शिक्षण व उद्योगाची वयोमानानुसार नवीन दिशा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीमध्ये वाटेकरी भरपूर प्रमाणात होत चालले आहेत. दोन एकर जमीन व घरामध्ये दहा वाटेकरी त्यामुळे आपोआपच काम नाही. उत्पन्न कमी. यामुळे हलाखीची परिस्थिती व कुटुंबातील वृद्ध माणसे अकारण त्रस्त, या चक्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.

वरील परिस्थितीचा विचार करता या चक्रातून सुटका करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजल्यास हमखास एक नवीन दिशा मिळून आर्थिक उत्पन्न तर वाढेलच शिव्या मानसिक समाधानदेखील मिळू शकेल.

सर्वसाधारण वयाचा विचार केल्यास खालीलप्रमाणे गट पाडून प्रत्येक गटातील व्यक्तीस कामे वाटून देता येतील.

१) वय ३ ते ५ वर्षे अंगणवाडी क्षेत्र: निसर्ग, पाणी, वनस्पती, पर्यावरण या संदर्भातील विविध पुरक गोष्टींची तोंडओळख लहान मुलांस करून देणे.

२) वय ५ ते १० वर्षे : विविध प्रकारे वनस्पतींची वाढ करण्याचे ज्ञान, बीज, रोपे, छाट, कटींग, वनशेती, जंगल वाढीसाठी, पर्यावरण जोपासण्यासाठी व संवर्धनासाठी वनस्पतींची लागवड त्याविषयी प्रात्यक्षिके उदा. कुंड्या भरणे, वाफे करणे व सर्व फळझाडांच्या विषयी मुळात आवड निर्माण करणे, त्यांची लागवड, उपयोग यांची माहिती प्रत्यक्ष देणे.

३) वय १० ते २० वर्षे : हा कालावधी शेतीविषयक, शेती जोडधंदाविषयक शिक्षण देण्याचा असून त्याच वयामध्ये संबंधित विषयाचे शिक्षण दिल्यास पुढे शेतकरी अडाणी राहणार नाही. शेतीविषयक कार्यशाळा भरवून त्यामध्ये अशा मुलांस शिक्षण द्यावयास हवे. शाळेला सुट्ट्या (भरगच्च) देऊ नयेत कारण याबाबतीत आपण चुकीच्या पद्धतीने चाललो आहोत. कारण अशा सुट्टयांमुळे मुलांचे शिक्षणविषयक लक्ष कमी होते. शिक्षणाचे धोरण ठरविताना शेती हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असल्याने प्रत्येक वर्गात शेतीविषयावर आधारित १०० मार्कांचा विषय वयोमान - नुसार ठरविणे अत्यावश्यक व गरजेचे आहे. म्हणजे या शिक्षणाची गोडी या वयातील मुलांना लागेल व कृषी उद्योगाचे बीज या मुलांच्या मनात रुजण्यास मदत होईल.

४) वय २० ते ३० वर्षे: या कालावधीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक नवनवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योग या विषयीचे ज्ञान द्यावयास हवे, किंबहुना अशा प्रकल्पावरती प्रत्यक्ष काम करणेची संधी देण्यात आल्यास शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करता येऊन उत्पन्नाच्या नवीन वाटा शोधता येतील व देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. मुले पदवी/ पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर व त्या त्या क्षेत्रातील अनुभवातून संरकारकडून पडिक जमिनी त्यांना लांब पल्ल्याच्या खंडाने मिळाल्यानंतर त्यावर मागील पहिल्या टप्प्यात शिकलेल्या गोष्टींचा प्रयोग करता येईल. या प्रकल्पावर मी स्वतः त्या काळचे भारताचे कृषिमंत्री स्व. ना. अण्णासाहेब शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चाही केली होती. अण्णासाहेबांनी ठिबक शिंचंनावर पुस्तके लिहावीत व देशाचे प्रबोधन करावे असे ते चारही विद्यापीठांचे महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे अध्यक्ष असताना मी सुचविले व स्वतःच्या लेखांच्या काही प्रति मुद्दाम त्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्व. अण्णासाहेबांनी या विनंतीचा विचार केला. त्या संदर्भात त्यांनी जवळजवळ चळवळच उभी केल्याचे आपणा सर्वांना माहीत आहेच. पण अजूनही या गोष्टीकडे सरकराने लक्ष नाही.

