सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सोयाबीन हे भारतातील तेलबिया पिकांपैकी एक प्रमुख तेलबिया पीक असून भुईमूग पिकानंतर क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत याचा नंबर लागतो. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे प्रमुख तेलबिया पीक आहे. चांगले उत्पादन व भाव यामुळे सोयाबीन खालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. विदर्भ, मराठवाड्यामधेतर हे मुख्य पीक झाले आहे. मात्र अलिकडे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादकतेत प्रचंड घट येऊ लागली आहे. तेव्हा या पिकांवरील किडींचा वेळीच बंदोबस्त करणे फार महत्त्वाचे आहे. तेव्हा शेतकर्यांनी सतर्क राहून त्याचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

* सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडी :

अ) खोड पोखरणाऱ्या किडी : या प्रकारात प्रामुख्याने खोडमाशी व चक्री भुंगा या दोन किडी आढळून येतात.

१) खोडमाशी : खोड पोखरणाऱ्या खोडमाशीची काळ्या रंगाची पौढ मादी माशी झाडाच्या देठावर व पानांवर फिकट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून २ ते ७ दिवसात पांढऱ्या रंगाची पाय नसलेली अळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग पोखरून खाते. परिणामी झाडाला अन्नद्रव्ये न मिळाल्याने झाड वाळते. या किडीचा प्रादुर्भाव झाला असता ३० ते ३५% पर्यंत नुकसान होऊ शकते.

उपाय : सोयाबीन पिकाची बारकाईने पाहणी करून छिद्र असलेली कीडग्रस्त झाडे आढळल्यास फेनव्हरलेट (२०%) १०० मिली किंवा क्विनॉलफॉस (२५%) २०० मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० ई.सी.) १५० मिली किंवा अॅसिफेट (७५%) १५० ग्रॅम अशा रासायनिक किटकनाशकांची १०० लि. पाण्यातून फवारणी करावी.

सेंद्रिय किटकनाशक म्हणून स्प्लेंडर २०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारणी खोडमाशीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते. असा मराठवाडा, विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

२) चक्रीभुंग : या कडीची अळी पिवळसर पांढरी, गुळगुलीत, बिनपायाची असून तिच्या डोक्याकडील भाग जाड असतो. पुर्ण वाढलेली अळी १९ ते २२ मिमी लांब असते. चक्री भुंगेरा फांदी, देठ व मधल्या पानाच्या देठावर २ चक्राकाप तयार करतो व मधल्या भागात ३ छिद्र पाडून मादी त्यापैकी एका छिद्रात अंडी घालते. परिणामी चक्राचा वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करते. कीडग्रस्त झाड सुरुवातीला इतर झाडांसारखेच दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्री भुंग्यामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्यांच्या संख्येत आणि वजनात ५० ते ६०% पर्यंत घट येऊ शकते.

उपाय : सोयाबीन पिकात फुलोऱ्यापुर्वी ३ ते ५ चक्रीभुंगे प्रति मीटर ओळीत आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी आहे असे समजावे. अशी परिस्थिती जाणवताच फेनव्हरलेट (२०%) १०० मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० ई. सी.) १५० मिली या रासायनिक किटकनाशकांची १०० लि. पाण्यातून फवारणी करावी. अथवा स्प्लेंडर या सेंद्रिय किटकनाशकाची (१५० मिली/१०० लि. पाणी) प्रतिबंधक म्हणून फवारणी करावी.

ब) पाने खाणाऱ्या अळ्या : या प्रकारात हिरवी उंट अळी, केसाळ अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी ह्या किडी येतात.

१) हिरवी उंट अळी : या किडीचे मादी पतंग सतत ५ दिवस दररोज ४० अंडी रात्रीच्यावेळी पानाच्या मागील पृष्ठभागावर घालते. २ - ४ दिवसात अंड्यातून निघालेली फिकट हिरव्या रंगाची ही अळी शरीराचा मधला भाग उंच करून चाटते. उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यानंतर सर्व भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. अळ्या फुलांचे व शेंगांचे प्रचंड नुकसान करतात.

उपाय : पिकाची बारकाईने पाहणी करून २ - ४ अळ्या आढळताच क्लोरोपायरीफॉस (२०%) २०० मिली किंवा क्विनॉलफॉस (२५%) २०० मिली या रासायनिक औषधांची १०० लि. पाण्यातून त्वरित फवारणी करावी. अथवा स्प्लेंडर २०० ते २५० मिली/१०० लि. पाण्यातून फवारावे.

२) केसाळ अळी : केसाळ अळीचे मादी पतंग पानांच्या मागील बाजूस पुंजक्यात समांतर ओळीत ४१५ ते १२४० एवढ्या मोठ्या प्रमाणता अंडी देऊ शकते. अळीची दोन्ही टोके काळी तर मधला भाग मळकट पिवळा असतो. शरीरावर दाट नारंगी केस असतात. या अळ्या पानांच्या मागील बाजूस राहून अधाशीपणे त्यातील हरितद्रव्ये खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे फक्त खोडच शिल्लक राहिल्याचे पाहवयास मिळते.

