जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारणारी काही सेंद्रिय खते

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पिकांचे अन्नाचे कोठार म्हणजे जमीन. ते भरण्यासाठी जशी निरनिराळी रासायनिक खते जमिनीत घातली जातात व जमीन सुधरवितात. त्याचप्रमाणात जमिनीची प्राकृतिक घडन सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा लागतो. जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा झाल्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते, पाण्याचा निचरा पुरेसा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, तापमान समतोल राहते व जमिनीची धुप कमी होते. त्याचप्रमाणे पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. ही सेंद्रिय खाते वनस्पती व प्राणीजन्य असून त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

१) शेणखत - शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणात जनावरांचे मुत्र व गुरांनी अर्धवट खाऊन टाकलेला चाऱ्याचेही अवशेष असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मुत्र शोषून घेता येते. तो माती जर शेणखताच्या खड्ड्यात शेणाबरोबर टाकली तर त्याची प्रत सुधारते.

सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.५ % नत्र, ०.२% स्फुरद आणि ०.५% पालाश असते. अशा प्रतिचे शेणखत जर पिकास हेक्टरी ४५ बैलगाड्या या प्रमाणात दिले गेले तर १ हेक्टर शेतात सरासरी ११२ किलो नत्र, ५६ किलो स्फुरद, व ११२ किलो पालाश घेतले जाते. मात्र ही संपुर्ण खते घेतलेल्या हंगामात उपलब्ध होत नाही. तर त्यातील नत्राची उपलब्धता फारच कमी म्हणजे ३०% पेक्षा कमी नत्र पिकांना उपलब्ध होते. सुमारे ६० ते ७०% स्फुरद व ७५% पालाश त्या हंगामात उपलब्ध होते. उरलेली अन्नद्रव्ये पिकांना दुसऱ्या व तिसऱ्या हंगामात समप्रमाणात मिळत असतात.

आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून पिकांचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. शेणखतांचे प्रमाण सर्वच पिकांना सारखे नसून जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांना ते (शेणखताचे) प्रमाण अधिक घालावे. तसेच वर्षातून दोन किंवा तीन पिके घेण्यात येणाऱ्या शेतात शेणखत जास्त प्रमाणात घालावे. याउलट कमी पर्जन्यमान असलेल्या भागात व वर्षातून एकच पीक घेण्यात येणाऱ्या शेतात शेणखताचे प्रमाण कमी करून चालते. या खतातील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ नये, म्हणून चांगले कुजलेले शेणखत शेतात नेल्यावर शेतात पसरवून मातीत चांगले मिसळावे.

२) सोनखत : सोनखतांमध्ये मानवाने उत्सर्जित केलेले घन विष्ठा व मुत्र यांचा समावेश असतो. शेणखतांपेक्षा सोनखतांमध्ये नत्र (५.५%), स्फुरद (४.०%) व पालाश (२.०%) यांचे प्रमाण जास्त असते. हे खट बनविण्यासाठी ४ मी. लांब व १ मी. रुंद व ३० सें.मी. खोलीचे चर खाणतात. हा खड्डा मानवी मलमुत्राने भरून त्यावर काडीकचरा अथवा मातीचा थर दिला जातो कुजण्याची क्रिया पुर्ण झाल्यावर खड्ड्यातील खत पावडर स्वरूपात तयार झालेले आढळते. या पद्धतीला पावडरेटी पद्धत असेही म्हटले जाते. हे खत तयार करताना मानवी विष्ठा व राख समप्रमाणात मिसळून वासरहीत सोनखत तयार होते. अशा प्रकारच्या सोनखतात अन्नद्रव्यांचे प्रमाण नत्र १.३२%, स्फुरद २.८%, पालाश ०.८% व चुना २४.२% असते. सोनखत तयार करताना त्यामध्ये ४० ते ३०% पर्यंत भुसा मिसळल्यास २ ते ३% नत्राचे प्रमाण असलेले खत मिळते. सोनखत तयार करताना त्यामध्ये तयार होणाऱ्या माशांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच त्यामध्ये कीड, जीवाणु, संसर्गजन्य रोग फैलावणारे जीवजंतु यांची वाढ होता कामा नये. शहरातील काडीकचऱ्यामध्ये मानवी मलमुत्र मिसळल्यास त्यापासूनही उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते.

