कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

श्री. एस.टी.शिंदे, डॉ. बी.बी.भोसले, प्रा. बी.व्ही.भेदे, डॉ. ए.जी.बडगुजर


* बी.टी. कपाशीमुळे कपाशीच्या क्षेत्र आणि उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

* बोंडअळ्यासाठी फवारणी कमी झाली आहे. पण रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठीच्या किटकनाशकांच्या फवारणीच्या संख्येत आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

* याचे प्रमुख कारण म्हणजे किटकनाशकाचा अतिरेकी वापर होय.

* यासाठी पिकाच्या टप्प्यानुसार आणि किडीनुसार किटकनाशकाची फवारणी आणि इतर पद्धतीचा अवलंब करून कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

रस शोषणाऱ्या किडी व व्यवस्थापन:

१) तुडतुडे

* या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो.

* सर्वात जास्त प्रादुर्भाव ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो.

* अधूनमधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण या किडीच्या वाढीला पोषक आहे.

* या बरोबरच कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो.

* सद्यपरिस्थितीत बीटी कपाशीवर तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची तीव्रता खूप वाढली आहे. याचे प्रमुख कारण आहे, निओनिकोटीनॉईड गटातील किटकनाशकाचा (उदा. इमिडाक्लोप्रीड) अति वापर होय. तुडतुड्यांमध्ये या किटकनाशकाबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे.

* तुडतुड्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने राहून रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात. पाने आकसतात व नंतर कडा तपकिरी किंवा लालसर होतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास झाडची संपूर्ण पाने तपकिरी होतात.

२) फुलकिडे : फुलकिडे पावसाळ्याच्या शेवटी आणि लांब उघाड पडली तर मोठ्या संख्येत वाढतात आणि सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात उग्र रूप धारण करतात.

* मागील ४ - ५ वर्षापासून फुलकिड्यांचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर जास्त प्रमाणात वाढत आहे.

* प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेश शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने व कळ्या आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात.

३) पांढरी माशी :

* पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो व नंतर नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव आढळून येतो.

* सध्या बीटी कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीच्या काळातील रासायनिक किटकनाशकांचा अतिरेकी वापर हे प्रमुख कारण आहे. यामुळे पांढऱ्या माशीचा कपाशीवर वारंवार पुर्नउद्रेक होत आहे.

* पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ढिसूळ होऊन शेवटी वाळतात.

* याशिवाय पिल्ले त्यांच्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व त्यावर बुरशी वाढून काळसर होते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडावर विपरित परिणाम होतो. त्याबरोबर काही विषाणूचा प्रसारासुद्धा या माशीमुळे होतो.

४) मावा :

* मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो.

* कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो.

* सर्वात जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर - जानेवारी महिन्यात आढळून येतो.

* रिमझिम पाऊस आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असते. परंतु जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते.

* माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

* याशिवाय माव्याने शरीरातून बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात.

* पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत. तसेच काही विषाणूंचा प्रसार माव्यामार्फत केला जातो. ५) पिठ्या ढेकूण :

* पिठ्या ढेकूण या नवीन किडीचा प्रादुर्भावही कापूस पिकावर आढळून येत आहे.

* महाराष्ट्रात २००७ व २००८ मध्ये पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. सध्या ही कीड काही शेतामध्येच थोड्या फार प्रमाणात आहे. ही कीड नियंत्रित राहण्यामध्ये या किडीचे नैसर्गिक शत्रू (उदा. प्रोम्युसिडी, अनॅसियस, अनॅगायरस) यांची महत्त्वाची भूमिका आहे.

* पिठ्या ढेकणाची प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने, कोवळे शेंडे, पाते, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे तांची वाढ होत नाही. हे ढेकूण त्यांच्या शरीरातून चिकट द्राव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर बुरशीची वाढ होते व त्याचा झाडावर विपरीत परिणाम होतो. बोंडे फुटल्यानंतर रुईवर बुरशी वाढून प्रत खालावते.

बोंडअळ्या : बीटी कापशीमुळे बोंडअळ्याचे नियंत्रण चांगल्याप्रकारे झाले आहे. पण मागील दोन वर्षापासून एक जनूक असलेल्या (बीजी - १) बीटी कपाशीच्या वाणावर शेंदरी आणि अमेरिकन बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.

१) अमेरिकन बोंडअळी :

* ही बहुभक्षी कीड असून विविध पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

* बीटी कपाशीमुळे या किडीचे नियंत्रण झाले आहे पण भविष्यात या किडीमध्ये बीटी बद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.

* अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरुवातीस कोवळी पाने, कळ्या, पाते, फुले यावर उपजिविका करते. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंडे खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात.

* सततचे पावसाळी वातावरण, ७५% पेक्षा जास्त हवेतील आर्द्रता, कमी सूर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक आहेत.

२) शेंदरी बोंडअळी:

* शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो.

* सध्या बीटी कपाशीवर विशेष करून एक जनुक असलेल्या वाणावर शेंदरी बोंडअळी आढळून येत आहे.

* उष्ण व ढगाळ हवामानात थोडा पाऊस आल्यास अळीची वाढ झपाट्याने होते.

* अळी कळ्या, फुल किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.

३) ठिपक्याची बोंडअळी

* या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळ्यात शिरून व नंतर बोंडात शिरून त्यांचे नुकसान करते.

* कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर - फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.

इतर किडी :

१) तंबाखुवरील पाने खाणारी अळी.

* ही कीड विविध पिकावर जगणारी असून केव्हातरी पण मोठ्या प्रमाणात येते.

* सध्या बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

* सुरूवातीच्या काळात अळ्या समूहाने राहून पानाच्या मागील हिरवा भाग खरवडून खातात. नंतर एकएकट्या राहून संपूर्ण पाने खातात. फक्त मुख्य शिरा व उपशिर तेवढ्याच शिल्लक ठेवतात. ही अळी फुले, कळ्या व बोंडावर सुद्धा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करतात.

२) पाने पोखरणारी अळी.

* ज्या शेतामध्ये वेलवर्गीय भाजीपाला घेतल्यानंतर कपाशीची लागवड केली जाते. अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो.

* या किडीची आली पानाच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी आकराच्या रेषा दिसतात.

३) तांबडे ढेकूण :

* ही कीड वर्षभर कार्यक्षम असते, पण सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये अधिक कार्यरत असते.

* प्रौढ ढेकूण व पिल्ले सुरुवातीला पानातील, कोवळ्या शेंड्यातून रस शोषण करतात. पक्व बोंड आणि उमलेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषण करतात.

४) करडे ढेकूण :

* ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते.

* प्रौढ व पिल्ले अर्धवट उमललेल्या बोंडातील, सरकीतील रस शोषून घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते व बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना ही ढेकणे चिरडून रुईवर डाग पडतात.

५) लाल कोळी :

* लाल कोळी किटकाच्या तुलनेने वेगळे असतात. त्यांना आठ पाये असतात.

* पिल्ले व प्रौढ कोळी कोवळ्या पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानावर फिकट पांढरट पिवळे चट्टे पडतात, नंतर पाने तपकिरी होऊन वाळतात.

* सध्या लाल कोळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून येत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

* बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक किटकनाशकांचाच वापर न करता मशागतीय, यांत्रिक, जैविक पद्धतीचा वापर करावा.

तसेच गरज पडल्यास आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

आर्थिक नुकसानीची पातळी:

कीड   आर्थिक नुकसानीची पातळी 
तुडतुडे   २ ते ३ पिल्ले/ पान  
फुलकिडे   १० फुलकिडे/पान  
पांढरी माशी  ८ ते १० प्रौढ माशा किंवा १० पिल्ले/पान  
मावा   १५ ते २०% प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा/पान  
पिठ्या ढेकूण   ५ ते १० % प्रादुर्भावग्रस्त झाडे  
बोंडअळ्या   ५ ते १० % प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले अथवा बोंडे किंवा
८ ते १० पतंग / सापळा सलग ३ दिवस.  


बी. टी. कपाशीवरील कीड व्यवस्थापनाचे टप्पे पेरणीपुर्वी:

* हंगाम संपल्यानंतर काडीकचरा वेचून नष्ट करावा.

* उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.

पेरणी करतेवेळी :

* बीजप्रक्रिया : बियाण्यास इमिडाक्लोप्रीड किंवा थायामिथॉक्झाम ७० डब्ल्यू. एस. ५ - ७ ग्रॅम प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे सुरुवातीला १५ ते २० दिवस रस शोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण मिळेल.

० - ४० दिवस :

संभाव्य प्रमुख किडी :

* मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण * रस शोषण करणाऱ्या किडीसाठी अॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अॅसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे किंवा.

* फोरेट १० जी किंवा फिप्रोनील ०.३ जी दाणेदार १० किलो/ हेक्टर याप्रमाणे जमिनीत ओल असताना झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने द्यावे.

* पहिली फवारणी जेवढी लांबता येईल, तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्रकिटकांचे संवर्धन होईल.

