सेंद्रिय खते उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सेंद्रिय खते आणि सेंद्रिय घटक (ह्युमस) यांचा आपल्या शेतातील वापर हा पुरातन काळापासून आहे. इ.स.पूर्व २३४ -२४९ वर्षात काही शास्त्रज्ञांनी या सेंद्रिय पदार्थाचे कुजणे, सडणे, खनिजीकरण, साल्ट पीटर यांसारख्या सेंद्रिय व नैसर्गिक खनिजद्रव्यांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर अनेक जर्मन, रशियन, इंग्रज, ग्रीक आणि रोमन शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे सेंद्रिय पदार्थामुळे तयार होणाऱ्या खतांचे महत्व व त्यांचा जमिनीवर होणारा परिणाम व पिकांना मिळणारा फायदा या संदर्भात प्रथम दर्शनी निष्कर्ष काढलेले आहेत.

पीक अवशेषावरील सूक्ष्म जिवाणूंच्या जीव रासायनिक क्रिया थांबल्यानंतर उरणाऱ्या टाकाऊ पदार्थांना सेंद्रिय पदार्थ अथवा सेंद्रिय द्रव्य असे म्हणता येईल. याचबरोबर प्राणी व मानवाची विष्ठा यांचा समावेश या पदार्थात करता येईल. तसेच शेतातील टाकाऊ काडीकचरा, पिकांचे अवशेष, भुसा, काड, धसकटे, पाचट गोठ्यातील अवशेष, टाकाऊ झालेला भाजीपाला इत्यादींचा समावेश देखील सेंद्रिय पदार्थामध्ये करता येतो. हे सेंद्रिय पदार्थ अर्धवट व कमी प्रमाणात कुजलेले असतात. जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास सेंद्रिय पदार्थाची सडण्याची क्रिया जलद गतीने होते.

ह्युमस : एस सेंद्रिय घटकद्रव्य

सेंद्रिय पदार्थाचे संपूर्ण विघटन होऊन त्याच्या परावर्तित स्वरूपाला 'ह्युमस' असे म्हणतात. शास्त्राज्ञांनी सेंद्रिय पदार्थांना जमिनीतील सुक्ष्म जिवाणुंना ऊर्जा पुरविणारे घटक म्हटले आहे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे जीव - रासायनिक क्रियांद्वारे विघटन होऊन सेंद्रिय आम्ल तयार होतात. जास्त अनुभारांचे सेंद्रिय घटक पदार्थ ज्यांचे पुढील विघटन किचकट व अवघड असते. यामध्ये मुख्यत्वे ह्युमीक आम्ल आणि ह्युमीन व त्यांच्यासारखे गुणधर्म असलेले पदार्थ तयार होतात. त्यातून रंगाने तपकिरी, गडद तपकिरी किंवा काळे किंवा काळेभोर प्रभावी द्रव्य मिळते. हेच पुर्ण विघटन झालेले ह्युमस सेंद्रिय घटकद्रव्य प्रभावीपणे कार्य करते.

सेंद्रिय पदार्थाचे वर्गीकरण

१) स्थुल सेंद्रिय पदार्थ : या पदार्थामध्ये प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट खत नागरी खत तसेच विष्ठेपासून तयार होणारे सोनखत, हिरवळीचे खत, गांडूळखत, साखर कारखान्यातील प्रेसमड, कंपोस्ट खत आणि त्यापासून इतर सेंद्रिय घटक द्रव्ये पुरविणाऱ्या पदार्थाचा समावेश होतो.

२) ससेंद्रिय सेंद्रिय खत : यामध्ये विशेष करून हाडे, पेंडीपासूनचे खत, शिंगापासून व जनावरांच्या खतापासून तयार झालेले खत यांचा समावेश करता येईल.

३) किरकोळ सेंद्रिय कचरा : पिकांच्या विविध घटकांपासून तयार होणारे निरनिराळे पदार्थ उदा. शेतातील काडीकचरा, पाचट, भुसा, मुळे, जनावरांचे अर्धे कुजलेले अवयव आणि मलमुत्र यांचा समावेश यात मुख्यत्वे होतो.

सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतांचे विविध प्रकारात वर्गीकरण होते. ते म्हणजे भरखत व जोरखत. जमिनीची भौतिक स्थिती व पोत सुधारण्यासाठी वरखातांची आवश्यकता भासते. वरखतांमुळे पिकांना आवश्यक अशी अन्नद्रव्य जमिनीतून मिळतात. तसेच पिकांना उपयुक्त अशा हजारो जिवाणूंची वाढ होते. जमिनीच्याकणांत पोकळी वाढून त्यांची पाणी व हवा धरून ठेवण्याची शक्तीही वाढते. वरखतांमध्ये मुख्यत:शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, हाडांचे खत, मासळीचे खत, पेंढीचे खत, गोबर गॅस, रबडीचे खत इत्यादी खतांचा समावेश होतो. या खताद्वारे पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य घटकांचे प्रमाण तक्ता क्र. १ मध्ये दर्शविले आहे. यावरून स्पष्टपणे त्यांची उपयुक्तता लक्षात येते. या खताद्वारे होणाऱ्या अन्नद्रव्य पुरवठ्याद्वारे जमिनीची सुपिकता वाढून तिची जैविक तसेच भौतिक स्थिती योग्य राखून पिकांचे चांगले पोषण करण्यास मदत करते. परिणामी पीक उत्पादनात वाढ होते.