३) गोबर गॅस स्लरी - जनावरांच्या शेणापासून पुरेपुर फायदा करून घेण्यासाठी बायोगॅस सयंत्र हे एक उपयुक्त संशोधन आहे. त्यामुळे इंधनासाठी गॅस आणि पिकांसाठी खत उपलब्ध होते. या सयंत्रामध्ये प्राणवायूच्या अनुपस्थित होणाऱ्या कुजण्याच्या क्रियेमुळे नत्राचा ऱ्हास कमी होतो. बयोगॅस सयंत्रामधुन येणारी स्लरी ही अमोनिया स्वरूपातील नत्राने संपृत्क झालेली असते. अशा स्वरूपातील नत्राचा उपयोग भात पिकास चांगला होतो. गोबरगॅस सयंत्रामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण नत्र १.८० %, स्फुरद ०.९० %, सेंद्रिय कर्ब ३५.२% असते.

४) डुकरांच्या शेणाचे खत - १० ते ५० कि. ग्रॅ. वजन गटातील एका डुकरापासून दिवसाला ०.५ ते २.५ कि. ग्रॅ. पर्यंत शेण मिळते आणि १.३ ते ४.० लि. मुत्र मिळते, तर ५१ ते ९० कि. ग्रॅ. मधील डुकराचे शेण १.० ते ४.० किलो व २.९ ते ४.० लि. मुत्र मिळते. त्याच्या शेणामध्ये ०.६०% नत्र, ०.१०% स्फुरद व ०.५०% पालाश असते. तर मुत्रामध्ये ०.४०% नत्र, ०.१०% स्फुरद व पालाश ०.५०% असते, म्हणजेच १ टन शेणापासून खतांमध्ये साधारणपणे ८ कि. ग्रॅ. नत्र, ४ कि.ग्रॅ. पालाश असते.

५) मुत्रखत - गुरांचे गोठ्यात निर्माण होणारे जनावरांचे मुत्र ही विपूल प्रमाणात आढळणारी चांगली सुविधा आहे. पाणी आणि अन्नद्रव्ये या व्यतिरिक्त यात असलेल्या पिकांच्या वाढीस आवश्यक द्रव्यामुळे पिकांची प्रत सुधरण्यात मदत होते. गुरांचे मुत्र हे लाकडाचा भुसा, ज्वारी, गहू, भाताच्या पेंढ्याचे तुकडे करून त्यामध्ये शोषून घ्यावे. अशा प्रकारे तयार केलेल्या मुत्र खताचा वापर भात पिकास केला असता त्याचा परिणाम युरिया खतापेक्षा चांगल्या प्रकारे झाल्याचे आढळून आले आहे.

६) शिंगाचे खत (हॉर्नमिल) - जनावरांचे इतर अवशेषापासून म्हणजे शिंगे व खुर यापासून बनविलेले हे उपयुक्त खत आहे. शिंगे व खूर वाळवून व दळून त्याची पावडर केली जाते. त्यामध्ये १० ते १५% नत्र, १% स्फुरद व २.५% चुना असतो. हे खत पेरणीपुर्वी ६ ते १० आठवडे जमिनीत २.५ ते ५.० सें.मी. खोल मिसळून देणे जरूरीचे असते.

