'सिद्धीविनायक' शेवग्याच्या ५६० झाडांपासून पहिला बहार ५ लाख ३२ हजार, तिसऱ्या बहाराच्या २०% मालाचे २ लाख ८० हजार म्हणून ऊस एकरी १०० टन, खोडवा ८० टन व पपईस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. बाळकृष्ण रघुनाथ पिसाळ,
मु.पो. बावधन, ता. वाई, जि. सातारा,
मोबा. ९२२६१४१३९५माझ्याकडे बावधन येथे २।। एकर काळी कसदार जमीन आहे. एप्रिल २०१२ मध्ये पुणे मार्केटयार्ड येथे आलो होतो. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ऑफिसला भेट दिली असता नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. तेथे 'सिद्धीविनायक' शेवग्याबद्दल सखोल माहिती मिळाल्यावर शेवगा हे पीक लावायचे ठरविले. कारण कमी कष्टात, कमी खर्चात, खात्रीशीर उत्पादन व हमी भाव देणारे आजच्या परिस्थितीत शेवग्याशिवाय दुसरे पीक निदर्शनास आले नाही.

आम्ही लगेच शेवगा लागवडीचे नियोजन करून १ एकर क्षेत्रासाठी १० पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवगा बी नेले. त्याची रोपे तयार करण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे वडाच्या झाडाखालची माती, थोडी शेतातील काळी माती, वाळू, गांडूळ खत आणि कल्पतरू सेंद्रिय खत असे एकत्र मिसळून ४'' x ६'' च्या पिशव्यांना दोन्ही बाजुला खाली आणि वर २ - २ छिद्र पाडून पिशव्या मातीने भरून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये जर्मिनेटर ची प्रक्रिया केलेले बी लावले.

'सिद्धीविनायक' शेवग्यास चव व भावही अधिक

रोपे तयार झाल्यानंतर १ एकर क्षेत्रामध्ये ९' x ९' वर खड्डे घेऊन त्यामध्ये शेणखत, कल्पतरू सेंद्रिय खत (५० किलो/एकर) टाकून खड्डे भरून घेतले. नंतर त्यामध्ये २२ मे २०१२ रोजी शेवग्याची लागवड केली. लागवडीनंतर १।। महिन्याने एकरी कल्पतरू खताच्या ३ बॅगा देऊन मातीची भर लावली. शेवगा ३ फूट उंचीचा झाल्यावर शेंडा छाटला. सुरूवातीला पाणी दांडाने देत होतो. नंतर ठिबक केले. या शेवग्यास लागवडीनंतर ७ महिन्यात शेंगा चालू झाल्या. मार्केटमध्ये शेंगा नेल्यानंतर त्यातील १ किलो शेंगा एका बाईने घरी खाण्यास नेल्या. त्याची भाजी इतकी चांगली झाली की, घरच्या कार्यक्रमसाठी परत हाच शेवगा १० किलो ६० रू. किलोने नेला. ज्या - ज्या लोकांनी हा शेवगा व्यापाऱ्याकडून नेला तर त्यांच्याकडे 'सिद्धीविनायक' शेवग्याचीच मागणी होत असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

पहिल्या बहाराचे ५ लाख ३२ हजार

डिसेंबर २०१२ ला चालू झालेला शेवगा एप्रिल २०१३ पर्यंत चालला. एकूण १८ टन शेवगा निघाला. सर्व व्यापाऱ्यांमार्फत विकला. भाव ३० रू. पासून ८० रू./किलोपर्यंत मिळाले. सुरुवातीला डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ पर्यंत ७० ते ८० रू. किलो दर मिळाला. नंतर ऊन वाढू लागले तसे मार्केट मध्ये इतरांचाही माल येऊन आवक वाढल्याने भाव कमी कमी होत गेले. शेवटी ३० रू. पर्यंत भाव मिळाला. या पहिल्या बहारापासून ५ लाख ३२ हजार रू. झाले. याला एकूण खर्च ३० - ३५ हजार रू. आला.

सततच्या पावसाने दुसरा बहार फेल !

एप्रिलमध्ये बहार संपल्यावर झाडाची खोडे १।। फूट ठेवून खरड छाटणी करून दुसरा बहार धरला. याला २ ते २।। फुटाचे फुटवे आल्यानंतर सतत ५६ दिवस एकसारखा पाऊस सुरू झाल्याने झाडांची उंची १८ ते २० फुटापर्यंत गेली. त्यामुळे फुलकळीच लागली नाही. झाडे नुसतीच माजली. परिणामी दुसरा बहार फेल गेला.

तिसरा बहार यशस्वी

त्यानंतर डिसेंबर २०१३ ला पहिल्या छाटणीच्या २ इंच खाली छाट मारला आणि सप्तामृत फवारण्या चालू केल्या. प्रथम १ टन गांडूळ खत, १ टन कारखान्याचे खत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत दिले. छाटणीनंतर चौथ्या दिवशी पहिली सप्तामृताची फवारणी केली. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी आणि पुन्हा १५ दिवसांनी अशा एकूण ३ फवारण्या केल्यानंतर मधे कोणत्याही फवारणीची गरज भासली नाही. दरम्यान हवामान स्वच्छ होते. नंतर फुलकळी लागल्यावर १ आणि शेंगा वाद्यासारख्या लागल्यावर १ अशा एकूण ५ फवारण्या सप्तामृताच्या एका बहाराला घेतल्या. खरड छाटणीनंतर ५ - ६ फुटवे निघाले की, शेंडा खुडला होता. नंतर पुन्हा नवीन फुटवे निघाले. असे ८ -१० सशक्त फुटवे ठेवून बाकीचे काढून टाकले. पहिला शेंडा २ फुटावर नंतर ४ फुटावर आणि ३ रा ६ फुटावरून शेंडा मारतो. तेथून फुलकळी लागण्यास सुरुवात होते. त्यानंतर शेंडा मारणे थांबवितो.

