आधुनिक द्राक्ष लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


द्राक्षाचे मूळ स्थान रशियातील अरमेनिय जिल्हा आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. महाराष्ट्रा नाशिक, सांगली, सोलापूर, अस्मानाबाद या जिल्ह्यांत द्राक्षाची सर्वांत जास्त लागवड आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, सांगली, तासगाव, उगाव, नारायणगाव, करकंभ - पंढरपूर, फलटण हा भाग उत्तम प्रतीच्या द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षाच्या लागवडीला औरंगाबाद, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतही तेथील अनुकूल हवामानामुळे भरपूर वाव आहे.

द्राक्षाचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे ) वापरतात. दुसर्‍या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात. तिसर्‍या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८० % उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. १०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी १०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात.

भारतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यांतील द्राक्षे त्यांच्या उच्च प्रतीमुळे प्रसिद्ध आहेत. द्राक्षाच्या पिकापासून सर्वांत जास्त आर्थिक लाभ होत असल्यामुळे इतर जिल्ह्यांतील द्राक्षाची लागवड वाढत आहे.

जमिन : द्राक्ष हे पीक लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत १० ते १५ वर्षे राहणारे असल्याने योग्य जमिनीचे निवड करणे फार महत्त्वाचे असते. या पिकासाठी मध्यम काळी, मध्यम खोलीची, चांगल्या निचर्‍याची, पोयटायुक्त, रेताड किंवा मुरमाड सुपिक अशा जमिनीची निवड करावी. अगदी भारी काळ्या जमिनीत या पिकाची लागवड करणे टाळावे तसेच क्षारयुक्त जमिनी द्राक्ष लागवडीस अयोग्य आहेत. कारण अंशा जमिनीमध्ये द्राक्ष वेलींची वाढ खुंटते व उत्पादनक्षमता कमी होते.

जमिनीचा सामू (pH) हा ६.५ ते ७.५ असावा. जमिनीमध्ये क्षारतेचे प्रमाण १.०० पेक्षा अधिक नसावे. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५० ते १ किंवा त्याहून अधिक असल्यास अती उत्तम समजावे.

क्षारता : मातीतील पाण्यात विद्राव्य स्थितीत असणारे क्षार जमिनीची क्षारता ठरवितात, ह्या क्षारांचे प्रमाण मोजण्यासाठी विद्युत वाहकता ०.३ मि. म्हो./ सें.मी. पेक्षा जास्त असल्यास जमीन खार जमीन माणली जाते आणि आशी जमीन द्राक्ष लागवडीस योग्य ठरत नाही. सोडियम व क्लोराईडचे प्रमाण द्राक्ष लागवडीत महत्वाचे ठरते.

तसेच सर्वसाधारण जमिनीमध्ये एकरी नत्र १५० ते १८० किलो, मुक्त चुना (CaCO3) २ ते ४%, तांबे (Cu) ०.३ ते २.५%, लोह (Fu) ०.२० ते १.५%, मंगल (Mn) ०.३ ते २.५ %, जस्त (Zn) ०.०८ ते ०.८५%, बोरॉन (B) ०.०२ ते ०.०८%, मॉलीब्लेडम (Mo) ०.०१ ते ०.०५%, मॅग्नेशियम (Mg) २ ते ४% असावे.

हवामान : द्राक्ष हे थंड हवामानातील पीक असल्याने अतिथंड हवामान जर असेल तरच द्राक्ष सुप्तावस्थेत जातात. परिणामी पिकाची वाढ होत नाही. मात्र आपल्या भागातील तापमान फारसे थंड नसल्याने त्याची वाढ समाधानकारक होते.

अधिक पावसामुळे व दमट हवामानामुळे या पिकाची वाढ चांगली होत नाही. तसेच रोग किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कमी पाऊस, कोरडी हवा आणि मध्यम तापमान असल्यास द्राक्ष वेलीची आणि फळांची वाढ चांगली होते. फळे वाढीच्या काळात मध्यम तापमान, कोरडी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यास फळे निरोगी व आकर्षक राहतात, फळातील साखरेचे प्रमाण वाढून आम्लतेचे प्रमाण कमी होते.

