कापसावरील विविध किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस हे एक भारतातील महत्त्वाचे पीक आहे. देशातील एकूण कृषी उत्पन्नाच्या २८.८% वाटा हा कपाशीचा आहे. परंतु असे असताना या पिकाच्या उत्पादनात घट येण्यात किडीचा प्रादुर्भाव ही एक जटील समस्या शेतकऱ्यांना कायम भेडसावत असते. कपाशीवर भारतात १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर महाराष्ट्रात २५ प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यापैकी १० ते १२ किडी ह्या कपाशीचे जास्त प्रमाणात नुकसान करतात. बी. टी. कपाशीमुळे कपाशीच्या क्षेत्रात व उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे. बी. टी. कपाशीवरील बोंडअळ्यांच्या फवारण्यांचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरिता पिकाच्या अवस्थेनुसार आणि किडीनुसार फवारणी व व्यवस्थापनाची आवश्यकता आहे.

* रस शोषणाऱ्या किडी:

१) मावा : मावा किडीचा पौढ लांबट असून, रंगाने पिवळसर ते गडद, हिरवा किंवा काळा आणि १ ते २ मिलीमिटर लांब असतो. या किडीच्या वर्षभरात अनेक पिढ्या निर्माण होतात. मावा किडीच्या पोटातील वरच्या भागावर दोन सुक्ष्म नलिका असून त्याद्वारे ही कीड चिकट, गोड द्रव बाहेर टाकते. हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात. ह्या मुंग्यांच्या पाठीवर पिल्ले बसून ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात. मावा कीड अंडी घालत नाही. तिचे प्रजनन संयोगाशिवाय होत असते. माद्या बिना पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात. एक मादी दररोज ८ ते २२ पिल्लांना जन्म देते.

पिल्ले ४ वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात. ७ ते ९ दिवसात मावा किडीची पूर्ण वाढ होऊन प्रौढ मावा १५ ते २१ दिवस जगतो. वर्षभरात १२ ते १४ पिढ्या उपजतात.

थंड हवामान आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीस पोषक असल्याने अशा वातावरणात मावा किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. प्रामुख्याने पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव आढळतो. कोरडवाहू कपाशीमध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेतील प्रादुर्भाव हा डिसेंबर - जानेवारी या थंडीमध्ये आढळतो. ज्याप्रमाणे थंड हवामान आणि अधिक आर्द्रता या किडीचा वाढीस पोषक ठरते. तसे जोराचा पाऊस झाला की मात्र मावा किडी घुवून जातात व त्यांची संख्या कमी होते.

माव्यामुळे होणारे नुकसान : पिल्ले व प्रौढ किडी पानांच्या खालच्या बाजूने आणी कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रस शोषतात. अशी पाने कमजोर होऊन आकसतात व मुरडतात. पानांचा रंग फिक्कट होतो. झाडाची वाढ खुंटते. मावा शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकतो. त्यामुळे पानाचा भाग चिकट बनतो. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानांवर काळा थर जमा होतो. परिणामी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो. माव्याचा प्रादुर्भाव शेवटच्या अवस्थेत झाल्यास बोंड उमलण्यात अडथळा येतो.

२) तुडतुडे : तुडतुडे हे फिक्कट हिरव्या रंगाचे प्रौढ किटक २ ते ४ मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्यांच्या समोरच्या पंखावर प्रत्येकी १ काळा ठिपका आणि डोक्याच्या भागावर २ काळे ठिपके असतात. ते पानांवर तिरकस चालतात. मादी पानांच्या शिरेमध्ये १ - १ पिवळी अंडी घालते. एक मादी ३० ते ४० अंडी घालते. अंडी घालण्यासाठी ३५ ते ४० दिवसांच्या कपाशीची पाने आवडतात. ४ ते ११ दिवस अंडी अवस्था राहते. पिल्ले पानांच्या खालील पृष्ठभागावरून रस शोषतात व २१ दिवसांत त्यांची वाढ पूर्ण होते. मादीशी संगम झालेले तुडतुडे उन्हाळ्यात ५ आठवड्यापेक्षा व हिवाळ्यात ७ आठवड्यापेक्षा अधिक काळ जगत नाहीत.

