ब्रोकोली लागवडीचे तंत्रज्ञान

प्रा.कु. योगिनी मनोहर पवार,
सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण, जि. सातारा,
मो. ९८८१३४४९५४


शास्त्रीय भाषेत स्प्राऊटींग ब्रोकोलीला ब्रासिका ओलेरेसिया व्हरा इटालिका हे नाव आहे. स्प्राऊटींग ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी आणि फुलकोबी यांचे कुळ जाती एक आहेत.

इटालियन भाषेत ब्रोक्को या शब्दाचा 'अंकुर' अथवा 'शेंडा' असा अर्थ होतो. 'स्प्राऊटिंग ब्रोकोली' या भाजीचा फक्त 'ब्रोकोली' या नावानेच उल्लेख केला जातो. या भाजीचे मूळस्थान इटली आहे.

भारतामध्ये हिमाचलप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू आणि काश्मिर तसेच दक्षिण भारतात निलगिरी पर्वतीय भागात आणि उत्तर भारतातील मैदानी भागात ब्रोकोलीची लागवड वाढत आहे.

महाराष्ट्रामध्ये पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, सातारा, पुणे या शहरामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ग्रीनहाऊस शिवाय या पिकाची लागवड यशस्वीपणे करता येते.

पोषणमूल्य व आहारातील महत्त्व:

ब्रोकोली भाजीमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्वे तसेच कॅल्शिअम, लोह उपलब्ध असल्यामुळे ब्रोकोलीला सुरक्षित अन्न संबोधले जाते. १०० ग्रॅम खाण्यायोग्य भाजीत खालील पोषक द्रव्ये असतात.

पाणी (ग्रॅ.)                 ८७-८८

प्रोटीन्स (मि.ग्रॅ.)       ३.२ - ३.३

कॅल्शिअम (मि.ग्रॅ.)    ५५.५

हरितद्रव्य (मि.ग्रॅ.)    २२.२३

फॉस्फरस (मि.ग्रॅ.)    ९३.५०

सोडिअम (मि.ग्रॅ.)    २६.२०

अॅस्कार्बिक अॅसिड (मि.ग्रॅ.)    १८६.७

महाराष्ट्रातील शेतकरी लहान क्षेत्रावर या भाजीची लागवड करीत असून पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या शहरामध्ये या भाजीचा सॅलडमध्ये (कोशिंबीर) वापर करतात.

ब्रोकोलीची लागवड करताना खालील बाबींचा विचार करावा :

वाढीची सवय - स्प्राऊटींग ब्रोकोलीचा गड्डा (फुल) दिसायला काहीसा फ्लॉवर सारखाच (फुलकोबी) असतो. फक्त या गड्ड्यांचा रंग जांभळट, निळसर हिरवा, फिक्कट हिरवा किंवा गडद हिरवा असतो. पानांची वाढसुद्धा फुलकोबीच्या झाडाप्रमाणेच असते. स्प्राऊटींग ब्रोकोलीचा गड्डा म्हणजे फुलोऱ्याची पूर्ण अवस्था असून तो हिरव्या काळ्या आणि त्यांच्या दांड्यांचा मांसल भाग यांचा समूह असतो. स्प्राऊटींग ब्रोकोलीच्या अग्रांकुरापासून (टर्मिनल शुट) येणाऱ्या गड्डयाभोवती बेचक्यातून आणखी गड्डे येत असतात. मुख्य गड्ड्यांची काढणी केल्यानंतर खोडावर असलेल्या पानांच्या बेचक्यातून लहान लहान ६ सें.मी. ते ८ सें.मी. व्यासाचे गड्डे मुख्य गड्डा काढल्यानंतर तयार होतात. एका झाडापासून मुख्य गड्ड्या व्यतिरिक्त ३ ते ४ गड्डे मिळतात म्हणून या पिकास 'स्प्राऊटींग ब्रोकोली' असे म्हणतात.

हवामान - ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तमप्रकारे घेता येते. दिवसाच्या २५ डी . ते २६ डी. से. आणि रात्रीच्या १६ डी. ते १७ डी. से. तापमानात ब्रोकोलीच्या गड्ड्याचे उत्पादन व प्रत चांगली येते. हरितगृहामध्ये वर्षभर ब्रोकोलीची लागवड करण्यासाठी हरितगृहात रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० डी. ते २५ डी.से. नियंत्रित करावे व आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी. जास्त तापमान वाढल्यास गड्डे घट्ट अवस्थेत मिळत नाहीत.