यासाठी वेलीची वाढ चांगली होण्यासाठी २५ से ३० डी. से. तापमान असावे, तापमान जर ४० डी. से. च्या वर गेल्यास किंवा १० डी. से. पेक्षा खाली आल्यास वेलीची वाढ मंदावते. बागेच्या निरोगी वाढीसाठी हवेत आर्द्रता ६० % पेक्षा कमी असणे अनुकूल ठरते. आर्द्रता ८० % पेक्षा अधिक असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

ऑक्टोबर ते मार्चचा काळ फलधारणेस, फळ पोसण्यास आणि फळांना गोडी वाढण्यास अनुकूल असतो. ऑगस्ट - सप्टेंबर या काळात ढगाळ हवामान राहते, उष्णतामानही घटते, त्यामुळे वेलींची वाढ खुंटते आणि वेलींना काही प्रमाणात विश्रांती मिळते. द्राक्ष बाग फुलोर्‍यात असताना पाऊस पडल्यास फुलोर्‍याची गळ होते. द्राक्षमण्यात पाणी फिरण्यास सुरुवात झाल्यापासून म्हणजेच द्राक्ष पक्व होण्यास सुरुवात झाल्यापासून पुढील काळात तापमानात खूपच वाढ होत असेल तर फळ पिकण्यावर त्याच अनिष्ट परिणाम होतो. अधिक तापमानामुळे फळे पिकण्याची क्रिया लवकर होते. परंतु त्यात साखरेचे प्रमाण कमी पडते. ज्या भागात कडक उन्हाळा असतो, त्या भागात द्राक्षवेली उत्पादनक्षम होण्यास खरड छाटणी वेळेवर करावी. कडक थंडी फार काळ टिकून राहिली तर कोवळ्या घडावर त्याच परिणाम होतो. अगदी कोवळे घड थंडीमुळे सुकून जातात. फळधारणेच्या क्रियेवर परिणाम होतो.

यशस्वी लागवडीसाठी जमीन व हवामानाच्या बाबतीत खालील दक्षता घ्यावी -

१) खरड छाटणीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या कालावधीत सुर्यप्रकाशाचा दिवसातील कालावधी ८ तासांपेक्षा कमी नसावा.

२) ऑक्टोबर छाटणीनंतरच्या महिन्यात किमान तापमान १८ डी. से. पेक्षा कमी नसावे.

३) नवीन फूट फुटत असताना थंडीमध्ये बर्फाचे कण पडत असणारे ठिकाण नसावे.

४) घड तयार होत असताना दमट हवामान नसावे.

५) निवडलेल्या जमिनीत ९० सें. मी. पर्यंत कठीण थर नसावा.

६) जमिनीतील एकूण विद्राव्य क्षार ०.३ पेक्षा जास्त नसावेत.

७) मातीतील पाण्याच्या संयुक्त द्रावणात एक्चेंजेबल सोडीअमचे प्रमाण १५ पेक्षा जास्त नसावे.

८) मातीतील पाण्याच्या संयुक्त द्रावणात क्लोराईड ५० मिली / लिटरपेक्षा जास्त नसावे.

९) पाण्यात एकूण क्षार १५०० पी. पी. एम. पेक्षा जास्त नसावे.

१०) पाण्यात क्लोराईड १४०० पी. पी. एम. पेक्षा जास्त नसावे.

११) पाण्यात सोडीयम ३६० पी. पी. एम. पेक्षा जास्त किंवा सोडीयम अॅबसॉर्पशन रेशिओ काळ्या मातीत ८ आणि हलक्या मातीत १२ पेक्षा जास्त नसावे.

नर्सरी तयार करणे :

द्राक्षाची लागवड ही द्राक्षाच्या छाटापासून केली जाते. यासाठी आपणास हव्या असलेल्या उत्तम काड्या चांगल्या जोपासलेल्या निरोगी अशा बागेतून घ्याव्यात. छाट वजनदार, निरोगी, पूर्ण पिकलेला, डोळे भरदार असलेला, असा हवा. कडी फोफशी नसावी. बागेला सातत्याने उत्तम माल आलेला असावा. अत्यंत निरोगी काड्या घ्याव्यात. कारण डेडआर्म सारखे रोग छाटांपासून नव्या बागेत घुसतात.

चांगले छाट हे वजनदार असून त्यांच्या वरची साल ही चिरटलेली असते. अशा काड्या रसरशीत दिसतात. या काड्या गोल आकाराच्या मध्यम पेराच्या ( ६ ते ८ सें. मी. लांबीच्या) टुपटुपीत डोळे असणार्‍या मध्यम जाडीच्या असतात. कमकुवत, अन्नसाठा कमी असलेल्या काड्या घेऊ नयेत. लांब पेराच्या फार जाड किंवा बारीक काड्या निवडू नयेत.

छाट ४ डोळ्यांचे घ्यावेत. खालचा काप खालच्या डोळ्याजवळ सरळ घ्यावा. वरचा काप तिरपा पण डोळ्याच्या विरुद्ध बाजूला अतरत जाणारा असा घ्यावा. छाट घेण्याचे काम सावलीत करावे. छाट घेतल्यानंतर सर्व छाट थंड जागेत ओल्या गोणपाटाखाली ठेवावेत. शक्यतो श्वसन कमी होईल हे पहावे. श्वसनात खर्च होणारा अन्नसाठा वाचविला पाहिजे. काड्या किंवा छाट जास्त तापमानात बाहेर राहिल्यास त्यांतील ओलावा कमी होतो. रस आटतो. रसाचा प्रवाह खंडित होतो. म्हणून काळजी घ्यावी.