उपाय : किडीचा प्रादुर्भाव जाणवताच क्लोरोपायरीफॉस (२०%) २५० मिली किंवा फेनव्हरलेट (२०%) ५० मिली किंवा स्प्लेंडर २०० ते २५० मिली/१०० लि. पाण्यातून फवारावे.

३) तंबाखूची पाने खाणारी अळी : या किडीला शास्त्रीय भाषेत "स्पोडोप्टेरा लिटूरा' म्हणतात. बहुजातीय पिकाचे नुकसान करणाऱ्या या किडीचा सोयाबीन पिकावर ऑगस्ट महिन्यात प्रादुर्भाव आढळतो. ही कीड मळकट पांढरट हिरवी व थोडीशी पारदर्शक असते. शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. या अळीची मादी पतंग पानांवर पुंजक्यात ३०० ते ४०० अंडी घालते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानांचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडावर पानेच शिल्लक राहत नाहीत.

उपाय : पीक फुलोऱ्यात येण्यापुर्वी आळ्यांचा प्रादुर्भाव जाणवताच क्विनॉलफॉस (२५%) २०० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस (२०%) २०० मिली किंवा प्रोफेनोफॉस (५०%) २५० मिली किंवा स्प्लेंडर २५० मिलीची प्रती १०० लि. पाण्यातून फवारणी करावी.

क) रस शोषण करणाऱ्या किडी :

१) मावा : सोयाबीनवर आढळणारी मावा ही कीड अर्धगोलाकार हिरव्या रंगाची असून मुख्यत: पानाखाली व खोडावर बसून रस शोषण करते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट पदार्थ स्त्रवत असल्यामुळे पानावर काळी बुरशी वाढून पानातील प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते तसेच यातील की प्रजातींमुळे सोयाबीन मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रसार होऊन पिकाचे अतोनात नुकसान होते.

२) तुडतुडे :ही कीड हिरव्या रंगाची २.५ मिमी लांब पाचरीच्या आकाराचे असून ते चालताना तिरपे चालतात. पिल्ले व प्रौढ तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूने पानांच्या खालच्या पेशींतील रस शोषण करतात. शरीरातील विषारी द्रव्य पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडून वरील बाजूकडे वक्र होतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे २० ते ३५% उत्पादनात घट येऊ शकते.

३)पांढरी माशी: रस शोषण करणाऱ्या गटातील ही एक महत्त्वाची कीड आहे. पौढमाशी १ ते २ मिमी आकाराची फिक्कट रंगाची असून तिच्या पंखावर पांढर मेणचट थर असतो. पांढऱ्या माशीचे पौढ व पिल्ले पानांच्या मागील बाजूस राहून पानांतील रस शोषण करतात. परिणामी पिकांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुले व शेंगासुद्धा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ सोडते. त्यावर काळी बुरशी वाढून झाडाच्या अन्न तयार करण्याच्या पक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयाबीनच्या मोझॅक रोगाचा देखील प्रसार करते.

उपाय : रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.

डायमेथोएट (३०% प्रवाही) १०० मिली किंवा मिथील डिमेटोन (२५%) १०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारावे किंवा वरील किडींच्या नियंत्रणासाठी अथवा प्रतिबंधक उपया म्हणून डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारणीमध्ये स्प्लेंडर पुढीलप्रमाणे फवारावे. म्हणजे कीड नियंत्रणाबरोबरच रोगांचेही नियंत्रण होऊन दर्जेदार अधिक उत्पादन हमखास मिळेल.

डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली. + थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + स्प्लेंडर १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) :जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ३०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) :थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि.पाणी.

* सोयाबीन वरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :

१) सोयाबीन पेरणीपुर्वी उन्हाळ्यात खोल नांगरट करावी.

२) मृगाचा चांगला पाऊस झाल्याबरोबर लवकर पेरणी करावी.

३) पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या पुरक खाद्य वनस्पतींचा नाश करावा.

४) आंतरमशागत, निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.

५) नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.

६) खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव आढळताच कीडग्रस्त झाडे, फांद्या पानाच्या देठाच्या आतील अळीसह नष्ट कराव्यात.

७) खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाडे मरतात. अशी झाडे गोळा करून नष्ट करावीत.

८) रासायनिक औषधे फवारण्यापुर्वी ५% निंबोळी अर्क आणि स्प्लेंडरची सप्तामृताबरोबर फवारणी करणे फायदेशीर ठरते.

कोणतीही फवारणी करताना प्रथम औषध पुर्णपणे कालवून (ढवळून) घ्यावे. फवारणीही झाडांच्या वरून व पानांच्या खालील बाजूनेदेखील व्यवस्थित होईल याची दक्षता घ्यावी.