मिरी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारत हे मिरीचे मूळस्थान असून इ.स. पूर्वी चौथ्या शतकापासून मिरी हे मसाल्याचे पीक म्हणून लागवडीखाली असल्याचा उल्लेख थिओ फ्रास्ट ह्या शास्त्रज्ञाने केला आहे. पैसा मिळवून देणाऱ्या पिकांपैकी मिरी हे एक महत्त्वाचे पीक आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला इंडोनेशिया, मलाया आणि अतिपूर्वेकडील देशांत मिरीची लागवड सुरू झाली. तोपर्यंत जागतिक बाजारपेठेत मिरी उत्पादनामध्ये भारताचा प्रथम क्रमांक होता. इ.स. १९४० पासून मिरीला वाढते बाजारभाव मिळू लागले. तेव्हापासून मिरी उत्पादकांनी मिरीचे जास्तीत जास्त उत्पान करण्याकडे अघिक लक्ष पुरविले. गेल्या संपुर्ण शतकात मिरी उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते.

क्षेत्र व उत्पादन : भारतात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व पांडेचरी या प्रदेशात मिरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. एकून उत्पादनाच्या ९७% उत्पादन एकट्या केरळ राज्यात होते. केरळ राज्यात मिरीचे ५०% उत्पादन परसबागेत होते. पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये थोड्या प्रमाणात मिरीची लागवड केली जाते. कन्नोर जिल्ह्यातील उत्तर घाटापासून दक्षिणेकडील त्रावणकोरपर्यंत मिरीची लागवड केली जाते, सिलोन, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्निओ आणि सयाम बेटामध्येसुद्धा मिरीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात रत्नागिरी व कुलाबा जिल्ह्यात मिरीच्या स्थानिक जातीची लागवड तुरळक प्रमाणात केली जाते.

वनस्पती शास्त्रीयदृष्टिकोन: मिरी हे मरीच कुल (Piperaceae) ह्या वनस्पतीकुलातील पीक असून वनस्पतीशास्त्रात पायपर नायग्रम ह्या नावाने ओळखले जाते. मिरीच्या वेलची तुलना बऱ्याच अंशी विड्याच्या पानांच्या वेलाबरोबर केली जाते. विड्याच्या वेलाप्रमाणेच मिरीच्या वेलालासुद्धा आधार द्यावा लागतो. मिरीचा वेळ सतत हिरवा राहणार असून त्याला पेरी (कांड्या) असतात. प्रत्येक पेरावर आधारासाठी तंतुमुळे फुटतात. पेरावर जमिनीला समांतर वेळ फुटतात. परंतु त्यांची लांबी मात्र फारशी नसते. मिरीच्या वेलाची पाने आकाराने निरनिराळ्या जातीत भिन्न असतात. पानाचा आकार मध्यम, रुंद किंवा अरुंद असतो. मिरीची पाने सर्वसाधारणपणे विड्याच्या पानाप्रमाणे रुंद वाढलेला वेल झुडुपाप्रमाणे दिसतो आणि त्याचा घेर साधारणत: १२० ते १५० सें.मी. इतका असतो. मिरीची फुले रंगाने मळकट पांढरी असून फुलाच्या गुच्छा ची लांबी वेगवेगळ्या जातीनुसार ५ सें.मी. ते १२ सें.मी. पर्यंत असते. नर वेलावरील फुलोरा शोभादायक असतो. वेलावरील संकर नैसर्गिकरित्या होत असतो. त्यामुळे फळधारणेत तफावत पडते आणि शेवटी तयार होणारी फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. फळे तयार होण्यासाठी २७५ दिवस लागतात. प्रत्येक फळात एकाच बी असते. फळ तयार होतात फळांचा रंग गडद नारंगी किंवा लाल होतो. मिरीच्या काही जातींमध्ये फल तयार झाले की ते गळून जमिनीवर पडते. परंतु बऱ्याचशा जातींमध्ये मिरीचा संपुर्ण गुच्छ पक्व होऊन जमिनीवर पडतो. मिरीच्या एका गुच्छामध्ये जातीनुसार साधारणत: २० ते ८० फळे असतात.