२०% मालाचे २ लाख ८० हजार

मार्च २०१४ ला फुलकळी लागून ४ मे २०१४ ला पहिला तोडा झाला. त्यानंतर शेंगा दररोज तोडतो. तर ४ मे ते ६ जुलै २०१४ (काल) पर्यंत ४७५० किलो माल निघाला आहे. सर्व माल वाई मार्केटला विकला. यंदा सुरुवातीला ४० रू. भाव मिळाला. तो वाढत वाढत आता ७० रू. चालू आहे. आजपर्यंत २ लाख ८० हजार रू. झाले असून आतापर्यंत फक्त २० टक्के माल तोडला गेला आहे. ८० % माल बाकी आहे. त्याचा फोटो कव्हरवर दिला आहे. झाडावरून एका बहाराला ८०० ते ८५० शेंगा म्हणजे ४० ते ४२ किलो मिळतात. एकूण ५६० झाडे लावली होती. त्यातील १० - १२ झाडे मेली, तर ५० - ६० झाडे वांझ आहेत व ती निघतातच. जवळपास ४८० झाडांपासून एकसारखे भरघोस उत्पादन मिळत आहे.

वाईचे मार्केट दुपारी १२ वा. चालू होते. १२ ते १ वाजेपर्यंत शेतकरी बाजारात माल नेतात आणि १ ते २ वाजेपर्यंत व्यापारी माल खरेदी करून २ वाजता मार्केट बंद होते. असे १२ ते २ वाजेपर्यंत वाई मार्केट चालू राहते. त्यासाठी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मी आणि २ गडी (मजूर) असे तिघेजण दररोज १०० ते २०० किलो निघतील अशा शेंगा तोडतो. नंतर १० ते ११ वाजेपर्यंत शेंगाचे पॅकिंग करून घरीच वजन करतो. त्यानंतर सव्वा अकरा वाजता माल वाई मार्केटला पाठवितो. घरापासून ३ किमीवर वाई मार्केट आहे. येथून महाड, चिपळूण भागातील व्यापारी भाजीपाला खरेदी करून पूर्ण कोकणात पाठवितात. दररोज साधारण ३५ ते ४० गाड्या भाजीपाला वाई मार्केटमधून लोड होतो. रोजच्या रोज ताजा माल (शेंगा) मार्केटमध्ये नेत असल्याने भाव तेजीचे मिळतात.

शेंग साधारण १।। ते २।। फूट लांबीची, कलर पूर्ण गर्द हिरवा, वजनदार, गरयुक्त आहे. चवीसही शेंग अतिशय चवदार, मगज भरीव असतो. या शेवग्याला रासायनिक खत किंवा औषध काहीच वापरले नाही. पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे. जमीन भारी काळी आहे. तोडे चालू झाल्यानंतर ठिबक दिवसाआड १ तास (२ ड्रिपर x ४ लि. डिस्चार्ज असे ८ लि.) पाणी देतो. पाणी विहीरीचे आहे.

लागणीचा ऊस १०० टन तर खोडवा ८० टन

एकूण २।। एकर क्षेत्रापैकी १ एकरमध्ये वरील 'सिद्धीविनायक' शेवगा, १ एकरमध्ये ऊस आणि २० गुंठे पपई आहे. उसाला कल्पतरू बांधणीच्यावेळी २०० किलो देतो. सप्तामृताच्या फवारण्या लागणीनंतर १।। महिन्यांनी एकदा आणि त्यानंतर १ महिन्यांनी अशा २ फवारण्या करतो. खोडव्याला देखील याचप्रमाणे तंत्रज्ञान वापरतो. सध्याचा ऊस मार्चमध्ये तुटून खोडवा आजपर्यंत (७ जुलै २०१४) ३।। महिन्यात ९ फूट उंचीचा झाला आहे. लागणीच्या उसापासून एकरी १०० टन तर खोडव्यापासून ८० टनापर्यंत उत्पादन मिळते.

पपईसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

पपई डिसेंबर २०१३ ला लावली आहे. सध्या झाडांवर १५ ते २० फळे १।। ते २ किलोची असून फुलकळी चालू आहे. सप्तामृताचे आतापर्यंत ४ फवारे घेतले आहेत. बागेवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही. यालादेखील रासायनिक काहीच वापरले नाही. जास्त भर गांडूळ खतावर असतो. १८ x ४ फुटाचे गांडूळ खताचे ३ बेड आहेत. वर्षातून ४ - ४ महिन्याने असे ३ वेळा गांडूळ खत तयार होते. ३ बेडपासून एकावेळी १।। टन गांडूळखत मिळते. असे वर्षाला ४।। टन मिळणारे गांडूळखत या सर्व २।। एकर क्षेत्रालाच वापरतो.

शेवग्याच्या शेंगा ६ ते ७ फूट उंचीपर्यंतच्या हाताने तोडता येतात, मात्र त्यावरील शेंगा खालून तोडायचे म्हटले की, फांदी तुटून कोवळ्या शेंगांचे व फुलांचे नुकसान होते म्हणून आज ७ जुलै २०१४ ला पुण्याला शेंगा तोडणीची लांब दांडीची कात्री घेण्यास आलो असता आपल्या ऑफिसला भेट देऊन ही मुलाखत देत आहे.