सेंद्रिय खतांची उपयुक्तता

१) शेणखत : शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेषही असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र शोषून घेता येते. ती माती जर शेणखताच्या खड्ड्यात शेणाबरोबर टाकली, तर त्यामुळे शेणखताची प्रत सुधारते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून पिकांचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय वरखताचा वापर करणे आवश्यक आहे.

२) सोनखत : सोनखतामध्ये मानवाने उत्सर्जित केलेली घाण विष्ट व मूत्र यांचा समावेश असतो. सोनखतामध्ये नत्र - १.२ टक्के, स्फुरद - ०.२० टक्के, पालाश - ०.३० टक्के या प्रमाणात असते. हे खत तयार करतांना मानवी विष्टा व राख समप्रमाणात मिसळून त्यामध्ये १० टक्के कोळशाची पूड मिसळल्यास दुर्गंधरहित सोनखत तयार होते.

३) लेंडीखत : आपल्या देशातील शेळ्या मेंढ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या विष्टेपासून देखील चांगल्या प्रतीचे लेंडीखत तयार करता येते यामध्ये सर्वसाधारणपणे ०.६५ टक्के नत्र, ०.५० टक्के स्फुरद आणि ०.०३ टक्के पालाश ही अन्नद्रव्य मिळतात. गाई - म्हशींच्या शेणापेक्षा मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खतांची प्रत चांगली असते. मेंढ्यांच्या ताज्या लेंडीत पालाश अन्नद्रव्याव्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य संपन्न असतात, त्या खालोखाल शेळ्यांच्या लेंड्यात असते.

४) कोंबडी विष्टा खत : कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठवलेली असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे. कोंबडीची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते व त्यातील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणून पेरणीपूर्वी हे खत घातल्यास पिकांवर चांगला परिणाम दिसून येतो. या खतांमध्ये पिकांना आवश्यक असलेल्या दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे.

५) विविध पेंडीचे खत : अखाद्य व तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडीचा वापर बहुतेक करून सेंद्रिय खत किंवा किटकनाशक म्हणून केला जातो. सर्वसाधारणपणे विविध पेंडीमध्ये ३.० ते ६.० % नत्र, ०.८० ते २.०% स्फुरद आणि १.० ते १.८% पालाश उपलब्ध होऊ शकते. काही पेंडीचा नत्रयुक्त खतासोबत वापर केल्यास खताच्या दाण्याभोवती आवरण तयार होऊन पेंडीमधील रासायनिक पदार्थामुळे अमोनिया स्वरूपातील नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये होण्याची क्रिया मंदावते.

६) रक्त खत (ब्लड मील) : कत्तलखान्यामधून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थातील जनावरांच्या रक्ताचे रूपांतर सेंद्रिय खतात करता येते. जनावरांच्या रक्तात सच्छिद्र गुठळ्या व पातळ द्रव्य असे दोन भाग असतात. रक्तातील गुठळ्या काही मिनिटे ०.५% हायड्रेक्लोरिक आम्लाच्या द्रावणात उकळून शिजविल्या जातात. द्रावणात १% चुना मिसळून ८० अंश से. तापमानापर्यंत मिश्रण तापविले जाते. घट्ट झालेल्या रक्ताचा रंग बदलतो. त्यातील पाणी काढून

तक्ता क्र. १ सेंद्रिय खतांद्वारे होणारा अन्नद्रव्य पुरवठा

अ.क्र.   वरखत   स्रोत   नत्र %   स्फूरद %   पालाश %  
१.   प्राण्यांची विष्ठा   प्राण्याचे शेण
प्राण्यांचे मुत्र
शेळी - मेंढी विष्ठा
मनुष्याची विष्ठा
०.३ ते ०.४
०.८०
०.६५
१.० ते १.२
०.१० ते ०.१५
०.०१ ते ०.०२
०.५०
०.१ ते ०.२
०.१५ ते ०.२०
०.५० ते ०.७०
०.०३
०.२ ते ०.३
२ .   कंपोस्ट खत   शेणखत
कोंबडी विष्ठा खत
शहरातील टाकाऊ पदार्थाचे खत
ग्रामीण भागातील टाकाऊ पदार्थाचे खत
जलपर्णी कंपोस्ट
०.५ ते १.०
२.८७
१.५ ते २.०
०.५ ते १.०
२.०
०.१५ ते ०.२०
२.९०
१.००
०.२०
१.०
०.५० ते ०.६०
२.६५
१.५०
०.५०
२.३०
३.   पेंढीचे खत   एरंडी पेंड
नारळ पेंड
सरकी पेंड
भुईमुग पेंड
लिंबाळी पेंड
कराळ पेंड
महू
जवस
करडई
तीळ
५.५ ते ५.८
३.० ते ३.२
३.९०
४.५०
४.८०
४.८०
२.५ ते २.६०
५.५०
४.८०
६.०
१.८०
१.८०
१.८०
१.७०
१.८०
१.८०
१.८०
१.८०
१.४०
१.४०
२.०
१.००
१.७०
१.६०
१.५०
१.३०
१.३०
१.८०
१.२०
१.२०
१.२०
४.   प्राण्यांच्या अवशेषांचे खत   रक्त खत
मांस
शिंग व खुरे
हाडांचे अवशेष
हाडांचा चुरा
मासळी खत
१० ते १२
१०.५०
१३.०
३ ते ४
१ ते २
४ ते १०
१.२०
२.५०
०.३ ते १.५
२० ते २५
२५ ते ३०
३ ते ९
१.००
०.५०
-
-
-
-


सूर्य प्रकाशात वाळवून खत बनवितात. यामध्ये नत्राचे प्रमाण १० ते १२ टक्के असते.