जमिनी- चांगल्याप्रकारे पाण्याचा निचरा होणारी, माध्यम रेतीमिश्रीत जमीन या पिकाच्या लागवडीसाठी चांगली असते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. हरितगृहामध्ये लागवड करण्यासाठी हरितगृहामध्ये लाल माती, शेणखत, रेती व भाताची तूस यांचे योग्य प्रमाण घेऊन माध्यम तयार करावे. त्यानंतर फॉरमॅलिन रसायनाने माध्यम निर्जंतुक करून ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. उंच व सोयीप्रमाणे लांब अशा आकाराचे गादी वाफे तयार करावेत.

रोपे तयार करणे - ब्राकोलीची लागवड गादी वाफ्यांवर बी पेरून रोपे तयार करून करतात. गादी वाफे १ मी. रुंद व २० सें.मी. उंच व १० मी. लांब या आकाराचे तयार करावेत. गादी वाफे तयार करण्यापुर्वी जमीन नांगरून, कुळवून, भुसभुशीत करून घ्यावी. गाडी वाफ्यात अंदाजे १० ते १५ कि. ग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम फोरेट १० जी आणि १०० ग्रॅम फॉलीडॉल पावडर टाकून मातीत मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. वाफ्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. बिया ५ ते ६ दिवसांत उगवतात व ३० ते ३५ दिवसांत पुनर्लागणीसाठी रोपे तयार होतात. नर्सरी वाफ्यामध्ये बियांची पेरणी दर पंधरवड्याने ऑगस्टपासून ऑक्टोबर पर्यंत करावी. रोपांच्या वाढीच्या काळात तापमान २० डी. ते २२ डी. से. असणे आवश्यक आहे. रोपांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर १० ते १२ दिवसांनी मॅलाथिऑन किंवा रोगोर १ मि. लि. अधिक बाविस्टीन १ ग्रॅम किंवा डायथेन एम - ४५ औषध २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

बियाण्यांचे प्रमाण - ४० आर (एक एकर) लागवडीसाठी संकरीत जातीचे बियाणे १२५ ग्रॅम लागते. १ ग्रॅम बियाण्यामध्ये ३०० ते ३५० बिया असतात.

जाती - रॉयलग्रीन, एव्हरग्रीन, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, सलीनास, पिलाग्रेम, सिय्याटिऑन मिडवे, ग्रीनमाऊंटेन, ग्रेड सेंट्रल प्रिमियम क्रॉप, प्रिमियम पुसा ब्रोकोली, गणेश ब्रोकोली, पालम समृद्धी, पुसा केटीएस-१ इ.

लागवड - रोपांची पुनर्लागण सरी वरंबा, पद्धतीने ४५ सें.मी. दोन ओळीत व ४५ सें. मी. दोन रोपांत अंतर ठेवून लागवड करतात (४५ x ४५ सें.मी.) किंवा ३ x ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करून त्यात वरील लागवड करतात. तसेच रोपाची लागवड ४५ x ३० सें.मी. किंवा ३० x ३० सें.मी. अंतर ठेवून करता येते.

४० आर क्षेत्रामध्ये अंदाजे २६,६६० रोपांची लागवड करता येते. पुनर्लागण साधारणत: दुपारनंतर करावी आणि लागवड झालेल्या रोपांना ठिबक संचाद्वारे पाणी द्यावे. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे १० लिटर पाण्यात १२ मि.ली. मोनोक्रोटोफॉस टाकून तयार केलेल्या द्रावणात बुडवून घ्यावीत.

पाणी व्यवस्थापन - पारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या रोपांना सारी पद्धतीने पाणी द्यावे. गाडी वाफ्यावर लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे, त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन गड्ड्याची प्रत चांगली मिळण्यास मदत होते. पिकाला ठिबक पद्धतीने किती व कशा प्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्वाची आहे.

खत व्यवस्थापन - साधारणत : ब्रोकोली पिकाला १ एकरला ६० कि.ग्रॅ. नत्र, ४० कि.ग्रॅ. स्फुरद आणि ७० कि.ग्रॅ. पालाश ही खते देणे आवश्यक आहे. पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये स्फुरद व पालाश खतांच्या मात्रा व नत्राची अर्धी मात्रा लागवडीपूर्वी जमिनीची पूर्व मशागत करताना द्यावी. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीपासून ४ -५ आठवड्यानंतर आणि दुसरा हप्ता गड्डे लागणे चालू झाल्यावर द्यावा. खतांची मात्रा दिल्यावर हलके पाणी द्यावे.