हवामान : समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीच्या भूभागात मिरीचा लागवड केली जाते. उष्ण हवामानाच्या देशात हे पीक चांगले टिकाव धरू शकते. मिरीला दमट हवामान चांगले मानवते. २५० सें.मी. पावसाच्या प्रदेशात मिरीचे पीक चांगले येते. मिरीचे पीक केवळ पावसावर वाढत असल्यामुळे पावसाने ताण दिल्यास आणी हंगाम कोरडा गेल्यास मिरीच्या पिकांवर आणि शेवटी उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. त्यासाठी पाण्याची पाळी आवश्यकतेनुसार देता यावी, अशी सोय असावी. मिरीला १६ डी. सें. ते ३८ डी. सें. इतके तापमान मानवते.

जमीन: सेंद्रिय खतांचे भरपूर प्रमाण असलेली चांगली कसदार, गाळाची आणि पोयट्याची उत्तम निचरा होणारी जमीन पिकाच्या लागवडी साठी चांगली असते. मिरीची लागवड मुख्य पीक म्हणून किंवा कॉफी, सुपारी, चहा ह्यांसारख्या पिकात मिश्रपीक म्हणून केली जाते. मिरीच्या बागा डोंगरमाथ्यावर असल्यास दक्षिणेकडील उतार सहसा टाळतात, कारण अशा भागात उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणे मिरीच्या पिकाला सहन होत नाहीत. कोकणात टेकड्यांच्या उतारावर लालसर रेताड (लॅटेराइट) जमिनीत हे पीक घेतले जाते.

मिरीच्या जाती :

१) कारी मोराटा : ही काळी मिरी प्रकारातील जात असून वेलावर आखूड आणि वक्र घड असतात. फळे आकाराने लहान व लाल रंगाची असतात. पानांचा रंग गडद हिरवा असून वेलीवर फक्त मादीफुले असतात. वेलीवर फळे एकाच वेळी तयार होत असून मध्यम उत्पादन देणारी जात आहे.

२) अरिसिना मोराटा : ही काळी मिरी प्रकारातील जात असून करी मोराटा जातीप्रमाणेच घड आखूड व वक्र असतात. फळे आकाराने लहान व लाल रंगाची असतात. वेलीवर सर्व मादीफुलेच असतात. ही मध्यम उत्पादन देणारी जात असून फळे एकाच वेळी तयार होतात.

३) माली गेसारा : ही देखील काळी मिरी प्रकारातील जात असून पाने रुंद असतात. घड १० सेंमी लांब असून पक्व झालेल्या फळांचा रंग लाल असतो. वेलीवर सर्व मादीफुले असून चांगले उत्पदान देणारी जात आहे.

४) कळू व्याली : ही जात काळी मिरीची असून पाने लाल असतात. या जातीच्या वेलीवर नर, मादी अशी दोन्ही प्रकारची फुले येतात. मलबार किनाऱ्यावर भरपूर उत्पादन देणारी जात आहे.

५) तफीसारा : ही पांढऱ्या मिरीची जात असून पाने रुंद व घड आकाराचे असतात. या जातीच्या वेलीवर दोन्ही प्रकारची फुले येत असून फळे लाल रंगाची असतात. मध्यम उत्पादन देणारी जात आहे.

६) बाकाळ मोराटा :ही पांढरी मिरी असून या जातीच्या झाडांची पाने लांब व फिक्कट हिरवी असतात. घड २० फळांचे असतात. वेलावर फक्त मादी फुले असतात. मात्र या जातीच्या मिरीच्या घडातून पक्व झालेली फळे सुटी होऊन गळून पडतात.

७) दोडगा : ही पांढऱ्या मिरीची जात असून पाने रुंद व घड वक्र आकाराचे असतात. या जातीच्या वेलीवर दोन्ही प्रकारची फुले येत असून फळे लाल रंगाची असतात. मध्यम उत्पादन देणारी जात आहे.

ह्या जातींशिवाय केरळ राज्यात बालनकोटा, कारीमुंडा, कन्याकडन ह्या जाती लागवडीखाली आहेत. केरळमधील मिरी संशोधन केंद्र तालीपरंबा येथे चेरीयाकानियाकादन व उथीरामकोता या दोन जातींचा संकर करून पन्नीयूर -१ नावाची नवीन जात शोधून काढली आहे. पूर्ण वाढ झालेल्या ह्या जातीच्या एका वेळापासून ७ किलो मिरीचे पीक मिळते. ही जात इतर जातींपेक्षा तीन पट अधिक उत्पन्न देते. कारी, माली गेसारा इ. जाती कर्नाटक राज्यात प्रचलित आहेत. मिरीच्या वेलावर मादी फुले किंवा नरफुले आढळतात. तरीपण काही जातीच्या वेलावर दोन्ही प्रकारची फुले आढळून येतात. अशा मिरीच्या जाती अधिक उत्पन्न देतात.