रोपवाटीका तयार करण्यासासाठी जमीन बनविणे :

उत्तम निचरा असणारी, तण विरहित अशी जमीन निवडावी. जमि उत्तम नांगरून घ्यावी. बारीक दगड वगैरे असतील तर वेचून काढावेत. त्यानंतर जमिनीत १ गुंठा क्षेत्रासाठी उत्तम कुजलेले शेणखत ५०० किलो + कल्पतरू सेंद्रिय खत ५ किलो + सुपरफॉस्फेट २० किलो + १ किलो झिंक सल्फेट व्यवस्थित मिसळून सर्वत्र सारखे विस्कटावे. यातच २५ किलो निंबोळी पेंड मिसळावी. याचबरोबर प्रोटेक्टंट + क्लोरेडेन डस्ट करून घ्यावे. त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी नांगरून, वखरून २ फुटावर सर्‍या पाडावयात. जमिनीची बांधणी करून पाणी द्यावे.

छाट कलमांची लागवड :

छाट कलमे लागवडीपुर्वी एक रात्रभर पाण्यात ठेवावीत. तसेच मुळ्या फोडण्यासाठी लागवडीपुर्वी १०० मिली जर्मिनेट + १० लि. पाणी या द्रावणात काड्या भिजवून लागवड करावी.

जमीन वाफशावर असताना (चिखल नसताना) जेव्हा मऊ असते. तेव्हा दोन डोळे जमिनीखाली जातील असे वरंब्याच्या बगलेत हलक्या हाताने दाबावे. तिसरा डोळा जमिनीला लागेल इतकी काडी थोडीशी तिरपी लावावी. हलक्या हाताने काडीच्या बुडाजवळील माती दाबावी अशा रितीने साधारण प्रत्येक वितावर वरंब्याच्या दोन्ही बाजूस काड्या लावून घ्याव्यात आणि हलके पाणी द्यावे. दर ५ /६ दिवसांनी जमिनीचा वरचा १'' थर वाळला की पुन्हा पाणी द्यावे. योग्य तापमान असल्यास जवळ जवळ २ आठवड्यात डोळे उमलू लागतात. साधारणपणे २० - २५ दिवसांनी वर छोटी पाने आणि खाली मुळ्या सुटायला लागतात. या रोपालाच आपण 'हुंडी' म्हणतो.

डोळे उमसत असतांना त्यावर उडद्या किडीचा प्रादूर्भाव होत असतो म्हणून जवळच्या प्रोटेक्टंटचा वापर करावा. 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारावीत. याच वेळी बारीक पाऊस वगैरे लागून राहीला तर प्रोटेक्टंटसह क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट आणि बाविस्टिनची फवारणी घ्यावी.

हुंडीची वाढ :

काड्या लावल्यानंतर साधारणपणे दीड महिन्याने वर पाने वाढीस लागतात. वाढ काही काळ स्थिरावते आणि जमिनीत मुळ्या वाढावयास लागतात. सुरुवातीला या मुळ्या वाढावयास लागतात. सुरूवातील या मुळ्या पांढर्‍या असतात. लावणीनंतर ६० -६५ दिवसांनी ही मुळी वीत - दीड वीत इतकी ऐसपैस लांब होते. या मुळ्या पांढर्‍या सुतळीसारख्या जाड होतात. हळुहळु त्या रंग बदलून तपकिरी होतात. या काळात खताचा ( नत्राचा ) होस दिल्यास फूट जोरात वाढीस लागते. मात्र मुळ्या कमकुवत राहतात, म्हणून हा मोह आवरावा. भरपूर कार्यक्षम, जोमदार मुळ्या येण्यासाठी जर्मिनेटर एकरी १ लि. मुळाशी २०० लि. पाण्यातून द्यावे.

एक बादली ताजे शेण + १ बादली मूत्र एकत्र करून त्याची ३ -४ बादल्या पाण्यात घालून रबडी करावी. या रबडीत २ किलो युरिया + २ किलो सुपरफॉस्फेट + १०० ग्रॅम गूळ + १ किलो झिंक सल्फेट + १ किलो फेरस सल्फेट घालून ती २०० लि. बनवावी. यांतील १ लिटर पाण्यात ९ लिटर पाणी घालून रोपांना बुडख्यात १/४ लि. (२५० मिली) प्रमाणात ओतावे. याचे उत्तम परिणाम दिसतात.