तुडतुड्यामुळे होणारे नुकसान : पौढ तुडतुडे व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने रस शोषतात आणि पानांच्या पेशीत ओली विषारी लाळ टाकतात. त्यामुळे पाने कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. प्रादुर्भाव वाढल्यास पाने लालसर होऊन कडा मुरगळतात. पानांचा रंग बदलून पाने वाळू लागतात व गळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांवरील फुलांची व बोंडांची संख्या घटते. कापसाचे एकूण उत्पादन कमी, वजन कमी भरून कापसाची प्रत ढासळते. ही कीड पानांच्या शिरेमध्ये सुईसारखी सोंड खुपसून पानांतील रस शोषते.

या किडीचा प्रादुर्भाव जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. तो साधारण १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात फैलावतो. मधून - मधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण या किडीच्या वाढीस पोषक ठरते. त्याचबरोबर कपाशींची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो. अलिकडच्या काळात बी.टी. कपाशीवरही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी सप्तामृतासोबत स्प्लेंडर २०० ते २५० मिली/१०० लि. पाण्यातून प्रादुर्भाव जाणवताच ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारावे.

३) फुलकिडे : फुलकिडे हे अत्यंत लहान असतात. ते भिंगाच्या सहाय्याने पहावे लागतात. त्याची लांबी १ मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही थोडी कमी व पिवळसर रंगाचे असतात. यातील पिवळसर रंगाच्या फुलकिड्यांना 'क्रॅक्लीनिओन शुल्टझी' म्हणातात. तर दुसऱ्या प्रकारातील काळ्या रंगाचे जे फुलकिडे असतात. त्याला 'कॅलिओथ्रिप्स इंडिकस' असे म्हणतात.

मादी कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूने त्यांच्या पेशीत अंडी घालते. काळ्या फुलकिड्यांमुळे झाडांच्या खालच्या पानांवर वरच्या बाजूने अतिशय पांढरे ठिपके पडतात. तर पिवळसर पांढऱ्या रंगाच्या फूल किड्यांमुळे खालच्या बाजूने पाने काळपट तर वरच्या बाजूने कोकडल्यासारखी व कडक होतात. पानांचे बारकाईने निरिक्षण केल्यास त्यावर काळ्या रेघा किंवा जळाल्यासारख्या भाग दिसतो. कोरडवाहू परिस्थितीत अधिक तापमान, कमी पाऊस किंवा पावसाची उघडीप असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

फुलकिड्यांमुळे होणारे नुकसान : या किडीचे पौढ व पिले पानांच्या मागील भाग खरवडून त्यात निघणारा रस शोषतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात. झाडांची वाढ खुंटते. ह्या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या शेवटी आणि उघडीप पडल्यावर वाढतो. सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात तर रुद्र रूप धारण करतो. अलिकडच्या ४ - ५ वर्षात बी टी कापसावरही या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

४) पांढरी माशी : कापसाच्या कोवळ्या पानांवर खालच्या बाजूने पांढरी माशी अंडी घालते. अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानांवर चिकटतात. अंडी जास्त घातलेली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. पौढ माशी लहान असून २ ते ३ मि.मी. लांब असते. पांढऱ्या माशीची पिल्ले पानांतील रस शोषून तेथेच कोषावस्थेत जातात. कोषावस्था २ ते ८ दिवस असते. पांढऱ्या माशीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास हवामानानुसार १४ ते १०७ दिवस लागतात.

पांढऱ्या माशीमुळे होणारे नुकसान : पांढऱ्या माशीची पिल्ले तसेच पौढ पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषतात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडून पान जळाल्यासारखे दिसते. शेवटी पाने वाळून गळून जातात. पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. पाने व झाड चिकट व काळसर होते आणि झाडाची वाढ खुंटते. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो तो नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

नियंत्रण : पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सप्तामृतासोबत सप्लेंडर २५० मिली १०० ते १५० लि. पाण्यातून फवारावे तसेच आलटून पालटून कडू निंबाचे तेल आणि निंबोळी अर्क प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारावे. त्यामुळे मावा, तुडतुडे, फुलकिड्यांचादेखील बंदोबस्त होतो.

