील साल काढण्यासाठी बियाणे १० दिवस पाण्यात भिजवून ठेवतात. अशा बियांची साल काढण्याच्या यंत्राने साल काढून टाकावी व बियाणे १ ते २ दिवस सावलीत वाळवावे. बियांमधून पाण्याचे प्रमाण १४% पेक्षा कमी करावे, अन्यथा साठवणुकीत बियांना कोंब फुटू शकतात. अशा पद्धतीने योग्य तापमानाला व पॉलिथीन पिशवीत किंवा बंद डब्यामध्ये बियाणे साठविल्यास बियाणे १ वर्ष उगवणक्षम राहू शकते.

बियांच्या योग्य उगवणीसाठी उष्ण तापमानाची प्रक्रिया आवश्यक असते. बियांच्या योग्य उगवणीसाठी ४० ते ४८ डी. से. तापमान व १८% आर्द्रतेला ४० दिवसांपर्यंत पॉलिथीन पिशवीत ठेवतात. यानंतर बिया ४८ तास पाण्यात ठेवाव्यात. अशाप्रकारे यापुढे बियांना अंकुर फुटण्यास सुरुवात होते व पुढे ३० - ४० दिवस चालते. अंकुर फुटलेल्या बिया निवडून रोपवाटिकेत खत - मातीने भरलेल्या पॉलिथीन पिशव्यांमध्ये लागवड करावी. या पिशव्यांना दररोज नियमित पाणी द्यावे. या रोपांच्या योग्य वाढीसाठी ठराविक अंतराने खतांच्या योग्य मात्रा द्याव्यात व तणांचे नियंत्रण ठेवावे. अशाप्रकारे १२ -१४ महिन्यांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. ऑईलपामची लागवड चौकोनी पद्धतीने करावी. यामध्ये दोन झाडांतील अंतर सारखे ठेवावे. ऑईलपामची लागवड त्रिकोणी पद्धतीनेसुद्धा करता येते.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : ऑईलपामच्या लागवडीसाठी ९ x ९ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. या अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी १०० झाडे बसतात. खड्ड्यात वरची सुपीक माती, कुजलेले शेणखत व १२५ ग्रॅम सुपर फॉस्फेट चांगले एकत्र करून भरावे. लागवडीसाठी चांगल्या वाढलेल्या व निरोगी रोपांची निवड करावी व खड्ड्याच्या मध्यभागी रोपाची लागवड करावी किंवा ऑईलपामची लागवड झाडाची वाढ व योग्य उत्पादनासाठी त्रिकोणी पद्धतीने दोन झाडांमध्ये ९ मीटर व दोन ओळींतील अंतर ७.७९ मीटर ठेवावे. ऑईलपामची लागवड वर्षभर करता येते. परंतु कमी पावसाच्या प्रदेशात वातावरणात कमी तापमान, अधिक आर्द्रता व जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त असताना लागवड करावी. अशाप्रकारे ऑईलपामची लागवड पावसाळ्यात १ - २ चांगले पाऊस झाल्यानंतर करणे योग्य ठरते.

खते आणि पाणी व्यवस्थापन : ऑईलपामच्या झाडांना वर्षातून २ वेळा खताचे हप्ते द्यावे लागतात. पहिला हप्ता पावसाळ्यापुर्वी जून महिन्यात व नंतरचा हप्ता पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झाडाभोवती किमान २ मीटर अंतरावर रिंग पद्धतीने खते द्यावीत.

खताच्या मात्रा परीक्षण अहवालानुसार ठरवाव्यात खते दिल्यानंतर झाडाला हलके पाणी द्यावे.

ऑईलपामच्या झाडाला द्यावयाच्या खताच्या मात्रा

शेणखत किंवा कंपोस्ट   प्रति झाड  
लागवडीपूर्वी   ५० किलो  
लागवडीनंतर   ५० किलो  
रासायनिक खते    
लागवडी पूर्वी   N -  
  P १२५ ग्रॅम  
  K -  
७ वर्षांपर्यंत (दरवर्षी)   N २२५ ग्रॅम  
  P २२५ ग्रॅम  
  K २२५  
  Mg १७५ ग्रॅम  
शेणखत किंवा कंपोस्ट   प्रति झाड  
७ वर्षानंतर (दरवर्षी)   N ४५० ग्रॅम  
  P ४५० ग्रॅम  
  K ९०० ग्रॅम  
  Mg ३५० ग्रॅम  


वरील घटकांसाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर प्रती झाड दरवर्षी १ किलो आणि ७ वर्षानंतर २ किलो या मात्रेत दिले असता ऑईलपामची अन्नघटकाची गरज भागून रासायनिक खतामुळे होणारा दुष्परिणाम टाळता येईल. तसेच कल्पतरूमुळे जमिनीच्या सुपिकतेत वाढ होईल. जमिनीचा पोत सुधारून जमिनीच्या जैविक व भौतिक गुणधर्मात वाढ होईल. त्यामुळे हवा व पाणी यांचे प्रमाण संतुलित राहून पाणीधारण क्षमता वाढेल. एकंदरीत उत्पादन व तेलाच्या दर्जात वाढ होईल.