७) हाडांचे खत (बोन मील) : जनावरांच्या हाडांपासून खत बनविण्यासाठी ताजी अथवा वाकलेली हाडे योग्य आकराच्या भांड्यात पुरेसे पाणी घेऊन त्यात भिजत ठेवली जातात. त्यामध्ये कॉस्टिक सोडा मिसळून ५% द्रावण केले जाते. ही हाडे दिवसांतून १ ते २ वेळा हलवितात. सुमारे दोन आठवड्यांनी हाडे विरघळून त्याचा लगदा तयार होतो. त्यातील कॉस्टिक सोड्याचे द्रावण वेगळे केले जाते. विरघळलेली हाडे दोन वेळा पाण्याने धुतात. नंतर १०% हायड्रोक्लोरिक आम्लाचे द्रावण मिसळून उदासीन केले जातात. त्यातील द्रावण वेगळे करुन पातळ मलीन कापडातून गाळून घेतात. हा लगदा उन्हामध्ये वाळवून व जंतुरहित करून बारीक पावडरीच्या स्वरूपात हाडांचे खत म्हणजेच बोन मील तयार केले जाते. यामध्ये स्फुरदाचे प्रमाण २५ ते ३० % असते.

८) शिंगाचे खत (हॉर्न मील ) : जनावरांच्या इतर अवशेषांपासून म्हणजे शिंगे व खर यांपासून बनविलेले हे एक उपयुक्त सेंद्रिय खत आहे. शिंगे व खूर वाळवून आणि दळून त्यांची बारीक पावडर केली जाते. त्यामध्ये १० ते १५ % नत्र, १०% स्फुरद व २५% चुना असतो.

९) मासळीचे खत (फिश मील): अखाद्य मासे व मत्स्य खाद्यप्रक्रिया कारखान्यातून बाहेर टाकण्यात येणाऱ्या अवशेषांपासून हे खत टायर करणायत येते. या खतामध्ये नत्रांचे प्रमाण ४ ते १०%, स्फुरद ३ ते ९ %, तर पालाश १% असते.

१० ) हिरवळीची खते : वनस्पतींच्या हिरव्या अवशेषापासून तयार केलेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात. हिरवळीच्या खतासाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांमध्ये ताग, धैंचा, गवार, मूग, चवळी, मटकी, उडीद, मेथी, लाख, वाटाणा, मसुर, शेवरी, गिरीपुष्प, लसूण घास सुबाभूळ,बरसीम, करंज इत्यादींचा समावेश होतो. यापासून आपण खत तयार करून शकतो.

अशी वरखते व भरखते रासायनिक खतासोबात वापरल्यास रासायनिक खताच्या खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य टिकवण्यास मदत होईल व उत्पादनातही वाढ होईल, अशा उपयुक्त खतांचा वापर शेती पद्धतीत करावा.

११) टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा प्रक्रियेद्वारे पुनर्वापर : शेतात प्रचंड प्रमाणात पिकांचे अवशेष आढळतात. त्यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रतीचे खत तयार होते. कंपोस्ट खत तयार करताना ढीग व खड्डा पद्धतीमध्ये शेतातील पेंढा, कडबा, धसकटे तूस इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थ एकत्र करून १२ इंच जाडीचा थर करावा. त्यावर ४ इंच जाडीचा शेणकाल्याच्या थर द्यावा. असे आलटूनपालटून प्रत्येकी ६ ते ७ थर देऊन शेवटचा थर मातीचा व शेणकाल्याने लिंपून ढीग किंवा खड्डा हवाबंद करावा. त्यापूर्वी ओलावा ५० टक्के राहील, याची काळजी घ्यावी. कंपोस्ट खड्डा भरल्यापासून तीस दिवसांच्या अंतराने दोन वेळा खड्ड्यातील थरांची उलथापालथ करावी. सेंद्रिय पदार्थ जलद कुजण्यासाठी सुपर फॉस्फेटसारख्या रासायनिक खतांचा व ट्रायकोडर्मा, अॅस्पॅरजिलस यासारख्या बुरशींचा उपयोग करावा.

गांडूळखत निर्मिती :

१) गांडूळ खत निर्मितीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.

२) ज्या ठिकाणी पाणी साचते. अशी खोलगट भागाची जाग टाळावी, शक्यतो जनावरांच्या गोठ्याजवळ आणि पाण्याची व्यवस्था जवळ आहे, अशी जागा निवडावी.

३) गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी असून प्रकाशात तो कार्य करू शकत नाही. त्याची त्वचा नाजुक असते. त्यामुळे काही वेळातच तो जमिनीच्या आत खाली जातो म्हणून गांडूळ खत तयार करताना त्याचे प्रकाशापासून संरक्षण व्हावे म्हणून निवाऱ्यासाठी छप्पर करणे आवश्यक आहे.

४) छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे किंवा शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या तुराट्या, ज्वारीचे ताटे, मोठे गवत, पाचट इत्यादी किंवा बाबुंचे तट्टे वापरून करता येईल.

५) छप्पर दोन्ही बाजूंना उताराचे असावे. जेणेकरून पावसाचे पाणी सहज निघून जाईल व दोन्ही बाजुंनी गांडुळांना सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही. यासाठी छपराची मधील उंची २.५ मी. व बाजुची उंची १.५ मी. असावी. रुंदी ५ मीटर व लांबी ३ मिटर किंवा आवश्यकतेनुसार आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेप्रमाणे असावी.