५) पिठ्या ढेकूण : या किडीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी कपाशीवर आढळणारी पिठ्या ढेकणाची फेनोकोकस सोलेनोप्सीस ही प्रजात आहे. या जातीचे शरीर लांबट गोलाकार व रंग हिरवट काळा असतो. या किडीच्या शरीरावर चिकट, मेणचट पांढऱ्या रंगाचे अवरण असते. पिठ्या ढेकणाची एक मादी साधारणत: १५० ते ६०० अंडी घालते. ती पुंजक्यात असतात व त्याभोवती कापसासारखे पांढरे अवरण असते. पिठ्या ढेकणाचा जीवनक्रम १५ ते २७ दिवसांचा असून एका वर्षामध्ये १५ पिढ्या तयार होतात.

पिठ्या ढेकणापासून होणारे नुकसान : पिठ्या ढेकणाची पिल्ले व पौढ ही दोन्ही अवस्थेतील कीड कपाशीची पाने, कोवळे शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषतात. त्यामुळे तो भाग सुरुवातीला सुकून नंतर वाळून जातो. हे ढेकूण आपल्या शरीरातून मेणचट गोड रस स्त्रवतात. त्यावर बुरशी वाढून झाडे फिक्कट आणि काळपट पडतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते व झाडे वाळून जातात. या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात २००७ - २००८ या वर्षी मोठ्या प्रमाणात झाला होता.

पुढे या किडीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक शत्रू उदा. प्रोम्युसिडी, अनॅसियस, अनॅगायरस यांचा वापर केला गेल्याने अलिकडे या किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणातच आढळतो.

* कापसावरील बोंड अळी : या बोंड अळीमध्ये ३ प्रकार आढळून येतात.

१) अमेरिकन बोंडअळी : ही बहुभक्षी कीड असून कापसाप्रमाणेच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करते. बी.टी. कपाशीमुळे या किडीचे नियंत्रण झाले आहे. असे जरी असले तरी भविष्यात ह्या किडीमध्ये बी.टी. ला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होऊ शकते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी सुरूवातीला कोवळी पाने, कळ्या, पाती, फुले यांवर तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून जातात किंवा पावसाच्या पाण्याने झाडावरच सडतात. सततचे पावसाळी वातावरण, हवेत ७५% पेक्षा जास्त आर्द्रता, कमी सुर्यप्रकाश या बाबी या किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.

२) शेंदरी बोंडअळी : या बोंड अळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो. सध्या बी.टी. कपाशीवर विशेषेकरून १ जनुक असलेल्या वाणावर शेंदरी बोंडअळी आढळून येते. उष्ण व ढगाळ हवामानात थोडा पाऊस असल्यास अळीची वाढ झपाट्याने होते. अळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र पाडून आत शिरते. प्रादुर्भाव ग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेल्या पाती, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.

३) ठिपक्याची बोंडअळी : या किडीची अळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलोऱ्यावर येताच ती कळ्यांत शिरून नंतर बोंडात शिरून त्याचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो.

कापसावरील इतर किडी :

१) तंबाखूवरील पाने खाणारी अळी : ही कीड विविध पिकांवर जगणारी असून सध्या बीटी कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरूवातीच्या काळात अळ्या समुहाने राहून पानांचा मागील भाग खरवडून खातात. त्यानंतर एकएकट्या राहून संपुर्ण पाने खातात. पानांच्या फक्त शिरा व उपशिराच तेवढ्या शिल्लक ठेवतात. ह्या अळ्या फुले, कळ्या व बोंडावरसुद्धा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करतात.

२) पाने पोखरणारी अळी : ह्या किडीचा प्रादुर्भाव हा ज्या शेतात अगोदरचे वेलवर्गीय पीक आहे आणि त्यानंतर कपाशी लावली आहे. तेथे आढळून येतो. ह्या किडीची अळी पानांच्या आत शिरून हिरवा भाग खाते. त्यामुळे पानांवर नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.

३) तांबडे ढेकूण : ही कीड वर्षभर कार्यरत असते, मात्र सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. पिल्ले व प्रौढ ढेकूण सुरूवातीच्या अवस्थेत पानांतून, कोवळ्या शेंड्यातून रस शोषतात. नंतर पक्व बोंड व उमललेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषतात.