यानंतर हुंडी वाढीचा २ रा टप्पा सुरू होतो. हा टप्पा कलम लावल्यापासून २ ।। ते ४ महिन्यात येतो. या काळात प्रथम मुळ्या तपकिरी होऊन त्यांत अन्नसाठा होण्यास सुरुवात होते. काडीचा मुळचा भाग जाड होऊ लागतो. नंतर या काडीवरची साल चिरटते. अशी हुंडी भरपूर अन्नसाठा असलेली असते. या हुंडीला 'पक्की हुंडी' म्हणतात. या हुंडीची खालची पाने जाड व जून बनतात.

कोवळ्या हुंड्यांची लागवड :

एप्रिल छाटणीतील काड्यापासून तयार केलेल्या हुंड्यांची लागवड सप्टेंबर अखेरीस करावी. या हुंड्यांमध्ये अद्याप भरपूर असा अन्नसाठा नसतो. मुळ्या कमीत कमी दुखावतील अशी लागण करणे महत्त्वाचे असते. नर्सरीतून वाफशावर मुळ्या जादा न दुखावता काढाव्यात. माती ढासळू द्यावी. या मुळ्या वाळू देऊ नये. शेतातच असल्यास लावण्यापूर्वी बादलीत पाण्यात बुडवून लावणीपर्यंत न्याव्यात. लांबून आणावयाच्या असतील तर ओल्या (जर्मिनेटरच्या द्रावणात ) गोणपाटात गुंडाळून आणाव्यात. हुंडी लागवडीपूर्वी १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० मिनिट भिजवून लागवड करावी किंवा ह्या द्रावणाचे लागवडीनंतर ड्रेंचिंग करावे.

हुंडी नवीन जागी बसविताना मुळांना लागणार्‍या जागेएवढा खड्डा वाफसा असतांना करावा. त्या खड्ड्यात मुळ्या मूळ जागेप्रमाणे पसरून हळुहळु वाफशाची माती दाबून घ्यावी. पाणी हलके द्यावे. अशा हुंड्या बसवताना मुळींना जेवढा कमी मार बसेल तितक्या लवकर त्या टवटवीत होताते. नंतर ८ -१० दिवसांनी वाढ होऊ लागते. मात्र कडक तापमानामुळे वरची पाने सुकतात व वाळतात. अशी पाने गेल्यास नवीन पाने येऊन ती पाने ३० -३५ दिवसांची होईपर्यंत हुंडीची उपासमार होते. कारण हुंडीतील अन्न संपवूनच ही पाने येतात.

ऑगस्टमध्ये लावलेल्या हुंड्यांची परिस्थिती अशी झाली तर वरील कोवळी वाढ हमखास पावसात सापडून रोगग्रस्त बनते. रोगामुळे पाने जातात. पुन्हा नवी फूट येत राहते. अशा रितीने अन्नसाठा कमी होऊन हुंड्या कमकुवत बनतात. अशा हुंड्या सुधारणे फारच कठीण असते. यासाठी सुरुवातीसच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम या २५० मिली औषधांची बुरशीनाशकासह १०० लि. पाण्यातून लागवडीनंतर ८ -८ दिवसांनी दोन फवारण्या घ्याव्यात. त्याने हुंड्याची प्रतिकार शक्ती वाढून अन्नसाठा वाढेल. तसेच हुंड्यांची प्रतिकुल हवामानातही जोमाने वाढ होईल. काही ठिकाणी पावसाच्या शेवटी लागवड करतात. एकंदरीत ही लागवड यशस्वी होते.

फेब्रुवारीमध्ये लावलेल्या हुंड्यांना मात्र नंतर वाढत्या तापमानाचे उष्ण कोरडे हवामान मानवते व या हुंड्या महिनाभरात त्यावरील पाने वयात आली असल्याने भरपूर अन्न बनवून जोमाने चाल घेताते.

ऑगस्ट व फेब्रुवारीमेध्ये लागवड केलेल्या हुंडीच्या वाढीतील हा हवामानाचा परिणाम समजून घ्यावा.

पक्की हुंडी लागवड :

किमान चार महीने वयाच्या शेवटच्या दीड महिन्यात कोवळी फूट न आलेल्या हुंडीत भरपूर अन्नसाठा असतो. ऑक्टोबर लागवडीपर्यंत अशा हुंड्या वापरतात. अशा पक्क्या हुंड्या लावताना तळातील मुळ्या काडीला जेथून मुळ्या फुटल्या आहेत, तेथून मुठीत धरून बाकीच्या कापून काढाव्यात व वरची काडी नवीन वाढीतील तपकिरी फुटीतील २ ते ३ डोळे ठेवून छाटून टाकावी. अशा हुंड्या कायम जागी वाफशावर बसवाव्यात. नेहमीप्रमाणे हुंडी वापशावर माती दाबून गच्च बसवावी. म्हणजे माती दाबून घेतल्याने मुळांच्या भोवती पोकळी राहणार नाही. नंतर हलकेसे पाणी द्यावे. या हुंड्यांनाही वरीलप्रमाणेच वाफश्यावर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करावे. अशा हुंडीत भरपूर अन्नसाठा असल्याने आणि जर्मिनेटरचा वापर केल्याने लावणीनंतर १० -१२ दिवसांत वर वाढावयास लागतात.