७) केसांचे खत - चर्मोउद्योगात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे केस उपलब्ध होतात. तसेच केशकर्तनालयातून मानवी केससुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. लोकरीपासून कापड बनविणाऱ्या मिलमध्ये देखील केस उपलब्ध होऊ शकतात. या अवशेषामध्ये नत्राचे प्रमाण १५% असते. परंतु त्यातील नत्र उपलब्ध स्वरूपात नसते. त्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. केस व लोकरी अवशेषाचे ८% कॉस्टिक सोड्याच्या द्रावणात प्रक्रिया करून लगदा किंवा पेस्ट तयार केली जाते. नंतर त्यामध्ये १०% हायड्रोक्लोरीक आम्ल मिसळून मिश्रण उदासिन करतात. त्यातील प्रथिने तळाशी साचतात. मिश्रणातील द्रव बाजुला करून सच्छिद्र घन अथवा स्थायु प्रदर्थातील पाणी काढून वाळविला जातो. अशा प्रकारे बनविलेल्या खतात १२ ते १५% नत्र असून पीक उत्पादन वाढीसाठी ते एके उत्तम नत्रयुक्त खत ठरू शकते.

८) कोंबडी खत - कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठविली असल्यामुळे असल्यामुळे कोंबड्याचा मूत्राचा नाश होत नाही. म्हणून ते एक उत्तम सेंद्रिय खत आहे. कोंबडीच्या वजनाच्या सुमारे ५% विष्ठा प्रति दिन मिळते. कोंबडीच्या विष्ठेतील अन्नद्रव्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  पाणी   नत्र   स्फुरद   पालाश  
गादी पद्धतीतील विष्ठा   ८०%   ०.७६%   ०.६३%   ०.२२%  
ताजी विष्ठा   ७५%   १.४७%   १.१५%   ०.४८७  
जमिनीवर वाळलेली विष्ठा   २४%   ३.०३%   २.६३%   १.४०%  


कुक्कुटपालन व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कोंबड्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. या अवशेषात पिसे. कत्तल केलेल्या पक्षांची डोकी, पाय अपुर्णवस्थेतील अंडी, आतडी इ. भाग येतात. सुमारे ४० मोठ्या पक्ष्यापासून वर्षाला १ टन अवशेष उत्पन्न होतात. हे अवशेष खड्ड्यात कुजवून शास्त्रीय पद्धतीने त्याचे उत्तम खत तयार करता येते.

कोंबडीच्या ताज्या विष्ठेमधील युरिक अॅसिड च्या स्वरूपातील नत्र पाच दिवसाच्या कालावधीत १.३३% पासून अगदी अल्प प्रमाणात उरते. अमोनिया स्वरूपातील नत्राचा ऱ्हास १६.७% पर्यंत होतो. तेव्हा नत्राचा ऱ्हास कमी होण्यासाठी सुपर फॉस्फेट व जिप्सम यासारखी संवर्धने वापरली पाहिजेत. एक टन विष्ठेसाठी ५० किलो सुपरफॉस्फेट वापरावे. गादी पद्धतीमध्ये गहू, भात, ज्वारी, मका, बाजरी या पिकांचे पेंढ्याचे बारीक तुकडे करून अथवा भाताचे तुस किंवा लाकडाचा भुसा वापरावा. त्यामुळे विष्ठेची खताची प्रत सुधारते. ऊग्र वास व माशांवर नियंत्रण राहते.

कोंबड्याची विष्ठा जमिनीत घातल्यापासून ताबडतोब कुजते व त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलबध होऊ लागतात. म्हणून हे खत पेरणीपुर्वी घालून द्यावे. मात्र भुपृष्ठावरील मातीत ते चांगले मिसळले जाईल याची काळजी घ्यावी. कारण हे खत जमिनीवर उघडे राहिले तर त्यातील ५०% नत्राचा ३० दिवसात ऱ्हास होण्याची शक्यात असते. त्याचप्रमाणे पिकांच्या आवश्यकतेनुसारच या खतांची मात्रा देण्यात यावी. हे खत वापरताना प्रती १ टन विष्ठेत ५० कि. ग्रॅ. विरीचा चुना मिसळल्यास घाणेरडा वास नाहीसा होतो.

