'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही

श्री. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर लोहार,
चोबे पिंपरी, पो. ढवळस, ता. माढा, जि. सोलापूर.
मोबा. ९४०३४४५२४०


सध्या २ रू. किलो गहू व ३ रू. किलो तांदूळ या सरकारच्या योजनेमुळे शेतीस मजुर मिळेनासे झालेत. आमच्या ज्वारीची काढणी करण्यास जोडीला ७०० रू. मजुरी द्यावी लागत आहे. त्यात १०० पेंढ्यादेखील काढत नाहीत. कांदा लागवडीला बाईला २०० रू. हजेरी आहे. बाया ११.०० वा. येतात व ५.०० जातात. मध्येच लाईट गेली तरी पुर्ण द्यावीच लागते.

उजणीधरण ७० - ८०% भरले की, माढा तालुक्यातील पिंप्री, ढवळस, जाकले, भागेवाडी, गवळेवाडी, महादेववाडी, कवे, रोपळे, बिटरगाव, मुंगशी, म्हैसगाव, रिधोरे, पापनस, आणि शिना - माढा बोगदा उचलपाण्यावरची गावे यामध्ये प्रचंड ऊस पट्टा होतोत. उसाशिवाय दुसरे पीकच दिसत नाही. त्यामुळे ऊस वेळेवर जात नाही. या भागात ४ - ५ साखर कारखाने असूनदेखील ऊस वेळेवर जात नाही. १८ महिन्यानंतरच तोड बसते. कारखान्यांनी सध्या १५०० चा सुरूवातीचा भाव काढला आहे, त्यामुळे कसे परवडायचे ? पाणी भरपूर आहे, मात्र सरासरी उतारा ३५ ते ४० टनाचा आहे. क्वचित सुधारित शेतकऱ्याला ६० - ६५ टनाप्रर्यंत उतारा मिळत आहे.

दुघ्धव्यवसाय करावा तर दुधाचेही भाव ढासळलेत. १७ रू. प्रमाणे डेअरीवाले दूध घेतात आणि पशुखाद्याचे दर हे वाढतच आहेत. आज गोळी पेंडीचे ५० किलोचे पोते ११०० रू. ला झाले आहे. पहिले ते ७०० रू. ला मिळत असे. यामुळे दुग्धव्यवसायही परवडेनासा झाला आहे. माझ्याकडे १० एकर शेती आहे. ३ बोअर आहेत. प्रत्येक बोअरला २ इंच पाणी आहे ते विहीरीत सोडून नंतर शेतीस वापरतो. मजुर व भारनियमन या मुख्य दोन्ही समस्यांमुळे शेती परवडेनाशी झाली आहे. २ मुले उच्चशिक्षित आहेत. ती नोकरीला आहेत. सुनादेखील उच्चशिक्षीत असल्याने त्यांना शेती करण्याची आवड नाही. मी, माझी पत्नी व वडील तिघेच शेती करीत आहे. तिघांना एवढी १० एकर शेती पेलत नाही. मजुर काय मिळत नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर माझी पुर्ण श्रद्धा आहे. सरांच्या मार्गदर्शनामुळे मागे खरबुज ३ एकर लावले होते तर खर्च वजा जाता २ लाख रू. ३ महिन्यात झाले होते. नंतर पावसाळी मिरची १ एकर लावली होती. तर हिरव्या मिरचीचे (कुर्डुवाडी मार्केटला) ६० - ६५ रू. किलो दराने ६० - ७० हजार रू. झाले होते. टोमॅटो ३० गुंठे जुनची लागण होती, त्यापासून १ लाख ३० हजार रू. झाले होते. मात्र सध्या मजुरांच्या समस्येने वेळेवर कुठलीच कामे होत नसल्याने शेती परवडेनाशी झाली आहे.

यावर सरच काहीतरी मार्ग सुचवतील या आशेने सरांकडे आज (२७ फेब्रुवारी २०१५) आलो आहे. सरांनी सांगितले, "जमीन हलकी असल्याने तुम्ही ठिबक करून ' सिद्धीविनायक' शेवगा व डाळींब लावा, तसेच जर्शी गाई परवडत नाहीत. त्या कमी करून सेंद्रिय शेती करण्यासाठी देशी गाईंचे संगोपन करा. " मी 'कृषी विज्ञान' मध्ये मागे वाचले आहे की, देशी गाई पालन कृषी क्षेत्रात क्रांती करतील. यांच्या गोमुत्राने व शेणखताने कमी खर्चात नैसर्गिक सेंद्रिय शेती बहरून दर्जेदार सेंद्रिय शेतीमाल उत्पादन होत आहे. त्यामुळे आता हळू हळू देशी गाई वाढवून सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा व भगवा डाळींब शेतीचे नियोजन करणार आहे.

सरांचे तंत्रज्ञानाबद्दल एवढी खात्री आहे की, हे एकमेव तंत्रज्ञान असे आहे की, त्याने शेतकरी समृद्ध होवून समाधानी राहील. त्यामुळे हे तंत्रज्ञाना व 'कृषी विज्ञान' मासिक मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. कृषी विज्ञानची मागील वर्गणी संपत आल्याने आज पुन्हा वार्षिक वर्गणी भरत आहे. यावेळी सरांनी मला 'कृषीविज्ञान' मार्च २०१५ चे मासिक भेट दिले.