ऑक्टोबर छाट कलम कायम जागी लावणे :

या पद्धतीत जागेवरच द्राक्ष छाट बसवितात. एका जागी ३ छाट ४'' अंतराने बसवितात. फेब्रुवारीत त्यांतील जोमदार एकच कलम राखावे. संक्रांतीनंतर अशा लागणीची फारच काळजी घ्यावी लागते. नांगे भरून घेणे हे पहिले काम आहे. हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे.

फेब्रुवारी लावण्यात येणार्‍या कोवळ्या हुंडीची चाल तशीच घ्यावी, तळात छाटू नये.

ऑगस्ट / ऑक्टोबरमध्ये हुंडी बसवून घेतलेली वाढ तशीच जमिनीवर पसरून द्यावी. थंडीत ही वाढ आपोआप मंदावते. फेब्रुवारीपर्यंत मुळीत भरपूर अन्नसाठा होतो. काड्याही तपकिरी होतात. ही वाढ तळांत २ डोळे ठेऊन छाटावी. मात्र ऑक्टोबरमधील केलेली छाट कलमाच्या लागवडीमध्ये कोवळ्या हुंडीतील लागवडीत वाढ कोवळी असते, त्याकरिता तळात छाटू नये.

अशा रितीने लावणीच्या कोणत्याही पद्धतीत २।। ते ४ महिने करून घ्यावयाची वाढ जमिनीच्या वर करून न घेता जमिनीच्या खाली भरपूर मुळी येईल अशीच करावयाची असते. अशी मुळी वाढावी. याकरिता जमीन आवळून आली असेल तर वरचेवर टाचण मारून ढिली करून घ्यावी. याकरिता लावणीच्या वेळी आणि नंतर १ महिन्याने कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमीन भुसभुषीत राहून हवा, पाणी खेळते राहते. अशा जमिनीत जास्तीत जास्त वाफसा राहिल असे पहावे. तसेच जर्मिनेटरचे द्रावण महिन्यातून २ वेळा द्यावे. नत्र देऊ नये. तसेच नवी वाढ २ ते २।। महिन्याची होईपर्यंत वेलीतील अन्नसाठा संपत असतो. हे लक्षात ठेवून त्याची जपणूक करवी. यासाठी नवीन द्राक्ष लागवडीत लावणीनंतर पहिले ३ महिने मुळ्यांचीच वाढ करून घ्यावयाची असते. हे यशस्वी लावणीचे पहिले सूत्र पूर्ण आत्मसात करावे. पुढील वाढीचा हा पाया ठरतो. यासाठी वरील खत व औषधांचा वापर फायदेशीर ठरतो.

चाल घेणे :

वरीलप्रमाणे लावणीचे तंत्र नीट सांभाळले तर जानेवारी अखेरीस वेळी चाल घेतात. शेंड्याकडे रोज एक नवे पान व नवे पेर येणे या वाढीला 'चाल' असे म्हणतात.

ही चाल - १) जमिनीतील मुळ्यांच पसारा,

२) मुळ्यांनी साठविलेला राखीव अन्नसाठा,

३) योग्य तंत्रज्ञानाचा, खातांच पुरवठा,

४) वाफसा,

५) उष्णता

या गोष्टींवर अवलंबून असते. वाढीसाठी योग्य तापमान महत्त्वाचे असते. कमी तापमानात एन्झाईम्स काम करीत नाहीत. खत घातले की वाढ झालीच पाहिजे अशी आपली गैरसमजूत असते. प्रथम तापमान अनुकूल हवे. त्यानंतर खत दिल्यास वेली खत वापरू शकतात. थंडीत खते घालून वाढ मिळवता येत नाही. तेथे डॉ. बावसकर तंत्रज्ञान 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावे. म्हणजे अपेक्षीत रिझल्ट मिळतील.