या खतांत पिकांना आवश्यक असणारी दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही अधिक असल्यामुळे हे एके उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे. हे खत निष्काळजीपणे वापरल्यास पिकावर दुष्परिणाम होण्याची शक्यात आहे. म्हणून पिकांच्या आवश्यकतेनुसारच हे खत वापरावे.

९) मासळीचे खत - अखाद्य मासे व मत्सखाद्य प्रक्रिया कारखान्यतून बाहेर टाकण्यात येणारे अवशेष यापासून हे खत तयार करण्यात येते. अशा प्रकारे मासळी प्रथम डायजेष्ठमध्ये वाफेत शिजवून त्यातील पाणी काढून टाकण्यासाठी वाळविली जाते. नंतर दळून त्याची बारीक भुकटी केली जाते. या खताचा उग्र वास कमी करण्यासाठी पाईन तेलाचा वापर केला जातो. ओल्या मासळीचे तुकडे करून चुलीतील राखेत मिसळून बंदिस्त जागेत सुमारे ३ ते ६ महिने कुजविल्यास मासळी खत तयार होते. मासळीचे खत हे त्यातील अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार एक समतोल सेंद्रिय खत असून सागर किनाऱ्यावरील शेतकरी भात, नारळ, सुपारी, आंबा इ. झाडांच्या पिकांना त्याचा वापर करतात. या खतातील अन्नद्रव्ये त्या पिकाला सावकाश उपलब्ध होत असल्यामुळे दिर्घ मुदतीच्या पिकांना त्याचा वापर करण्यात यावा अथवा पेरणीपुर्वी २ ते ३ आठवडे आधी शेतात घालण्यात यावे.

या खतातील नत्राचे प्रमाण ४ ते १०%, स्फुरदचे ३ ते ९% व पालाशचे १% असते. यातील सेंद्रिय कर्ब नत्राचे गुणोत्तर प्रमाण ४ ते ५ पर्यंत असते. या खताची बारीक पुड करून वापरल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढेल.

१०) कत्तलखान्यातील गलाठा - कत्तलखान्यातील जनावरांच्या शरीराच्या टाकाऊ अवशेषापासून या प्रकारचे खत तयार करतात. या टाकाऊ मांसाच्या पदार्थाचा उपयोग कंपोस्ट खड्ड्यात करून कंपोस्ट खताची प्रत सुधारता येते. त्याचप्रमाणे फक्त टाकाऊ अवशेषापासून खत तयार करावयाचे असल्यास अवशेष वाफेवर शिजवून वाळवुन बारीक करून वापरता येते. यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे मासांचे तुकडे ५% हायड्रोक्लोरीक अॅसिडमध्ये (अम्लात) शिजवून नरम करणे. नंतर आम्लमुक्त करण्यासाठी पाण्याने धुणे व त्यातील पाणी काढून सुर्यप्रकाशात वाळविणे. अशा प्रकारे खतात ८ ते १०% नत्र, १ ते २% स्फुरद व १% पालाश असतो.

११) रक्तखत (ब्लडमील) - खाटीक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या जनावरांच्या रक्ताचे रूपांतर मौल्यवान अशा सेंद्रिय खतात करता येते.

जनावरांच्या रक्तात सच्छिंद गुठळ्या व पातळ द्रव्य असे दोन भाग असतात. रक्तातील गुठळ्या काही मिनीटे ०.५ % हायड्रोक्लोरीक आम्लाच्या द्रावणात उकळून शिजविल्या जातात. घट्ट झालेल्या गुठळ्या पृष्ठभागावर येतात. त्या वाळवुन खत म्हणून वापरतात. या खतात १४ ते १५% नत्र असते. रक्तातील पातळ द्रवात १% चूना मिसळून ८० अंश से. पर्यंत तापमानात तापविले जाते. घट्ट झालेला रक्ताचा रंग बदलतो. त्यातील पाणी वेगळे करून सुर्यप्रकाशात वाळवून खत तयार करतात. अशा प्रकारच्या रक्त खतात १० ते १२% नत्र असते.