४) करडे ढेकूण : करडे ढेकूण ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते. प्रौढ व पिल्ले अर्धवट उमललेल्या बोंडातील सरकीतील रस शोषूण घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते. बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना हे ढेकून चिरडून रुईवर डाग पडतात.

५) लाल कोळी : ही कीड इतर किटकांपेक्षा वेगळी असते. रंगाने लालसर असून त्यांना आठपाय असतात. पिल्ले व पौढ कोळी कोवळ्या पानातील रस शोषतात, त्यामुळे पानांवर फिक्कट पांढरे, पिवळे चट्टे पडतात. पुढे पाने तपकिरी होऊन वाळतात. अलिकडे या किडीचादेखील प्रादुर्भाव काही ठिकाणी भेडसावट आहे.

* एकात्मिक कीड व्यवस्थापन : किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक किटकनाशकांचाच वापर न करता मशागतीय, यांत्रिक, जैविक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणाचे संतुलन राखून माहित असलेल्या कीड नियंत्रणाच्या निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करणे. जेणे करून हानीकारक किडी आटोक्यात आणता येऊन पर्यावरणाचा समतोल साधता येतो.

ह्या पद्धतीमुळे पीक संरक्षण होऊन ते आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. रासायनिक किटकनाशकांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम कार्यक्षमरित्या कमी होऊ शकतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती:

१) मशागतीय पद्धत : मशागतीय पद्धतींना एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचे स्थान असून त्या बिनखर्चाच्या किंवा कमी खर्चाच्या असतात. यांचा वापर योग्यवेळी व विशिष्ट प्रकारे केल्यास अतिशय फायदेशीर ठरते.

२) त्याकरिता कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर शेतातील पऱ्हाट्या उपटून शेताबाहेर काढाव्यात. म्हणजे झाडावरील रोग - किडींच्या अवस्था नष्ट होतील.

३) शक्य असल्यास जमिनीची खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीतील किडींच्या अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपतील.

कपाशीची धसकटे व इतर पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. म्हणजे त्यावरील किडींची अवस्था नष्ट होईल.

४) कपाशीचे तंतूविरहीत बियाणे पेरणीसाठी वापरावे.

५) कापूस पिकाची योग्य फेरपालट करावी

६) कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी. डी. एच. वाय २८६, पी के व्ही हाय २. पी के व्ही हाय या पानांवर लव असलेल्या जाती तुडतुड्यांना प्रतिकारक आहेत.

७) माती परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून २ ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य ठेवून अधिकतम नत्राचा वापर टाळावा. म्हणजे पिकाची प्रमाणापेक्षा दाटी होणार नाही, म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.

८) कपाशीत चवळीचे आंतरपीक घ्यावे. म्हणजे कपाशीवरील किडींचे शत्रु किटकांचे चवळीवर पोषण होईल. तसेच आंतरमशागतीच्या पद्धतीने शेत सतत तण विरहीत ठेवावे. म्हणजे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल.


९) कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी पक्षीथांबे उभारावेत. त्यावर चिमण्या, निळपक्षी, मैना, कावळे, कोतवाल असे पक्षी बसून शेतातील अळ्या/किडी टिपतील .

२) यांत्रिकी पद्धत : बोंड अळ्यांसाठी कपाशीच्या शेतात फेरोमेन सापळे लावून त्यात जमा होणारे नर पतंग दररोज काढून मारावेत.

पिवळ्या पत्र्याचे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत. याकरिता टिनच्या पिवळ्या पत्र्याच्या डब्यावर तेल किंवा ग्रिस लावून ते शेतात लावावेत. म्हणजे डब्याला माशा चिकटून अडकून राहतात व मरतात. चिकटलेल्या माशा पुसून घेऊन डब्यांना पुन्हा तेल लावून ठेवावे.

१) प्रादुर्भाव ग्रस्त गळलेली पाने, पात्या आणि लहान बोंडे जमा करून नष्ट करावीत.

२) गुलाबी बोंडअळीग्रस्त डोम कळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.