जोरात येणारी चाल काही काळ मधेच थांबली तर त्याचे मुख्य कारण तापमान कमी होणे असते. नाहीतर रोज एक पेर, एक पान अशी वाढ चालू राहते. चांगली वाढ रोज ३ इंचापर्यंत होते. ही वाढ रात्रीतून जास्त होते. चाल घेतल्यानंतर येणारी पहिली पाने १" ते ४" रुंदीची असतात. चांगली वाढलेली द्राक्षाची पाने ८" ते १०" रुंदीची असतात. चाल घेतलेल्या रोपांना १।। फूटाजवळ बगल फुटी येऊ लागल्या पाहिजेत. पहिली ३ इंचे ते १।। फूट वाढ गाठाळ चालते. नंतरची वाढ लांब पेराची होणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे असते. वेलीच्या शेंड्याकडील चार पेरानंतर पाचव्या पानाच्या बगलेत बगल फूट येते. अशा बगल फुटी येऊ लागल्या तर त्या २ -३ पाने राखून खुडाव्यात. सामान्यपणे वेल १।। फूट वाढल्यावर तळातून बगल फुटी वाढल्या पाहिजेत. बगल फुटी येणे म्हणजे जमिनीत मुळी जोमदार वाढत आहे असे ओळखावे. मुळींनी बनवलेल्या सायटोकायनीनमुळे या फुटींना वाढायला मदत होतो.

चाल घेतलेल्या द्राक्षवेलींना वेळीच आधार द्यावा. यासाठी प्रत्येक वेलाजवळ मजबूत बांबू वेलाच्या नैऋत्येकडे (दक्षिण - पश्चिम कोपरा) रोवावा. वाढणारे वेल बांबूला बांधून ठेवण्याची एक पद्धत असते. हे वेल वाढीच्या टोकांकडचा फुटभर भाग नेहमी झुकता ठेवीत, त्याखाली बांधत जावे.

वेल चाल घेण्याच्या आधी मांडव तयार हवा. वेलीचा शेंडा खुडेपर्यंत त्याची जाडी पुरेशी जाड हवी, म्हणजे निश्चित घड मिळतील. म्हणून वेल भरत वाढत गेला पाहिजे. ३ फूट ते ५ फुटापर्यंतची वाढ जोरात झाली पाहिजे.

पहिल्या फुटांत ४ पानावर बगल फूट थांबवावी. नंतरच्या फुटात ५ पानावर, अशा रितीने ५ फुटपर्यंत वेल भरून घ्यावा. पाच फुटानंतरचा शेंडा १५ -२० दिवस लोंबत टाकावा. दरम्यान खोड जाड होते. पायाच्या आंगठ्याप्रमाणे ते जाड झाले तर उत्तम पीक येईल. पाच फुटाजवळ थांबविल्याने खोड चांगले भरते. यानंतर ५ फुटावर टॉंपींग करताच जोरात फुटते. त्याच्या वाढीसाठी नियमित अन्नपुरवठा या पानावाटे चालू राहतो. टॉंपींग केल्यानंतर ज्या दोन फुटी जोमात वाढतात, त्या साधारण १।। फूट वाढल्यानंतर आडव्या तारेवर बांधून घ्याव्यात आणि त्यांची वाढ ८ -१० पानाची झाल्यावर ७ पानावर टॉंपींग करावे. म्हणजे दोन्ही बाजूचे ओलांडे स्थिरावतात आणि त्यावरील १४ -१५ काड्या उत्तमप्रकारे वाढतात मे अखेरपर्यंत इतकी वाढ झाली तर बागेस निश्चित माल मिळतो.

द्राक्ष बाग केव्हा लावणार:

द्राक्ष उत्पादन निर्यातीच्या दृष्टीकोनातून करतेवेळी प्रामुख्याने त्ये देशांमधील बाजारपेठेची माहिती मिळवून कोणत्यावेळी मागणीनुसार पुरवठा केल्यास विक्रीदार जास्त मिळेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. साधारणत: दक्षिण आफ्रिका, चिली, ऑस्ट्रेलिया इ. देश अग्रेसर आहेत. या देशांचा माल जानेवारीमध्ये च युरोपीय देशामधील मार्केटमध्ये येत असल्यामुळे साहजिकच त्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते, कारण जानेवारी ते मार्चमध्येच द्राक्षांना जास्त प्रमाणत मागणी असते. आपल्याकडे द्राक्षाचा हंगाम मार्च ते मे पर्यंत चालतो. परंतु जर का डिसेंबरअखेर किंवा जानेवारीमध्ये आपण द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकलो तर आपल्या द्राक्षास प्रचंड मागणी राहिलेली आहे व राहणार आहे. हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार्‍या अनेक द्राक्ष बागाईतदारांनी अनुभवले आहे. तेव्हा या बाबी ध्यानात घेऊन द्राक्ष लागवड केल्यास अधिक फायदेशीर ठरणार आहे.