६) छपराखाली १ मीटर रूंदीचे दोन समांतर बिछाने किंवा १.५ मीटर रूंदीचे दोन समांतर खड्डे करावेत.

गांडूळ खताचा खड्डा भरण्याची पद्धत :

१) सर्वात खाली सेंद्रिय पदार्थाची १५ सें. मी. चा थर.

२) अर्धवट कुजलेले शेणखत व माती ३:१ प्रमाणात मिसळून १५ सें. मी. चा थर.

३) पाण्यात शेण काळवून १० सें. मी चा थर.

४) सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन.

गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

१) ढिग/ बिछाना पद्धत,

२) खड्डा पद्धत आणि

३) कुंडी/ टाकी पद्धत

यापैकी शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर खत तयार करण्यासाठी ढिग / बिछाना किंवा खड्डा पद्धत सोयीची आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठीचा बिछाना विशिष्ट पद्धतीने तयार करायला पाहिजे. जेणेकरून कमी कालावधीत उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होईल. या पद्धतीत मांडवाखाली सावलीत १ मीटर रुंद व ३ मीटर लांबीचा बिछाना तयार करावा. लांबी ही सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. ती आपण कमी किंवा जास्त करू शकतो. सुरुवातीला सर्वात खाली बुडाशी १५ सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा (उदा. गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन - तुर - सुर्यफुलाचा भुसा, नारळाच्या शेंड्या चाऱ्याचा उरलेला भाग, पालापाचोळा व शेतातील इतर वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ इ.) थर द्यावा. त्यामुळे गांडुळांना जाड कचऱ्यात आश्रय मिळेल. त्यानंतर त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती ३:१ प्रमाणात मिसळून त्याचा १५ सें.मी. चा थर द्यावा. हा थर उष्णता निरोधनाचे काम करील. त्यावर पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून १० सेंमी चा तिसरा थर द्यावा. शेणामुळे पदार्थाची कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल व ते गांडूळास खाद्य म्हणून उपयोगात आणता येईल.

शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हे आच्छादन १५ सें.मी. पेक्षा जास्त जाडीचे नसावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार आवश्यकतेप्रमाणे दररोज किंवा दिवसआड बिछान्यावर पाणी शिंपडावे. बिछान्यातील उष्णता कमी झाल्यावर एक दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजुला सारून कमीत कमी १००० प्रौढ गांडूळे सोडावीत. गांडूळे सोडताना त्यांना एकमेकांपासून वेगळे करून बिछान्यात सगळीकडे सोडावीत. एकाच जागेवर तसाच त्याचा गुच्छ (गोळा) बिछान्यात सोडू नये. गांडूळ बिछान्यास सोडल्यावर परत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे व बिछान्यास नियमित पाणी द्यावे. बिछान्यात ४० ते ५० टक्के ओलावा व २० डी. ते ३० डी. सेल्सिअस तापमान राहील याची दक्षता घ्यावी. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या या मिश्रणावर गांडूळ क्रिया करतात. गांडूळे सेंद्रिय पदार्थमिश्रीत माती खाऊन आपली उपजीवीका करतात. आणि त्यात अंडीपुंज व विष्ठा टाकतात. यात कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मोठ्या प्रमाणावर असतात. एवढेच नव्हे तर उन्नद्रव्ये, जिवनसत्वे, संजीवके, प्रतिजैविके पण यात असतात. या मिश्रणास गांडुळ खत म्हणतात. गांडुळाच्या संख्येनुसार गांडूळ खत निर्मितीस दीड ते दोन महिने लागतात. गांडुळाची संख्या कमी असेल. तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो. साधारणपणे ३ x १ x ०.६ मिटर बिछान्यात गांडुळाची संख्या १० हाजार झाली की, दोन महिन्यात उत्तम असे ५०० किलो गांडूळखत तायर होते. चहाच्या भुकटीसारखे, भुसभुशीत, दाणेदार, त्याचा मातकट वास येऊ लागला की, गांडूळखत तयार झाले असे समजावे. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की, बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळासकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे ३ - ४ तासात सर्व गांडुळे तळाशी जाऊन बसतील, वरचा खताचा भाग हलक्या हाताने अलग करून घ्यावा व खालची गांडूळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात / खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने आपण खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करू शकतो.

गांडूळखताचा वापर :

गांडूळ खत निर्जींव नसून त्यात गांडुळाची पिल्ले अंडीकोष व कोट्यावधी जिवाणू जिवंत असतात. म्हणून नेहमी ओलसर अवस्थेत सावलीत ठेवावे. गांडूळ खत शक्यतो लवकर शेतात/ पिकांस वापरणे योग्य आहे. परंतु काही कारणास्तव आपण ते लवकर वापरू शकत नसाल, तर त्यावर पाणी शिंपडून ते ओलसर राहील, याची काळजी घ्यावी व सावलीत गोण्यामध्ये भरून साठवावे.

