अधिक लागवड व पावसात सापडल्याने झेंडूला भाव कमी, खर्च अधिक तरीही २० गुंठ्यात ४० हजार

श्री. प्रविण अरुण तराळे, मु.पो. वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला. मो. ९७६७९३९७९८

झेंडू लागवडीसाठी आम्ही प्रथम २० गुंठे क्षेत्र नांगरून घेतले. रोटाव्हेटर मारले. ४।। फुटाचे बेड तयार केले. ड्रीपच्या नळ्या अंथरून घेतल्या व ४।।' x २' वर झेंडूची (कलकत्ता) १ जून २०१६ रोजी लागवड केली. २।। हजार झाडे बसली. लागवड केल्यानंतर ८ दिवसांनी जर्मिनेटर +ह्युमिक अॅसिडची ड्रेंचिंग केली. त्यानंतर १५ दिवसांनी १८:४६:० खत २ पोते दिले. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनरची फवारणी केली व नंतर १९:१९:१९, १२:६१:०, १३:०:४५, ०:५२:३४ या विद्राव्य खतांचे गरजेनुसार २।। हजार झाडांस दर तिसऱ्या दिवशी ३ किलो याप्रमाणे एकूण १० डोस दिले.

लागवड केल्यानंतर २१ व्या दिवशी पहिल्या कळ्या काढून टाकल्या. असे झाडाचे वय ५५ दिवस होईपर्यंत एकूण ३ वेळा कळ्या खुडल्या. नंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व रासायनिक (किटकनाशक, बुरशीनाशक) औषधांच्या १५ - २० दिवसाला फवारण्या करत असे. प्रथम झेंडूचा तोडा १५ ऑगस्ट २०१६ रोजी निघाला. नंतर गोकुळ आष्टमी, गणपती, ऋषी पंचमी, गौरीपुजन या सणांमध्ये झेंडू भरपूर निघाला. फुलांची क्वालिटी चांगली निघाली. परंतु यावर्षी झेंडूच्या लागवडी भरपूर प्रमाणात झाल्यामुळे बाजारभाव पाहिजे तसे मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी मिळाले.

२० गुंठ्यामध्ये ३० बेड होते तर रोज ६ बेडचा माल तोडत असे. रोज ६ पोते (३० - ३२ किलोचे पोते) माल निघत होता. असे १५ ऑगस्टचा पहिला तोडा झाल्यानंतर झेंडू दुसऱ्यांदा गोकूळ अष्टमीला तोडला. त्यानंतर मात्र दररोज १५० ते १८० किलो फुले असे १० तोडे चांगले झाले. भाव १५ - २० ते २५ रु./किलो मिळाला. त्यानंतर वारा वादळी पाऊस झल्याने प्लॉटची पडझड झाली. फांद्यांची मोडतोड झाल्याने गणपतीनंतर प्लॉट काढून टाकला. यासाठी खर्च २.८० रु./रोप याप्रमाणे ७००० रु. रोपांवर, मशागत बेडसह ३००० रु., २ हजार रु. ची खते, विद्राव्य खते २५०० रु., डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर ४ हजार रु. असा एकूण १९ -२० हजार रु. खर्च झाला. भाव फारच कमी होते तरी ४० हजार रु. एकूण उत्पन्न मिळाले. भाव जर जास्त (नेहमीसारखे) ४० ते ६० - ७० रु./किलो) असते तर अधिक पैसे झाले असते.

Related New Articles
more...