पूर्व मशागत : बागेसाठी बागेची निवड केल्यावर ३ मी. x ३ मी. अंतरावर खड्डे घेऊन त्यामध्ये आधारासाठी एप्रिल - मे महिन्यात झाडे किंवा खांब लावावे लागतात. आधार म्हणून लावावयाची झाडे सरळ आणि भरभर वाढणारी असावीत, म्हणून मिरीची नवीन बाग करण्यासाठी ददम किंवा रेशमी सावलीची झाडे लावतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यात मिश्रपीक घेतल्यास सावलीसाठी लावलेल्या सिल्वर ओकच्या झाडांचा उपयोग मिरीच्या वेलांना आधारासाठी होतो किंवा सुपारीच्या बागेत मिरीचे वेल सुपारीच्या झाडांवर सोडतात, कॉफीच्या पिकाला गर्द छायेची आवश्यकता असते, परंतु मिरीला अगदी तुरळक छाया मिळाली तरी चालते, काही वेळा झाडाशिवाय वाळलेले लाकडी खांब किंवा दगडी खांब वेलांना आधारासाठी लावतात. आधारासाठी लावलेल्या झाडाची पुर्णपणे वाढ झाल्यावर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये मिरीची लागवड करता येते. मिरीच्या वेलची लागवड दाट किंवा पातळ करणे बागायतदाराच्या मनावर आणि आवडीवर अवलंबून असते. सर्वसाधारणत: मिश्र पिकात दर हेक्टरी १७५ वेलांचे गट असता. तर स्वतंत्र बागेत हे गट दर हेक्टरी ७५० किंवा त्याहून अधिक असतात. मिरीला आधारासाठी लावलेल्या झाडाशिवाय नैऋत्य बाजूस सुरक्षित असा झाडाचा पट्टा लावावा लागतो.

लागवडीसाठी बियाणे : मिरीची लागवड वेलाच्या तुकड्यापासून केली जाते. हे तुकडे काढण्यासाठी फुलांत पुंकेसर व स्त्रीकेसर दोन्ही असलेले. चांगले भरघोस उत्पन्न देणारे वेल निवडावेत. फुलात पूंकेसर व स्त्रीकेसर दोन्ही असल्यास अशा वेलांना वेळेवर फुले येऊन उत्पादन चांगले येते. निवडलेल्या वेळापासून ४५ सें.मी. लांबीचे तुकडे काढावेत. पुष्कळ वेळा निवड न केलेल्या वेळापासून तुकडे काढून घेतल्यास त्यांचा उत्पन्नाव अनिष्ट परिणाम होतो. मोठ्या प्रमाणवर लागवड करावयाची असल्यास अशा प्रकारचे बियाणे एकाच वेळी उपलब्ध होऊन शकत नाही. म्हणून निवड केलेल्या वेलाचे तुकडे एका रोपवाटिकेत लावून त्याला मुळे फुटू द्यावीत आणि नंतर मोठ्या प्रमाणावर लागवड करावी.

वेलाच्या तुकड्यापासून रोपे तयार करणे : मिरीच्या वेलाची छाटणी चालू असताना त्यातून निवडलेले बियाणे रोपवाटिकेत लावून ठेवावे. या तुकड्यांना मुळे फुटल्यानंतर ते कायम ठिकाणी लावले जाते. कायम ठिकाणी लावलेली रोपे रोपवाटिकेत कायम राखली जातात. वेलाचे तुकडे फार लांबून आणलेले असतील तर अगदी थोड्या तुकड्यांना मुळे फुटतात. हे होऊ नये, यासाठी सुरूवातीसाच निवडलेले तुकडे (छाट) ५० मिली जर्मिनेटर + १० लि. पाणी या द्रावणात बुडवूनच लागवड करावी. म्हणजे काड्यांना जारवा फुटून सर्व रोपे यशस्वीरित्या फुटतात.

दाबकलमे करूनसुद्धा मुळे फुटलेल्या वेलाचे तुकडे काढता येतात. ही पद्धत खर्चीक असली तरी फायदेशीर असते. दाबकलमापासून लावलेले वेल लवकर फळे देण्यास सुरुवात करतात.

