द्राक्षाचे आरोग्यविषयी महत्त्व

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


उत्कृष्ठ आहारमुल्य व औषधी गुणांचा समन्वय म्हणजे द्राक्षफळ होय. आपल्या दैनंदिन आहारामध्ये फळांचा समावेश असणे हे आहाराच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्या शरीरास लागणारी पोषकतत्वे आणि औषधी तत्वे ही फळांतून मिळतात. त्यामुळे आपले शरीरास लागणारी पोषकतत्वे आणि औषधी तत्वे हि फळांतून मिळतात. त्यामुळे आपले शारिरीक आजारापासून व विकृतीपासून संरक्षण होते. सफरचंद, आंबा, मोसंबी, पपई, आवळा, चिकूप्रमाणे द्राक्षामध्येही शरीरास पोषण आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा आहारात आवश्य समावेश करावा. द्राक्षापासून बनवलेले प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. मनुके, वाईन, रस हे ही पोषक आहेत.

आयुर्वेदिक महत्त्व: प्राचीन काळात बृहत्संहिता, कौटिल्याचे अर्थशास्त्र, धन्वंतरी निघंटू व कालीदासाचे (खिस्तपूर्व सुमारे ५७ वर्षे) वाड्मयात द्राक्षाचा उल्लेख आहे. शारंगधरच्या उपवन विनोद आणि सूरपालच्या 'वृक्षायुर्वेद' या संस्कृत ग्रंथात द्राक्षाचा उल्लेख आहे. आयुर्वेदात 'द्राक्षसव' व ' द्राक्षरिष्ठ' यांचे महत्त्व सांगितले आहे. द्राक्षारिष्ठ छातीच्या सर्व रोगांवर विशेषत: क्षयरोगावर उपयुक्त आहे. द्राक्षसव पौष्टीक असून त्यात 'अ' जीवनसत्व आहे. कावीळ झालेल्या रोग्यांनी आहारात मानुक्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्ये मनुक्याचे वर्णन आगशामक, पाचक, गोड, शितल, स्वादिष्ठ असून त्यामुळे तहान, कफ शरीरातील उष्णता व अशक्तपणा कमी होतो. तसेच द्राक्षे शीतवर्य, ब्रहण, कण्ठय. वृष्य, विरोचनोपण व रक्तशोधाक आहेत. द्राक्ष सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. तसेच मूळव्याध, रक्तशुद्धी, डोळ्यांची थकावट तसेच रसाचा उपयोग पंडूरोगावर होतो. पक्व द्राक्षे ही स्वराला हितकर, मधूर, तृप्ती देणारी, पचन होतेवेळी स्निग्ध डोळ्याला हितकर, मुत्राचे प्रमाण वाढवणारी, सौचाला साफ करणारी, पौष्टीक, केसांना हितकर, पित्तशामक, शीतगुणी, पथ्थकारक, श्रमहारक आहेत.

सुकविलेली द्राक्ष (मनुका/ बेदाणा) पुष्ठी, तृष्ठी करणारी व बलवर्धक व ओजकर आहेत. काळी द्राक्षे शितगुणी हृदयाला बल देणारी. वीर्यवर्धक, गॅसेस शरीराबाहेर काढणारी स्निग्ध, हर्षप्रद, श्रमनाशक असून दाह कमी करणारी आहेत.

आधुनिक महत्त्व: द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण कमी असून तेही लोह नैसर्गिक स्वरूपात असल्याने त्याचे शोषण पचन व परिवर्तन सहज, चटकन व परीपुर्ण होते. म्हणूनच अॅनिमिया व रक्ताल्पता या विकारात द्राक्षसेवन लाभदायक ठरते.रोज ३०० सी.सी. द्राक्षस्वरस ३ -४ महिने घेतल्यास शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

रक्तशुद्धी द्राक्षातील मैलीक, सायट्रिक, टाटॉंरिक ह्या आम्लामुळे होते. तसेच त्यामुळे आतडी आणि मुत्रपिंड याच्या कार्याला चालना मिळते व मुत्राचे प्रमाण वाढते. त्याचा निचारही योग्य तर्‍हेने होते असल्याने मुत्राचेही काही विकार बरे होतात.

द्राक्षाच्या अंगी लँक्झेरिव गुण असल्याने द्राक्ष कॉन्सिटपेशन या विकारामध्ये ते उपयोगी पडते, त्यामुळे मूळव्याधीचा त्रासही कमी होतो. द्राक्ष पित्तनाशक व पित्तशामक (अॅटासिड) असल्याने त्याच्या सेवनाने पोटातील तसेच डोळे आणि हाताचे व पायाचे तळवे यांच्यामध्ये जाणवणारी जळजळ कमी होते. शरीरातील कडकी कमी होते. रक्त शुद्ध आणि थंड झाल्याने त्वचारोगावरही त्याचा उपयोग होतो. द्राक्षामध्ये असणार्‍या फॅनॉलीक्समुळे हृदयाचे रोग होत नाहीत. तसेच सतत द्राक्ष सेवनाने हृदयास बळ मिळते.

रेडवाईन जर दररोज प्रमाणात सेवन केली तर शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालते आणि रक्तदाबासारखी व्याधी होत नाही. तसेच शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण व्यवस्थित राहून शरीरास स्थूलपणा तसेच जडत्व येत नाही.

द्राक्षातील पोषक तत्वे - द्राक्षामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडीयम, लोह, क्लोरीन, अॅसिड, ग्लुकोज, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, सेलेनियम, फॉस्फरस, बोरॉन तसेच विटामिन ए. सी. फोलेट, फिनॉल, कार्बोहायड्रेट ही शरीरास उपयुक्त घटकद्रव्ये, पोषकद्रव्ये व पोषकतत्वे आहेत.

१०० ग्रॅम ताजी द्राक्षे व बेदाणा / मनुका यामध्ये घटकद्रव्ये पुढीलप्रमाणे (टक्केवारीमध्ये) असतात.

घटकद्रव्ये   ताजी द्राक्ष   बेदाणा/ मनुका  
पाणी   ८५.५   १८.५  
पिष्टमय पदार्थ   १०.२   ७७.३  
प्रथिने   ०.८   २.०  
स्निग्धांश   ०.१   ०.२  
खनिजद्रव्ये   ०.१   २.०  
तंतूमय पदार्थ   ३.०   -  
चूना   ०.३   ०.१  
स्फूरद   ०.०२   ०.०८  
लोह   ०.२   ४.०  
उष्मांक (कॅलरी)   ४   ३१९  
जीवनसत्व 'अ'   १५ मि. ग्रॅ.   -  
जीवनसत्व 'ब '   ४० मि. ग्रॅ.   ६० मि. ग्रॅ.  
जीवनसत्व 'क'   ३ मि. ग्रॅ.   ६० मि. ग्रॅ.  
रिबोप्लेवीन   ०.३ मि.ग्रॅ.   -  
निकोटीन आम्ल   ०.३ मि.ग्रॅ.   -  


अलीकडे द्राक्षाच्या कॅन्सरवर उपाय महणून काम चालले आहे. यात विशेषत: रंगीत जातीचा वापर केला जात आहे. द्राक्षापासून काढलेल्या रसाचासुद्धा उपयोग हाडांच्या वाढीसाठी होतो तसेच अॅलर्जी रोधक महणून सुद्धा करता येतो.