गेल्या १५ वर्षापासून 'सिद्धीविनायक' शेवग्यामध्ये आंतरपिके, स्वत: विक्री करतो

श्री. वसंतराव निवृत्ती काळे (वय ८०),
सर्व्हे नं.२६, महंमदवाडी रोड, ससाणेनगर, हडपसर, पुणे - २८.
फोन नं.(०२०) २६८२४२३८/८३०८७२९८१०१६ वर्षापुर्वी ४०० 'सिद्धीविनायक' शेवगा १०' x १०' वर लावला होता. त्यातील ३०० झाडे २ वर्षापुर्वी काढून त्याच जागेवर नवीन ३०० झाडे 'सिद्धीविनायक' शेवग्याची लावली आहेत आणि जुनी १०० झाडे तशीच ठेवली आहेत.

बाराही महिने आमच्या या ४०० झाडांपासून कमीत - कमी ५ किलो दररोज किरकोळ विक्रीसाठी शेंगा काढून १५ दिवसातून एकदा उरलेला माल काढला, तर १०० किलो माल सहज निघतो. शेवगा जिथे पिकतो तेथेच ८० रू./किलोने विकतो व जास्तीचा (१०० किलो) शेवगा हडपसर मार्केटमध्ये विकतो. शेवग्याला रासायनिक खते, औषधे वापरत नाही. फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो त्यामुळे शेंग चविष्ट लागते. त्यामुळे किरकोळ घेणारे लांबून आवर्जुन शेंगा घेण्यास येतात.

साधारण ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत ८० रू./किलो बाजारभाव असतो. जानेवारीनंतर उष्णता वाढत जाते. त्यामुळे मालाची आवक बाजारात वाढते. त्यामुळे बाजार ४० रू./किलोपर्यंत खाली येतो. मग हा भाव जानेवारी ते जुलैपर्यंत राहतो.

शेवग्यामध्ये आम्ही दुय्यम (आंतर) पिके वांगी, मिरची, कोथिंबीर, मेथी, आळू इ.घेतो. त्याच्यापासून आम्हाला वर्षभरात १ लाख रू. सहज होतात. शेवग्यासह सर्व पिकांची मजुरी जाऊन ३० - ४० हजार रू. शिल्लक राहतात आणि शेवग्याचे पीक बोनस म्हणून मिळते. शिवाय आंतरपिकामुळे शेवग्याची निगा चांगली राहते.

शेवग्यात वांग्याचे आंतरपीक

सप्टेंबरमध्ये आंतरपीक जुनी पंचगंगा वांगी उपटून काढून ऑक्टोबरमध्ये पुन्हा लावली. वांग्याची झाडे खाली पडून पसरू नये म्हणून त्याला टोमेटो प्रमाणे तार - काठीचा आधार देतो. अशी वांगी ६० दिवसात चालू होतात. १० महिन्यांपर्यंत ती उत्पादन देतात.

शेवग्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारतो. तेव्हा तेच औषध खाली वांग्यावर पडते. त्यामुळे वांग्यावर कुठलीही रोगराई होत नाही. वांगी दिवसाड तोडतो. तोड्याला २० ते ३० किलो वांगी निघतात. ऊन वाढले की फुलगळ होते. वांगी १।। इंच जाडीची तोडतो. अशा कोवळ्या, काटेरी, हिरव्या वांग्याला किरकोळ मागणी जास्त आहे. जागेवरून वांगी ४० रू. किलोने जातात.

मधल्या वाफ्यात पालेभाजी

शेवगा १०' x १०' वर पुर्व - पश्चिम आहे. जमीन मध्यम काळी आहे. शेवग्याच्या ओळीमध्ये २ झाडत ३ वांग्याची झाडे २।। - २।। फुटावर आहेत. याला वरंबा असतो. मधल्या वाफ्यात कोथिंबीर, मेथी, पालक ह्या पालेभाज्या घेतो. साधारण २ महिन्यात या पालेभाज्याचे एक पीक निघते. त्यांनतर १५ दिवसात रान निट करण्यास लागतात. अशी वर्षातून ४ पिके निघतात.

मेथी थंडीच्या हंगामात चांगली येते. म्हणून ती ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत घेतो. तर कोथिंबीर व पालक १२ ही महिने येते, म्हणून ती कायम थोडी - थोडी चालूच असते.

प्रदुषणावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मात

आमची शेती हडपसरमध्ये असल्याने चारही बाजूला मोठ्या - मोठ्या हौसिंग सोसायट्या आणि प्रदुषण खूप आहे. तरी त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मात करून ही पिके यशस्वीरित्या घेतो.

शेवग्याच्या चारही बाजुने कंपाऊंडच्या आतमध्ये दर ५ फुटावर कढीपत्याची झाडे आहेत. दररोज थोडा - थोडा कढीपत्ता काढतो. १५ रू. ला १ गड्डी जाते. जागेवरून कधी १० ते २० रू. चा कढीपत्ता वरील भाजीपाल्याबरोबर विकला जातो.

दररोज मी स्वत: संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत वरील भाजीपाल्याची शेतातच हातविक्री करतो. १ ते १।। हजार रू. ची विक्री रोज होते. जास्तीचा माल हडपसर होलसेल मार्केटला पाठवितो. हडपसर भाजीमार्केटला दलाली पद्धत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून थेट किरकोळ भाजी विक्रेत्याला माल विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना २ - ५ रू. भाव जादा मिळतो.

याच शेवग्यात ३ गुंठ्यामध्ये आळुचे आंतरपीक आहे. तर दररोज १० पानांच्या २५ गड्ड्या आळू काढली जाते. ती ५ रू. गड्डीप्रमाणे विकली जाते.

या शेतीमध्ये गेल्या १५ वर्षात मशागतीसाठी बैल किंवा ट्रॅक्टरचा कसलाच वापर केला जात नाही. पालेभाज्यांचे पीक काढल्यावर कुदळीने मजुराकडून चाळणी करून १० दिवस जमीन तापू देऊन लगेच दुसरे आंतरपीक घेतले जाते. शेवग्याला वेगळे पाणी दिले जाते नाही. आंतरपिकाच्या साऱ्यातून पाणी सोडले जाते, त्यावरच हे वरंब्यावरील शेवगा व वांग्याचे पीक येते, तसेच शेवग्यावर सप्तामृताची फवारणी करीत असल्याने तेच औषध खाली आंतरपिकांवर पडत असल्याने आंतरपिकांना वेगळी फवारणी कधीच करीत नाही. कुदळीच्या चाळणीमुळे तणमुक्त शेत राहते.

८० व्या वर्षी शेतीत आनंद

माझे सध्या वय ८० असून एका मजुराच्या मदतीने आम्ही दोघे ३० गुंठ्यातील ही आदर्श शेती यशस्वीरित्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सहाय्याने करीत आहे.

माझे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले आहे. शेतीची आवड असल्याने वडीलोपार्जित शेती करीत आहे. माझा नातू १२ वी सायन्समध्ये शिकत असून तो सुट्टीच्या दिवशी मला या शेतीकामात मदत करतो.