शेवग्यास फुले न लागण्याची कारणे व उपाय

श्री. संतोष घोगरे,
मु.पो. बावडा, ता. दंदापूर, जि. पुणे,
मोबा. ९४२२४६०८८५



ओडीसा जातीचा शेवगा मे २०१४ मध्ये ४ एकरमध्ये ६' x ६' वर लावला आहे. जमीन भारी काळी आणि इनलाईन ठिबक केले आहे. लागवड करून ४।। महिन्याचा प्लॉट झाला तरी फुलकळी लागत नाही. तेव्हा सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी (२ नोव्हेंबर १४) आलो आहे. सध्या झाडांची उंची ११ फुटापर्यंत आहे.

सरांनी यावर प्रथम सांगितले, एक तर काळ्या जमिनीत शक्यतो (९५%) शेवगा लागवड करूच नये. कारण अशी जमीन अधिक भुसभुशीत (Friable) असते. पाणी धारण क्षमता ६५ ते ७०% असते. त्यामुळे मुळ्या पटकन वाढतात. शाखीय वाढ जबरदस्त होते. छाटणी व खताचे व्यवस्थापन नीट न जमल्याने झाडे अनावश्यक १० ते ११ फुटापर्यंत ४।। महिन्यातच झाली आहेत, हे चुकीचे आहे. साधारणपणे सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये (भाद्रपद) ऊन जास्त असते. या काळात १ महिना अगोदरच छाटणी करणे गरजेचे असते. म्हणजे भाद्रपदात लागलेल्या फुलकळीचा माल जेव्हा मार्केटमध्ये येतो, तेव्हा ४० रू. पासून ८० ते १०० रू./किलो भाव मिळतो.

काळी जमीन आणि पाण्याचे प्रमाणे अधिक झाल्याने पांढरी मुळे अनावश्यक वाढून शाखीय वाढ झपाट्याने होते. हे अनेक शेतकऱ्यांचा लागवडीतून लक्षात आले आहे. जेथे लागवड काळ्या जमिनीत होते आणि ठीबकने पाणी दिले जाते, तेथे प्रतिकूल ( Advars) परिस्थती निर्माण होते, तेव्हा इनलाईन ड्रीपचा वापर करू नये.

सदरची शेवग्याची जमिनी ही काळी असून भुसभुशीत आहे. तिचा वरील पापुद्रा भेगाळला असला तरी २ इंचाच्या खाली माती ओली आहे. त्यामुळे सरांनी सांगितले, जमीन काळी असल्याने सुर्यप्रकाशाने ती तापून वरचा २ इंच थर भेगाळत आहे. मात्र मुळी वाढीचा जमिनीचा भाग ओला असतो. शेतकऱ्याला वरून वाटते जमीन भेगाळली आहे म्हणून तो पाणी देतो. तर अशा परिस्थितीत शक्यतो पाणी देवू नये. आपण एरवी ८' x ८' वर हलक्या जमिनीत लागवड करण्यास सांगितले आहे. मात्र ही लागवड पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणाऱ्या काळ्या जमिनीत असून झाडे ६' x ६' वर (जवळ - जवळ) लावली गेल्याने झाडांची दाटी झाली आहे. त्यामुळे मायक्रो क्लायमेट म्हणजे अधिक थंडी, अधिक गारवा व ठिबकचे अनियंत्रीत नियंत्रण झाल्याने फुलकळी न लागण्याची समस्या उद्भवली आहे. अशा प्रतिकूल परिस्थतीत पाणी हे दुपारी द्यावे.

जेव्हा अशी थंड परिस्थिती असते, तेव्हा जमिनीत उष्णता निर्माण करण्यासाठी एकरी २०० किलो प्रेसमड खत किंवा २०० किलो प्युअर कोंबड खत (Facies)कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने द्यावे. जर तुसासह कोंबडखत असल्यास २५० किलो द्यावे किंवा डुकरांची लीद देखील अशा परिस्थितीत उपयुक्त ठरते. ते जमिनीत उष्णता निर्माण करून सॉईल कंडीशनर (भू - सुधारक) म्हणून काम करेल. या ३ - ४ गोष्टींचा प्रयोग करून बघावा.