३) हिरव्या बोंड अळीच्या अळ्या मोठ्या झालेल्या असल्यास त्या वेचून माराव्यात.

) जैविक पद्धत : कापसावरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा अवास्तव वापर केल्याने मित्र किटकही मारले जातात. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडतो. जैविक नियंत्रणासाठी उपयोगी असणारे निवडक परोपजीवी, भक्षक किटक, विषाणू आणि जिवाणू प्रयोगशाळेत वाढविता येतात. त्यांचा वापर किडीच्या नियंत्रणासाठी करता येते.

ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाचा, क्रायसोपा बी.टी. या जिवाणूचा वापर करता येतो.

ट्रायकोग्रामा: ट्रायकोग्रामाची माशी अति सुक्ष्म असते. ती दुसर्‍या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते. त्यामुळे अंडी अवस्थेतच या किडींचा नायनाट होतो. असे ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ट्रायकोकार्ड आपणाला विकत मिळू शकतात. एका कार्डवर ४०,००० अंडी असतात आणि १ कार्ड १ एकरसाठी पुरेसे होते. कपाशीच्या शेतात बोंड अळ्यांची अंडी दिसू लागल्यावर किंवा उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी या पट्ट्या लावाव्यात. या पट्ट्यावरील अंड्यातून ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचा प्रौढ बाहेर पडून बोंडे अळ्यांच्या अंड्यांचा शोध घेतो व त्यात आपली अंडी घालतो. अशा तऱ्हेने अंडी अवस्थेत बोंड अळ्यांचा नायनाट होतो.

क्रायसोपा : क्रायसोपाची अळी ही मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच बोंड अळ्यांची अंडी व त्याच्या लहान अळ्या भक्षण करते. क्रयासोपाचा पतंग पोपटी हिरवा व निळसर झाक असलेला असतो. मादी पतंग कपाशीच्या पानांवर किंवा देठावर एके - एक अशी अंडी घालते. अंडे हिरव्या रंगाचे असून पांढर्‍या तंतुच्या टोकावर चिकटलेले राहते. या अंड्यातून ४८ तासात अळी बाहेर पडते व भक्षाच्या शोधात फिरते. अळी अवस्था १५ ते २७ दिवसांची असते. क्रायसोपाची अंडी हेक्टरी १० हजार या प्रमाणात कपाशीच्या शेतात एकसारख्या प्रमाणात पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यावर ३० दिवसच्या अंतराने २ वेळा सोडवीत.

एच. एन. पी. व्ही. विषाणू : घाटे अळीचा विषाणू हा एच. एन. पी. व्ही. या नावाने ओळखला जातो. एच. एन. पी. व्ही. ची पहिली फवारणी हेक्टरी २५० ते ५०० एल. इ. या प्रमाणात हिरव्या बोंडअळीच्या अगदी लहान अळ्या दिसू लागताच करवी. या १० लिटर फवारणीच्या द्रावणात १ ग्रॅम राणीपाल टाकावे. हे फवारणीयुक्त खाद्य अमेरिकन बोंडअळीने खाल्ल्यानंतर अळीला व्हायरोसीस नावाचा रोग होऊन अळी झाडाला उलटी लटकून मरते. महत्त्वाचे म्हणजे एच. एन. पी. व्ही. इतर मित्रकिटकांना अपायकारक नाही.

एच. एन. पी. व्ही. मुळे फक्त अमेरिकन बोंडअळीचेच नियंत्रण करता येते. बी.टी. या जीवाणुमुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण करता येते.

लेडी बर्ड बीटल : लेडी बर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्यान मावा किडीवर जगतात. लेडी बर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबूळकी असून समुहामध्ये पण उभी घातलेली असतात. याची अळी ६ ते ७ मि.मी. लांब असून रंगाने करडी व त्यावर पांढुरके ठिपके असतात. प्रौढ अवस्थेतील लेडी बर्ड बीटल हे तुरीच्या दाण्यासारखे पण खालून चपटे व फुगीर असतात. रंग पिवळसर, बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असातात. काही प्रजातीमध्ये पंखावरील रेषा किंवा ठिपके नसतात. अळी प्रती दिवशी २५ मावा तर प्रौढ भुंगा ५० -५५ मावा खाऊ शकतो. पिकावर मावा किडीसोबत लेडी बर्ड बीटल जास्त आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर पूर्णपणे टाळावा.