ऑईलपामच्या अधिक उत्पादनासाठी कोरड्या हंगामात पाणी देणे गरजेचे असते. पाणी देण्याच्या पद्धती या त्या क्षेत्रातील हवामान व जमिनीचा प्रकार व मगदुरावर अवलंबून असतात.

साधारण उतार किंवा सपाट जमिनीत पाणी पुरेसे उपलब्ध असल्यास वाफे पद्धतीने पाणी द्यावे. उताराच्या जमिनी व पाण्याची कमतरता असल्यास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

ऑईलपामच्या झाडाच्या वयानुसार पाण्याची गरज वाढते तसेच जमिनीचा मगदूर पाणी धरून ठेवण्याची क्षमता यांवर पाण्याची आवश्यकता ठरते. साधारणत: ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .

आंतरपिकांची लागवड : ऑईलपामच्या झाडांमध्ये सुरूवातीची वर्षे आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. आंतरपिकाची लागवड त्या भागात घेतल्या जाणाऱ्या पिकानुसार बदलत जाते. साधारणत: तूर, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा, भुईमूग यासारखी द्विदलवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर ठरते. या पिकांच्या मुळांवरील गाठी वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण करतात, त्यामुळे नत्र काही प्रमाणात पिकास उपलब्ध होतो. तसेच या पिकांची पानगळ झाल्यामुळे जमिनीचा मगदूर सुधारतो व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याशिवाय ऑईलपाममध्ये मिरची, पालेभाज्या, वैरण पिके, निशिगंध अननस, पपई, केळी यासारखी पिके सुरुवातीच्या तीन वर्षापर्यंत घेता येतात. या पिकांची आंतरपिके म्हणून निवड करताना अन्नद्रव्याची अतिरिक्त मात्रा व पाण्याची पाळी यांचे व्यवस्थापन वेगळे असावे.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) पिठ्या ढेकूण व मावा : नवीन रोपांमधील रस या किडी शोषून घेतात. त्यामुळे पानांना इज होते व बुरशीची वाढ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी रोगार १५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १२ मिली किंवा स्प्लेंडर १५ मिली १० लि. पाण्यात एकत्र करून फवारावे.

२) पाने खाणारी अळी किंवा नागअळी : ही अळी पानाचा आतील गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारिल ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. किडग्रस्त पाने गोळा करून जाळून टाकावीत.

३) गेंड्या भुंग्या : हा भुंगा ऑईलपामच्या झाडाच्या शेंड्यामधून येणारा नवीन कोंब खातो, त्यामुळे झाडाची वाढ थांबते. गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावर नवीन येणारी पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात. किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाड सुकते आणि मरते. या किडीच्या नियंत्रणासाठी उपद्रव झालेल्या भागातून लोखंडी सळई किंवा हुकच्या सहाय्याने भुंगा काढून ठार मारावा किंवा १० ग्रॅम दाणेदार फोरेट झाडांच्या शेंड्यात दोन पानांच्यामध्ये तीन महिन्यांतून एकदा टाकवे.

४) उंदीर : उंदीर हे ऑईलपामच्या फळांना उपद्रव करतात. कोवळी वाढणारी फळे उंदीर पोखरतात. त्यामुळे अशा फळांची गळ होते. उंदरांच्या नियंत्रणासाठी झाडांच्या बुंध्यावर जमिनीपासून ६ फूट उंचीवर १ फूट रुंदीच्या गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात. त्यामुळे उंदीर झाडावर चढताना घसरून पडतो किंवा उंदराच्या बंदोबस्तासाठी रोबॅन किंवा रॅक्यूमिन या उंदराच्या सापळ्यांचा वापर करावा.

* महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) शेंडा करपा : नवीन पानावर व वाढीवर हा रोग दिसून येतो. पानावर तपकिरी रंग येतो व पुढे पूर्ण पानभर पसरतो. हा रोग नवीन झाडावर जास्त येतो. या रोगामुळे मुख्य शेंडा वाकतो व पाने वाळतात. या रोगाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पालाश आणि मॅग्नेशियम ची कमतरता किंवा त्या जातीचा मूळ गुणधर्म असू शकतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोगास प्रतिकारक अशा जातींची लागवड करावी.