खाटीक कारखान्यातील जमिनीवर सुक्या शेणखताची पावडर लाकडाचा भुसा, वाळलेली पानांची पावडर, यासारखे सेंद्रिय पदार्थ पसरवून त्या खतातील द्रव शोषून घेतला तर त्यात ४ ते % नत्राचे प्रमाण असल्यामुळे खत म्हणून वापर करता येतो.

रक्त खतात १ ते २% स्फुरद व १% पालाश असतो. रक्तखत जमिनीत घातल्यावर ताबडतोब कुजत असल्यामुळे पिकांच्या पेरणीपुर्वी घालून चालते.

१२) तळ्यातील गाळ - पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर तळ्याच्या परिसरातील शेतातील पोयटा, चिकणमाती व सेंद्रिय पदार्थ यांचे कण तळ्याच्या तळाशी साठले जातात. या गाळात ०.३% नत्र, ०.३% स्फुरद व ०. ३% पालाश असते. अशा गाळात नत्र स्थिर करणाऱ्या सुक्ष्म जिवाणुची वेगाने वाढ होत असते. त्यामुळे अशा गाळाला खताइतकेच महत्व आहे. या गाळामध्ये भुसभुशीत जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात बदल घडून आणता येतो. म्हणुन तळ्यातील गाळाचा उपयोग सेंद्रिय खत व भुसूधारक म्हणून केला जातो.

१३) राख - राख हे चांगले प्रकारचे पालाशयुक्त सेंद्रिय खत आहे. निरनिराळ्या पदार्थापासून तयार झालेल्या राखेतील अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते.

राखेचा प्रकार   नत्र %   स्फुरद %   पालाश %  
केळशाची राख   ०.७   ०.४   ०.५  
घरातील कचऱ्याची राख   ०.५ ते १.९   १.६ ते ४   २.३ ते ३.३  
गुऱ्हाळातील राख   ०.१ ते ०.२   ०.८ ते १.३   १.५ ते ३.१  
बाभुळ लाकडाची राख   ०.१ ते ०.२   २.५ ते ३.०   ३.५ ते ४.५  


राखेचा उपयोग भातशेतीला तसेच आंबा, संत्री केळी आणि भाजीपाला पिकांना चांगला होतो. थोड्याफार प्रमाणात रोगकिडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा राखेचा उपयोग होतो.

१४) प्रेसमड केक - साखर उत्पादनात उसाच्या रसामधील अविद्राव्य अशुद्ध पदार्थ गाळण पद्धतीने वेगळे केले जातात. या अशुद्ध पदार्थाचा चोथा म्हणजे प्रेसमड पेंड होय. तिचे प्रमाण उसाच्या वजनाच्या ३ ते ७% असते. म्हणजे देशात ५ ते ६ लाख टन प्रेसमडचे उत्पादन होत असते. त्यामध्ये ५० ते ७०% पाणी असते. या पेंडीत ८ ते १०% मेणाचे प्रमाण असल्यामुळे त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सावकाश उपलब्ध होत असतात. त्यासाठी पेंडीतील मेण वेगळे करण्याची आवश्यकता असते.

प्रेसमड पेंडीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. सेंद्रियकर्ब ३६%, नत्र १ ते २% पालाश ०.५ ते १.५ %, चुना १.२%, मॅग्नेशियम ०.०९% व सुक्ष्म अन्नद्रव्ये (भाग प्रति दशलक्ष प्रमाण) लोह ३७, मँगेनिज ४१३, जस्त १६५ व तांबे ७५.

ऊस पिकासाठी हे खत प्रति हेक्टरी १२.५ टन वापरावे. या खताचा परिणाम दुसऱ्या हंगामातील पिकांवरही दिसून येतो. तसेच क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी या खताचा वापर करतात.