सीरफीड माशी : ही देखील मित्रकीडी असून मावा किडीचा भक्षक किटक आहे. सीरफीड माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडील भाग टोकदार असतो. या अळीला पाय नसतात. दिवसभरात सर्वसाधारणपाने एक अळी १०० मावा कीड खाते. या किटकाची माशी घरातील माशीसारखीस असून पाठीवर लाल पिवळे काळे पट्टे असातात. माशीचे डोके लालसर रंगाचे असते.

पेंट्याटोमीड ढेकूण : हे ढेकूण ढालीच्या आकाराचे काळपट काथ्याच्या रंगासारखे असून कापूस पिकावर सर्वत्र पाहायला मिळतात. ओरिअस ढेकूण हे छोटे काळपट रंगाचे असून त्यांना सोंड असते. हे ढेकूण फुले तसेच पानांच्या बेचक्यात आसतात. हे ढेकूण आपली सोंड अमेरिकन बोंडअळी, उंटअळी तसेच इतर अळ्यांच्या शरीरात खुपसून शरीरातील द्रव शोषूण घेतात. त्यामुळे अळ्या मरतात. पेट्याटोमीड ढेकणाची पिल्ले पिवळसर चकचकीत रंगाची असून ती लहान अळ्यांच्या शरीरात आपली सोंड खुपसून आतील द्रव शोषूण घेतात.

४) कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप फेरोमोन्स म्हणजे काय ?

किटक आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारची रसायने / रसायनांची मिश्रणे बाहेर टाकतात व रसायनांच परिणाम त्यांच्याच प्रजातीतील बंधावामध्ये होऊन त्यांच्या विशिष्ट प्रतिकिया निर्माण होतात. थोडक्यात अशी रसायने संदेश वहनाचे काम करतात. यांनाच 'फेरोमोन्स' असे म्हणतात. किटकांच्या शरीरात अत्यंत अल्प प्रमाणात अशी फेरोमोन्स उपलब्ध असतात. वातावरणात ती फारच अस्थिर असतात. दुसर्‍या संयोगामध्ये (पदार्थामध्ये) त्यांचे चटकन रूपांतर होते. फेरोमोन्स अनेक रासायनिक संयोगाच्या मिश्रणातून तयार झालेले असल्यामुळे, त्यांचे गुणधर्म ओळखणे आणि तशाच प्रकारची फेरोमोन्स कृत्रिमरित्या तयार करणे ही मोठी अवधड, कष्टप्रद, आणि खर्चिक बाब आहे, स्वजातीय किटकांवर फेरोमोन्सचे जे परिणाम, प्रतिक्रिया दिसून येतात, यावरून त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. उदा. ऐक्य, मार्गदर्शन, विखुरणे, लिंगविषयक, अंडी घालणे आणि भिती इत्यादी. आपल्याला अनेकदा मुंग्या एका मागोमाग चालताना दिसतात, तर हे केवळ फेरोमोन्सपैकी लिंग विषयक संदेश देणारे फेरोमोन्स कीड व्यवस्थापनात जास्त उपयुक्त आहेत.

फेरोमोन्सचे कार्य : बहुतांशी मादी नराला आकर्षित करण्यासाठी आपल्या शरीरातून फेरोमोन्स रसायने सोडतात, तर काही प्रजातीमध्ये नर आपल्या शरीरातून हे फेरोमोन्स मादीस आकर्षित करण्यासाठी सोडतो. त्यामुळे दोन्ही लिंगी किडी एकत्र येऊन समागम साधू शकतात. फेरोमोन्स परिणाम फक्त स्वजातीय किटकांवरच होतात. विरुद्ध लिंगीय उमेदवार आकर्षिण्यासाठी वातावरणात सोडावी लागणारी मात्र आश्चर्यकारक आणि महत्त्वपुर्ण असतो.