गांडूळ खत शेतीसाठी एकरी २ टन या मात्रेने जमिनीत मिसळून वापरावे हे खत जमिनीत पेरून दिलेले चांगले. फळबाग पिकांसाठी वापरायचे झाल्यास हेक्टरी झाडाच्या संख्येने पाच हजाराला भागून प्रति झाडाची मात्रा काढावी व गांडूळ खत झाडाच्या भोवती ६० सें.मी. अंतरावर चर खोदून बांगडी पद्धतीने द्यावे. त्यावर शेणाचा ५ सें.मी. जाडीचा थर देऊन सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. फळझाडांना नियमित पाणी देऊन ओलावा टिकून राहील. याची काळजी घ्यावी. प्रत्येक तीन महिन्यांना पाण्यात शेण कालवून रबडी करून झाडास द्यावी व सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. म्हणजे गांडुळांना भरपूर खाद्य मिळेल व त्याची संख्या वाढेल. गांडुळांची संख्या एकरी १० लक्ष झाल्यानंतर त्या पुढील काळात पिकांना अन्नद्रव्य पुरविण्यासाठी रासायनिक खतांची गरज भासत नाही. गांडूळ खताचा शेतीत वापर केल्यानंतर कीटकनाशक किंवा तणनाशके जमिनीवर वापरू नयेत. गांडूळ शेतीची सुरुवात करताना शेती उत्पन्नात घट येऊ नये. म्हणून हळूहळू रासायनिक खतांची मात्रा कमी करावी. एकदम वापर बंद करूनये. रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर १५ दिवसांनी गांडूळ खत वापरावे. गांडूळ खतात असलेली अंडी पिल्ले व जिवाणू यांची जमिनीत वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी तेथे नेहमी ओलावा. त्यांना अन्न व चांगल्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन राहील. याची काळजी घ्यावी.

गांडूळखत तयार करताना घ्यावयाची काळजी.

१) बिछान्यावर पाणी टाकताना जास्त पाणी साचणार नाही व ओलावा ४० ते ५० टक्के राहील, याची काळजी घ्यवी.

२) बिछान्यातील तापमान २० डी. ते ३० डी. सेंटीग्रेड दरम्यान ठेवावे व त्यावर सूर्यप्रकाश येणार नाही, याची काळजी घ्यावी.

३) गांडुळाचे वाळवी, बेडूक, साप, मुंग्या, गोम, उंदीर व कोंबडी या शत्रुंपासून संरक्षण करावे.

उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धती.

१) खड्डा पद्धत,

२) ढीग/रास पद्धत

३) पाचट शेतात गाडणे

१) खड्डा पद्धत :

या पद्धतीत एक टन उसाचे पाचट कंपोस्ट करण्यासाठी प्रत्येक खड्ड्याची रुंदी २ मीटर, खोली १ मीटर व लांबी ५ मीटर ठेवतात. खड्ड्याची लांबी उपलब्ध जमिनीनुसार ठरविता येते. परंतु रुंदी आणि खोलीच्या बाबतची मोजमापे कटाक्षाने पाळावीत, कारण खड्डा जर उथळ असेल, तर पाचट वाळते आणि कुजण्याची क्रिया मंदावते.

खड्डा भरण्याची पद्धत :

१) खड्डा भरताना प्रथम तळाशी १५ ते ३० सें.मी. जाडीचा उसाच्या पाचटाचा थर द्यावा.

२) एक ड्रममध्ये १०० लिटर पाणी घेऊन प्रति टनासाठी पाचटाच्या वजनाच्या १० टक्के म्हणजे १०० किलो शेण व पाचटाचे सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जिवाणू अर्धा किलो प्रती तासात या प्रमाणात पाण्यात मिसळून घ्यावेत.

३) तयार झालेले मिश्रण कंपोस्ट खड्डे भरताना संपूर्ण खड्ड्यात पुरेल अशा रीतीने पसरावे.

४) दुसरा एक ड्रम घेऊन त्यात १०० लिटर पाणी द्यावे व त्यात प्रति टन पाचटासाठी ८ किलो युरीया तसेच १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन पाण्यात चांगले विरघळल्यानंतर खड्डे भरताना हे द्रावण प्रत्येक थरावर समप्रमाणात संपूर्ण खड्यात पुरेल अशा रीतीने टाकावे. दोन्ही द्रावणे वेगवेगळी वापरावीत.

५) पाचपटाच्या प्रत्येक थरावर प्रथम युरिया व सुपर फोस्फेटचे द्रावण टाकून नंतर शेणकाला व जिवाणूंचे मिश्रण टाकवे.

६) आवश्यकतेनुसार जादा पाणी टाकून त्यामध्ये पाचटाच्या वजनाच्या ६० टक्के ओलावा राहील. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीवर ४० ते ६० सें. मी. येईल इतका भरावा.

७) संपूर्ण खड्डा मातीने अथवा शेणमाती गवताने सर्व बाजूंनी लिंपून बंद करावा. म्हणजे खड्ड्यातील पाणी बाष्प होऊन हवेत उडून जाणारा नाही.

८) १ ते २ महिन्याच्या अंतराने खड्डा वर - खाली करून चाळवणी करुन खड्डा पुन्हा भरावा. आवश्यकता वाटल्यास पाणी टाकावे.

९) अशा पद्धतीने ३ ते ४.५ महिन्यात पाचटापासून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट तयार होते.

२) ढीग / रास पद्धत :

या पद्धतीमध्ये पाचट गोळा करून ढीग तयार करावा लागतो. ढीग तयार करताना पाया २ मीटर लांब,१२ मीटर रुंद व दीड मीटर उंच असावा. परंतु ढीग तयार करताना वर निमुळता होईल अशा पद्धतीने थरावर थर देऊन तयार करावा. वरच्या रुंदीचे आकारमान पायापेक्षा ६० सें.मी. कमी असावे.

