दगड खाणीतील साचलेल्या पाण्यावर सितारा मिरची, वांगी, बांधावरील 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून चांगले उत्पन्न व पैसे

श्री. शशिकांत शामराव पायगुडे,
मु. पो. वाघोली (भावडी रोड), ता. हवेली, जि. पुणे
मोबा. ९९२१९४९६५९



मला शेतीतील अनुभव फारसा नाही, मात्र शेतीची फार आवड असल्याने शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पिके घेत असतो. २ वर्षापुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे ऑफिसवरून मार्गदर्शन घेऊन "सिद्धीविनायक" शेवग्याची ५० रोपे बांधाने लावली आणि मध्ये जमिनीत भाजीपाला पिके थोड्या - थोड्या प्रमाणात करू लागलो.

बांधावरील ५० 'सिद्धीविनायक' शेवगा ४०० किलो शेंगा, ८ ते १० हजार रू.

या शेवग्याला ६ - ७ महिन्यात शेंगा चालू झाल्या या शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून ९ ते १० किलो शेंगा मिळाल्या. त्याला २२ ते २५ रू. /किलो भाव त्यावेळी मिळाला ५० झाडांपासून साधारण एका वर्षात ४०० किलो शेंगा मिळाल्या आहेत. असे या बांधावरील ५० झाडांपासून वर्षाला ८ ते १० हजार रू. गेली २ वर्षे मिळत आहेत.

या अनुभवावरून जानेवारी २०१३ मध्ये पुन्हा 'सिद्धीविनायक' शेवग्याची २०० झाडे ७ x ७ फुटावर लावली. आम्ही शेतीत नवीनच असल्याने बांधाने लावलेल्या झाडांचे छाटणीचे तंत्र जमले नाही. नाहीतर अजून उत्पादनात वाढ झाली असती. चालू शेवग्याला मात्र वेळोवेळी छाटणी केली. त्यामुळे सध्या ६ महिन्यात ५ - ६ फुटाची मर्यादित उंची व घेर डेरेदार ७ x ७ फुटावरील लागवडही दाट वाटते असा आहे. फुलकळी ४ थ्या महिन्यात लागली. सध्या झाडांवर भरपूर फुलकळी व लहान - लहान २० - २५ शेंगा लागल्या आहेत.

५०० वांग्याच्या रोपापासून ५॥ ते ६ हजार २०० सितारा मिरचीपासूनही ५ ते ६ हजार

या शेवग्यात शेवग्याबरोबरच जानेवारीत २०० सितार मिरचीची रोपे आणि ५०० वांग्याची रोपे नर्सरीतून आणून लावली होती. त्या दोन्ही पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ - ३ फवारण्या केल्या होत्या. तेवढ्यावर हिरव्या काटेरी वांग्यापासून आठवड्याला ५० किलो माल निघत होता. गावातच हात विक्री करणाऱ्यांना ठोक १२ ते १५ रू. / किलो भावाने देत. वांगी २ महिने चालली. ८ - १० तोडे झाले. या वांग्यापासून ५॥ - ६ हजार रू. झाले. तर सितारा मिरची १० - १२ दिवसाला १० ते १५ किलोपर्यंत निघत होती. साधारणपणे एकूण २०० किलो मिरची निघाली असेल. त्यापासूनही ५ - ६ हजार रू. चे उत्पन्न मिळाले.

एकूण ५ एकर क्षेत्र असून त्यातील ३ एकरमध्ये स्टोन क्रशरची खाण आहे आणि उर्वरीत २ एकरमध्ये शेती करतो. ही खाण खोदल्यामुळे क्वॉरी खड्ड्यात पाणी साठते. त्या पाण्यावर ठिबक व स्प्रिंक्लर करून शेती करतो. उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरी शेवग्याच्या सावलीला असलेल्या मिरचीची झाडे हिरवीगार व मिरच्याही (माल) टवटवीत मिळत होत्या. त्यामुळे असे आढळले की शेडनेटच्या खर्चापेक्षा सेवग्याच्या सावलीत ही भाजीपाला पिके चांगली येतात.

या अनुभवावरून आमचे जावई (मुरूम ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) १ एकर 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीस उत्सूक झाले. त्यांच्यासाठी आज (२८ जून २०१३) ८ पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे बी व शेवगा पुस्तक (७० रू.), कृषी मार्गदर्शिका (३० रू.) घेतली आहे.

आता सध्या शेतीत जून २०१३ मध्ये लावलेला भुईमूग अर्धा एकर, मूग अर्धा एकर, तूर १० गुंठे वर उल्लेख केलेल्या शेवग्याची २०० झाडे आहेत.

डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचा सुगंधा कढीपत्ता १० झाडे लावली आहेत. ती ३ फुटाची झाली आहेत. बांधाने १०० तैवान पपईची झाडे लावलेली आहेत. ती ५ - ६ महिन्याची आहेत. झेंडू १०० रोपे लावली आहेत. त्यापासून ४ - ५ किलो फुले मिळतात. माझ्याकडे सर्वप्रकारची औधोगिक शेती औजारे आहेत. गुजरातचा महान पॉवर टिलर आहे. त्यामुळे बैलाची गरज राहत नाही.

आमचे स्वत: चे डंपर, जेसीबी असल्याने उन्हाळ्यात तलावातील गाळ उपसून या २ एकर जमिनीत भरला आहे. भावाचा म्हशींचा तबेला आहे. त्यामुळे शेणखतही १२ - १५ डंपर टाकले आहे.