जमिनीच्या रासायनिक पृथ:करण अहवालाप्रमाणे मॉलीब्डेनम आणि बोरॉन ही पोषणद्रव्ये फवारणी द्वारे किंवा जमिनीतून द्यावी. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्ड्याचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे पिकावर आढळून येतात याचे नियंत्रण करण्यासाठी लागवड झाल्यावर ३० दिवसांनी ४० आर जमिनीला १.६ कि.ग्रॅ. बोरॅक्स (सोडिअम ट्रेटा बोरेट) फवारावे किंवा जमिनीतून द्यावे. तसेच लागवड झाल्यावर ६० दिवसांनी पुन्हा ४० १ एकरला १.६ कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे.

मॉलिब्डेनम या सूक्ष्म द्रव्याच्या कमतरतेमुळे ब्रोकोली पानांच्या पाल्याची नेहमीसारखी वाढ न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडांचा शेंडा खुरटलेला राहतो व गड्डा भरत नाही. विशेषत: आम्लीय जमिनीत ही विकृती दिसून येते. नियंत्रणासाठी ४० आरला १.६ कि. ग्रॅ. अमोनियम किंवा सोडिअम मॉलिब्डेट जमिनीत मिसळून द्यावे अथवा फवारावे.

आंतर मशागत - रोपांची पुनर्लागण झाल्यापासून ३० दिवसांनी वाफ्यावरील/सरीमधील गवत तण काढून माती ३ - ४ से.मी. खोलीपर्यंत खुरप्याचे हलवून द्यावी. माती हलवितांना रोपांच्या बुध्यांना मातीचा आधार द्यावा म्हणजे ती कोलमडत नाहीत. शिवाय रोपांची वाढ जोमदार होते. पुन्हा २० -२५ दिवसांनी खुरपणी करून वाफे स्वच्छ तणविरहित ठेवावेत.

किड आणि त्यांचे नियंत्रण - १. काळी माशी (मस्टर्ड सॉफ्लाय) - लक्षणे - ही माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या काळ्या रंगाच्या अळ्या कोवळ्या रोपांची पाने खातात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. रोपांची वाढ खुंटते. रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्ल्यास रोपांवर गड्डा धरत नाही. एकंदरती उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटते.

उपाययोजना - नियंत्रणासाठी ०.०२ टक्के मॅलॅथिऑन किंवा क्विनालफॉस ०.०५ टक्के किंवा क्लोरोपायरीफॉस ०.०५ टक्के औषधांच्या १० - १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारण्या कराव्यात.

२) मावा - लक्षणे - हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे हे बारीक किडे पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुरकतल्यासारखी होऊन पिवळी पडतात. आणि वाळून जातात. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गड्ड्याची प्रत चांगली नसते.

उपाययोजना - नियंत्रणासाठी ०.०५ टक्के मॅलॅथिऑन ५० इ. सी. किंवा अॅसिफेट ०.०१ टक्के किंवा निमअर्क ४ टक्के या औषधांच्या १० - १२ दिवसानंतर ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

३) चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड ब्लॅकमॉथ) - लक्षणे - या किडीची अळी पानांच्या खालच्या बाजडूस राहून बिळे पडून पानांतील हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड पाने खाऊन पानांची अगदी चाळण करते. पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

उपाययोजना - नियंत्रणासाठी फेनव्हरलेट २० इसी ५० ग्रॅम ए. आय. प्रती हेक्टर या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने फवारावे. तसेच रोपवाटिकेतील रोपांवर १० लिटर पाण्यात १२ मिली मोनोक्रोटोफॉस ३५ हब्ल्यू. एस. सी. किंवा २० मि.ली. क्विनालफॉस मिसळून फवारणी करावी.

रोग आणि त्यांचे नियंत्रण -

१) रोप कोलममडणे (डॅपिंग ऑफ) - लक्षणे - रोपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशीमुळे होतो. उष्ण आणि दमट हवेत तसेच रोपवाटीकेत पाण्याचा निचरा चांगाला नसल्यास हा रोग लवकर होतो. जमिनीलगतचा भाग भुरकट, कठीण होऊन सुकतो.

