व्यवहारातील करता येण्यासारखे जैविक उपया !

श्री. कौस्तुभ नंदकुमार वडनेरे, मु.पो. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे
मोबा. ९८२२०४८३०३



आमची केशर आंब्याची २००७ मधील ५०० झाडे आहेत. या झाडांना सुरूवातीपासून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतो. उत्पादन चांगले मिळते. मात्र या वर्षी काही झाडांच्या शेंड्याकडील फांद्या मधेच वाळतात. पानांवर टोकदार उंचवटे तयार होतात. अशा वाळलेल्या फांद्या व पाने सरांना दाखवायला आणली होती. तेव्हा याचे निरीक्षण केल्यावर सरांनी सांगितले, जेथे पानथळ जमीन आहे किंवा जेथे सुर्यप्रकाश कमी आहे किंवा झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत अशा पक्षांची विष्ठा खालच्या पानांवर पडून हे व्रण (पानांवरील टोकदार उंचवटे) आले असावेत. यासाठी प्रथम तुम्ही माती परिक्षण करून घ्या. म्हणजे त्याचे योग्य निदान करता येईल.

आंब्याला वाळवी लागत आहे. यासाठी सरांना विचारले असता सरांनी सांगितले, "आंब्याच्या खोडाला प्रत्येकी एक किलो चुना, गेरू, मोरचुद व प्रोटेक्टंट २० लि. पाण्यात काळवून कुंच्याने वर्षातून ३ वेळा लावला पाहिजे. पहिल्यांदा मृग हा ७ ते २२ जून असा असतो. तेव्हा त्यापुर्वी म्हणजे ४ जूनला ही पेस्ट लावावी. दुसऱ्यांदा श्रावणी पोळा झाल्यावर पेस्ट लावावी आणि तिसऱ्या वेळेला आंब्याला मोहोर साधरणत: डिसेंबरमध्ये येतो तेव्हा त्यापुर्वी लावावी. खोडाला पेस्ट लावताना त्यामध्ये खराब झालेले गोडेतेल मिसळावे. त्याने मिश्रण खोडाला चांगले चिकटते. तसेच तेलकटपणामुळे किडीला चालण्यास अडथळा येतो. गेरू (काव) वापरताना तो बारीक खड्यासारखा, लिंबू, संत्र्याच्या आकाराचा न घेता २५० ते ३५० ग्रॅमचे ओबड- धोबड आकाराचे खडे जसे चांगल्या भट्टीत भाजलेल्या विटेचा जसा विटकरी रंग असतो तशा रंगाचा वापरावा. चुना हा जो कबड्डी, हॉलीबॉल, बॅडमिंटनच्या ग्राउंडला जो फकीत वापरला जातो. तो धुसर असतो. तो पाण्यात टाकल्यावर पाण्याचे बुडबुडे येणारा असावा.

अशा चुन्याचा वापर पेस्टसाठी वापरावा. मात्र कळीचा चुना शेतकऱ्यास परवडणार नाही. तेव्हा तो न वापरता असा पण स्वच्छ पांढरा (डोंगा मारतात) असा दुय्यम पण स्वच्छ पांढरा (डोंगा मारतात असा) चुना वापरावा.

पाणी देताना वाळवी प्रतिबंधासाठी प्रोटेक्टंट चमच्याने वाहत्या पाण्यात आळ्यात विसकटून द्यावे. एक वर्षाच्या आतील झाडास १ काडीपेटी प्रोटेक्टंट २।।' - ३' त्रिज्येच्या आळ्यात द्यावे. २ - ५ वर्षाच्या झाडांना ३' ते ३।।' त्रिज्येत आळ्यात ५ काडीपेटी देणे. १० वर्षाच्या झाडाला ५' ते ५।।' त्रिज्येत १०० ग्रॅम प्रोटेक्टंट देणे. ५० ते ७० वर्षाच्या झाडास प्रोटेक्टंट २५० ग्रॅम देणे. त्यामुळे सुत्रकृमी, वाळवी, हुमणीचा (प्रतिबंधात्मक) त्रास कमी होतो. प्रत्येक वर्षाला आळे करताना आळ्याची रुंदी व उंची वाढविणे.

हुमणीच्या प्रादुर्भावावर सरांनी सांगितले, हुमणीचा प्रादुर्भाव हा जेव्हा खत कच्चे असते, कच्चे खत शेतात पसरविले जाते किंवा कचऱ्याचे अथवा दुभत्या म्हशीच्या गोठ्यातील वाया गेलेला चारा मुत्रात भिजलेला खड्ड्यात साठविला जातो अशा खताचा वास हुमणीला आवडतो. त्यावेळेस हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो. याचे नियत्रण कसे करावे? हे सरांनी थोडक्यात सांगून सविस्तर विवेचन कृषी मार्गदर्शिकेत (पान नं. १३ व १४ ) केल्याचे सांगितले. हुमणीचा जेथे मोठ्या प्रमाणात उपद्रव असतो, तेथे उंदराची पिल्ले खाण्यासाठी मोठे साप टपलेले असतात आणि ही हुमणीची आळी ओल्या निवडलेल्या कोळंबीच्या आकाराची असते तिला साप खातात, असे पाहण्यात आले आहे. अशाप्रकारे सापांपासून उंदरांचा व हुमणीचादेखील नाश होतो. तेव्हा साप ही शेतकऱ्याचा मित्र आहे त्याला मारू नये.