५) वय ३० ते ४० वर्षे व ४० ते ५० वर्षे: या कालावधीमध्ये भातशेतीत मोगरा, आंबा अशा प्रकारची जादा उत्पन्न मिळवून देणारी, तीस वर्षापर्यंत विविध प्रयोग यशस्वी केल्यानंतर भारतीय पद्धतीने उच्चान्तर्गत मधुमक्षिकापालन, निर्यात व देशांतर्गत फुलशेती, विविध फलोत्पादन, प्रक्रिया व उपपदार्थ प्रक्रियांचे प्रकल्प (By Poducts & their Process Industries - Value Addition Products) पारदर्शकपणे सहकारी तत्त्वावर उभे करणे व निर्यात संस्थांचे तालुक्यात जाळे तयार करणे. जिल्ह्यात कमी ऊर्जेचा वापर करून नवीन तंत्रज्ञान उभे करणे, त्यापासून फळे तोडणीनंतर ती अधिक काळ नैसर्गिक पद्धतीने कशाप्रकारे टिकवावी, त्यांची हाताळणी व निर्यात कशी सुलभ होईल, तोडणीनंतरची नासाडी झालेली फळे कशाप्रकारे कमी होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक वनस्पती पारंपरिक पिकातुन विविध प्रक्रिया उद्योग उदा. मक्यापासून स्टार्च, ग्लुकोज, पॉपकॉर्न व नंतर शिकलेले तरुण अनेक औषधास लागणारे प्रकल्प उभारू शकतील. उदा. विविध वनस्पतींच्या भागाचे पावडर, चुर्ण (जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहासाठी), सिताफळाच्या बियांची पावडर उदा. लिखांवर उपयुक्त, शिकेकाईची पावडर त्यापासून आयुर्वेदिक शाम्पू यांचे शिक्षण दिले पाहिजे. पडिक जमिनीमध्ये आयुर्वेदिक वनस्पती योग्य काळजी घेतल्यास व्यवस्थितरित्या वाढू शकतात व या लागवडीपासून मानसिक समाधान तर मिळतेच कारण येथूनच शारिरीक व मानसिक विकृतींचा कालावधी सुरू होतो. मानसिक ताणतणाव निर्माण होतात. निरनिराळ्या व्याधींचे प्रमाण वाढते. तेव्हा अशा वनस्पतींची व पारंपरिक पिकांची लागवड केल्यास पोटापाण्याचा प्रश्न तर सुटेलच शिवाय आयुर्वेदिक वनस्पतींपासून निरनिराळ्या व्याधींवर उपचारही करता येईल. सागरगोटा वनस्पतीपासून प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर बरा होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. अशी अनेक उदारहणे आहेत. याचे संशोधन करून अशा वनस्पतींची लागवड करणे सोयीचे आहे व ग्रामीण भागात जेथे M. B. B.S. डॉक्टर जात नाही तेथे आयुर्वेदिक औषधांद्वारे या वयातील लोकांना आयुर्वेदिक वनस्पतींचे ज्ञान देऊन रुग्णांवर उपचार केले तरी अशा परिसरात ग्रामीण आरोग्य (आयुर्वेदिक) केंद्रे उभी राहतील व हे योगराज भारतासारख्या महाकाय देशाकडेच असतात, हे सर्वांना समजेल.

६) वय ५० - ६० वर्षे : या वयातील शेतकरी निवृत्तीकडे झुकलेले असतात. घरातील तरुण व्यक्तींना अशा व्यक्तींची अडगळ वाटू लागते. तेव्हा हे होऊ नये अशासाठी या व्यक्तींना शेतात पाठवून, राहण्यास घर बांधून शेताच्या रिकाम्या बांधावर शेवगा, चिंच, कढीपत्ता, कवठ, सीताफळ, कडुलिंब अशा पिकांची लागवड करणे त्याबरोबर जोडधंदा म्हणून एखादी खुंट्याला शेळी अथवा मेंढी व कोंबड्या पाळण्यास दिल्या तर शेळ्या मेंढयांना चारा मिळतो व शेतकऱ्याला दूध, लोकर, अंडी यांचे उत्पन्न मिळून त्याच उत्पन्नातून आळंदी - पंढरपूरची वारी सुखासमाधानाने करता येईल व या पशुंचे, झाडांचे संगोपन करण्यास स्वतःचे मन गुंतवून वेळ चांगला जाईल. ताणतणाव राहणार नाहीत. शेतकी मालाचे संरक्षण होईल. उतार वयात नवीन पूरक उद्योगांचा विकास होईल. आरोग्य चांगले राहील व अध्यात्माकडे खऱ्या अर्थाने प्रगती होत जाईल.

वरील सर्व कल्पना मिशनरी स्वरूपाचे कार्य, झोकून किंवा वाहून घेण्याची प्रवृत्ती, मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याची जबरदस्त, इच्छाशक्ती, विविध टप्प्यांवर स्थानिक लोकांच्या, बाहेरील गावच्या तज्ज्ञांकडून प्रबोधन, विविध प्रकारच्या मंडळांची स्थापना (विज्ञान, उद्योजक, प्रशिक्षण, अध्यात्म, साधना) करून हे शक्य होईल. हे करताना कट्टर राष्ट्रप्रेमी युवकांना मार्गप्रदिप म्हणून प्रगत करून असे प्रकल्प राबविण्याचा हा श्रीगणेश ठरेल.