१५) कंपोस्ट खत - कंपोस्ट बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या सेंद्रिय पदार्थामधील कर्ब न नत्र यांचे प्रमाण फार महत्त्वाचे आहे. टाकाऊ पदार्थ कुजण्याची क्रिया त्यावर अवलंबून असते. सेंद्रिय पदार्थाबरोबर असलेल्या जिवाणूच्या शक्तीसाठी कर्ब व शरीर घडविण्यासाठी नत्राचे प्रमाण असल्यास कुजण्याची क्रिया मंदावते तर कमी असल्यास त्यातील नत्राचा ऱ्हास कमी होतो. कंपोस्ट बनविण्यासाठी योग्य असलेल्या निरनिराळ्या सेंद्रिय पदार्थामधील कर्ब : नत्राचे प्रमाण पुढील तक्त्यात दिलेले आहे.

कंपोस्ट बनविताना पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपोस्ट खड्डे खणण्यासाठी जागा निवडताना पावसाचे पाणी तंबुण्याची शक्यता असलेल्या खोलगट किंवा पाणथळ जागा निवडू नयेत. शक्यतो जनावरांच्या गोठयाजवळ जागा निवडावी. म्हणजे शेण व इतर काडी जादा लांब वाहून नेण्याची गरज राहणार नाही. जर खड्डा शेतात खणायचा असेल तर शेताच्या एका कोपऱ्यात खणावा. म्हणजे शेतातील तण व इतर पिकांचे टाकाऊ भाग एकत्र करणे सोपे जाईल.

सेंद्रिय प्रदार्थ     कर्ब :नत्र

गाईचे शेण         २०:१

जनावरांचे मुत्र     २:१

झाडांची पाने     २५:१

गवत                  ४०:१

गव्हाचा भुसा   १२५:१

धान्याचा कोंडा   ९०:१

कंपोस्ट खड्ड्याचे माप - कंपोस्ट खड्डे जास्त मोठे किंवा जास्त लहानसुद्धा असू नयेत. सर्वसाधारणपणे ते १ मीटरपेक्षा खोल व २ मीटरपेक्षा रुंद असू नयेत. खड्ड्याची लांबी जनावरांच्या संख्येवर अवलंबून राहील.

जर खड्ड्याची लांबी २ मीटर पेक्षा जादा असेल तर खड्डा २ मीटरच्या कप्याकप्याने भरावा. त्यासाठी तुरकात्या आडव्या उभ्या बांधुन ताटी तयार करावी. एक कप्पा २ ते ४ दिवसात भरल्यानंतर ताटी पुढे सरकावी.

खड्डा भरण्याची पद्धत : प्रथम खड्डयाच्या तळाशी १५ सें.मी. जाडीचा पालापाचोळा व काडीकचरा यांचा थर सारख्या प्रमाणात भरावा. या थरावर पाणी शिंपून तो भिजवून घ्यावा. या थरावर पाच पट पाण्यात शेण व मुत्र मिसळून शेणकाल्याचा ८ सें.मी. जाडीचा थर द्यावा. ज्या ठिकाणी गोबर गॅस मधुन निघणाऱ्या स्लरी उपलब्ध असतील तेथे या मिश्रनाचा उपयोग करावा. अशा स्लरीमध्ये फुजण्याच्या क्रियेस आवश्यक असलेल्या जिवाणूचे प्रमाण नुसत्या शेणापेक्षा जास्त असते. या दोन थरावर १ लिटर पाण्यात अर्धा किलो युरिया व १ किलो सुपरफॉस्फेट यांचे द्रावण करून शिंपडावे. अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थ, शेणकाला, सुपरफॉस्फेट याचे आलटून पालटून थर देऊन संपुर्ण खडा भरून घ्यावा. खड्डा सपाटीच्यावर ६० सें.मी. भरावा. सेंद्रिय पदार्थाच्या ५० ते ६०% पर्यंत पाण्याचा वापर करावा. मोकळ्या हवेमध्ये कुजण्याची क्रिया ६/७ दिवस होऊ दिल्यावर शेवटच्या थरावर मातीचा पातळ थर द्यावा व ताज्या शेणाने तो लिंपून घ्यावा. अशा प्रकारे तयार केलेले उत्कृष्ठ कंपोस्ट ३ महिन्यामध्ये वापरण्यास योग्य होते.