इनलाईन १।। - १।। फुटावर असल्याने शेवग्याची मुळे ही झपाट्याने वाढतात. वाढही झपाट्याने होते आणि मग फुल लागत नाही. आता ही इनलाईन ड्रीप काढून टाकणे शक्य नसल्यास थंडीच्या काळात आठवड्यातून १ ते १।। तसाच चालवावी. पुढील सुक्ष्म मिमांसा करण्यासाठी या मातीची पाणीधारण क्षमता, वाळू पोयटा, चिकण मातीचे प्रमाणे, मुक्त चुना, ऑरगॅनिक कार्बन, एकूण नायट्रोजनचे प्रमाण सामू/इसी क्लोराईडस, कार्बोनेट, बायकार्बोनेट अहवाल पुढीलवेळी घेऊन येणे. तसेच पाण्याचे पृथ्थकरणही व त्याचा अहवाल पुढीलवेळी घेऊन येणे.

शेवगा सोडून इतर पिकांना इनलाईन ड्रीप चालते. कारण शेवगा हा अति संवेदनशील पीक आहे. तेव्हा शेवग्याला इनलाईन ड्रीप करू नये.

शेवग्याला अधिक रासायनिक खताची फवारणी चालत नाही. किटकनाशकाची फवारणी चालत नाही. आपली (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी) फवारणीच या पिकाला उपकाक ठरते. आषाढ श्रावणातील पावसात कोबी, फ्लावर, टोमॅटो, बटाटा, घेवडा, मिरची, ढोबळी, कापूस. शेवगा रोपे यावर कॉलररॉट येतो. तो येऊ नये म्हणून सप्तामृताबरोबर कार्बन डेझीमची फवारणी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.

सरांना शेवग्याची शाखीय वाढ थोपविण्यासाठी संजीवकाचा वापर करू का ? असे विचारले तेव्हा, सरांनी सांगितले, अशा अवस्थेत ते वापरने धोकादायक ठरते. वाढ थोपविण्यासाठी सी. सी. सी. व इथ्रेल हे वापरले जाते. ते फक्त ज्या पानांची कॅनॉपी, देठ, पाने जाड, चमकदार आहेत आणि त्यावर वॅक्सीलेअर असल्याने फवारलेले औषध पानांवर चिटकून राहत नाही. अशा पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. परंतु शेवगा पीक हे अति संवेदनशील असल्याने त्यला हे योग्य ठरत नाही. कोवळी पाने व पोपटी हिरवी पाने असताना औषध मारल्यावर कोमेजतात. जर वापरावयाचे असल्यास सप्तामृतासोबत थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून निरीक्षण करावे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आता अगोरा वांगी लावणार आहे. यावर सरांना सल्ला विचारला असता सरांनी सांगितले, वांग्याचे झाड काटक असते. अगोरा वांग्याच्या पानांचे, फांद्याचे वजन कमी व फळांचे वजन जास्त हे व्यस्त आहे. याला कल्पतरू १०० ग्रॅम लागवडीच्यावेळी द्यावे. सप्तामृत आठवड्यास द्यावे. म्हणजे बोरापासून ते नारळाच्या आकाराचे १।। महिन्यात वांगे होते. म्हणजे कमी वेळात वांगे पोसण्यासाठी ही फवारणी आवश्यक आहे. याला बाराही महिने दर असतात. ३० ते ४० रू. किलो उन्हाळ्यात भाव असतो. सणवार सोडून तोडणी करून नुसते वाशी, पुणे मार्केटवर अवलंबून न राहतात कलकत्ता, बेंगलोर असे बाहेरीलही मार्केटचा अभ्यास करा.

दलालांना भावाची चौकशी करताना दलाल सांगतो भाव चांगले आहे, माल आण आणि ट्रकभर मला आल्यास भाव ढासळून पिळवणूकीची वागणूक दलाल शेतकऱ्याला देतो. शेतकऱ्याचा चेहरा पडलेला पाहून मालाचे भाव पडतो. ज्याप्रमाणे ट्रॅफिक पोलीसाने गाडी पकडल्यावर तो चालकाचे लायसन्स घेवून बाजूला घेतो. त्यावेळी चालकाचा जसा चेहरा होतो तशी अवस्था येथे शेतकऱ्याची होते. तेव्हा अनेक दलालांना फोन करून त्यांच्या बोलण्यावरून तो न्याय देऊ शकतो, असे वाटल्यावरच माल पाठवावा. याची शेतकऱ्यांची कृपा करून दखल घ्यावी.