२) पाचटाचा प्रत्येक थर १५ ते २० सें.मी. जाडीचा असावा. त्या प्रत्येक थरावर १ टोपले शेण + १०० ग्रॅम पाचट कुजविणारे जिवाणू (सोजर काजू) + ३० लिटर पाणी यांचे मिश्रण शिंपडावे व त्यानंतर पाचटाच्या प्रति टनास ८ किलो युरिया व १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे पाण्यात मिश्रण तयार करून शिंपडावे.

३) प्रत्येक थरावर मातीचा १ ते २ सें.मी. जाडीचा थर देऊन अशाप्रकारे दिड मीटर उंच ढीग तयार करावा.

४) ढीग सर्व बाजूंनी माती, गवत पाणी पुरवठा करून लिंपून घ्यावा. १ ते २ महिन्यांनी ढिगातील पाचटाची उलथापालथ करावी आणि पुन्हा ढीग बंद करावा. म्हणजे ४ ते ५ महिन्यांनी खत तयार होते.

५) ढीग न हलविल्यास उष्णता निर्माण होऊन जिवाणू मरतात. तसेच हवेतील नत्रामध्ये अमोनियाच्या रूपाने जास्त प्रमाणात उडून जाते. पाण्याचे प्रमाणही कमी होते.

३) शेतात पाचट कुजविणे :

खड्डा अगर ढीग पद्धतीने कंपोस्ट करणे काही कारणांमुळे शक्य होत नसेल तर पाचटाचे लहान लहान तुकडे करून शेतातच गाडणे व १ महिन्याच्या पिकांची लागवड करावी ही एक सोपी पद्धत आहे. यासाठी प्रथम जमिनीत सऱ्यांमध्ये हेक्टरी ५ ते ७.५ टन पाचट टाकावे आणि त्यानंतर रिजरच्या सहाय्याने वरंब्याचे सरीमध्ये प्रति टन ८ किलो युरिया, २० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो जिवाणू कल्चर वापरा आणि पाचट गाडून झाल्यानंतर पाणी द्यावे आणि अशारितीने शेतातल्या शेतात ४ ते ४.५ महिन्यांमध्ये संपूर्ण पाचट कुजून जाऊन त्याचे कंपोस्ट खातात रूपांतर होते.

४) उसाच्या खोडवा पिकात पाचट गाडणे:

उसाच्या खोडवा पिकात पाचट गाडता येते. ऊस तोडल्यानंतर उसाच्या बुडाजवळील वरंब्यावरील पाचट सरीमध्ये सारून घ्यावे. रिजरच्या साहाय्याने वरंबा कुदळून माती पाचटावर टाकावी. तसेच हेक्टरी ७० ते ८० किलो सुपर फॉस्फेट व ४ ते ५ किलो पाचट कुजविणारे बुरशीजन्य जिवाणू खत वापरावे आणि दुसरे दिवशी हलके पाणी द्यावे. अशाप्रकारे खोडव्यात गाडलेले पाचट खोडव्याची बांधणी करेपर्यंत कुजले जाते व शेतातील पाचटामुळे उसाच्या उगवणीवर उंचीवर, जाडीवर आणि उसाच्या संख्येवर चांगला परिणाम दिसून येतो.

५) उसाच्या पाचटापासून कंपोस्ट खत तयार करतांना घ्यावयाची काळजी.

पाचटात कठीण तंतुमय आणि मेणचट पदार्थाचे प्रणाम बरेच असते. खत तयार करण्यासाठी पुढीलल महत्त्वाच्या बाबींमध्ये लक्ष द्यावे.

१) पाचटामध्ये जिवाणूंचा वापर करणे :

कुजविणारे जिवाणू उदा. बुरशी अॅक्टीनोमायसेटीज अणू जिवाणूंचा यात समावेश आहे. त्यामुळे पाचटाचे कंपोस्ट खतात रूपांतर होते. या जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर कुजण्याची क्रिया अवलंबून असते. ते कार्यक्षम असल्यास कुजण्याची क्रिया जलद होते.

२) कार्ब व नत्र प्रमाण :

पाचटामध्ये कर्बाचे प्रमाण कमी असते. सधारणपणे १२५ ते १५०:१ तसेच यामध्ये कठीण लिगनीन तंतुमय पदार्थ कुजण्यास प्रतिबंध करणाऱ्या घटकांचे प्रमाण इतर पदार्थापेक्षा जास्त असते. म्हणूनच उसाचे पाचट लवकर कुजत नाही हे प्रमाण ५०:१ पर्यंत आणावे. त्यामुळे पाचट कुजण्याची क्रिया योग्य व जलद होण्यास मदत होते. त्याकरित प्रतिटन ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० ते १५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे.

३) पाचट कुजविण्यासाठी ओलावा/पाणी

पाचट कुजविण्यासाठी जिवाणूंचे जीवरसायनिक काम योग्य व जलद होण्यासाठी ५० ते ६० टक्के ओलावा असावा. मात्र खड्ड्यात पाणी साठून राहील इतके पाणी टाकू नये.

४) पाचटाचा आकार :

उसाचे पाचट लांब व रुंद असेल, तर विघटनाच्या क्रियेस जास्त वेळ लागतो. त्यसाठी कंपोस्ट खड्डे भरण्यापूर्वी पाटाचे १५ ते २० सें.मी. लांबीचे लहान लहान तुकडे करावेत. म्हणजे खड्डा भरणे सोयीचे जाते व पाचट लवकर कुजण्यास मदत होत.