सर्वसाधारणपणे असे निदर्शनास आले आहे की, कंपोस्ट ढीग करून बऱ्याच कालावधीमध्ये शेतात उघड्यावर ठेवतात. त्यामुळे त्यातील नत्राचे प्रमाण कमी होते. यासाठी खड्ड्यातून खत बाहेर काढल्यानंतर लवकर शेतात ते मिसळावे. यावेळी जमिनीत योग्य प्रमाणात म्हणजे वाफाशाइ तके पाणी पाहिज. पेरणीपुर्वी १५ ते २० दिवस अगोदर कंपोस्ट शेतात घातल्यावर त्यातील अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकास होऊ लागते.

१६) गांडूळ खत - गांडूळखत तयार करण्यासाठी ऊन व पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून शेडची आवश्यकता असते. शेडचा आकार खताची आवश्यकता, उपलब्ध शेण व काडीकचरा यावर अवलंबून असते. या शेडमध्ये ढीग पध्दतीने खत तयार करावे. ढिगाचे तापमान २५ ते २८ डी. से. च्या दरम्यान राखावे लागते. कारण हे तापमान गांडूळाच्या प्रजोत्पादनासाठी व वाढीसाठी योग्य आहे. ढिगांची रुंदी ४ फुट, उंची २ फुट व लांबी गरजेनुसार ठेवावी.

ढीग करण्यापुर्वी जागा साफ करून त्यावर पाणी शिंपडावे. त्या जागेवर काडीकचऱ्याचा थर द्यावा. यासाठी सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय टाकाऊ पदार्थांचा म्हणजे नारळाची पाने, केळीची वाळेलेली पाने, उसाचे पाचट इत्यादीचा उपयोग करावा. या थरांचा उपयोग गांडुळांना घर म्हणून होतो. हा थर २ ते ३ इंचाचा देऊन त्यावर वाळलेले शेण अथवा बायोगॅसमधील स्लरी यांचा थर द्यावा. हा थर उष्णता निरोधनाचे कार्य करतो. शेणाच्या थरांमधील प्रतीमीटर २०० गांडुळे सोडावीत. त्यावर पुन्हा शेण, काडीकचरा, पालापाचोळा, गवत, शेतातील कचरा यांचा थर द्यावा. असा तयार झालेला ढीग गोणपाटाने झाकून ठेवावा. त्यावर ढीग ओला राहील यापद्धतीने दिवसातून दोन वेळा किंवा एकदा पाणी मारावे. ४ ते ६ आठवड्यानंतर सेंद्रिय पदार्थांचे काळ्या कणीदार खतात रूपांतर झालेले दिसते. खत तयार झाल्यावर ते वाळवून त्याचा ढिग तयार केल्यास गांडूळे तळाच्या थरात जातात. त्यामुळे वरचा थर फक्त खताचाच शिल्लक राहतो.

साधारणपणे १०० किलो सेंद्रिय पदार्थापासून ३०० ते ३५० किलो खत तयार होते. गांडुळ खत अथवा 'व्हर्मी कंपोस्ट' यामध्ये नुसतीच नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्ये असतात असे नाही तर चुना, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, लोह, बोरॉन न मॅलीब्ल्डेनम यासारखी सुक्ष्म अन्नद्रव्येही असतात. या अन्नद्रव्यांचे प्रमाण गांडूळखत तयार करण्यासाठी कोणते सेंद्रिय पदार्थ वापरले यावर अवलंबून असते. गांडूळ खताच्या वापराने पिकांच्या उत्पादनात नुसती वाढच होते असे नव्हे, तर पिकांच्या दाण्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढून दाण्याची प्रत सुधारते, फळझाडांचा आकार वाढून फळांची प्रत ही सुधारते.