बियापासून रोपे तयार करणे :मिरीची लागवड बियापासून देखील केली जाते. एप्रिल महिन्यात निवडलेल्या झाडापासून पक्व झालेली मिरीची फळे गोळा केली जातात. गोळा केलेली फळे रात्रभर भिजत ठेवतात. भिजवलेली फळे गाईच्या शेणामध्ये मिसळतात व जोराने घासतात आणि रोपवाटिकेत लावतात. रोपवाटिकेला दररोज पाणी घातले जाते. लागवडीनंतर ३० दिवसांच्या अवधीत बी उगवण्यास सुरुवात होते व पंधरा दिवसात सर्व बियांची उगवण पूर्ण होते. याशिवाय अजून खात्रीशीर उपाय म्हणून बियाणे जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात रात्रभर बुडवून नंतर लावल्याने कमी दिवसात १००% उगवण होऊन वाढ झपाट्याने होते. अशा प्रकारे बियांपासून जुलै - ओगस्टमध्ये रोपे लागवडीस तयार होतात. अशा रितीने लागवड केलेली बाग वेगवेगळ्या प्रकारच्या वेलांची असते आणि म्हणून या पद्धतीची शिफारस लागवडीसाठी केली जात नाही.

लागवड : मिरीच्या वेलाच्या आधारासाठी लावलेल्या झाडांच्या उत्तरेला किंवा ईशान्येला मिरीच्या लागवडीसाठी केलेल्या ४५ सेंमी x ४५ सेंमी x ५० सेंमी आकाराचे खड्डे जंगलातील मातीने अर्धवट भरून काढावेत. निवड केलेले वेलाचे तुकडे किंवा मुळे आलेले वेल एका खड्ड्यात ६ ते ७ या प्रमाणात आधारासाठी लावलेल्या झाडांच्या किंवा खांबाच्या भोवताली गोलाकार लावावेत किंवा लागवडीच्या अगोदर सात दिवस निवडक वेलाचे ३ - ४ तुकडे बांबूच्या टोपल्यात लावावे. ते चांगले वाढीस लागल्यावर बांबूची टोपली अलगद बाजूला काढून मातीसकट ३ - ४ रोपे प्रत्येक ठिकाणी लावावीत. रोपे किंवा निवडक वेलांचे तुकडे लावताना त्याबियाण्याची एक ते दोन पेरी जमिनीत गाडली जातील अशी काळजी घ्यावी. फळझाडांची लागवड करून त्याभोवती मातीचा वर्तुळाकार उंचवटा तयार करावा. त्याप्रमाणे मिरीच्या लावलेल्या तुकड्याभोवती मातीचा आधार द्यावा. लागवडीनंतर त्यावर जर्मिनेटर ३० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येकी ३० ते ५० मिलीप्रमाणे द्रावणाचे ड्रेंचिंग (आळवणी) करावे. त्याने मिरीच्या वेलांची वाढ जोमात होत राहते. एक वर्षात वेलची वाढ १२० ते १५० सेमी पर्यंत होते. वेळ वाढत असताना प्रत्येक ३० सेंमी अंतरावर वेल हळूवारपणे आधारावर बांधत जावे. काही देशांमध्ये १२ ते १८ महिन्यानंतर पानावेलीची ज्याप्रमाणे उतरण (Lowering) करतात, त्याप्रमाणे मिरीच्या वेलांची उतरण करण्याची प्रथा आहे. उतरण ही आधारासाठी लावलेल्या झाडाजवळच गोलाकार गुंडाळी करून केली जाते. वेलाची उतरण केल्याने वेलांना अधिक प्रमाणात मुळे फुटून नवीन धुमारे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्यामुळे मिरीच्या उत्पादनात वाढ होते. असे काही प्रयोगांती आढळून आले आहे. अशी उतरण - पद्धत कर्नाटक राज्यात अवलंबिली जात नाही.