द्राक्ष बाग लागवडीची पूर्वतयारी :

द्राक्षबाग लागवडीपूर्वी मार्च - एप्रिलमध्ये उत्तम मशागत करून सध्या प्रचलित असलेल्या वाय (Y) पद्धती मांडवाची उभारणी करावी. यासाठी लागवडीचे अंतर १०' x ६', १२' x ६' किंवा ९' x ६' निवडावे. यापेक्षा लागवडीतील अंतर कमी - अधिक झाल्यास पुढे पिकाच्या उत्पादनावर त्याच परिणाम होतो. लागवडीतील अंतर अधिक झाल्यास काही ठिकाणी असे आढळले आहे की, जमिनीच्या सुपीकतेनुसार काही काळाने वेलीच्या शेंड्याचा जोर कमी होत जातो. परिणामी ५ -६ वर्षानंतर द्राक्षामध्ये सौरजळ होण्याचा संभव असतो.

द्राक्ष लागवडीसाठी निवडलेल्या अंतरावर चार किंवा नांगराने खोल तास मारावे. चार किंवा खोल तास घेण्याचे कारण म्हणजे द्राक्षाची उत्पादकता व कार्यक्षमता ही द्राक्षाच्या मुळांच्या कार्यावर अवलंबून असते. जेवढी द्राक्षाच्या झाडांची मुळे खोलवर पसरतील तेवढी उत्पादकता व कार्यक्षमता जास्त वर्षापर्यंत चालू राहते. नांगराच्या तासापेक्षा चर खोल असल्याने ते अधिक फायदेशीर ठरतात. चर साधारणपणे २।। x २।। फूट किंवा ३ x ३ फुटाचे घ्यावेत. नांगराने तास एवढे खोल जात नसल्याने अशा तासांमध्ये लागवड केल्यावर ३ फुटाखालील थर कडक असल्याने मुळ्याची वाढ त्याच्या खाली होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ५ -७ वर्षानंतर वर्षानुवर्ष बागांची उत्पादकता घटत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र सर्वांनाचा चर घेणे जमेल असे नसल्याने कमीत कमी नांगराने खोल तास मारून लागवड करावी. द्राक्ष हुंडी तयार केलेली असल्यास खड्डे घेऊनही लागवड करणे सोईचे व फायदेशीर ठरते. यासाठी खड्डे २ x २, २।। x २।।, किंवा ३ x ३ फुटाचे घ्यावेत.

चर / खड्डा भरणे :

चर घेतल्यानंतर त्यामध्ये एकरी २० टन चांगले कुजलेले शेणखत + २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. शेणखत कमी प्रमाणात असल्यास कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस त्या प्रमाणात वाढवावा. तसेच या खतासोबत १५० ते २०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो मॅग्नेशियम सल्फेट, ५० किलो फेरस सल्फेट, २५ किलो झिंक सल्फेट, ५ किलो बोरॅक्स, २५ किलो फॉलीडॉंल डस्त या प्रमाणात वापरावे. खत देताना अर्धी मात्रा मातीत मिसळून चर किंवा खड्डे भरून घ्यावेत व उरलेली अर्धी मात्र चराच्या किंवा खड्ड्याच्या तोंडाशी द्यावी.

त्यानंतर पाण्याने चार/ खड्डे ओलावून घ्यावेत वे वापसा आल्यानंतर चराच्या ( ओळीत ) मध्यभागी दोरीने खुणा कराव्यात. या ठिकाणी हुंडी बसेल एवढे खड्डे घ्यावेत.

निरोगी, जोमदार, मुळे भरपूर असलेली पन्हेरी निवडून ती लागवडीच्या वेळी जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + १० लि. द्रावणात या प्रमाणात भिजवून (बुडवून) घेऊन लावावी. तसे शक्य झाले नाही तर हेच द्रावण हुंडी लागवडीनंतर प्रत्येक हुंडीवरून ५० मिली द्रावण ( ड्रेंचिंग करावे ) ओतावे. हुंडी लागवडीनंतर खड्डा उकरलेल्या मातीने हुंडी दाबून बसवावी व हलके पाणी द्यावे.

जाती : महाराष्ट्रात सुरुवातीला भोकरी, फकडी आणि बंगलोर पर्पल या जाती लागवडीखाली होत्या. नंतरच्या काळात अनाबेशाही, काळी साहेबी आणि चिमा साहेबी या जातींची लागवड झाली. या सर्व जाती आता मागे पडल्या असून थॉम्पसन सीडलेस, किशमिश चोर्नी, फ्लेम सीडलेस, तास ए- गणेश, सोनाका या जातींची लागवड सर्वांत जास्त प्रमाणात केली जात आहे. काही प्रमुख जातींची माहिती खाली दिलेली आहे.