फेरोमोन्सचे उपयोग : कीड व्यवस्थापनात फेरोमोन्सचा उपयोग तीन प्रकारे करण्यात येतो -

१) सापळ्याद्वारे किडींचे संनियंत्रण करणे,

२) मोठ्या प्रमाणावर किडी सापळ्यात पकडणे, आणि

३) किटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे.

मोठ्या प्रमाणात किडी पकडणे : फेरोमोन्सचा वापर करून कीड नियंत्रण होऊ शकेल का ? यावर बरेचसे संशोधन झाले आहे. किडींचे प्रमाण ज्या वेळी कमी असते, अशाच वेळी त्यांना पकडण्यासाठी फेरोमोन्सचा मोठ्या प्रमाणावर चांगला उपयोग होतो, असे संशोधनावरून दिसून आले आहे. साधारणपणे जो भाग किडग्रस्त नसतो, त्या ठिकाणी सुरुवातीला किडींचे प्रमाण कमी असते, अशा वेळी फेरोमोन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर किटक पकडले जाऊ शकतात. जेणेकरून त्यांचे प्रमाण खूपच कमी करता येते. हंगामाच्या सुरुवातीस फेरोमोन्स सापळ्याद्वारे मोठ्या प्रमाणात किडी पडदाल्यास त्यांची संख्या मर्यादित ठेवता येते.

फेरोमोन ट्रॅपचा वापर : कपाशीवरील बोंड अळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी असे फेरोमोन ट्रॅप्स कपाशीच्या शेतात लावावेत. हे ट्रॅप लावताना ते पिकापेक्षा १ फूट उंच असावेत. ठिपक्याच्या बोंड अळीसाठी व्हीटल्युर, अमेरिकन बोंडअळीसाठी हेक्झाल्युर आणि गुलाबी बोंडअळीसाठी गॉसीप्ल्युर याप्रमाणे ज्या त्या बोंड अळीसाठी ते ते फेरोमोनमध्ये बसवावेत. एकाच प्रकारच्या दोन फेरोमोन ट्रॅप्सूमधील अंतर ५० मीटर ठेवावे. प्रत्येक बोंडअळीसाठी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन ट्रॅप्स लावावेत. या फेरोमोन ट्रॅप्समध्ये त्या त्या बोंडअळीचे जर पतंग आकर्षिले जाऊन त्यामध्ये अडकून पडतात. अडकून पडलेले नर दररोज काढून मारून टाकावेत. या फेरोमोन ट्रॅप्समध्ये प्रत्येकी कमीत कमी ८ ते १० नर पतंग सतत २ ते ३ दिवस दररोज सापळ्यात आढळून आल्यास त्या त्या बोंडअळीसाठी नियंत्रणाची उपाययोजना करावी.

५) वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर : कडुनिंबामध्ये असणार्‍या कीड प्रतिबंधक अनके घटकामुळे भक्षणरोधक, भक्षणप्रतिसारक, वासप्रतिसारक, प्रजनन रोधक गुणधर्म आढळत आहेत. त्यामुळे कीड आटोक्यात आणण्यासाठी कडुनिंबाल अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ५% निंबोळी अर्काची फवारणी कपाशीवरील बोंड अळीसाठी परिणामकारक ठरल्याचे आढळले आहे. निंबोळी अर्काचा परोपजीवी व परभक्षी किटकांवर विपरीत परिणाम होत नाही. याशिवाय निंबोळी अर्क घरच्या - घरी तयार करता येत असल्याने शेतकर्‍यांना निंबोळी अर्काचा वापर करणे किफायतशीर ठरते.

५% निंबोळी अर्क तयार करण्यासाठी ५ किलो वाळलेल्या निंबोळ्या फवारणीच्या आदल्या दिवशी बारीक कुटून हा कुट १० लि. पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव. अधून - मधून ते ढवळावे. सकाळी निंबोळी अर्काचे द्रावण वस्त्रगाळ करून कापडाची पुरचुंडी चांगली पिळून घ्या. जेणेकरून जास्तीत - जास्त अर्क निघेल. या अर्कात २०० ग्रॅम साबणाचा चुरा किंवा निरमा पावडर टाकून ढवळावे. त्यानंतर या द्र्वाणात पाणी टाकून संपूर्ण द्रावण १०० लि. तयार करावे. अशाप्रकारे तयार केलेल्या निंबोळी अर्काची बोंडअळ्यांचा नियंत्रणासाठी फवारणी करावी. यामध्ये किटकनाशकाची अर्धी मात्र मिसळलयास अधिक प्रभावी नियंत्रण होते.

डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर :

डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा पुढील प्रमाणे सुरूवातीपासूनच वापर करणे कीड - रोगच्या बंदोबस्ताबरोबरच उत्पादन व दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

* बीजप्रक्रिया : १ किलो बियाण्यास १ लि. पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात बियाणे ३ ते ४ तास भिजत ठेवून नंतर सावलीत सुकवावे. नंतर प्रोटेक्टंट पावडर २५ ते २० ग्रॅम बियाण्यास चोळून लागवडीसाठी बी वापरावे.

जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे बियाची कमी दिवसात चांगल्याप्रकारे उगवण होऊन पीक पाण्याचा पावसाचा काही प्रमाणातील ताण सहन करते. त्यामुळे पाण्याचा थोडा ताण जरी पडला तरी रोपे तग धरतात. कपाशीचे रोपातील मर (फ्युजेरियम वील्ट) होत नाही. प्रोटेक्टंटमुळे कापसाची कीड प्रतिकारशक्ती वाढते.

* सप्तामृत फवारणी :

१) पहिली फवारणी -(उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) - २५० मिली जर्मिनेटर + २५० मिली कॉटनथ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + १०० मिली प्रिझम + १०० मिली हार्मोनी + १०० मिली स्प्लेंडर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० लि. पाणी.

२) दुसरी फवारणी - (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी)- ५०० मिली जर्मिनेटर + ५०० मिली कॉटन थ्राईवर + ५०० मिली क्रॉंपशाईनर + २५० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली प्रिझम + २५० मिली हार्मोनी + २५० मिली स्प्लेंडर + १०० लि. पाणी.

३) तिसरी फवारणी - (उगवणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) - ७५० मिली कॉटन थ्राईवर + ७५० मिली क्रॉंपशाईनर + ३०० मिली राईपनर + ५०० मिली न्युट्राटोन + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ३०० मिली हार्मोनी + ३०० ते ४०० मिली स्प्लेंडर + २०० लि. पाणी.

४) चौथी फवारणी - (उगवणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी ) - १ लि. कॉटन थ्राईवर + १ लि. क्रॉंपशाईनर + ७५० मिली राईपनर + ७५० मिली ते १ लि. न्युट्राटोन + ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मिली हार्मोनी + ५०० मिली स्प्लेंडर + २५० लि.पाणी.
५) पाचवी फवारणी - (उगवणीनंतर ९० ते १०५ दिवसांनी ) - १। लि. कॉटन थ्राईवर + १।। लि. क्रॉंपशाईनर + १ ते १। लि. राईपनर + १ ते १। लि. न्युट्राटोन + ५०० मिली हार्मोनी + ५०० मिली स्प्लेंडर + ३०० लि.पाणी.

* फरदड घेण्यासाठी वरील फवारणी क्रमांक ३ ते ५ या ३ फवारण्या सुरूवातीचा कापूस वेचण्या संपत आल्यावर दर १५ दिवसांनी घ्याव्यात.

* कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर : बी लावतेवेळी प्रत्येक बियाजवळ २५ ते ५० ग्रॅम गाडून द्यावे. त्यानंतर पहिली खुरपणी झाल्यावर चहाच्या कपाएवढे खोडाजवळ (एकरी १५० ते २०० किलो) गाडून द्यावे.

कल्पतरू खतामुळे जमीन भुसभूशीत राहून आवर्षण भागात कमी पाण्याच्या उपलब्धतेत हवेतील गारवा मुळाजवळ खेचून गारवा निर्माण होतो. जारवा वाढतो. जमिनीतील हवा, पाणी, अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राहतो. जमिनीची भौतिक सुपिकता वाढून पोत सुधारतो. पांढरी मुळी पाण्याचा शोध घेत पुढे चाल करते.

अधिक माहितीसाठी आपल्याजवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून कापसाचे पान, फुलपात्या, बोंड दाखवून त्यानंतर योग्य मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.