आंतरमशागत : मिरीच्या वेलाची वाद साधारण ९० सें.मी. उंच होईपर्यंत त्याला कसल्याही प्रकारच्या फांद्या फुटू देत नाहीत. वेलांना फुटलेल्या आडव्या फांद्या साधारणत: जोराचा मान्सून पाऊस उतरल्यावर म्हणजे जून महिन्यानंतर काढल्या जातात. दरवर्षी मिरीच्या वेलाची वाढ साधारण: १५० सेमी इतकी होते. वर वर्णन केल्याप्रमाणे मिरीचे वेल प्रत्येक ३० सेमी अंतरावर आधाराने हळूवार बांधावेत. लागवडीनंतर साधारणत: ४ वर्षांची मिरीच्या वेलांना बहर येण्यास सुरुवात होते. मिरीच्या फळांची काढणी झाल्यावर सहसा एप्रिल महिन्यात वेलांना खत देऊन भर द्यावी. सुपारीच्या बागेत मिरीचे पीक मिश्रपीक म्हणून घेतले असेल तर सुपारीला दिलेले खत मिरीच्या वेलांना पुरेसे होते. मिरीच्या बागेतील आधाराची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. आधारासाठी लावलेल्या झाडांची वाजवी वाढ रोखण्यासाठी झाडांचे शेंडे ठराविक उंचीवर मोडावेत. तसेच वेलांची वाजवी वाढ रोखण्यासाठी वेलांचे शेंडेदेखील ठराविक उंचीला तोडावेत. त्यामुळे फळे काढणे सोपे जाते. अर्थात ही कामे वेलाची फळे काढून झाल्यावर करावीत.

खते : पालापाचोळा आणि चांगले कुजलेले शेणखत समप्रमाणात मिसळून प्रत्येक वेलाला साधारणत: ५ किली आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात दरवर्षी दोन हप्त्यात द्यावे. तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत मिरीच्या वेलांना नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण वरखतांच्या द्वारे दिले जाते.

रोग आणि कीड :

पोलू भुंगा किंवा फळे पोखरणारी अळी : पक्व झालेल्या फळांना भोके पाडून ही अळी फळातील गर खाते आणि त्यामुळे फळ पोकळ राहते. हा अतिशय छोटा किटक असून त्याची मादी घडातील पोकळीत अंडी घालते. ह्या किडीमुळे मिरीचे ३० ते ४०% नुकसान होते.

उपाय : ही कीड पडू नये म्हणून बाग अगदी स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक असते. बागेत स्वच्छता ठेवल्याने कोशावस्थेत असणाऱ्या किटकांचा सहजासहजी नाश होतो. तसेच प्रोटेक्टंट आणि कार्बारिल किंवा २:२:५० च्या बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

मर रोग : हा दोन प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे. एका प्रकारात वेलाची मुळे कुजतात, त्यानंतर हळूहळू पाने पिवळी पडून गळतात व वेल मरतो दुसऱ्या प्रकारात ३० सें.मी. उंची वर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्या ठिकाणी वेलीची साल फुटते, पाने पिवळी पडून गळतात व वेल मरतो.

उपाय : जर्मिनेटर ३० मिली + कॉपर ऑक्झिक्लोराईड २० ग्रॅमचे १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून वेलीच्या मुळांना द्यावे. तसेच रोग प्रतिबंधक जात लावावी.

वरील रोगाशिवाय धान्याची कीड, सिगारेट कीड आणि अशाच प्रकारच्या काही किडीचा मिरीवर प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी स्वच्छ आणि हवेशीर जागेत मिरीची साठवण करावी.

कीड, रोगमुक्त मिरीच्या जोमदार वाढीसाठी उत्पादन सुरू होईपर्यंत पहिले तीन वर्षे खालील प्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (जूनमध्ये) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ते २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.


२) दुसरी फवारणी : (जुलैमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम+ १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (ऑगस्टमध्ये) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम. + २०० लि.पाणी.

३ वर्षानंतर उत्पादन चालू होऊन अधिक मिळण्यासाठी वरील फवारण्या घेत असताना दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत राईपनर आणि न्युट्राटोन अनुक्रमे ५००,७५० मिलीप्रमाणे वापरावे. तसेच सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान चौथी फवारणी थ्राईवर ७५० मिली, क्रॉपशाईनर ७५० मिली, राईपनर ७५० मिली, न्युट्राटोन ७५० मिली, २५० लि. पाणी या प्रमाणात करावी. बहार लवकर घ्यावयाचा असल्यास एप्रिलपासून एक - एक महिन्याच्या अंतराने फवारण्या घेतल्या तरी चालते.