उपाययोजना - वाफ्यावर कॅप्टन किंवा फायटोलीनचे १० टक्के द्रावण झारीने दाट शिंपडावे. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी काळजी घ्यावी.

२) घाण्या रोग (ब्लॉक रॉट ) - लक्षणे - पानाच्या मुख्य आणि उपशिरामधल्या भागात पानाच्या कडा मरून इंग्रजी अक्षर V या आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. लागण झालेला भाग कुजून वाळून जातो. पानांच्या शिरा काळपट पडतात. झाडाच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळपट द्रव निघतो आणि त्याला दुर्गंधी येते. रोपांना गड्डा धरत नाही व रोपे वाळून जातात.

उपाययोजना -रोग प्रतिबंधक जातीची लागवड करावी. बी मर्क्युरीक क्लोराईडच्या द्रावणात (१ ग्रॅम औषध आणि १ लिटर पाणी या प्रमाणात) ३० मिनिटे भिजत ठेऊन नंतर सावलीत सुकवावे.

३) करपा (ब्लेकस्पॉट ) - लक्षणे - हा बुरशीजन्य रोग आहे. पान देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपल्यासारखा काळपट दिसतो. जास्त दमट हवामानात गड्ड्यावर डाग दिसतात.

उपाययोजना - रोगप्रतिकारक जातीची निवड करावी. डायथेन एम - ४५ हे औषध १ लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात फवारावे. २ - ३ फवारण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

४) भुरी (पावडरी मिल्ड्यू) लक्षणे - या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जोमाने होते. जून झालेल्या पानांवरील वरच्या भागात पांढरे ठिपके आढळून येतात. हे ठिपके मोठे होऊन पानांच्या दोन्ही खालील व वरील बाजूस पसरतात. पाने पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. उत्पादन कमी मिळते.

उपाययोजना - कॅराथेन २ ग्रॅम १ लि. किंवा टोपास ४ मि. ली./१० लि. पाणी किंवा रूबीगन ३.५ मि. ली./१० लि. पाणी या प्रमाणात मिसळून ३ - ४ फवारण्या आलटून पालटून १० -१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

५) केवडा (डाऊनि मिल्ड्यू) - लक्षणे - पानांच्या वरील बाजूवर अनियमित आकाराचे पिवळ्या रंगाचे ठिपके आढळतात पानांच्या खालच्या बाजूससुद्धा रोगाटे चट्टे आढळून येऊन चट्ट्यावर पांढऱ्या गुलाबी रंगाची वाढ आढळते. फुलांचे दांडे वर येतात. गड्डा नासून जातो.

उपाययोजना - डायथेन एम - ४५, २ ग्रॅम १ लि. किंवा रोडोमिल १.५ ग्रॅम /१ लि. पाणी ३ - ४ वेळा ७ - १० दिवसांच्या अंतराने फवारावे किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण १० -१२ दिवसांच्या अंतराने फवारावे.

काढणी - ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत काढणीस तयार होतो. गड्ड्याचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच गड्डा काढावा. गड्डा घट्ट असून गड्ड्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापुर्वीच गड्डा काढणे आवश्यक आहे. गड्ड्याची काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी. तयार गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ग्रॅम असणे आवश्यक आहे.

उत्पादन - एकरी ८ ते ९ मे. टन उत्पादन मिळते. सरासरी विक्री दर रू. २५ ते ३५ प्रति किलोग्रॅम मिळतो.

पॅकींग - गड्ड्याची काढणी झाल्यावर गड्ड्यांची आकारमानाप्रमाणे किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावे. गड्डे छिद्रे असलेल्या कोरोगेटेड बॉक्समध्ये ३ किंवा ४ थरामध्ये अंदाजे ५ कि.ग्रॅ. पर्यंत भरावेत. पॅकिंगमधील बॉक्सेसमध्ये तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग पिवळट किंवा फिकट होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते. असे गड्डे विक्रीस अयोग्य असतात.

अशा रितीने ब्रोकोली भाजी पिकाची लागवड केल्यास कमी कालावधीत उत्तम नफा मिळतो. शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर शाश्त्रोत्क तांत्रिक माहिती आत्मसात करून ब्रोकोली पिकाची लागवड करून आर्थिक दृष्टीने अधिक नफा मिळवावा.