* निओनिकोडीनॉईड गटातील कीटकनाशके विशेषकरून इमीडाक्लोप्रीडचा वापर करू नये. तसेच मित्रकिटकांना हानिकारक किटकनाशकांची फवारणी टाळावी.

४० - ६० दिवस

*संभाव्य प्रमुख्य किडी : तुडतुडे , फुलकिडे, पिठ्या ढेकूण

* व्हर्टीसिलीयम लिकॅनी या बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा.

थायमिथॉक्झाम २५ टक्के २.५ ग्रॅम किंवा असिटामिप्रीड २० टक्के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* सुरुवातीच्या काळातील दुय्यम किडी जसे करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी , पाने गुंडाळणारी अळी, ऊंटअळ्या, केसाळ अळ्या इत्यादी कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यासाठी किटकनाकाची फवारणी करू नये.

६० - ८० दिवस :

संभाव्य प्रमुख किडी : फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी

* फिप्रीनील ५ टक्के २० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.

८० - १०० दिवस :

संभाव्य प्रमुख किडी : फुलकिडे, पांढरीमाशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, अमेरिकन बोंडअळी

* ५ टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल ५० मिली किंवा अझाडिरॅक्टीन १०००० पीपीएम १० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे किंवा.

* रस शोषण करणाऱ्या किडीसाठी बुप्रोफेझीन २५ टक्के १० मिली किंवा डायफेनथ्युरॉन ५० टक्के १२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

१०० दिवसाच्या पुढे:

संभाव्य प्रमुख किडी : पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, अमेरिकन व शेंदरी बोंडअळी

* रस शोषण करणाऱ्या किडीसाठी अॅसिफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के हेक्टर १० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* अमेरिकन बोंडअळीसाठी स्पिनोसॅड ४५ टक्के ४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

* शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यास थायोडीकार्ब ७५ टक्के २० ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

* गुलाबी बोंडअळीसाठी पीक १२० ते १३० दिवसाचे झाल्यावर ट्रायकोग्रामाटॉंयडिया बेक्ट्री या परोपजीवी

गांधीलमाशीच्या अंड्याचे कार्ड (१.५ लाख अंडी / हे) पिकावर लावावेत.

कपाशीच्या विविध टप्प्यानुसार फवारणीसाठी कीटकनाशके

कालावधी   कीड   कीटकनाशक   प्रमाण/१० लि. पाणी  
० - ४०   मावा, तुडतुडे, पिठ्या ढेकूण   अॅसिफेट ७५ एसपी किंवा   २० ग्रॅम  
फोरेट १० जी   १० कि./हे.  
४० - ६०   तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण   व्हर्टीसिलीयम लिकॅनी   ४० ग्रॅम  
थायामिथॉक्झाम २५ डब्ल्यूजी किंवा   २.५ ग्रॅम  
अॅसिटामिप्रीड २० एसपी   २ ग्रॅम  
६० - ८० फुलकिडे, तुडतुडे, पंढरी माशी   फिप्रोनील ५ एससी किंवा   २० मि.लि.  
लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी   ८ मि.ली.  
८० -१००   फुलकिडे, पांढरी माशी,
तुडतुडे, पिठ्या ढेकूण,
अमेरिकन बोंडअळी  
निंबोळी अर्क   ५ टक्के  
निंबोळी तेल   ५ टक्के  
आझाडिरॅक्टीन ३००० पीपीएम   २५ मिली  
आझाडिरॅक्टीन १०००० पीपीएम   १० मिली  
फुलकिडे पांढरी माशी,
तुडतुडे, पिठ्या ढेकूण  
बप्रोफेझीन २५ एससी   २० मिली  
डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यूपी   १२ ग्रॅम  
१०० पुढे   पांढरी माशी, तुडतुडे
पिठ्या ढेकूण  
अॅसिफेट ५० टक्के +
इमिडाक्लोप्रीड १.८ एसपी  
२० ग्रॅम  
ट्रायझोफॉस ४० ईसी   ३० मिली  
  अमेरिकन बोंडअळी   स्पिनोसॅड ४५ एसपी   ४ मिली  
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी   ४ ग्रॅम  
प्रोफेनोफॉस ५० ईसी   २० मिली  
  शेंदरी बोंडअळी   थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी   २० ग्रॅम  
लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी   १० मिली  


वरील किटकनाशकांची मात्रा साध्या पंपासाठी आहे. पवार पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

लागोपाठ एकाच किटकनाशकाची फवारणी करू नये.

अशाप्रकारे पिकाच्या विविध टप्प्यानुसार आणि किडीनुसार योग्य किटकनाशकाची निवड करावी.