काढणी : मिरीच्या वेलाला साधारणत: तिसऱ्या वर्षापासून फुले येण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर मान्सूनचा जोराचा पाऊस संपल्यावर जून महिन्यात वेलांच्या आडव्या फांद्याला घड येण्यास सुरुवात होते. ४ वर्षापासून मिरीचे फळे निघावयास सुरुवात होते. तरी पण पाचव्या अगर सहाव्या वर्षी मिरीच्या वेलापासून भरघोस उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. सपाटीवर मिरी काढणीचा हंगाम नोव्हेंबरपासून फेबुवारीपर्यंत असतो. तर डोंगराळ भागामध्ये मिरी काढणीचा हंगाम जानेवारीपासून मार्च महिन्यापर्यंत असतो. पक्व झालेल्या मिरीच्या फळाचा रंग गर्द नारंगी किंवा भडक लाल असतो. फळे काढण्यासाठी बऱ्याच वेळा शिडीचा वापर केला जातो. फळे काढताना प्रत्येक घड वेगवेगळा केला जातो. मिरीचे घड पक्व होण्यापूर्वी काढून ८ ते १० दिवसापर्यंत उन्हात वाळविले जातात. पांढरी मिरी मात्र पक्व झालेलीच काढली जाते. पांढऱ्या मिरीची टरफले पक्व झाल्यावर हाताने सहज निघू शकतात. मिरीची काढणी झाल्यावर सर्व घड खळ्यावर किंवा परसात गोळा करून हाताने चोळून किंवा पायाखाली तुडवून मिरीची फळे सुटी केली जातात. नंतर फळे ५ ते १० दिवसांपर्यंत उन्हात वाळविली जातात. त्या काळात बाहेरची साल काळी पडून सुरकुतते आणि हीच काळी मिरी बाजारात विक्रीला येते.

पांढरी मिरी : पांढऱ्या मिरीचे पक्व झालेले घड अंगणात आणून १ - २ दिवस ढीग करून ठेवतात. ह्या काळात सर्व घड पिवळसर होतात. देठापासून फळे मोकळी केल्यावर एक रात्रभर पाण्यात भिजत ठेवतात. भिजलेली मिरी आकसून ती काही प्रमाणात बुरसटते. अशावेळी बाहेरील साल सहजासहजी काढता येते. म्हणून अशी मिरीची फळे परत पाण्यात टाकून हाताने चोळावीत. काही वेळानंतर मिरीच्या फळांची बाहेरील साल निघून जाते आणि पांढरी मिरी दिसू लागते. अशी फळे परत उन्हात ५ ते १० दिवसांपर्यंत वाळवावीत अशी प्रक्रिया करून तयार झालेली मिरी बाजारात येते आणि तिलाच 'पांढरी मिरी' असे म्हणतात.

उत्पादन : निरनिराळ्या भागातील जमीन आणि तिचा पोत, हंगामी पाऊस, लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती, मिरीच्या वेगवेगळ्या जाती आणि वेलांचे वय ह्यावर मिरीचे उत्पादन अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या वेलापासून प्रत्येकी ९०० ते ११०० ग्रॅम इतके वाळलेल्या मिरीचे उत्पादन मिळू शकते. स्वतंत्र बागेतील मिरीच्या उत्पादनापेक्षा परसातील फणसासारख्या झाडाजवळ लागवड केलेल्या मिरीच्या वेलाचे उत्पादन अधिक येते. अशा मिरीच्या वेलापासून कधी - कधी ३ किलो उत्पादन येऊ शकते. काही भागामध्ये ३.६ x ३.६ मीटर अंतरावर एका हेक्टरमध्ये ७५० मिरीचे वेल असतात. त्यापासून ३५० ते १७५० किलो वाळलेल्या मिरीचे उत्पादन झाल्याचे आढळून आले आहे. वेलावरून काढलेल्या मिरीचे वजन वाळविल्यानंतर केवळ २५ टक्के घटते. म्हणजे १०० किलोपासून ७५ किलो वाळलेली मिरी मिळू शकते. चांगला वाढलेला मिरीचा बाग २० वर्षांपर्यंत चांगले उत्पादन देऊ शकतो.

उपयोग : निरनिराळ्या चटण्या आणि आमटीत मिरीचा उपयोग करतात. ट्रायमोडसारखी अनेक औषधे तयार करण्यात मिरी वापरतात. अल्कलॉइड , पिपरेन आणि रोझीन तयार करण्यात मिरीचा वापर केला जातो. मिरीमध्ये तिखटपणा त्यातील रेझीनमुळे येतो.