१) थॉम्पसन सीडलेस :

भारतात या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर फार फायदेशीर ठरलेली आहे. द्राक्षाच्या बिनबियांच्या जातींमध्ये उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी ही जात आहे. या जातीचे उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन असून घड मध्यम, भरगच्च मण्यांनी भरलेला असतो. परंतु मण्यांच आकार लहान असतो. मण्यांचा आकार वाढविण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी आणि जिब्रेलिक अॅसिड यांचा वापर केल्यास घडाचे वजन जवळजवळ दुप्पट वाढते. साखरेचे प्रमाण २० ते २२% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीच मोठ्या प्रमाणावर वापर केला जोतो.

२) अनाबेशाही :

भारतात ही जात प्रसिद्ध असून आंध्र प्रदेशात हैद्राबाद सभोवतालच्या प्रदेशात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ टनांपर्यंत असून घडाचा आकार मध्यम, मणी मोठे, टपोर्‍या आकाराचे, फिकट पिवळ्या रंगाचे असतात. यात साखरेचे प्रमाण १५ ते १६ % असून साल जाड, चिवट आणि गर घट्ट असतो. ही जात वाहतुकीला सोयीची असल्यामुळे भारतात सर्व राज्यांत पाठविण्यास चांगली आहे.

३) गुलाबी :

या जातीला मस्कती स्वाद असून ही जात रस तयार करण्यासाठी चांगली आहे. घड निमुळत्या आकाराचे असून मणी मध्यम आकाराचे आणि काही मणी बिनबियांचे असतात. घडामध्ये मणी विरळ भरलेले असून मणी एकसारख्या आकाराचे नसतात. मणी एकाच वेळी पक्क होत नाहीत. या जातीचे हेक्टरी उत्पादन ८ -१० टन येते.

४) बंगलोर पर्पल :

काळ्या गुलाबी रंगाच्या द्राक्षांत ही जात प्रसिद्ध आहे. हेक्टरी उत्पादन २० ते ३५ टन येत असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या या जातीखालील क्षेत्र जास्त आहे. या जातीवर करपा रोग येत नसल्यामुळे पावसाळी प्रदेशातील लागवडीस योग्य आहे. मणी गोलाकार, मोठा असून रंग लालसर काळा असतो. साल जाड, गर घट्ट आणि साखरेचे प्रमाण १८% असून द्राक्षाची प्रत तितकी चांगली नाही. या जातीचा वापर प्रामुख्याने मद्य तयार करण्यासाठी करतात.

५) काळी साहेबी :

या जातीचा घड मोठा असून घडत काळ्या रंगाचे लांबट मणी विरळ असतात. ही जात उशिरा तयार होणारी असून साखरेचे प्रमाण १८ -२०% असते. मणी एकाच वेळेला पक्क होत नाहीत.

६) फकडी :

ही जुनी जात असून घड मोठ्या आकाराचे परंतु विरळ मण्यांनी भरलेले असतात. साल नाजूक व पातळ असून प्रतीला फारशी चांगली नाही. मात्र रसाकरिता चांगली जात आहे.

७) तास - ए - गणेश :

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे ही जात थॉम्पसन सीडलेस जातीमधूनच निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली. या जातीचे घड घट्ट नसून मणी आकाराने लांब, सोनेरी रंगाचे व साठवणुकीस योग्य असतात.

८) सोनाका :

ही जात नानज, जिल्हा सोलापूर येथे थॉम्पसन सीडलेस या जातीमधून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे पानांचे देठ तांबूस असून मणी १ ते १.५ इंच लांबीचे, टपोरे, पातळ सालीचे असतात. मण्यांचा रंग पिवळसर तांबूस असून देठ मजबूत असल्यामुळे वाहतुकीस योग्य अशी जात आहे. साखरेचे प्रमाण २४ ते २६% असल्यामुळे बेदाणे करण्यास चांगली जात आहे.

९) किशमिश चोर्नी :

या जातीस शरद सीडलेस नावानेही ओळखले जाते. मूळची ही जात रशियन असून रंगाने काळी आणि बिनबियांची आहे. लवकर तयार होणारी ही जात मनुके करण्यासाठी उत्तम आहे.

१० फ्लेम सीडलेस :

ही जात काळ्या रंगाची (पूर्ण पिकल्यावर) व बिनबियांची आहे. लवकर तयारी होणारी गोड अशी ही जात थोड्या काळात लोकप्रिय झाली आहे.

या जातींव्यतिरिक्त मद्यनिर्मितीसाठी काही खास जातींची लागवड शँपेन/इंडेज वाइन्स यांनी नारायणगाव परिसरात केली आहे. त्यात चारडोणी पिनो वळा, मेरलाट, कॅबरनेट या जातींचा समावेश आहे.