बऱ्याचा वेळा पावसाळा सुरू होता होता गोगलगाई बाहेर येतात. त्या कोवळ्या पिकांचे शेंडे, बारीक नवीन गोड मुळे, नर्सरीतील रोपे कुरतडून प्रचंड नुकसान करतात, तेव्हा कळीच्या चुन्यासारखा चुना घेऊन साधारण तीन इंच रुंदीच्या अशा चुन्याच्या दाट पट्ट्या रोपांच्या मांडणीच्या चोहोबाजूने माराव्यात म्हणजे गोगलगाईची वाट बंद होते व चुना हा उष्ण असल्याने व गोगलगाई चालताना तिची खालची मऊ बाजू चुन्यास लागल्याने तिला भाजल्याची संवेदना होते व ती तिकडे फिरकत नाही. हा प्रयोग सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वारंवार करणे गरजेचे आहे.

सुत्रकृमीवर सरांनी सांगितले की, कोकणात मोठ्या प्रमाणात बागा असतात. या चिकणमातीत हार्ड पॅन बनल्याने पाण्याचा निचरा होत नाही. अशा पानथळ जमिनीत सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच देशावरही डाळींबाच्या, द्राक्षाच्या व इतर बागांवर हा सुत्रकृमीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. प्रोटेक्टंटचा जर वेळोवळी वापर केला तर सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच सुत्रकृमीसाठी सापळा पीक म्हणून बागेत झेंडूची लागवड करावी. सर, आपल्या तंत्रज्ञानाने उत्पादन छान मिळाले. एकूण ५०० झाडे आहेत. त्यापैकी २५० ते ३०० झाडे चालू आहे. त्यापासून ७ टन उत्पादन मिळाले. मात्र एकावेळी एकदम ७ टन माल मार्केटला आणला तर सरसरी २८ रू. किलो भाव मिळाला. हा खूपच कमी भाव असल्याने हातात फक्त १.५ लाख रू. आले. तेव्हा मार्केटिंग चा प्रश्न गहन आहे. यावर सरांनी सांगितले, "आपण आंबा घेताना २०० रू./किलोने घेतो. मात्र शेतकऱ्याचा माल विकायचा असतो तेव्हा कवडीमोल भावाने विकावा लागतो. यावर आम्ही केलेला प्रयोग असा की, आमचा हापूस, केशर, गावठी हापूस या जातीचा आंबा काढला तेव्हा पुणे मार्केटमधील व्यापाऱ्यांनी ३० ते ३२ रू. डझनचा भाव सांगितल्यावर आम्ही त्यांना आंबा न देता हे अर्धवट पिकलेले आंबे सुरुवातीला भेट दिले. ते लोक सांगतात असा आंबा आम्ही कधीच खाल्ला नाही. तेव्हा तो पुन्हा पुन्हा मागू लागले, हे आंबे आम्ही सुरुवातीला १०० रू. डझनने विकले नंतर ८० रू. डझनने विकले, असा प्रयोग आपण करावा. जे शेतकरी धोरणी, चौकस, चपळ, चतूर आहेत असे शेतकरी अशाप्रकारेच मार्केटींग करून आपल्या दर्जेदार मालापासून चांगले पैसे मिळवर आहेत. या पद्धतीने डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून खडकवासाला धरणाकाठच्या खिरीट या शेतकऱ्याने स्वत:चे मार्केट उभे केले. त्याने अप्रतिम माल पिकविल्याने त्याची काकडी घेण्यास आजूबाजूचे लोक व केवटे आकृष्ट झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर येऊन चांगला भाव देऊन माल विकत घेतला कारण त्यांना गिऱ्हाईकांनी चांगला भाव दिला. सरांनी खिरीटच्या शेताला भेट दिली तेव्हा खिरीटने (एम.ए.) एक किस्सा सांगितला की माझी काकडी विकायला घेऊन जाताना जर अशिर झाला तर डेक्कन जिमखाण्यावर काकडी विकणारे जीप आली नाही. म्हणून फोन करतात, जेव्हा वाटेवर आहे असे सांगतो तेव्हांचा जीव भांड्यात पडतो. कारण त्यांच्या दुकानावर काकडी घेण्यासाठी लोक या काकडीची वाट पाहतात. त्या घटनेवरूनच त्यांना शेतात मार्केट उभे करण्याची कल्पना सुचली. (संदर्भ : कृषी विज्ञान जुलै २०१५ पान २५ वरील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञान जगभरातील शेतकऱ्यांसाठी वरील फोटो)

आंबे पिकविण्यासाठी गव्हाच्या काडाचा वापर करावा. कारण भाताच्या काडापेक्षा गव्हाच्या काडाला जास्त उब असते. २- ३ इंचाचा भुसा व्यवस्थित खाली आंथरून त्यावर आंब्याची आढी लावून त्यावर काडाचा एक ते दोन इंच थर लावावा. तळाला जर ४ इंचाचा थर लागला तर जागेवरच आंबे सडतात. तसेच आढीला पश्चिमेकडील ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. या उन्हापासून बचाव करण्यासाठी पश्चिमेकडे वाया गेलेल्या फ्लेक्सचा वापर करावा. जे शेतकरी आंबे पिकविण्यासाठी लाकडी पेट्या वापरतात. त्या पेट्यांना ३ पट्ट्या असतात. या प्रत्येक पट्टीमध्ये गॅप असते, त्यामुळे हवा खेळती राहते. त्या पेट्यात आडवे काड पसरलेले असते. त्यामुळे उभी आडवी हवा खेळती राहते. चारही बाजूने हवा पास होते. अशाप्रकारे पेट्या भरल्यावर ५ - ६ दिवसात आंबा पिकतो.