२) पर्णगुच्छ : नवीन न उघडलेल्या पानांच्या खालच्या बाजूला तपकिरी रंग येतो. पुढे हा रोग पानांच्या खालच्या बाजूता पसरत जातो. तसेच निवन पाने लहान व गुच्छासारखी येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पानांवर १% बोर्डो मिश्रणाची शेंड्यावर फवारणी करावी.

याशिवाय ऑईलपामच्या झाडावर फळकूज, खोडकूज, पानांवरील करपा इ. रोग आढळतात.

* काढणी, उत्पादन आणि विक्रीव्यवस्था :

ऑईलपामच्या फळांचे उत्पादन लागवडीनंतर ३ - ४ वर्षानंतर सुरू होते. परंतु फळे आकाराने लहान असतात, त्यामुळे उत्पादन कमी मिळते. त्यामुळे सुरुवातीला आलेला बहार काढून टाकणे योग्य ठरते. त्यानंतर पुढील उत्पादन घेण्यास सुरुवात करावी. ऑईलपामच्या झाडावर नर व मादी फुलांचे घोस येतात. त्यांपैकी नरफुलांचे घोस काढून टाकावेत.

ऑईलपामची फळे फळधारणेनंतर ५ - ६ महिन्यांत काढणीस तयार होतात. फळांची योग्य परिपक्वतेला काढणी करावी. अपरिपक्व फळांमध्ये तेलाचे प्रमाण कमी मिळते. साधारणत: ५० ग्रॅम वजनाच्या घडात एक फळ घडातून वेगळे होईल अशा वेळी घडाची काढणी करावी. घडाच्या काढणीसाठी तीक्ष्ण चाकू किंवा कोयता बांबूला बांधावा. सुरूवातीला घडाला लागून असलेली पाने काढून नंतर देठासहित घड तोडावा. अशाप्रकारे एका दिवसात एक मनुष्य साधारणपणे १०० - १५० घड काढतो. एक हेक्टर क्षेत्रापासून ऑईलपामच्या २५ - ३० टन घडांचे उत्पन्न मिळू शकते. घडांची काढणी केल्यानंतर २४ तासांच्या आत प्रक्रिया करावी अन्यथा तेलामध्ये मुक्त घन आम्लाचे प्रमाण वाढून तेलाची प्रत कमी होते. त्यसाठी काढणी केल्यानंतर घडांना ३० -४० मिनीटे उकळत्या पाण्यात ठेवून निर्जंतुकीकरण केले जाते. फळे हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मऊ होतात तसेच फळातील अनावश्यक घटक निघून जातात. त्यानंतर फळे दाबून उकळत्या पाण्यात टाकतात. फळाचा गर तळाला बसून तेल पाण्यावर तरंगते. अशाप्रकारे तरंगणारे तेल वरच्यावर काढून घेतले जाते.

या तेलाचे वर्गीकरण किंवा शुद्धीकरण करून त्याचा उपयोग खाण्यासाठी, साबण, औषधे, मलम, सौंदर्यप्रसाधने इत्यादींसाठी वापर केला जातो.

अशाप्रकारे ऑईलपामच्या फळांपासून महत्त्वाची दोन उत्पादने मिळतात.

१) पामतेल : पामतेल हे प्रामुख्याने ऑईलपाम फळाच्या आतील गरापासून मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण जवळ - जवळ ४५ - ५५% असते . पामतेल हे घट्ट असून २५ -५० डी. से. तापमानाला वितळते. या तेलाचा रंग पिवळा ते नारिंगी लाल असतो. ऑईलपामचे शुद्धीकरण व ब्लोंचिंग करून त्यातील हानीकारक घटक काढून त्याचा खाण्यासाठी वापर करतात. ऑईलपामचा वापर मोठ्या प्रमाणात साबण किंवा सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी करतात. ऑईलपाममध्ये व्हिटॅमीन बी - कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते.

२) पामच्या बियांचे तेल : ऑईलपामच्या फळाच्या बियांत जवळजवळ ५०% तेल असते. हे तेल नारळाच्या तेलासारखे असते. याला जवळजवळ रंग नसतो व तापमान कमी झाल्यास तेल गोठते. ये तेलाचा वापर चॉकलेट आणि बेकारीमध्ये करतात. तसेच आईस्क्रीम, साबण, साबण पावडर बनविण्यासाठी या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. तेल काढल्यानंतर मिळणाऱ्या पेंडीच्या जनावरांचे खाद्य म्हणून उपयोग करतात.

Related New Articles
more...