५) खड्ड्यातील तापमान :

पाचट कुजण्याच्या क्रियेसाठी कंपोस्ट खतातील अथवा ढिगातील तापमान ५ओ ते ६० सें.मी. अंश. सेल्सिअसच्या आसपास असावे लागते. म्हणून १ ते १.५ महिन्याने खताच्या खड्ड्यातील अथवा ढिगातील थरांची उलथापालथ करावी म्हणजे तापमान स्थिर राहते.

पाचटाचे कंपोस्ट खत तयार झाले का हे कसे ओळखावे ?

१) कंपोस्ट खतांचा रंग विटकरी व गर्द काळा दिसतो.

२) कंपोस्ट खतास मातकट वास येतो.

३) खत सहज मऊ होते व त्याचा स्पर्शही मऊ होतो.

४) कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे आकारमान सुमारे ६५ टक्के कमी होते व मुळ वजनाच्या ३० ते ६० टक्के घट होते.

विविध सेंद्रिय खते आणि त्यांचे उत्पदान :

अ) कंपोस्ट खत : जनावरांच्या गोठ्यातील निर्माण होणारा काडीकचरा गोळा करून त्याचे थरावर थर तयार करावेत. त्या थरावर गोठ्यातील मलमुत्र शोषलेली माती अथवा जनावरांनी तुडविलेले गवत असा थर द्यावा. याद्वारे नत्राचा पुरवठा होऊ शकतो. त्यावर जुन्या कंपोस्टचा थर द्यावा आणि त्यावर मातीचा एक थर द्यावा. अशी प्रक्रिया दर तीन ते चार दिवसांच्या जमा होणाऱ्या कचऱ्यावर करावी. या थरांची उंची सर्वसाधारणपणे १ ते १.५ फुट उंच २ मीटर रुंद आणि ६ ते ८ फुट लांब असावी. असा एक ढीग तयार झाल्यावर दुसरा ढीग लावण्यास सुरवात करावी. यावर दर १० ते १५ दिवसांनी पाण्याचा फवारा द्यावा. (पावसाळा सोडून) या ढिगाची फेरपालट करून घ्यावी. जशी जशी कुजण्याची क्रिया होईल तसा तसा हा ढीग खाली जाईल. उंची कमी होईल. जी उंची होईल त्याच्या दुप्पट करणे. अशारीतीन दर १५ -२० दिवसांनी ढिगाला पलटी मारावी. ही क्रिया २ महिने करावी. त्यानंतर ढीग तसाच ठेवावा. ४ महिन्यांनी खत तयार होईल.

कंपोस्ट खतनिर्मिती :

या खतनिर्मितीमध्ये ओला कचरा, सुका कचरा, शेण, राख, चाळलेली माती, चुनखडी अथवा जिप्सम या पदार्थाचा वापर करतात. सर्वसाधारणपणे यामध्ये वेगवेगळ्या कच्च्या मालाच्या प्रमाणात निरनिराळी प्रमाणके वापरता येतात. यामध्ये सुका कचरा १०० भाग, माती ७५ भाग, राख २० भाग, शेण २५० भाग, जुने कंपोस्ट १० भाग, युरीया ८ भाग, सुपर कॉस्फेट ४ भाग, जिवाणू उपलब्धतेनुसार असे वापरात येतात किंवा शेण ५०० भाग, सुका कचरा १०० भाग, ओला कचरा २५० भाग, जुने कंपोस्ट २० भाग, युरिया १८ भाग अशा रीतीने वापरता येतात.

सर्वप्रथम शेतातील सुकलेला काडीकचरा हॅमरमिलमध्ये दळून घ्यावा व त्याचा साठ करावा. त्यामध्ये शेण, माती युरिया, सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण एकजीव करावे. यामध्ये थोडे पाणी घालून लगदा तयार करावा. या लगद्याचा वापर कंपोस्ट जागेमध्ये ठेवण्यासाठी करावा. कमीत कमी २० ते २५ दिवसांत तर जास्त ५० ते ६० दिवसांत हे कंपोस्ट खत तयार होऊ शकते. या कंपोस्ट निर्मितीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे या खताला पाणी सुटते. ते पाणी कंपोस्ट खतनिर्मितीतील नालीद्वारे खड्ड्यात शोषून घेता येते. यामध्ये तयार झालेला लगदा कंपोस्ट खड्यामध्ये कुजण्यास घालावा. यानंतर या लगद्याचा आकार मुळ ढिगाच्या १/४ होतो. त्यावेळी हे खत तयार झाले असे समजावे. खतनिर्मितीत ओलावा राहण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा शिडकावा करावा.

कंपोस्ट खतनिर्मितीच्या विविध टाक्या औद्योगिक खतनिर्मितीसाठी बांधल्यानंतर यामध्ये कच्चा माल लगदा करून भरावा. यासाठी सुका कचरा १०० भाग, शेण ५०० भाग, युरिया १२ भाग, जुने कंपोस्ट १० भाग, असे मिश्रण पाण्याने एकजीव करावे. मिश्रण टाकीत टाकण्यापूर्वी १० ते १५ किलो चुनखडी, शेण आणि माती लावायचे १:१ प्रमाण मिश्रण लिपण्यासाठी तयार करावे. यासाठी सर्वसाधारण ३ फुट खोल, ३.५ ते ४ फुट रुंद, ३० फुट लांब टाकी बनविता येते. याद्वारे खतनिर्मितीसाठी २ ते २.५ महिन्याचा कालावधी लागतो. अशाप्रकारे अल्प गुंतवणुकी द्वारे कंपोस्ट खतनिर्मिती कारखाना निर्माण करता येऊ शकतो.

कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पद्धती गुणदोषांसह प्रचलित आहेत.

नॅडेप खत निर्मिती :

सर्वसाधारणपणे कमीत कमी कालवधीत चांगले खत कसे तयार करता येईल. यासाठी ढीग पद्धत आणि खड्डा पद्धतीचा वापर करतात. यासोबतच नॅडेप पद्धत पुढे आली आहे. कंपोस्ट खतनिर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञान नॅडेप पद्धत म्हणून विकसित झाली आहे. हे तंत्रज्ञान स्व. नारायण देवराव पांढरीपांडे उर्फ नॅडेप काकारा. पुसद, जि. यवतमाळ यांच्या प्रयोगशीलतेतून तयार झाले आहे. सर्वसाधारणपणे प्रचलित पद्धतीचे दोष दूर करून नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.

अ) नॅडेप टाकी तयार करणे :

विटांचे बांधकाम करून टाकी तयार करण्यासाठी जमिनीवर ३ फुट उंच, ६ फुट रुंद व १० फुट लांब असे बांधकाम केले जाते. विटांच्या प्रत्येक थरानंतर तिसऱ्या थरामध्ये खिडक्या ठेवल्या जतात. यामुळे जीवाणुंसाठी आवश्यक प्राणवायु मिळतो. टाकीच्या बांधकामाची रुंदी ९ इंच ठेवतात. टाकीचे वरचे दोन थर सिमेंटचे ठेवावेत म्हणजे खत भरताना किंवा काढताना टाकी पडणार नाही. टाकीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर माती व शेण यांच्या मिश्रणाने लिंपून टाकावी. ही टाकी जमिनीवर असल्यामुळे कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार पोषकद्रव्ये कंपोस्ट खतात सामावून उत्तम प्रतीचे खत तयार होते.

ब ) टाकी बांधताना घ्यावयाची काळजी :

टाकी शक्यतोवर सावलीत असावी. टाकी शक्यतोवर पाणी साचणार नाही, अशा ठिकाणी असावी. टाकी भरल्यानंतर लिंपून घेतल्यानंतर त्यावर तण उगवू देऊ नये. उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा १० ते १५ दिवसांच्या अंतराने चालू ठेवावा. दगडाची पोळ रचूनदेखील टाकी बनविता येते.

क) नेडेप कंपोस्ट टाकी भरण्यासाठी पदार्थ :

१) शेतातील वाया जाणारा काडीकचरा, पालापाचोळा, धसकटे, भुसकटे इ.१४०० ते १५०० किलो, तरोटा, गोखरू व इतर तणकटे देखील या कामी वापरता येतात.

२) गोबर गॅसची मळी २५० किलो किंवा ताजे शेणखत १०० किलो

३) चाळलेली/पोयट्याची/गाळाची/जमिनीच्या वरच्या थरातील माती १५०० किलो.

४) पाणी १५०० ते ३००० लिटर ऋतुप्रमाणे

ड ) नॅडेप टाकी भरण्याची पद्धत :

टाकीच्या/हौदाच्या तळाला १५ सें.मी. जाडीचा काडीकचऱ्याचा थर देऊन त्यावर शेणकाला टाकावा. त्यावर ५० ते ६० किलो माती समप्रमाणात सर्वत्र टाकवी. अशा प्रकारच्या टाकी मध्ये प्रत्येक थर भरून घ्यावा. टाकी भरताना ६० टक्के ओलावा राहावा. थरामध्ये ओला काडीकचरा व अन्नधान्याचा भुसा वापरावा. टाकी पुर्णपणे भरल्यानंतर शेवटचा थर इ. झोपडीच्या आकाराचा करावा आणि ४८ तासांच्या आत टाकी पूर्ण भरावी. नॅडेप पद्धतीने कंपोस्ट तयार केले, तर एक टाकीतून अंदाजे ३ टन कंपोस्ट ४ महिन्यांत तयार होते.

इ) खत तयार झाल्याचे ओळखणे :

तीन महिन्यानंतर खत परिपक्व झाल्यानंतर त्याचा रंग भुरकट बनून, त्याला दुर्गंधी न येता विशिष्ट प्रकारचा सुखद वास येतो व खत थंड लागतो. जर काही भाग कुजायचा राहिला, तर त्याचा परत कचरा भरताना वापर करावा. नॅडेप खतामध्ये ०.५ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते ०.९ टक्के स्फुरद व १.२ ते१.४ टक्के पालाशसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश असतो.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनात रासायनिक खतास सेंद्रिय खताबरोबरच जिवाणू खताची जोड देऊन नैसर्गिक स्रोताचा उपयोग करावा. वातावरणात असलेल्या ८० टक्के नत्राचा वापर करण्यासाठी त्यांचे रूपांतर अमोनिकल नत्रात होणे जरूरीचे आहे. ही किमया मानवास, प्राण्यास किंवा वनस्पतीस अवगत नाही फक्त विशिष्ट जिवाणू ही क्रिया करू शकतात. या कारणाने शेती पद्धतीत सेंद्रिय खते व जैविक खत उत्पादनाचे तंत्रज्ञान अवगत करणे निश्चितच व शाश्वत पीक उत्पदान वाढीच्या दृष्टिकोनातून साह्यकारी ठरते.